रंगलेप : ( पेंट). रंगलेप म्हणजे पाणी व तेल यासारख्या द्रवामध्ये अतिसूक्ष्म सफेत अथवा रंगीत कण विखुरलेले असतात असे तरल  ( प्रवाही) मिश्रण असून ते एखाद्या पृष्ठभागावर लावले असता वाळल्यानंतर पृष्ठभाग वर त्याचे पातळ व घट्ट पटल तयार होते. यातील सफेत वा रंगीत कणांना ‘ रंगद्रव्य ’ आणि पटल निर्माण करणाऱ्‍या द्रवाला ‘ वाहकद्रव्य ’ किंवा ‘ वाहक ’ म्हणतात. सर्वसाधारणपणे शोभा वाढविण्यासाठी किंवा संरक्षणाच्या दृष्टीने काही पृष्ठभागांवर  ( उदा. , धातू ,  लाकूड , दगड , कापड , कातडे वगैरे) रंगलेप लावला जातो.

  साधारणपणे १९२० सालापर्यंत रंगलेप म्हणजे लेड कार्बोनेटाचे  ( व्हाइट लेडचे) जवसाच्या ( अळशीच्या) तेलातील तरल मिश्रण असे समजले जाई कारण त्या वेळी दुसरे रंगलेप फारसे माहीत वा उपलब्ध नव्हते. ⇨ व्हार्निश वाहकामध्ये निरनिराळी रंगद्रव्ये घालून तयार होणाऱ्‍या रंगलेपाला ‘एनॅमल’ म्हणतात. हे पूर्ण वाळल्यावर साफ , घट्ट पटल तयार होते व ते चकचकीत किंवा चमकरहित राहते. हवेमध्ये त्वरित वाळणारे घटक म्हणून सेल्युलोज एस्टरे वा ईथरे वापरलेल्या व विद्रावकाच्या  ( विरघळविणाऱ्‍या पदार्थाच्या) बाष्पीभवनाने  ( बाष्परूपाने उडून जाण्याने) वाळणाऱ्‍या रंगलेपांना ‘ लॅकर ’ म्हणतात [ ⟶  लॅकर] .  हल्ली या सर्व प्रकारचे रंगलेप ‘पृष्ठलेप’ या सर्वसामान्य संज्ञेने ओळखले जातात. रंगलेपांचे वर्गीकरण त्यांच्या उपयोगांवरून किंवा रासायनिक संघटनांवरून करण्याची पद्धत आहे.

    इतिहास : रंगलेपांबद्दल फार प्राचीन काळापासून माहिती होती आणि त्यांचा उपयोग सुशोभनासाठी किंवा चित्रकलेकरिता केल्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत [उदा. , पुराणाश्मयुगीन  ( इ. स. पू. सु. ५ लक्ष ते १०००० वर्षांपूर्वीच्या काळातील) मानवाने गुहांमध्ये काढलेली चित्रे] .  रंगलेपाचा उपयोग केल्याची पहिली नोंद बायबल मध्ये ‘नोआ यांनी आपली नौका टिकावू व जलरोधी करण्यासाठी तिला आतून व बाहेरून डांबराचा लेप लावला ’ या स्वरूपात आढळते. ईजिप्तमधील सु. ५ , ००० वर्षांपूर्वी रंगलेप लावलेल्या थडग्यांचे रंग अद्यापही सुस्थितीत आहेत. ग्रीक तसेच रोमन लोकांनी रंगलेपांचा उपयोग केल्याचे उल्लेख आहेत. रोमन लोक जास्त करून मेणापासून तयार केलेले रंगलेप वापरीत असत. भारतात मोहें-ज-दडो व हडप्पा येथे सापडलेल्या इ. स. पू. तिसऱ्‍या सहस्रकातील काही मृत्पात्रांवर रंगलेप वापरल्याचे दिसून आले आहे. वैदिक काळाच्या उत्तरार्धात घरांना रंगलेप लावण्याची प्रथा होती. मिर्झापूर जिल्हा  ( उत्तर प्रदेश) ,  कैमूर टेकड्या  ( मध्य प्रदेश) वगैरे ठिकाणी गुहा चित्रे सापडली आहेत. युक्तिकरुपतरु या अकराव्या शतकातील ग्रंथात खाऱ्‍या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी विविध नौकांना लावावयाच्या रंगलेपांची माहिती दिली आहे. अजिंठा येथील भित्तिचित्रांतील ,  तसेच नंतरच्या राजपूत व मोगल कलांतील रंगलेपांचा वापर उल्लेखनीय आहे.

   अनेक शतके रंगलेप ही चैनीची वस्तू राहिली  कारण काही वैयक्तिक कारागीर आपल्या अनुभवावर व किचकट वेळखाऊ प्रक्रियेने रंगलेप तयार करू शकत. यामुळे सौंदर्यासक्त श्रीमंत लोकांनाच रंगलेपांचा खर्च परवडेल अशी परिस्थिती होती. रंगलेप तयार करणे ही त्या काळी एक कला समजली जात असली , तरी तंत्रज्ञानासही महत्त्व होते. लिओनार्दो दा व्हींची हे त्या काळातील सर्वांत उत्तम प्रभावशाली चित्रकार होते असे नसून त्यांनी चित्रांकरिता वापरलेले रंगलेप  ( जे ते स्वतः तयार करीत) जास्त चांगल्या तंत्रज्ञानामुळे जास्त दिवस सुस्थितीत राहिले व इतर कलाकारांची चित्रे केव्हाच नष्ट झाली. औद्योगिक क्रांतीनंतर निरनिराळ्या प्रकारची यंत्रे बऱ्‍याच प्रमाणावर तयार होऊ लागल्यावर त्यांचे गंजण्यापासून संरक्षण करण्यासाठी रंगलेपांच्या उपयोगास उत्तेजन मिळाले आणि निरनिराळे रंगलेप मोठ्या प्रमाणावर तयार होऊ लागले  परंतु त्या वेळीसुद्धा यंत्रांचे रंगामुळे जरी आकर्षण वाढले ,  तरी गंजण्याच्या प्रक्रियेस दीर्घकाळ प्रतिबंधक असणारे उपाय शोधण्याकडे विशेष लक्ष दिले गेले नाही. त्याबाबत संशोधन करण्याऐवजी यंत्रसामग्रीला पुन्हा पुन्हा रंग लावणे हीच क्रिया जास्त प्रचलित होती. औद्योगिकीकरण वाढल्या व र आणि विशेषतः दुसऱ्‍या महायुद्धानंतर रासायनिक अभियांत्रिकी व रसायनशास्त्रीय संशोधन यांत खूप प्रगती झाल्यामुळे रंगलेप उद्योगातही खूप बदल झाले आणि शास्त्रीय दृष्टीने रंगलेपांचे उत्पादन वाढत गेले.  

