वडशी: (वडस, चराई). या मचूळ पाण्यातील माशाचा समावेश मेगॅलोपिडी कुलात होत असून याचे शास्त्रीय नाव मेगॅलॉप्स सायप्रिनॉयडीस असे आहे. इंडियन टार्पन, बिग आय, ऑक्स-आय हेरिंग किंवा सिल्व्हर किंग अशी विविध इंग्रजी नावेही याला आहेत. याचा प्रसार आफ्रिकेचा पूर्व किनारा, भारताचे दोन्ही किनारे, नदीमुखे व गोड्या पाण्यात तसेच श्रीलंका, चीन, क्वीन्सलँडचा किनारा येथे आहे. अमेरिकन टार्पनचा हा पूर्वेकडील प्रतिनिधी आहे. याच्या प्रौढाच्या डोक्याचा माथा काळपट निळसर हिरवा असून वय कमी असताना रंग फिक्कट असतो. याचे पोट रूपेरी रंगाचे असून त्यावर निळसर चमक असते. खवल्यांच्या कडा, तसेच पार्श्विक रेखा व डोक्याच्या दोन्ही बाजू चमकदार रूपेरी असतात. जबड्याचा मध्य काळा असतो. पाठीवरील व शेपटाचा पर करड्या रंगाचे असून त्यांवर काळ्या रंगाचे अगदी बारीक ठिपके असतात. परांच्या कडा काळसर असतात. छातीवरील खालचा व ढुंगणावरील पर पातळ व जवळजवळ पारदर्शक असून त्यांवर थोडे काळे ठिपके असतात.

वडशी खूप क्रियाशील मासा आहे. मुलटे मासे याचे विशेष आवडते खाद्य आहे. सामन माशाप्रमाणे प्रसंगी तो पाण्याबाहेर उसळी मारतो. याची सरासरी लांबी ३९ सेंमी. व वजन ४५० ग्रॅ. असते. ६१ सेंमी. पर्यंत लांबीचे व ९०७ ग्रॅ.पर्यंत वजनाचे काही मासे आढळले आहेत. क्वीन्सलँड किनाऱ्यावरील मासे १.५ मी. लांबीचे असतात. वडशी गोदावरी व कृष्णा नद्यांमध्ये १०० किमी. तर कावेरी नदीत मेत्तूर धरणापर्यंत म्हणजे ४०० किमी. आत येतो.

वडशी खाड्यांच्या तोंडाशी समुद्रकिनारी आपली अंडी घालीत असावा व त्यानंतर पावसाळ्याच्या सुरूवातीला (जून महिन्यात) त्याची लक्षावधी पिले खाड्यांच्या मुखांतून गोड्या पाण्याच्या लहान लहान डबक्यांत शिरतात. ही पिले अहिरे किंवा ईल माशांच्या पिलांसारखी लांबट, फितींसारखी आणि पारदर्शक असून त्यांचे डोके, पर व वायुकोश हे अवयव उठून दिसतात. ती डॅफ्निया, सायक्लॉप्स इ. गोड्या अगर मचूळ पाण्यातील सूक्ष्मजीवांवर आपली उपजीविका करतात. तेथे चार महिन्यांत २५−३० सेंमी.पर्यंत वाढल्यावर ऑक्टोबर महिन्यात ती समुद्रात जातात. मधला जलमार्ग क्वचित बंद झाल्यास ती गोड्या पाण्यातच मोठी होतात पण तेथे त्यांची वीण होत नाही.

वडशीवडशीची चपलता, पाण्याबाहेर उसळ्या मारणे इ. गुणांमुळे तो गळाने मासेमारी करणाऱ्या छंदीष्ट लोकांमध्ये लोकप्रिय आहे. अमेरिकन टार्पनप्रमाणे तो १.५ मी. लांब वाढत नाही पण ६० सेंमी.पर्यंत तो वाढतो. तो खूप ताकदवान आहे. त्याची श्वसनक्रिया गढूळ पाण्यात जेथे अगदी कमी ऑक्सिजन असतो तेथेही राहाता येईल अशा रीतीने परिवर्तित झालेली असते. श्वसवासाठी तो पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन ती आपल्या श्वसनासाठी वापरतो. खाण्याच्या दृष्टीने तो फारसा चांगला नाही. त्याचे मांस कमी दर्जाचे व काटेयुक्त असते.

कुलकर्णी, चं. वि. जमदाडे, ज. वि.