छत्री ऊन व पाऊस यांच्यापासून संरक्षण करणारे एक साधन. व्यक्तिगत सार्वत्रिक उपयोगाखेरीज समुद्रकिनारा, उपाहारगृहे इ. ठिकाणी उघड्या जागेत सावलीसाठी, सर्कशीत कसरतीची कामे करताना तोल संभाळण्यासाठी इ. प्रकारेही छत्रीचा उपयोग करण्यात येतो. विमानातून व अवकाशयानातून माणसे वा वस्तू अलगद उतरविण्यासाठी हवाई छत्री  वापरतात, पण तिचे केवळ आकाराच्या बाबतीतच सामान्य छत्रीशी साम्य असते. ऊनपावसापासून संरक्षण करण्यासाठी केलेल्या छत्रीसारख्या बांधकामालाही ‘छत्री’ अशीच संज्ञा वापरतात. समाधीसारख्या ठिकाणी अशी छत्री बांधण्याची प्रथा फार पूर्वीपासून आहे.

इतिहास :प्राचीन ईजिप्त, ॲसिरिया इ. देशांतील गुलाम आपल्या मालकाच्या डोक्यावर सावलीसाठी धरीत असलेल्या आच्छादनासारख्या वस्तूतून छत्रीचा उदय झाला असावा. असे आच्छादन पर्शियातील सु. २,४०० वर्षांपूर्वीच्या जुन्या इमारतीवरील कोरीव कामात आढळून आलेले आहे. तसेच ईजिप्त, निनेव्ह, पर्सेपलिस इत्यादींमधील जुन्या धर्मग्रंथांत छत्रधारी व्यक्तींच्या आकृत्या आढळतात. पूर्वेकडील देशांत पूर्वी छत्रीचा उपयोग फक्त राजे लोक करीत. धार्मिक समारंभापुरते धर्मगुरूंच्या डोक्यावरील छताचे (चांदव्याचे) स्वरूप छत्रीसारखे असे.

चीनमध्ये एकाच काठीला चार छते असलेली छत्री राजे लोक संरक्षणाच्या हेतूने वापरीत. इ. स. पू. बाराव्या शतकात चीनमध्ये ज्या छत्र्या वापरीत असत, त्या नाजूक असून त्यांचा उपयोग उन्हापासून संरक्षण करण्यासाठी करीत असत. कंबोडिया, थायलंड, इंडोनेशिया इ. देशांतही छत्रीचा असाच उपयोग करतात. जपानी साम्राज्याची स्थापना झाल्यापासून जपानमधील लोक छत्र्या वापरीत आहेत. जपानमध्ये आजही रंगीबेरंगी आकर्षक छत्र्या वापरात असून छत्री ही जपानी राष्ट्रीय पोशाखाचा एक भाग झाला आहे.

आफ्रिकेतील काही भागांत स्थानिक टोळ्यांचे नेते इतर लोकांपेक्षा वेगळेपणा दर्शविण्यासाठी छत्री वापरीत असत.

प्राचीन ग्रीस व रोम येथील स्त्रिया छत्री वापरीत, पण त्या काळी पुरुषाने छत्री वापरल्यास ते बायकीपणाचे लक्षण समजले जाई. पोप यांच्याजवळ मिरवणुकीच्या वेळी एक मिटलेली व दुसरी उघडी अशा दोन छत्र्या असत. उघडी छत्री ऐहिक शक्तीचे द्योतक, तर मिटलेली छत्री दैवी शक्तीचे द्योतक मानण्यात येई. अंत्यविधीच्या वेळी धर्मोपदेशक बोडके असत आणि ते चामड्याच्या जड छत्र्या वापरीत, असा उल्लेख आढळतो. सतराव्या शतकात पश्चिम यूरोपमध्ये श्रीमंत लोक उन्हापासून संरक्षणासाठी चिनी धाटणीच्या छत्र्या वापरीत असत. ॲन राणीच्या काळात लंडनमधील स्त्रिया पावसापासून संरक्षण होण्यासाठी छत्र्या वापरीत असत. अठराव्या शतकापासून कॉफीगृहांतील मोकळ्या जागेत सावलीसाठी छत्रीचा उपयोग होऊ लागला.

पावसापासून संरक्षण करण्याकरिता छत्रीचा उपयोग प्रथम फ्रान्समध्ये सोळाव्या शतकात करण्यात आला. लंडन शहरात नेहमी छत्री घेऊन फिरणारे पहिले गृहस्थ जोब्स हॅन्वे हे होत व पावसापासून संरक्षण करण्यासाठी छत्रीचा उपयोग होतो, असे त्यांनी दाखवून दिले.

सतराव्या शतकापर्यंतच्या छत्र्या दिसावयास ओबडधोबड असत. छत्रीवरील आच्छादन कातड्याचे वा तेलकट कापडाचे असे. छत्री अवजड असल्याने ती बरोबर बाळगणे कठीण होई व ती वाहून नेण्यासाठी एखादा नोकर ठेवावा लागे. देवमाशाच्या हाडांचा उपयोग छत्री तयार करण्यासाठी करण्यास सुरुवात झाल्यानंतर छत्र्या हलक्या व वापरण्यास सोयीस्कर वाटू लागल्या. तथापि ह्या छत्र्यांना तेलकट वा साधे कापड वापरीत असल्याने त्या जड असत आणि छत्री मिटविल्यानंतर कापडाच्या घड्या पडून त्या एकमेकींना चिकटत असत. १८४८ मध्ये विल्यम सँगस्टन यांनी आच्छादनासाठी आल्पाका कापडाचा उपयोग करण्याचे एकस्व (पेटंट) मिळविले. १८५० च्या सुमारास सॅम्युएल फॉक्स यांना एका खाडीवरील पोकळ नळ्यांचा पूल पाहून छत्रीसाठी हलक्या पण ताकदवान व नळकांडीसारख्या काड्या वापरण्याची कल्पना सुचली. १८५२ मध्ये त्यांनी इंग्रजी ‘U’अक्षराच्या आकाराच्या धातूच्या काड्या असलेल्या छत्रीचे एकस्व घेतले. यानंतर छत्रीसाठी पोलादाचा व विसाव्या शतकात ॲल्युमिनियमाचा वापर करण्यात येऊ लागला.