   निरनिराळ्या देशांमध्ये सुसंघटित व साधनसामग्रीने सुसज्ज अशा संशोधन प्रयोगशाळांची स्थापना झाली आणि त्यामुळे विशेष गुणधर्म किंवा उपयोग असलेले रंगलेप तयार होऊ लागले. लवकर पसरणारे ,  लवकर वाळणारे , वासरहित ,  पाण्यात विद्राव्य  ( विरघळणारे) किंवा विविध रंगछटांमध्ये उपलब्ध असलेले असे निरनिराळे रंगलेप बनविले गेले. उत्पादन तंत्रामध्येही बदल झाले. २०० ते १ , १०० लि. क्षमतेच्या लहान व्हार्निश कुंभांपासून १० , ००० ते २० , ००० लि. क्षमतेचे रेझीन विक्रियक बनविण्यात आले. दगडी दलित्राच्या  ( चूर्ण करणाऱ्‍या साधनाच्या) जागी दर दिवशी हजारो लिटर तयार रंगलेपाची निर्मिती करणारी अतिशीघ्र यंत्रसामग्री वापरण्यात येऊ लागली. आवेष्टन क्रियेत क्रांती होऊन हाताने डबे भरण्याऐवजी अतिशीघ्र स्वयंचलित रंगलेप डब्यात भरणारी ,  लेबल आणि झाकण लावणारी यंत्रे प्रचलित झाली आहेत. रासायनिक व खनिज तेल उद्योगांची झपाट्याने वाढ झाल्यामुळे रंगद्रव्ये ,  रेझिने ,  विद्रावक इ. कच्चे माल मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले.  

    मूलभूत घटक पदार्थ : रंगलेप हा चार मूलभूत घटक पदार्थांपासून तयार होतो : ( १) रंगद्रव्य ,  ( २) वाहक , ( ३) बाष्पनशील विद्रावक व  ( ४) समावेशक.  

   रंगद्रव्य : हे अतिसूक्ष्म कणी ,  अविद्राव्य ,  सफेत ,  रंगीत अगर धातवीय चूर्णाच्या रूपात असते. ते नैसर्गिक खनिजापासून मिळविले जाते अथवा विविध रासायनिक क्रियांनी तयार केले जाते. [ ⟶  रंगद्रव्ये] .

   वाहक : रंगलेपातील वाहक हा पटल तयार करणारा बंधक  ( बाइंडर) व विद्रावक यांनी मिळून बनलेला द्रव पदार्थ असतो. या रंगद्रव्याचे अतिसूक्ष्म अविद्राव्य कण विखुरलेले असून पटल वाळल्यानंतर हे कण एकमेकांना बांधले जातात.  

   प्राचीन काळी ईजिप्तमध्ये वाहक म्हणून बाभळीचा डिंक ,  अंड्यातील श्‍वेतक  ( पांढरा बलक) ,  जिलेटिन ,  केसीन व मधमाश्यांचे मेण वापरल्याचे उल्लेख आढळतात. प्राचीन काळात रंगलेपाकरिता वाहक म्हणून वापरलेले पदार्थ जगभर साधारणपणे सारखेच होते व त्या त्या प्रदेशात उपलब्ध असलेले होते. पर्शियन लोकांनी बाभळीचा डिंक वापरला ,  तर भारतात शिजविलेल्या भातापासून खडूच्या कांड्या बनवीत. चीन व जपानमध्ये व्हार्निश वृक्षापासून  ( ऱ्‍ह स व्हर्निसिफेरा ) मिळणाऱ्या रसाचा रंगलेप वाहक म्हणून उपयोग करीत. चौदाव्या शतकापर्यंत चित्रकार सर्वसाधारणपणे बंधक म्हणून अंड्यातील श्वेतक वापरीत. सोळाव्या शतकापासून निरनिराळ्या वनस्पतिजन्य व मत्स्यजन्य तेलांकडे लक्ष जाऊन ओलिओरेझीनयुक्त वाहक सर्वसामान्य प्रचारात आले.  


   आधुनिक वाहक  :  सध्या सर्वत्र वापरल्या जाणाऱ्या वाहकांमध्ये शुष्कन तेले ,  व्हार्निशे ,  संश्लेषित (कृत्रिम रीत्या बनविलेल्या) रेझिनांचे विद्राव ,  रेझिनांची पायसे  ( एकमेकांत न मिसळणाऱ्या द्रवांपासून बनविलेली दृढ मिश्रणे) ,  संश्लेषित लॅटेक्स [नैसर्गिक वा कृत्रिम रबराचे किंवा प्लॅस्टिकाचे पाण्यात संधारण करून तयार केलेले दुधी कलिल  ⟶ कलिल] वगैरेंचा समावेश होतो.  

   पुष्कळ वेळा पदार्थ बंधक व वाहक अशी दोन्ही कामे करतो. विद्रावरूप वाहकाच्या बाबतीत बंधकाचा विद्रावकात स्वच्छ व श्यान  ( दाट) विद्राव तयार करतात आणि नंतर त्यात रंगद्रव्य सरळ विखुरतात. वाळून पटल तयार झाल्यावर घनरूप झालेला वाहक हा रंगद्रव्य व इतर पदार्थांना बंधक म्हणून उपयोगी पडतो आणि अखंड पटल तयार होते. या प्रकारच्या वाहकांमध्ये शुष्कन तेले ,  व्हार्निशे ,  संश्लेषित रेझिने ,  शेलॅक ,  केसीन विद्राव आणि सेल्युलोज अनुजात  ( सेल्युलोजापासून तयार केलेली इतर संयुगे) व व्हिनिल बहुवारिके यासांरखे उच्च बहुवारिक पदार्थ [ ⟶ प्लॅस्टिक व उच्च बहुवारिके] यांचा अंतर्भाव होतो.  

   काही विशिष्ट वनस्पतींच्या बिया व कठिण कवचाची फळे यांपासून तसेच विशिष्ट जातीच्या माशंपासून मिळणारी तेले विद्रावरूप वाहक म्हणून वापरली जातात. या तेलांचे शुष्कन ,  अर्ध शुष्कन व अशुष्कन असे वर्गीकरण केले जाते. जवसाचे तेल सर्वा ं त जास्त वापरण्यात येणारे शुष्कन तेल असून सोयाबीन तेल हे अर्धशुष्कन आणि एरंडेल ,  सरकीचे तेल व खोबरेल ही शुष्कन तेले होत. घरादारांना लावण्यात येणाऱ्या रंगलेपांतच अद्यापही पटल तयार करणारा घटक म्हणून तेल वापरण्यात येते आणि त्यांचीही लोकप्रियता लॅटेक्स इमारती रंगलेप प्रचारात आल्यापासून कमी झालेली आहे.   

