मुष्टियुद्ध : एक रोमहर्षक क्रीडाप्रकार. पूर्वी हा खेळ नुसत्या मुठींनी खेळत, श्रीकृष्ण-कंस , भीम-दुःशासन इत्यादींच्या मुष्टियुद्धांचे संदर्भ महाभारत काळात आढळतात. प्राचीन ग्रीसमध्ये थीरा येथील भित्तिलेपचित्रात (इ. स. पू. १५२०) मुष्टियुद्धाचे चित्रण आढळते. १८६० च्या सुमारास क्वीन्सबरीचा आठवा मार्क्विस जॉन शॉल्टो डग्लस (१८४४–१९००) याने बॉक्सिंगच्या स्वरूपात या खेळाला अधिक नियमबद्ध करण्यास प्रांरभ केला. ‘ब्रिटिश बॉक्सिंग बोर्ड ऑफ कंट्रोल’ ने १९२९ मध्ये तयार केलेल्या नियमांनुसार हा खेळ चालतो. त्याशिवाय ‘एबीए’ (अमॅच्युअर बॉक्सिग असोसिएशन), ‘ईबीयू’ (यूरोपियन बॉक्सिंग युनियन) व ‘डब्ल्यूबीसी’(वर्ल्ड बॉक्सिंग कौन्सिल) यांचेही नियम, वजनगट व इतर थोडेफार बदल यांसह आहेत.

जो फ्रेझियर विरुद्ध विजेता मुहम्मद अली लढत, मानिला, फिलिपीन्स, ऑक्टोबर १९७५.

मुष्टियुद्धाच्या खेळात दोन खेळाडू हातांत विशिष्ट प्रकारच्या, १७०·१० ते २८३·५० ग्रॅ.(सहा ते दहा औंस) वजनाच्या चामड्याच्या मुष्टी घालून परस्पंराना ठोसे देऊन, विशिष्ट वेळात हरविण्याच्या प्रयत्न करतात. आक्रमण आणि बचाव अशा दुहेरी अंगांनी त्यात खेळाडूचे कौशल्य पणास लागते. प्रत्येक नियमयुक्त ठोशास, ठोसा चुकविण्यास व खेळण्याच्या विशिष्ट प्रदर्शनीय पद्धतीस (म्हणजेच खेळाडूच्या शैलीसाठी) ठराविक गुण असतात. विजयी खेळाडूस २० गुण व प्रतिस्पर्ध्यास त्यांपेक्षा कमी गुण दिले जातात.

हा खेळ जमिनीपासून साधारणतः ०·७६ ते ०·९५ मी. (२ / फुट ते ३ फुट) उंच असलेल्या लाकडी चौरस रिंगणात चालतो. हे रिंगण ३·६५ मी. X ३·६५ मी. (१२ फुट X १२ फुट) किंवा ४·२६ मी. X ४·२६ मी (१४ फुट X १४ फुट) किंवा ६·१० मी. X ६·१० मी (२० फुट X २० फुट) असे चौरस असते. त्याच्या बाहेरील फलाट (प्लॅटफॉर्म) सु. ४६ सेंमी वाढता असावा. फलाटाचा वरचा भाग सु. १·९ सेंमी. मऊ गादीवजा आवरणाने आच्छादतात. त्याच्या चारही बाजूंना दोरांचे कुंपण असते. त्या दोन दोरांमधील अंतरही ४० सेंमी. (१ फुट ४ इंच) ते ५० सेंमी. (१ फुट ८ इंच) पर्यंत असते. हे दोर २ ते ४ पर्यंत असतात. खेळाडू या रिंगणाच्या बाहेर जाऊ शकत नाही. ४५ किग्रॅ. पेक्षा अधिक किंवा वय वर्षे १७ पेक्षा अधिक गटामध्ये ३ मिनिटांची एक खेळी व एक मिनिटाची विश्रांती असे तीन डाव असतात तर वय वर्षे १७ पेक्षा कमी किंवा ४५ किग्रँ. पेक्षा कमी वजनाच्या गटासाठी दोन मिनिटांची खेळी व एक मिनिटाची विश्रांती [२ + १ + २ + १ + २] असे तीन डाव असतात. आंतरराष्ट्रीय आणि खुल्या स्पर्धामध्ये तीन तीन मिनिटांचे २० डावही असतात. खेळाडूंचे प्रतिस्पर्धी साधारण तरी समान असावेत, म्हणून ४५ किग्रॅ. वजनापासून ८०·७३९ किग्रॅ. पर्यंत १२ गट असतात. या दोन गटात दोन किग्रॅ. पेक्षा अधिक अंतर नसते. खेळाडूने खिळे (स्पाइक्स) असलेले बूट, मांडीवर सैलसर चड्डी, जबड्याच्या आत ‘गमशील्ड’व कमरेखाली ‘सेंटरगार्ड’ ही संरक्षक साधने वापरावीत, असे स्थूल नियम आहेत.

