शीडजहाज शर्यत-मार्ग

शीड जहाज शर्यती : (यॉटिंग). छोट्या शिडांच्या क्रीडानौकांची शर्यत. हा प्रामुख्याने सहभागीत्वाचा क्रीडप्रकार आहे. अठराव्या शतकात यासंबंधीची एक संस्था (क्लब) स्थापन झाली होती परंतु आधुनिक शीडजहाजांच्या शर्यती खऱ्या अर्थाने एकोणिसाव्या शतकात सुरू झाल्या.

या शर्यतीचा मार्ग पुढील आकृतीत दाखविल्याप्रमाणे असतो. दोन तरंगखुणांमधील (बोयऱ्यांमधील) अंतराचा हा मार्ग असतो. शर्यतीची सुरुवात व शेवट त्याच्या कक्षेत होते. शर्यत पूर्ण करण्यासाठी ठराविक कालमर्यादा असते. शर्यतीला दिशा देईपर्यंत शीडजहाजाला आरंभरेषेच्या मागे स्थिर ठेवणे जिकिरीचे असते. लाटा, वाऱ्याची दिशा व जवळपासचे अडथळे यांचा विचार करून होडी दहा मिनिटे योग्य स्थितीत सज्ज ठेवण्यासाठी कर्णधाराला (हेल्म्समन) खूपच कौशल्य वापरावे लागते. वाऱ्याच्या दिशेने होडी उच्चतम वेगाने हाकारणे, यात कर्णधाराची खरी परीक्षा असते. हवेचे परीक्षण करून व शर्यतीचा अंदाज घेऊन उत्तम आरंभ करणे, हा या शर्यतीमधील महत्त्वाचा घटक असतो.   

शीडजहाज शर्यतीचे एक दृश्यशर्यत सुरू झाली की, एकमेकांच्या होड्यांची टक्कर होऊ नये वा तीत इतर अडथळे येऊ नयेत म्हणून पुढील काही नियम पाळावे लागतात. : (१) जेव्हा गलबताच्या डाव्या बाजूच्या शिडाला दोरी बांधली जाते, तेव्हा उजवी बाजू पूर्णपणे मोकळी ठेवली पाहिजे. (२) दोन जहाजांची टक्कर टाळण्यासाठी वाऱ्याच्या दिशेने (अपवर्ड) जाणाऱ्या जहाजाने वाऱ्याच्या मागून (डाउनवर्ड) येणाऱ्या जहाजासाठी योग्य अंतर राहील, याची काळजी घेतली पाहिजे. तसेच मागील बाजूने येणाऱ्याजहाजाने पुढील जहाजासाठी योग्य अंतर राखून ठेवले पाहिजे. (३) पुढील जहाजाला ओलांडून (ओव्हरटेक) जावयाचे असल्यास योग्य संधी साधून पुढे जावे व मागे पडणाऱ्या जहाजाशी योग्य अंतर राखावे. तसेच मागे पडणाऱ्याजहाजाला न घाबरवता पुढे जावे परंतु पुढे जाणाऱ्याजहाजाने मागील जहाजाचा वळण्याचा (टर्न) हक्क डावलू नये. विशेषतः दोन होड्या जेव्हा बरोबरीने जात असतात (त्यांच्या डोलकाठ्या बरोबरीने असतात), तेव्हा पुढे जाणाऱ्या. जहाजाच्या कप्तानाने ही काळजी घेणे जरुरीचे आहे. याबाबत दुर्लक्ष झाल्यास तक्रार नोंदवता येते. यावर एक उपाय म्हणजे ज्या जहाजाला मार्ग बदलावयाचा आहे किंवा बाजू बदलावयाची आहे, त्याने शीड भरताना दुसऱ्या जहाजाला अडथळा होईल, असे काहीही करता कामा नये. (४) खुणा (तरंगखुणा, बांधून ठेवलेले जहाज किंवा दांडे) – जेव्हा शर्यतीचा शेवट अत्यंत जवळ आलेला असतो व उरलेले कमीत कमी अंतर कापण्याचा प्रयत्न ईर्षेने चालू असतो (लांबचा मार्ग टाळण्यासाठी), त्या वेळी शर्यतीच्या मार्गावरील खुणांमध्ये (उदा., तरंगखुणा, बांधून ठेवलेले जहाज किंवा दांडे इ.) जहाजांची रेटारेटी होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. जर पुढील जहाजाने जागा दिली नाही, तर मागून येणाऱ्या जहाजाने या खुणांच्या मधून पुढील जहाजापुढे जाण्याचा प्रयत्न करू नये. (५) सुरक्षित व चांगल्या खेळासाठी स्पर्धक होड्या जेव्हा काही अडथळ्यांजवळ किंवा उथळ पाण्याजवळ येतात, तेव्हा पुढे जाण्यासाठी कोणताही धोका पत्करू नये, अशा वेळी होडीने ‘पाणी ऽऽ’ (वॉटर) अशी साद घालावी लागते. तसेच असे केले आहे, याबाबत शर्यत-समितीची खात्री पटली पहिजे. खुणेच्या जवळ जी होडी योग्य मार्गाने जात आहे, त्या होडीला मागील होडीने ओलांडण्याचा प्रयत्न करू नये.