   वरील नैसर्गिक तेल वाहकांत सापेक्षतः जास्त शुष्कन काल ,  मऊ पटल तयार होणे व एकसारखेपणाचा अभाव हे अनिष्ट गुणधर्म आहेत. त्यांत सुधारणा घडवून आणण्यासाठी दृढ रेझिनांचा उपयोग केला जातो. ओलिओरेझीनयुक्त व्हार्निशे म्हणजे शुष्कन तेले व दृढ रेझिने यांच्यावर विशिष्ट परिस्थितीत  ‘पाकक्रिया’ करून तयार केलले संयोग असतात. शुष्कन काळ कमी करण्याचा दुसऱ्या एका पद्धतीत मॅलेइक ॲनहायड्राइडाचा किंवा स्टायरिनाचा समावेश करतात. अशा प्रकारे संस्कारित केलेल्या तेलांचा जल व रासायनिक प्रतिरोध अधिक चांगला असून त्याचे शुष्कन गुणधर्मही अधिक शीघ्र असतात.

   आधुनिक काळातील अधिक महत्त्वाच्या संश्लेषित रेझिनांमध्ये अल्किड रेझिनांची गणना होते. हे पदार्थ साधारणपणे ग्लिसरीन ,  एथिलीन ग्लायकॉल यांसारखे पॉलिहायड्रिक अल्कोहोल [चार किंवा अधिक हायड्रॉक्सिल गट  ( म्हणजे − OH)  असलेले अल्कोहोल ],  थॅलिक ,  मॅलेइक यांसारखी बहुक्षारकीय अम्ले [ ⟶ अम्ले व क्षारक] आणि ⇨वसाम्ले किंवा तेल  ( शुष्कन ,  अर्धशुष्कन अथवा अशुष्कन) यांची विक्रिया घडवून तयार करतात. ही अल्किड रेझिने व्हार्निशाची जागा अंशतः किंवा पूर्णतः घेऊ शकतात. यातील तीन पदार्थांचे परस्परांशी असणारे प्रमाण बदलून हवे तसे गुणधर्म बदलता येतात. ही रेझिने वापरल्याने दृढता व चिवटपणा वाढतो ,  उच्च तापमानालाही रंग अधिक काळ टिकू शकतो आणि रंगलेप लावलेली वस्तू भाजण्याचा काळ काही मिनिटांइतका कमी ठेवता येतो.

   दुसऱ्या एका प्रकारच्या वाहकात रेझिने द्रवात विखुरलेली असतात. विखुरलेली रेझिने ही पाणी किंवा बाष्पनशील विद्रावकात सूक्ष्म ,  गोलसर ,  अविद्राव्य कणांच्या रूपात संधारित  ( लोंबकळत्या स्थितीत) असतात. द्रवाचे बाष्पीभवन झाले म्हणजे रंगद्रव्य व रेझीन यांचे पृथक्‌ कण मागे राहतात. हा अवशेष तापवून पटलनिर्मितीची क्रिया पूर्ण करतात व त्यामुळे रेझिनाचे कण एकजीव होऊन अखंड पटल तयार होते. पॉलिव्हिनिल क्लोराइडाचे कार्बनी सोल [ ⟶ कलिल] व संश्लेषित रबर लॅटेक्स ही अशा प्रकारच्या वाहकाची उदाहरणे आहेत. १९४८ सालापासून लॅटेक्स किंवा पायस बहुवारिके या नावाने ओळखण्यात येणारी पाण्यात विखुरलेली बहुवारिके वाहक म्हणून मोठ्या प्रमाणात वापरात आली आहेत. लॅटेक्समध्ये बंधक पाण्यात विखुरलेला असून पाण्याचे बाष्पीभवन झाल्यावर प्लॅस्टिक कण एकजीव होऊन पटल तयार होते. द्रवात विखुरलेल्या इतर प्रणालींप्रमाणेच यात पटल तयार होईपर्यत रंगद्रव्य बंधकापासून अलग राहते.  

   पटलनिर्मिती करणारे पदार्थ श्यान अवस्थेतून घन अवस्थेत जाण्याची क्रिया पुढील तीन सर्वसाधारण पद्धतींपैकी एका वा तिन्हींच्या संयोगाने घडून येते  : ( १) विद्रावकाचे बाष्पीभवन , ( २) ⇨ऑक्सिडीभवन व  ( ३) ⇨ब हु वारिकीकरण . शेलॅक ,  स्पिरिट व्हार्निशे ,  लॅकर ,  लॅटेक्स रंगलेप यांचे शुष्कीकरण विद्रावकाच्या बाष्पीभवनाने होते. जरूर वाटल्यास भट्टीत तापवून बाष्पीभवनाचा वेग वाढविता येतो. शुष्कन तेले ,  ओलिओरेझीनयुक्त व्हार्नि शे ,  ऑक्सिडीकरण होणारी अल्किड रेझिने इत्यादींचे शुष्कनकरण ऑक्सिडीभवनाने होते तेलाच्या दोन किंवा अधिक रेणूंचा संयोग जटिल संरचनारूपात होतो तेव्हा ऑक्सीडीभवन होताना बहुवारिकीकरण होते. याखेरिज संघनन बहुवारिकीकरण आणि समावेशी बहुवारिकीकरणही घडून येण्याची शक्यता असते.  

   बाष्पनशील विद्रावक : हे बाष्पनशील द्रव किंवा त्यांची मिश्रणे असतात. यांना रंगलेप विरलक असेही म्हणतात. त्यांत रंगलेपातील पटलनिर्मिती करणारा घटक रंगलेप लावण्याच्या  ( व तो वाळण्याच्या) दृष्टीने त्याची योग्य सांद्रता होईल इतपत विरघळविण्याची वा विखुरण्याची क्षमता असते. रंगलेपांकरिता सर्वसामान्यपणे वापरण्यात येणाऱ्या विद्रावकांचे वर्गीकरण टर्पिन विद्रावक  ( उदा. ,  टर्पेंटाइन) ,  हायड्रोकार्बन विद्रावक  ( उदा. ,  खनिज तेल आणि दगडी कोळशाचे डांबर यांपासून मिळणारे विद्रावक) ,  ऑक्सिजनीकृत विद्रावक  ( उदा. ,  अल्कोहोले ,  एस्टरे ,  कोटोने इ.) ,  क्लोरिनीकृत विद्रावक ,  नायट्रोपॅराफिने ,  फ्यूराने व पाणी असे केले जाते.  