मज्जातंतूंच्या भागावर, काळजावर, किंवा हनुवटीवर ठोसा बसला आणि दहा सेकंदांच्या आत खेळाडू पुन्हा खेळू शकला नाही, तर ठोसा मारणारा विजयी होतो. अद्ययावत नियमानुसार पंच ज्याप्रमाणे मध्येच खेळ थांबवून खेळाडूला समज देऊ शकतो, त्याप्रमाणे खेळासाठी नेमलेले डॉक्टरही खेळाडूला अपघाती इजेपासून वाचविण्यासाठी खेळ थांबविण्यास सांगू शकतात. जिंकलेल्या खेळीला ५ गुण असतात. दोन्ही खेळाडू बरोबरीचे असतील तेव्हा चढाई करणारा किंवा प्रदर्शनीय म्हणजे शैलीदर्शी ठोसे मारणारा विजयी होतो. एका खेळाडूच्या कमरेला निळा पट्टा असतो, तर दुसऱ्याच्या कमरेला तांबडा पट्टा असतो. पंच दोन्ही खेळाडूंचे हात धरून व विजयी खेळाडूचा एक हात वर उंच करून विजयी खेळाडू जाहीर करतात. खेळाडूंची शुश्रूषा करण्यासाठी प्रत्येकी एकेक साहायक असतो.


खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करून खेळाला प्रारंभ करतात. त्यावेळी डावा पाय पुढे व उजवा पाय मागे ठेऊन योग्य प्रकारे तोल साधतात. डावा हात पुढे पण खाद्यांपर्यत उंच नेऊन उजवा हात आडवा धरून हनुवटीचे संरक्षण करण्यासाठी आणि ठोसा देण्यासाठी तयार ठेवतात. हनुवटी ही प्रतिस्पर्ध्याचे प्रमुख लक्ष्य असते. डाव्या खांद्यानेही हनुवटीचे संरक्षण करता येते.

आक्रमक ठोशांचे सहा प्रकार आहेत : डाव्या हाताचा सरळ ठोसा स्वतःच्या वजनाच्या जोरावर करतात. डावा ठोसा (लेफ्ट हूक) कोपरात हात वाकवून फासळ्यांवर, किंवा पोटाच्या खळगीत मारतात. हा ठोसा आपल्या लक्ष्यावर नीट मारता यावा, म्हणून डावा हात नाकावर नेण्याचे किंवा उजवा ठोसा फासळ्यांना मारण्याचे आविर्भाव करतात. प्रतिस्पर्धी दोन्ही मुष्टींनी हल्ला करण्यासाठी अंगावर चालून आल्यास खालून वर निसटता ठोसा मारतात. याच प्रकारचे ठोसे उजव्या हाताने मारता येतात. परंतु खेळताना डाव्या हातापेक्षा उजवा हात मागे असल्याने ठोसा मारताना त्याला जास्त अंतर काटावे लागते. त्यामुळे फार वेळा उजवा हात वापरत नाहीत. उजव्या हाताचा सरळ ठोसा अनपेक्षित असल्याने अधिक परिणामकारक होतो. डाव्या हाताच्या ठोशानंतर लगेच उजव्या हाताचा दणका जबक्यावर ठेऊन देण्याच्या पद्धतीला ‘एक-दोन ठोसा’ असे म्हणतात. या खेळात प्रतिचढाई करूनच चांगले संरक्षण साधता येते. अंगावर येणाऱ्या खेळाडूला रोखण्यासाठी स्वतःच सरळ दणका देणे उत्तम. दोन्ही मुष्टींचा ढालीसारखाही उपयोग होतो. बाजूला सरकणे, खाली वाकणे, दूर जाणे, डोके बाजूला झुकविणे या हालचालींना संरक्षणात्मक महत्त्व असते. दोन्ही खेळाडू फार जवळ आले, किंवा एकमेकांना भिडले तर हातातून खाली निसटून जाऊन आखूड अंतरावरचे (शॉर्ट आर्म) ठोसे मारतात. खेळाडू जवळ येऊ लागताच डाव्या हाताने सरळ ठोसे मारून त्याला लांब सरकावयास भाग पाडता येते. खेळाडू रिंगणाच्या कोपऱ्यात सापडल्यास दोन्ही मुष्टींनी डोक्याचे आणि शरीराचे संरक्षण करीत त्याला कोंडीतून बाहेर पडता येते. बेंबीच्या खाली, मुष्टी उघडून हाताच्या तळव्यांनी, मनगटाने किंवा कोपराने ठोसे मारणे, डोक्याच्या मागे किंवा मानेवर मारणे, मूत्रपिंडावर मारणे, प्रतिस्पर्धी खाली पडल्यानंतर त्याला ठोसे मारणे, खेळाडूला धरणे, टक्कर देणे, धक्का देणे, कुस्ती खेळणे, पडलेल्या खेळाडूवर डोके किंवा शरीर झोकणे, हात किंवा मुष्टी पकडून दुसऱ्या हाताने ठोसे मारणे, ठोकरणे, कानांच्या दोन्ही बाजूंना दोन्ही हातांनी एकाच वेळी ठोसे मारणे, रिंगणाच्या दोऱ्यांचा दुरुपयोग करणे किंवा ठोसा बसलेला नसतानाच पडणे इ. मार्ग चोखाळले, तर खेळाडूला प्रथम समज देतात आणि तरीही न ऐकल्यास बादही करतात. खेळाडूस कोणत्या परिस्थितीत खेळता येत नाही, यासंबंधीचे काही प्रतिबंधात्मक नियम आहेत. उदा., स्थानिक भूल वा इंजेक्शन घेऊन खेळू नये एका डोळयाने अंध वा स्पर्श-भिंगे घातलेल्याने खेळू नये फीट अथवा अपस्मार पीडित तसेच बहिऱ्या वा जखमी व्यक्तीने खेळू नये, इत्यादी.