आधुनिक जहाज प्लॅस्टिकपासून तयार केलेले असते व त्याचे सुटे भाग हे ॲल्युमिनियमचे किंवा कार्बनी फायबरचे असतात. ‘शीड’ हे डेक्रान, मायलर किंवा नायलॉनचे असते. ऑलिंपिक स्पर्धांसाठी चार वेगवेगळ्या प्रकारची गलबते असतात. (१) उत्तर-पश्चिम जोराच्या वाऱ्यात जाणारे शीडजहाज (मिस्ट्रल सायबोर्ड), (२) छोटी होडी (डिंगी), (३) कणा वर होणारे जहाज (कीलबोट), (४) दोन होड्यांचे युग्म (कॅटमरान). 

गुणांकन-पद्धती : शीडजहाजाच्या स्पर्धांसाठी ऑलिंपिक सामने व नेहमीच्या इतर स्पर्धा यांच्या गुणांकन-पद्धती वेगवेगळ्या असतात. प्रत्येक प्रकारात या शर्यती घेतल्या जातात. कमीत कमी एकूण गुण मिळालेले जहाज शर्यत जिंकते. या गुणांकन-पद्धती पुढीलप्रमाणे :-

सर्वांत कमी गुण 

ऑलिंपिक क्रीडा सामने 

सर्वसामान्य इतर शर्यती 

प्रथम क्रमांक 

०·७५

द्वितीय क्रमांक 

तृतीय क्रमांक 

५·७

चौथा क्रमांक 

पाचवा क्रमांक 

१०

सहावा क्रमांक 

११

७६

सातवा व त्यापुढील क्रमांक शेवट ज्या क्रमांकावर झाला.  

समुद्रविहार : (क्रूइझिंग). आनंदासाठी केलेले पर्यटन म्हणजे समुद्रविहार. स्पर्धा नसलेली शीडजहाजाची ही एक वेगळी बाजू. यामध्ये एका बंदरापासून दुसऱ्या बंदरापर्यंत प्रवास करावा लागतो. या खेळात होडी एक रात्र समुद्रातच असली पाहिजे. समुद्रविहाराचा हा क्रीडाप्रकार सार्वत्रिक असून तो व्यवस्थितपणे नियोजित केलेला असतो. याशिवाय महासागरातील शीडजहाज स्पर्धा (ओशन रेसिंग), बर्फामधील शीडजहाज स्पर्धा (आइस यॉटिंग) व वाळूतील शीडजहाज स्पर्धा (सँड यॉटिंग) हेही प्रकार आहेत.

पहा : नौकाक्रीडा.

 कुलकर्णी, द. वि.