  समावेशके : वाहकाचे ,  बंधकाचे किंवा मूळ रंगद्रव्याचे गुणधर्म योग्य असे बदलण्यासाठी अथवा काही खास परिणाम साधण्यासाठी रंगलेपात अल्प प्रमाणात मिसळण्यात येणाऱ्या द्रव्यांना समावेशके म्हणतात. शुष्कीकरण क्रिया जलद व्हावी यासाठी मॅलेइक ॲनहायड्राइड ,  स्टायरीन यांसारखी द्रव्ये मिसळतात. मोटार ,  स्कूटर यांसारखी वाहने रंगविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लॅकर रंगलेपांचा फवारा रूपाने उपयोग करता येण्यासाठी नायट्रोसेल्युलोज विद्रावक वापरतात. तेले वा ओलिओरेझीनयुक्त बंधक असलेल्या रंगलेपांच्या बाबतीत पटल द्रवरूपातून घनरूपात जाण्याची क्रिया जलद व्हावी याकरिता त्यांत उत्प्रेरकांचा  ( रासायनिक विक्रियेचा वेग बदलणाऱ्या पदार्थांचा) समावेश करतात. शुष्कीकारक द्रव्ये म्हणजे तेले व तैलपरिवर्तित रेझिने यांचे जलद ऑक्सीडीकरण होण्यासाठी वापरण्यात येणारे उत्प्रेरक असतात. कोबाल्ट ,  मँगॅनीज ,  शिसे व जस्त यांचा वसाम्ले वा नॅप्थेनिक अम्ले यांच्याषी संयोग होऊन तयार होणाऱ्या व तेलात विद्राव्य असणाऱ्या संयुगांचा  ( साबणांचा) शुष्कीकारक म्हणून उपयोग करतात. ॲल्युमिनियम  साबण घनीकरण करण्यासाठी वापरतात. ⇨पृष्ठक्रियाकारकांचा उपयोग रंगद्रव्य विखुरण्यास मदत करण्यासाठी ,  रंगलेपाच्या वाहकतेच्या नियंत्रणाकरिता व रंगद्रव्याचे पुन्हा पुंजके होण्याची क्रिया किमान ठेवून रंगाचा एकसारखेपणा टिकविण्यासाठी करतात. ⇨कवकनाशके , फेनप्रतिबंधक द्रव्ये ,  मेणे ,  ⇨उभयप्रतिरोधी विद्राव ,  पोपडे किंवा पापुद्रे निघण्यास प्रतिबंध करणारी द्रव्ये वगैरे समावेशकांचाही जरूरीप्रमाणे उपयोग करण्यात येतो. 


   रंगलेपाचे उपयुक्त आयुष्य हे अंशतः वाहकाच्या निवडीवर आणि अंशतः तो रंगलेप ज्या परिस्थितीत वापरला जातो त्या परिस्थितीमुळे उद्भभवणाऱ्या रासायनिक बदलांवर अवलंबून असते. रंगलेपातील संबंधित घटकांचे योग्य प्रमाण आणि योग्य प्रकार वापरल्यास त्याचे उपयुक्त आयुष्य वाढविता येते.  

    उत्पादन : रंगलेप व व्हार्निश उद्योगासंबंधीचे पहिले तांत्रिक वर्णन जे. एफ्‌. वॉटिन यांच्या १७७२ च्या सुमारास व्हार्निश सूत्रे देणाया ग्रंथात आढळते. त्यात कोपल व अंबर हे मुख्य रेझीन घटक आणि टर्पेंटाइन हे विरलक वापरून व्हार्निश बनविण्याचा उल्लेख आहे. रंगद्रव्य मोठ्या दगडी उखळामध्ये गोल बत्त्याने घोटले जात असे. व्हार्निशे तयार करणारे कारखाने इंग्लंड  ( १७९०) ,  फ्रान्स  ( १८२०) ,  जर्मनी  ( १८३०) व ऑस्ट्रिया  ( १८४३) या देशांत स्थापन झाले. रंगद्रव्य दळण्याकरिता मुख्यत्वे साध्या दगडी जात्यासारखी साधने त्या काळी वापरीत असत. व्हार्निशनिर्मितीची तंत्रविद्या अधिक प्रगत अवस्थेत असलेल्या ब्रिटन व नेदर्लंड्स या देशांतही १९०० सालापर्यंत रंगलेप उद्योगात फारशी सुधारणा झालेली नव्हती. एकाच वेळी तयार करावयाची रंगलेपाची राशी व एकूण उत्पादन यांतील वाढ याच त्या काळातील उल्लेखनीय गोष्टी होत.

   आधुनिक रंगलेप उद्योगात बऱ्याच मोठ्या प्रमाणात निरनिराळ्या क्रिया-प्रक्रिया केल्या जातात. यांत वाहक तयार करणे ,  रंगद्रव्य उत्पादन ,  मिश्रण करणे ,  विखुरण्याची क्रिया ,  परीक्षण ,  रंग प्रमाणभूत रंगछटेशी सुजोडीकरण ,  आवेष्टन वगैरेंचा समावेश होतो. या उद्योगात मागणीप्रमाणे खूप वाढ झालेली असल्याने आणि पुष्कळसे आवश्यक घटक निरनिराळ्या रासायनिक उद्योगांमधून उपलब्ध होत असल्याने रंगलेपाचे संपूर्ण उत्पादन एकाच ठिकाणी होत नाही.  