इंग्लंडमध्ये आधुनिक मुष्टियुद्धाच्या खेळाची बीजे आढळतात. प्रथम या खेळाला ‘बक्षिसासाठी युद्ध’ असे म्हणत असत. जेम्स फिग हा अनधिकृतरीत्या मुष्टियुद्धातला पहिला उत्कृष्ट खेळाडू (१७१९) असला, तरी सध्याच्या खेळाच्या दृष्टिकोनातून पाहिले, तर त्याला कोणी मुष्टियोद्धा म्हणूनही मानणार नाही. फिग एका जागेवर उभा राहून नुसत्या मुठींनीच दणके देऊन, कमरेला विळखा घालून प्रतिस्पर्ध्याला जमिनीवर फेकून देत असे. जॅक ब्रॉट्‌न (१७०४–८९) याने १७४३ साली मुष्टियुद्धाचे नियम व चामड्याच्या मुष्टी तयार केल्या. १८३८ साली या नियमांत सुधारणा करून खेळाचे दहशतवादी व हिंसक स्वरूप सौम्य करण्यात आले. जेम्स केली आणि जोनाथन स्मिथ यांचा मेलबर्न येथे १८८५ मध्ये झालेला सामना ६ तास चाललेला होता. त्यापूर्वी चेशर येथे १८२५ मध्ये जॅक जोन्स व पॅट्‌सी टनी यांच्यात २७६ खेळींचा सामना (४ तास ३० मिनिटे) होऊन पॅट्‌सीला पराभव पत्करावा लागला होता. ‘नॅशनल स्पोर्टिंग क्लब’ची स्थापना इंग्लंडमध्ये १८९१ मध्ये झाली. हा ब्रिटिशांचा खेळ म्हणून मान्यता पावला असला, तरी आजपर्यंत भरलेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांत रॉबर्ट ऊर्फ बॉब फिट्‌सिमन्झ या हेवी वेट (अतिवजनाच्या) गटातील खेळाडूचा अपवाद सोडला, तर अमेरिका, क्यूबा, यू. एस्. एस्. आर्. व जर्मनीचे खेळाडू विविध गटांत विजयी झालेले दिसतात. कॅशस क्ले ऊर्फ मुहम्मद अली, जो फ्रेझियर, सोनी लिस्टन, लॅरी गोम्स, रे रॉबिन्सन, तसेच भारतातील कौरसिंग (आशियाई सुवर्णपदक विजेता, १९८२) हे अलीकडील काही उत्कृष्ट नामवंत मुष्टियोद्धे होत.

संदर्भ : 1. Cokes, Curtis Kayser, Hugh, The Complete Book of Boxing for Fighters and Fight Fans, Plam Springs (Calif.), 1980.             2. Diagramgroup, Ed., Official World Encyclopedia of Games and Sports, London, 1979.             3. Fleischer, Nat Andre, Sam, A Pictorial History of Boxing, Socaucus, N. J., 1975.

आलेगावकर, प. म. गोखले, श्री. पु.