आट्यापाट्या: एका संघातील खेळाडूंनी दुसऱ्या संघातील खेळाडूंना ठराविक जागेमध्ये (पाटीत) अडविणे व अडविलेल्या खेळाडूंनी हुलकावणी देऊन निसटून जाणे, अशी स्थूल रूपरेषा असलेला महाराष्ट्रीय खेळ. या मैदानी खेळात कोंडी, हुलकावणी, शिवाशिवी अशा प्रकारांचा समावेश होतो. संत तुकारामाच्या काळी हा खेळ प्रचलित होता, असे त्याच्या अभंगातील वर्णनावरून दिसते.

पूर्वी या खेळासाठी सर्वमान्य नियम नव्हते. पुण्याच्या डेक्कन जिमखान्याने हा खेळ सुधारून त्याचे १९१४ मध्ये अधिकृत व नियमबद्ध अखिल भारतीय सामने सुरू केले. १९१८ मध्ये बडोद्याच्या हिंदविजय जिमखान्यानेही सामन्यांसाठी वेगळे नियम केले. १९३५ पासून अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळाने या खेळाला आधुनिक, आकर्षक, संघटित व शिस्तबद्ध स्वरूप दिले. एकेरी आट्यापाट्यांची नवीन पद्धत याच मंडळाने सुरू केली. आज त्यांच्या नियमांनुसारच हा खेळ सर्वत्र खेळला जातो.

आट्यापाट्यांचे क्रीडांगण प्रचलित नियमांनुसार सूरपाटी व इतर नऊ पाट्यांत विभागलेले असते (आ. १). खेळ जेथून सुरू होतो त्या पाटीला चांभारपाटी वा कपाळपाटी म्हणतात. शेवटच्या पाटीला लोणपाटी म्हणतात. सर्व पाट्यांना दुभागून जाणाऱ्या पाटीस मृदंगपाटी व सूरपाटी व त्यावरील खेळाडूस मृदंग वा सूर म्हणतात.

खेळाडूंचे दोन संघ असतात व त्यांत प्रत्येकी नऊ खेळाडू असतात. अधिकृत सामन्याच्या वेळी प्रत्येकी पाटी, सूरपाटी व चांभारपाटी यांसाठी एकेक असे एकूण आठ पंच व एक सरपंच असतो. याशिवाय वेळाधिकारी व गुणलेखकही असतो.

आट्यापाट्यांचे क्रीडांगण: अ- आ: चांभारपाटी वा कपाळपाटी ए-ऐ: लोणपाटी (या दोन्ही पाट्यांची लांबी ७.०३ मी.) क-ख : सूरपाटी वा मृदंगपाटी (२७.१५ मी.) ग-घ: पाटी अंतर (३.३५ मी)

खेळीत खेळणारे (लोणवाले) चांभारपाटीकडून लोणपाटीकडे खेळत जाऊन लोणपाटीकडून उलटून चांभारपाटीकडे खेळत येतात. त्यांनी चांभारपाटी ओलांडली, की लोण होते. प्रतिपक्षातील खेळाडू (पाटीवाले किंवा पाट्या धरणारे) पाट्यांवर उभे राहून लोणवाल्यांना अटकाव करून लोण न व्हावे असा प्रयत्न करतात. लोणांवरच डावाचा निर्णय अवलंबून असतो. सूरवाल्याला प्रतिस्पर्ध्यास चोहोंकडून कोठेही मारता येते पण पाटी धरणाऱ्या खेळाडूस मात्र प्रतिस्पर्धी मागच्या घरात गेल्यानंतर मारता येत नाही.