   आधुनिक काळात रंगलेप उद्योग हा केवळ कुटीरोद्योग वा लघुउद्योग राहिलेला नसून त्यात मोठ्या प्रमाणावर उलाढाली होत आहेत. आधुनिक तंत्रविद्या व व्यवस्थापन यांमुळे पुष्कळसा कच्चा माल निरनिराळ्या रासायनिक उद्योगांकडून आवश्यकतेप्रमाणे मागविला जातो. त्यानंतर त्या त्या कारखान्याच्या दर्जाप्रमाणे आणि त्यात चालणाऱ्या संशोधन व विकास कार्यक्रमानुसार रंगलेप ‘विनिर्मित माल ’ म्हणून वितरीत केला जातो. ‘रासायनिक अभियांत्रिकी ’ या नोंदीत उल्लेख केलेली निरनिराळ्या प्रकारची यंत्रे व पद्धती या उद्योगात वापरली जातात. उदा. ,  रंगद्रव्य व बंधक अथवा वाहक यांचे एकजीव मिश्रण करण्यासाठी चेंडू वा दांड्यांची  ( रोलर) चक्की वापरतात. आवेष्टन व लेबले लावण्यासाठी वाहक पट्ट्यांचा उपयोग करतात. साधारणपणे रंगलेप कारखान्यात कच्च्या मालाचे परीक्षण करून त्याचा दर्जा ठरविला जातो व मगच तो मुख्य उत्पादनात वापरला जातो. रंगलेप तयार झाल्यावर गुणवत्ता नियंत्रणासाठी पुन्हा परीक्षण केले जाते. त्या वेळी अगोदर बाजारात पाठविलेल्या रंगलेपाप्रमाणेच सर्व गुणधर्म आहेत की नाहीत हे काळजीपूर्वक तपासले जाते. तसेच रंगछटेचे सुजोडीकरण केले जाते. रंगलेपाकरिता वापरण्यात येणाऱ्या खंडित प्रक्रियेमध्ये याला विशेष महत्त्व आहे.  

   सध्या रंगलेप उद्योगात संशोधन व विकास यांना फार महत्त्व प्राप्त झालेले आहे कारण रंगलेप तयार करण्यासाठी लागणारी ऊर्जा ,  कच्चा माल व कामगार यांवरील खर्च अधिकाधिक वाढत आहे. याखेरीज ⇨लॅमिनेट व रंगीत प्लॅस्टिक यांसारख्या स्वतःच रंगीत असलेल्या  ( व त्यामुळे निराळे रंगलेप न लागणाऱ्या) द्रव्यांची स्पर्धा वाढली आहे.  

    रंगलेप लावण्याची पद्धती : सर्वांत जुनी व अजूनही वापरली जाणारी पद्धत म्हणजे रंगलेप ब्रशाने लावणे. ही पद्धत जास्त करून घरदारांच्या सुशोभनासाठी व इमारतींच्या संरक्षणासाठी वापरली जाते. इमारतीच्या अंतर्गत सुशोभनासाठी पायस ,  लॅटेक्स व इतर रंगलेप उपलब्ध झाल्यावर हात-रुळाचा व रंगफवारणी यंत्राचाही उपयोग लोकप्रिय झाला. 

   आधुनिक काळात रंगलेप तयार करण्याच्या व वापरण्याच्या पद्धतींत खूपच बदल झाले आहेत. चूर्णरूप रंगलेप व ‘घन’ पायसे यांच्या प्रसारामुळे द्रवरूप रंगलेप मागे पडत आहेत. ब्रशाच्या जागी फवारणे ,  भाजणे व स्थिर विद्युत या पद्धतींचा वापर वाढत आहे.  

  कारखान्यांमध्ये ,  विशेषतः जुळणीमार्ग उत्पादन प्रकारात ,  स्वस्त व जलद क्रिया होणाऱ्या पद्धती वापराव्या लागतात. फवारणी तंत्र हे जलद वाहक मार्गावरील क्रियेसाठी चटकन जुळवून घेता येते. रंगलेपांचे लहान आकारमानातील वायुकलिल धारक [ ⟶ वायुकलिल] उपलब्ध झालेले असल्याने घरगुती उपयोगासाठीही फवारणी तंत्राचा उपयोग करता येतो. जटिल आकाराच्या वस्तूंना व मोठ्या भागांना  ( उदा. ,  मोटारगाडीच्या साट्याच्या भागांना) रंगलेप लावण्यासाठी ते रंगलेपाच्या मोठ्या टाकीतून बुचकळून काढणे स्वस्त व सोयीचे असते. या पद्धतीत एकसारखा लेप देणे शक्य होते कारण जादा वा ओघळलेला रंगलेप स्थिर विद्युत्‌ प्रयुक्तीने ओढून किंवा केंद्रोत्सारी  ( वर्तुळाकार फिरणाऱ्या वस्तूच्या बाबतीतील केंद्रापासून दूर जाणाऱ्या प्रेरणेचा उपयोग करणाऱ्या) पद्धतीने वाळवून काढून टाकता येतो. सपाट पृष्ठभागांना  ( उदा. ,  धातूचा पत्रा ,  पट्ट्या इ.) रुळाने रंगलेप लावतात. अतिशय मोठ्या अवजड सामग्रीच्या भागांना रंगलेप लवचिक नळाने  ( होजने) ओतून लावतात आणि जादा रंगलेप निथळून व गोळा करून पुन्हा वापरतात.  

   पाण्यात विद्राव्य असणारे रंगलेप विद्युत्‌ निक्षेपण या पद्धतीने लावता येतात. याकरिता विद्युत्‌ प्रवाहाची जरूरी असून या पद्धतीचा सु. १९५० सालापासून मोटारगाडी उद्योगात साट्यांकरिता व इतर भागांकरिता वापर केला जात आहे. रंगलेप एका मोठ्या पात्रात ठेवलेला असून तो ⇨विद्युत्‌ विच्छेदन घटाचा एक विद्युत्‌ अग्र बनतो. रंगलेप लावावयाचे भाग या पात्रात बुडविले जातात व घटाच्या दुसऱ्या अग्राला जोडण्यात येतात. पाण्यात विद्राव्य असलेल्या रंगलेपामधील बंधकाच्या रेणूंवर विद्युत्‌ भार असल्याने विद्युत्‌ प्रवाह चालू केल्यावर ते बुडवलेल्या भागाकडे जाऊन त्यांवर निक्षेपित होतात  ( साचतात). रंगद्रव्य पण त्याचबरोबर जाते कारण त्याचे रेणू बंधकाच्या रेणूंबरोबर संबद्ध असतात.

   पुष्कळ वर्षे ऋण विद्युत्‌ भारित कार्‌बॉक्सिलेट लवणे ही बंधक असलेली बहुवारिके विद्युत्‌ निक्षेपण पद्धतीत वापरली जात होती. ही लवणे धनाग्राकडे जातात व उदासिनीकारक  NH4+ आयन  ( विद्युत्‌ भारित अणुगट) दुसऱ्या बाजूला जातो. मुक्त अम्ले लवणापेक्षा कमी विद्राव्य असल्याने लवणे धनाग्रावर निक्षेपित होतात  परंतु ही पद्धत आता ऋणाग्री निक्षेपणाच्या पद्धतीमुळे मागे पडत आहे. यामध्ये रंगलेपातील बंधकाचे रेणू धन भारित असून ते ऋणाग्राकडे जाऊन त्यावर निक्षेपित होतात. या पद्धतीने लावलेले रंगलेप गंजण्यापासून संरक्षण करण्यासाठी जास्त प्रभावी ठरतात.

   कोणत्याही पद्धतीने रंगलेप लावला ,  तरी त्यातील विद्रावक कक्ष  ( सर्वसाधारण) तापमानाला किंवा भाजण्याच्या क्रियेच्या कमी तापमानाला बाष्पीभवनाने पूर्णपणे काढून टाकणे आवश्यक असते. याकरिता हवेच्या सान्निध्यात ऑक्सिडीकरण केले जाऊन किंवा मोठ्या कारखान्यात भट्टीमध्ये वा अवरक्त दिव्यांनी  ( दृश्य वर्णपटातील तांबड्या रंगाच्या अलीकडील अदृश्य प्रारण उत्सर्जित करणाऱ्या दिव्यांनी) तापविलेल्या बोगद्यात भाजण्याची क्रिया करून रंगलेपाचे पटल वाळवितात अथवा अंतिम अवस्थेत रूपांतरित करतात. मोठ्या औद्योगिक कारखान्यांत बहुधा विद्रावक काही प्रमाणात परत मिळविला जातो.  


   रंगलेप जास्त प्रमाणात वापरल्यामुळे होणारे प्रदूषण ही एक नवीन समस्या आहे. रंगलेप वाळताना त्यातील कार्बनी विद्रावकाचे बाष्पीभवन होऊन तो हवेत मिसळतो. या प्रकारे ३ , ६० , ००० टन विद्रावक बाष्पीभवनाने हवेत मिसळतात ,  असा अंदाज करण्यात आला आहे. असे प्रदूषण टाळण्यासाठी रंगद्रव्याचे प्रमाण वाढविणे हा एक उपाय आहे  पण त्यामुळे रंगलेपाचे काही गुणधर्म बदलून त्याचा उपयोग समाधानकारक होत नाही. यामुळे शेवटचा उपाय म्हणून नेहमीचे बंधक वा विद्रावक न वापरता घन चूर्णांचे मिश्रण तयार करून ते वापरण्याची नवीन पद्धत शोधून काढण्यात आली. ही पद्धत व्यापारी तत्त्वावर पुष्कळच यशस्वी ठरली आहे. ही मिश्रणे १००% घन मानण्यास हरकत नाही. हे चूर्णरूप मिश्रण धातूच्या भागांवर फवाऱ्याच्या रूपात उडविले जाते व तेथे ते स्थिर विद्युत्‌ प्रेरणेने चिकटून राहते. नंतर भट्टीत भाजल्यावर तो द्रवरूपात जाऊन रंगद्रव्याचे अखंड पटल तयार होते. त्याच वेळी उष्णतेमुळे चूर्णातील काही रासायनिक द्रव्यांची विक्रिया होऊन आवश्यक ते त्रिमितीय जालक तयार होते. भट्टीत भाजण्याच्या या पहिल्या क्रियेनंतर आणखी तापमान वाढले ,  तरी हे रंगलेप खराब होत नाहीत आणि रासायनिक द्रव्यांना प्रतिरोधक बनतात. एपॉक्सी व पॉलिएस्टर हे दोन्ही प्रकार अशा चूर्णात बंधक म्हणून उपयोगी पडतात. या प्रकारचे रंगलेप मुख्यतः वाहक पट्ट्याच्या जुळणी मार्गाचा उपयोग करून बनविण्यात येणाऱ्या अवजड यंत्रसामग्रीच्या उदा., ट्रॅ क्ट र, मोटारगाड्या इत्यादींच्या) उत्पादनात वापरतात.

    उपयोग : विविध इमारती आणि बांधकामे ,  यंत्रसामग्री ,  वाहने इत्यादींच्या भागांचे पृष्ठांचे वातावरणक्रिया  ( उदा. ,  ऊन ,  पाऊस इ.) गंजणे व सूक्ष्मजीवांचे आक्रमण  ( उदा. ,  जहाजांच्या समुद्रातील पाण्याखालील भागावर सूक्ष्मजीवांची होणारी अनिष्ट वाढ) यांपासून संरक्षण करण्याकरिता सर्वसाधारणपणे रंगलेपांचा उपयोग करतात. याखेरीज उष्णता निरोधन ,  आरोग्यपूर्ण परिस्थिती टिकविणे ,  इमारतीचे प्रकाशन नियंत्रण ,  सौंदर्यशास्त्रीय दृष्ट्या इष्ट असे बाह्यस्वरूप प्राप्त करून देणे यांकरिता रंगलेप वापरतात. आग मंदावण्यास मदत करणारे रंगलेप वापरल्यामुळे जीवित व वित्त हानीचे प्रमाण कमी होते ,  असे आढळून आले आहे.

  उपयोगानुसार रंगलेपांचे घरगुती उपयोगाचे ,  संरक्षक व नाविक उपयोगाचे आणि औद्योगिक उपयोगाचे असे तीन वर्ग करता येतात.  

   घरगुती उपयोगाचे रंगलेप सामान्यतः २० लि. किंवा त्यापेक्षा कमी क्षमतेच्या आवेष्टनात मिळतात. हे रंगलेप तेले ,  अल्किडे ,  व्हार्निशे व पायस बहुवारिके यांसारख्या हवेने वाळणाऱ्या वाहकांवर आधारलेले असून त्यांची साठवणीतील स्थिरता उत्तम असते. यांत अनेकविध रंगछटा उपलब्ध आहेत. सामान्यतः हे रंगलेप ब्रशाने लावण्यात येतात. यांत घराच्या अंतर्भागातील भिंती ,  दारे व खिडक्या यांच्या चौकटी ,  जमीन ,  छत ,  फर्निचर ,  धातूच्या वस्तू इत्यादींच्या सुशोभनासाठी वापरण्यात येणाऱ्या रंगलेपांचा समावेश होतो.

   संरक्षक व नाविक क्षेत्रातील रंगलेपांचे प्रमुख उद्दिष्ट गंजणे ,  वातावरणक्रिया अथवा जैव कारणाने होणारा ऱ्हास यांपासून मालमत्तेचे संरक्षण करणे हा आहे. या स्वरूपाच्या रंगलेपांची गरज चटकन कळून येत नाही. ब्रिटनमध्ये गंजण्यामुळे दरवर्षी सु. ६ , ५०० दशलक्ष पौंड किंमतीच्या मालमत्तेचे नुकसान होते ,  असा १९८६ मध्ये एक अंदाज व्यक्त करण्यात आला. गंजणे ही एक विद्युत्‌ रासायनिक प्रक्रिया आहे. रंगलेप लावल्यामुळे धातूच्या गंजण्यास कारणीभूत होणारे ऑक्सिजन किंवा पाण्याचे आयन व धातूचा पृष्ठभाग यांमध्ये एक अडथळा म्हणून अथवा विद्युत्‌ प्रवाहाला प्रतिबंधक म्हणून रंगलेपाचा उपयोग होतो. साधारणपणे रंगलेपाचे पटल व धातूचा पृष्ठभाग यांमध्ये उच्च विद्युत्‌ रोध तयार होतो. लोखंडाचे गंजणे थोपविण्यासाठी सामान्यतः क्लेरिनीकृत रबर पायसापासून तयार केलेले रंगलेप वापरतात. यामुळे एक अपरिवर्तनीय अडथळा तयार होऊन पाण्याचा अथवा गंजण्यास कारणीभूत होणाऱ्या इतर द्रव्यांचा परिणाम कमी होतो. [ ⟶ गंजणे] .