प्रत्यक्षात ओलीसुकी होऊन खेळाला सुरुवात होताच पाटीवाल्या संघातील सूर झपाट्याने दुसऱ्या पाटीला स्पर्श करून परत फिरतो. या क्रियेला कांडे चिरणे असे म्हणतात. कांडे चिरल्याशिवाय सूराला गडी मारता येत नाही. सूराचे कांडे चिरणे होईपर्यंत खेळणारांपैकी बहुतेक खेळाडू तिसरी पाटी धरणाऱ्यापर्यंत येऊन पोहोचतात. अशा वेळी सूर तिसऱ्या पाटीवाल्याच्या मदतीने कोंडी करून खेळाडूंना अडवितो यासच कोंडी धरणे म्हणतात (आ. २). अशी कोंडी खेळात केव्हाही व कोठेही होऊ शकते. पाटीवाले कोंडी करून लोणवाल्यांना अडविण्याचा तसेच शिवून बाद करण्याचा प्रयत्‍न करतात. अशा रीतीने लोण न होता जर लोणवाला संघ बाद झाला, तर पाटीवाल्यांना लोण करण्याची संधी मिळते. पाटीवाल्यांनी केलेली कोंडी फोडण्याचे हुलकावण्या, पडउड्या असे अनेक मार्ग आहेत. तिसऱ्या पाटीत कोंडी असताना काही खेळाडू लोणपाटीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्‍न करतात. लोणपाटी गाठलेला खेळाडू (यासच पक्का खेळाडू म्हणतात) पाटीवाल्याच्या मागे जाऊन ‘तोंड’ असा शब्द उच्चारतो, यास तोंड मागणे असे म्हणतात. मग पाटीवाला तोंड फिरवतो. खेळणारा त्या पाटीतून लोण घेऊन पाट्या ओलांडत चांभारपाटी गाठण्याचा प्रयत्‍न करतो. त्यावेळी सूर पहिली कोंडी सोडून पक्का खेळाडू ज्या पाटीत असेल त्या पाटीत कोंडी धरतो. लोणपाटीपर्यंत न पोहोचलेल्या कच्च्या खेळाडूस पक्का खेळाडू लोण पोहोचवतो. हे लोण पक्का व कच्चा खेळाडू एकाच कांड्यात वा चौकात असतील तरच पोहोचते. अशा रीतीने एकाकडून दुसऱ्याकडे लोण सरकवत चांभारपाटी ओलांडली, की लोण पूर्ण होते. यानंतर बाकीच्या खेळाडूंना चांभारपाटीपर्यंत खेळत येण्याची जरूरी नसते. प्रतिपक्षावर किती लोणे लागली, यावर निर्णय ठरतो. खेळाचा अवधी सात मिनिटांचा असतो. या अवधीत लोण अपूर्ण राहिल्यास खेळणारांनी जितक्या पाट्या ओलांडल्या, त्या पाट्यांचे प्रत्येकी एक याप्रमाणे गुण मिळतात.

हा खेळ मनोरंजक, भरपूर व्यायाम करून देणारा व बिनखर्ची आहे. वैयक्तिक चापल्य व सांघिक कौशल्य यांची कसोटी यात लागते. तसेच शारीरिक व मानसिक अनुसंधानाचेही शिक्षण मिळते.

धारूरकर, य. ज.

भाबी आट्यापाट्या : हा आट्यापाट्या खेळाचाच सोपा व सुटसुटीत प्रकार आहे. आट्यापाट्यांमध्ये तोंड मागण्याची पद्धत आहे तर भाबी आट्यापाट्यांमध्ये तोंड

आ. २. कोंडी धरणे

मागताना ‘भाबी’ म्हणण्याची पद्धत आहे. त्यावरूनच ह्या खेळास भाबी आट्यापाट्या हे नाव पडले आहे. त्याची प्रमुख तत्त्वे आट्यापाट्यांप्रमाणेच असली, तरी काही नियमांत फरक आहे. आट्यापाट्यांसाठी नऊ पाट्या लागतात तर भाबी आट्यापाट्यांचे क्रीडांगण सात पाट्यांमध्ये विभागलेले असते. त्यास जागाही कमी लागते. या खेळात एखादा खेळाडू बाद झाला तरी सबंध संघाचा डाव संपला, असे धरण्यात येते. त्यामुळे प्रत्येक खेळाडूस कौशल्य पणाला लावून दक्षतापूर्वक खेळावे लागते. मात्र प्रत्येक संघास सहा वेळा खेळण्याची व सहा वेळा पाट्या धरण्याची संधी मिळत असते. ह्या खेळात दीडकांडे चिरण्याची पद्धत आहे. सूरवाल्याने दीडकांड्यास हाताचा वा पायाचा स्पर्श करावाच लागतो आणि तो स्पर्श करून त्याने चांभारपाटीजवळच्या छोट्या पावकांड्यास स्पर्श करावयाचा असतो. ह्या दोन्ही पाट्यांस स्पर्श करण्याच्या अगोदर सूरवाल्यास खेळणाऱ्या संघातील खेळाडूंस बाद करता येत नाही. पावकांड्यास स्पर्श केल्यानंतरही त्याला आपले तोंड व शरीर लोणपाटीच्या दिशेकडे फिरवावे लागते. त्यानंतरच तो चांभारपाटीवरील खेळाडूस बाद करू शकतो. ह्या खेळात खेळाडू जमिनीवर समांतर पडून गेल्यास तो बाद ठरवला जातो. त्याचप्रमाणे एकेरी पाटी चिरताना हात पाटीबाहेर टेकून गेल्यास किंवा पाटी ओलांडून गेल्यावर कमरेवरील शरीराचा भाग जमिनीस टेकल्यास तो खेळाडू बाद धरला जातो. ह्या खेळाच्या सामन्यांची व्यवस्था ठेवण्यासाठी सात पंच, दोन सरपंच, गुणलेखक व निरीक्षक अशा एकूण अकरा अधिकाऱ्यांची आवश्यकता असते. हा खेळ इंदूर, हैदराबाद, पुणे इ. ठिकाणी खेळला जातो. पुण्यात १९७० साली पुणे जिल्हा भाबी आट्यापाट्या संघाची स्थापना झाली. तेव्हापासून ह्या खेळाच्या स्पर्धा पुण्यात नियमितपणे भरतात. सुमारे २०० संघ त्यात भाग देतात. ह्या खेळाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.

पंडित, बाळ ज.