   संरक्षक व नाविक उपयोगाचे रंगलेप ब्रशाने वा फवारणीने लावण्याचे असून त्यांत हवेने वाळणारे अथवा रासायनिक उत्प्रेरित वाहक असतात. या वाहकांमुळे सूर्यप्रकाश ,  हवेतील उच्च आर्द्रता ,  तापमानातील मोठे बदल व अपायकारक औद्योगिक वातावरण यांना जास्तीत जास्त प्रतिरोध होण्याबरोबरच रंगलेपाच्या सौंदर्यावर आणि रंगछटेवर फारसा लक्षणीय परिणाम होत नाही. जहाजांच्या तळाला लावण्यात येणाऱ्या रंगलेपात तांब्याचे अगर पाऱ्याचे विद्राव्य अनुजात असून त्यांमुळे तळावर जलीय जीवांची वाढ होण्यास प्रतिरोध करणारा पृष्ठभाग तयार होतो. कार्यालयीन इमारती ,  शाळा ,  सरकारी कार्यालये ,  लष्करी ठाणी ,  औद्योगिक संयंत्रे ,  दुग्धशाळा ,  रेल्वेचे डबे ,  विमाने ,  जहाजे ,  गोद्या ,  गुदामे वगैरेंकरिता संरक्षणासाठी व सुशोभनासाठी खास प्रकारचे रंगलेप उपलब्ध आहेत.

   औद्योगिक उपयोगाकरिता अनेकविध प्रकारचे रंगलेप तयार करण्यात आलेले आहेत. औद्योगिक रंगलेप सामान्यतः मोठ्या प्रमाणावर वापरावयाचे असून ते हाताळण्याचा वेग महत्त्वाचा असतो अगर त्यात विशेष संरक्षण गुणधर्म आवश्यक असतात. या रंगलेपांत मोटारगाड्या ,  प्रशीतक  ( रेफ्रिजरेटर्स) ,  धुलाई यंत्रे ,  यंत्रसामग्री ,  कार्यालयीन व गृहोपयोगी साधने ,  शस्त्रास्त्रे ,  लष्करी साधनसामग्री ,  फर्निचर इत्यादींसाठी वापरण्यात येणाऱ्या रंगलेपांचा समावेश होतो. या रंगलेपांच्या बाबतीत विद्रावक काढून टाकणे व पटल बहुवारिकीकरण या क्रिया बहुधा वायुवीजन  ( हवा खेळती ठेवणे) चांगल्या प्रकारे केलेल्या भट्ट्यांत किंवा तापविलेल्या बोगद्यांत करण्यात येत असल्याने वाहक म्हणून सामान्यतः लॅकर व उत्प्रेरित प्रणाली वापरण्यात येतात.  

   रंगलेपांच्या एकूण उत्पादनापैकी सु. ६०% रंगलेप घरगुती उपयोगाचे वा संरक्षणासाठी वापरण्याचे असतात आणि राहिलेले ४०% औद्योगिक उपयोगाचे असतात. रंगलेपांच्या जागतिक उत्पादनासंबंधीची यथार्थ आकडेवारी उपलब्ध नाही  परंतु केवळ अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर वर्षी सु. २०० कोटी लिटर रंगलेप वापरले जातात ,  असा अंदाज आहे.

   रंगलेपांसंबंधीच्या आधुनिक प्रगतीचे एक उदाहरण म्हणून इंपीरियल केमिकल इंडस्ट्रीज या ब्रिटिश कंपनीने विकसित केलेल्या ‘टेंप्रो’ या रंगलेपाचे देता येईल. हा रंगलेप सुलभपणे काढून टाकता येतो हे त्याचे वैशिष्ट्य आहे. नवीन मोटारगाडी प्रदर्शन कक्षात आणण्यापूर्वी तीवर ओरखडे व इतर खूणा असू नयेत यासाठी तात्पुरता लावण्याकरिता हा रंगलेप वापरण्याचे मूलतः उद्दिष्ट होते. यामुळे वाहतुकीमधील काळात झालेली खराबी मूळ रंगलेपास न लागता हा वरील तात्पुरता रंगलेप सौम्य क्षारीय  ( अल्कलाइन) विद्रावाने साफ करता येतो  पण आता या रंगलेपाचे इतरही उपयोग होऊ लागले आहेत. लष्करी वाहनांच्या मायावरणाकरिता लावण्यात येणाऱ्या नेहमीच्या हिरव्या व काळ्या रंगांवर हिवाळी कवाईतीसाठी तात्पुरता पांढरा रंगलेप लावता येतो. मोटारगाडीच्या साट्यावरील लहानसहान पोचे साट्याला रंगलेप लावल्याशिवाय दिसून येत नाहीत व नंतर ते ठोकून दुरुस्त केल्यास रंगकाम खराब होते. तात्पुरता काळा चकचकीत रंगलेप लावल्यास असे दोष उठून दिसतात आणि ते दुरुस्त केल्यावर हा रंगलेप क्षारीय विद्रावाने धुवून टाकता येतो. याखेरीज क्रीडा जगतात धावण्याच्या मॅरॅथॉन शर्यतीकरिता रस्त्यावर मार्गदर्शनासाठी विविध खुणा करण्यासाठी या रंगलेपाचा उपयोग करण्यात आलेला असून या खुणा शर्यतीनंतर सहजपणे काढून टाकता येतात.


    भारतीय उद्योग : भारतातील पहिला रंगलेप कारखाना शालिमार पेंट ,  कलर अँड व्हार्निश लि. हा १९०२ मध्ये प. बंगालमधील हावड्यानजीक गोवाबारिआ येथे स्थापन झाला. १९१९ पर्यंत हा एकच रंगलेप कारखाना भारतात होता. पहिल्या महायुद्धात या कारखान्याला मिळालेले प्रचंड काम पाहून १९१९ − २३ या काळात कलकत्ता व त्याच्या आसपास सहा नवीन कारखाने निघाले. त्यानंतर मुंबईत आणि १९३० च्या सुमारास उत्तर भारतात व पुढे दक्षिण भारतातही रंगलेप कारखाने निघाले. दुसऱ्या महायुद्धामुळे रंगलेप उद्योगाला आणखी चालना मिळाली. १९४५ नंतर रंगलेप व व्हार्निश उद्योग मंडळाच्या शिफारशींनुसार अनेक कारखान्यांनी आधुनिकीकरण करून आपल्या उत्पादनाची व्याप्ती वाढविली. महायुद्धापूर्वी नाविक ,  बांधकाम व घरगुती उपयोगाच्या रंगलेपांचेच उत्पादन करण्यात येत होते. अलीकडील काळात भारतात बहुतेक सर्व प्रकारचे रंगलेप तयार करण्यात येतात आणि त्यांत औद्योगिक उपयोगाचे तसेच विमाने ,  प्रशीतक ,  जहाजे इत्यादींकरिता लागणारे रंगलेप  कातडे ,  ॲल्युमिनियम वर्ख व खाद्यपदार्थांचे डबे यांकरिता लागणारे रंगलेप  उच्च तापमानाला टिकणारे रंगलेप  ॲल्युमिनियम रंगलेप वगैरेंचा समावेश होतो. भारतीय मानक संस्थेने रंगलेप व संबंधित द्रव्ये यांविषयी २०० हून अधिक मानके  ( प्रमाणे) तयार केलेली आहेत. १९४८ मध्ये रंगलेपांचे ३८ संघटित कारखाने होते व १९६० च्या सुमारास ५२ संघटित व सु. २०० लहान कारखाने होते. संघटित कारखान्यांपैकी १८ प. बंगाल ,  १४ मुंबई ४ उत्तर प्रदेश ,  ३ तामिळनाडू ,  ३ गुजरात ,  ३ दिल्ली या प्रदेशांत व बाकीचे इतर राज्यांत होते. या कारखान्यांची १९६१ मधील एकूण

 भारतातील निरनिराळया प्रकारच्या रंगलेपांचे उत्पादक  

 रंगलेप प्रकार  

 उत्पादन (टनांत)  

 १९७२-७३  

 १९७७-७८  

 १९८२-८३  

 शुष्क डिस्टेंपर व सिमेंट रंगलेप  

 १७,५००  

 १९,१००  

 २४,२००  

 तैलबध्द डिस्टेंपर  

 ६,९००  

 १०,२००  

 १३,६५०  

 आकार्य पायस रंगलेप  

 ३,४१६  

 ४,०५०  

 ४,८८०  

 कडक रंगलेप  

 १,२००  

 १०,८००  

 १२,५५०  

 तयार मिश्रित रंगलेप व एनॅमल  

 ७७,२०२  

 ८७,६४०  

 १,२४,५२०  

 व्हार्निशे  

 १६,७३१  

 १६,४००  

 २०,०५०  

 बिटयुमेन ब्लॅक  

 ३,१९३  

 २,७००  

 २,९००  

 नायट्रोसेल्युलोज लॅकर   

 ५,६२७  

 ४,६००  

 ५,९००  

 नायट्रोसेल्युलोज साहाय्यके  

 ८३१  

 ६४०  

 ८२०  

 एकूण  

 १,३२,६००  

 १,५६,१३०  

 २,०९,४८०  

   

क्षमता सु. ७७ , ००० टन होती. १९६५ सालानंतर रासायनिक उद्योगांमध्ये परदेशी सहकार्याचा अथवा तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ लागल्याने निरनिराळ्या प्रकारची रासायनिक द्रव्ये उपलब्ध झाली असून त्यांतील खनिज तेल उत्पादांचा मोठा भाग होता. यामुळे रंगलेपांकरिता लागणारे बंधक ,  वाहक व रंगद्रव्ये जास्त प्रमाणात उपलब्ध झाली. काही मोठ्या कंपन्यांचे विदेशी कंपन्यांबरोबर करार झालेले असून त्यात एशियन पेंट्स ही सर्वांत मोठी कंपनी आहे. त्याखालोखाल गुडलॅस नेरोलॅक पेंट्स लि. ,  गरवारे पेंट्स लि. ,  जेन्सन अँड निकोल्सन  ( इंडिया) लि. ,  बाँबे पेंट्स अँड अलाइड प्रॉडक्ट्स लि. ,  शालिमार पेंट्स लि. इ. कंपन्यांचे क्रमांक लागतात. लहान कुटीरोद्योग अनेक असून ते स्थानिक मागणीनुसार रंगलेपाचा पुरवठा करतात. कॅम्लिन ही मुंबईची कंपनी केवळ चित्रकारांकरिता लागणारे रंगलेप आणि इतर साधने बनविते. थायलंड व पूर्वेकडील इतर देशांत या कंपनीने शाखा काढलेल्या आहेत. एशियन पेंट्स या कंपनीने फिजी बेटे ,  नायजेरिया यांसारख्या विकसनशील देशांत कारखाने स्थापन केले आहेत. भारतातील निरनिराळ्या प्रकारच्या रंगलेपाच्या १९७२-७३ ,  १९७७-७८ व १९८२-८३  ( अंदाजे) या वर्षांचे उत्पादन कोष्टकात दिलेले आहे.  

 पहा  :  डिस्टेंपर  तेले व वसा  रंगद्रव्ये  रेझिने  लॅकर  व्हार्निश.  

  संदर्भ  : 1. Ash, M. Ash, L. Formulary of Paints and Other Coatings, 2 Vols., New York, 1978-82.                                                                                                                                     2. Banov., A. Paints and Coatings  Handbook, New York, 1981.

              3. Boxall,  J . Fraunhofer, J. A. von. Paint Formulation Principles and Practies, New York, 1980.

              4. Chatfied, H. W., Ed., Paint and Varnish Manufacture,  London, 1955.

             5. C . S. I. R. The Wealth of India, Industrial Products, Part  VI. New Delhi, 1965.    

              6. Heaton, N. Outlines of Paint Techanology,  London, 1956.    

              7. Khanna, A. S. Paints and Vernishes , Hyderabad, 1959.    

              8. Nylen. P. Sunderland, E. Modern Surface Coatings , New York, 1965    

              9. Parker, D. H. Principles of Surface Coatings Techanology, New York, 1965  

  चिपळूणकर ,  मा. त्रिं.  पोतनीस ,  श्री. पु.  कोंडकर ,  निनाद