भारतात छत्री निरनिराळ्या स्वरूपांत फार पूर्वीपासून वापरण्यात येत आहे. प्राचीन ग्रंथांतून छत्रीचा उल्लेख आढळतो. राजाची छत्री ही इतरांच्या छत्र्यांपेक्षा वेगळी असे. ही छत्री रत्‍नजडित व सुशोभित असे आणि ती धरण्यासाठी वेगळे नोकर असत. निरनिराळे अधिकार दर्शविणाऱ्या छत्र्या निरनिराळ्या रंगांच्या असून राजा त्या बहाल करीत असे. जैन तीर्थंकरांच्या मूर्तींवरही छत्री असते, असे आढळून येते. बुद्धाच्या स्तूपांवरही छत्रीसारखे चिन्ह आढळते. देवादिकांच्या पालख्यांवर आणि रथांवर छत्री धरण्याची चाल पुरातन काळापासून चालू आहे.

सामर्थ्य व सार्वभौमत्व यांचे छत्री (किंवा छत्र) हे एक प्रतीक आहे. सर्व राजांना छत्रधारी हा किताब असे. ‘छत्रपती’ हा किताब धारण करणे हे राजांना भूषण समजले जाई. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर छत्रपती हा किताब घेतला होता.

केरळमध्ये पावसापासून संरक्षण करण्यासाठी व सामाजिक रूढींनुसार नेहमी छत्री वापरण्यात येते. मद्रासकडील भागात पूर्वी ताडपत्रीच्या छत्र्या वापरीत असत पण कापडी छत्र्या प्रचारात आल्यानंतर या छत्र्या मागे पडल्या. कोकण भागात पळस व इतर काही वृक्षांची पाने बांबूच्या सांगाड्यावर बसवून तयार केलेले आच्छादन वापरतात. त्याला ‘इरले’ असे म्हणतात. पावसाळ्यात शेतामध्ये काम करताना मुख्यत्वे त्याचा उपयोग होतो.


निर्मिती :छत्री तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य व तिचे स्वरूप यांत कालमानानुसार आणि प्रचलित आवडीनिवडीनुसार बदल होत गेलेले आहेत. छत्री तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यात कापडाला महत्व आहे. हे कापड रेशमाचे, रेयॉनाचे, नायलॉनाचे वा जलरोधी सुताचे असते. विविध प्रकारांचे व रंगांचे आकृतिबंध छापलेले किंवा एक वा अनेक रंगांचे कापड वापरतात. पुरुषांच्या छत्र्या अद्यापिही लाकडी दांड्याच्या, पितळी पंचपात्राच्या (काड्या ज्यात गुंतवलेल्या असतात त्या सरकत्या व दांड्याच्या टोकावर असणाऱ्या स्थिर भागाच्या) व लोखंडी वा ॲल्युमिनियमाच्या काड्यांच्या बनविलेल्या असतात. अशा छत्र्या नायलॉन, रेशीम वा जलरोधी सुती कापडाच्या असतात. सामान्यतः बायकांच्या छत्र्यांकरिता विविध रंगांचे व आकृतिबंधाचे कापड वापरण्यात येते. समुद्रकिनारा, उपाहारगृहे इ. ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या छत्र्या आकारमानाने मोठ्या व विविध रंगांच्या कापडाच्या असतात.

सर्वसामान्य छत्र्या लहान मोठ्या आकारमानाच्या मिळतात. छत्र्यांचे दांडे लाकडी वा लोखंडी असून मुठी प्लॅस्टिकच्या वा लाकडाच्या वा लोखंडाच्या असतात. स्त्रियांच्या छत्र्या घडी करता येईल अशा स्वरुपातही बनविल्या जातात.

  

छत्री : (१) दांडा, (२) पंचपात्र, (३) मूठ, (४) काड्या, (५) कापड, (६) अटकाव.

दांड्याच्या एका टोकाला थोडे अंतर सोडून एक पंचपात्र बसविलेले असते. पंचपात्राला उभ्या आठ ते सोळा खाचा असतात व एक वर्तुळाकार आडवी खाच असते. काड्यांच्या टोकांना असलेल्या भोकांतून तार ओवून घेतात. काड्या उभ्या खाचांत व तार आडव्या खाचेत बसेल अशा तऱ्हेने तारेसह काड्या गुंफतात व तारेची टोके पिळतात. त्यामुळे काड्या पंचपात्रापासून सुटत नाहीत. दुसऱ्या एका निराळ्या आकाराच्या पंचपात्रात वरीलप्रमाणे काड्या गुंफतात व अशा रीतीने छत्रीचा सांगाडा तयार होतो. दुसरे पंचपात्र पहिल्या पंचपात्राजवळ येऊ नये म्हणून दांड्यात एक खिळा बसवतात, तसेच पंचपात्र खाली गेल्यास छत्री उघडते व त्या स्थितीत ती ठेवण्यासाठी तारेचा वा पितळेचा अटकाव (घोडा) दांड्यात खाच पाडून बसविलेला असतो. हा अटकाव वरच्या पंचपात्राला जोडलेल्या भागातील खाचेत अडकून बसतो व त्यामुळे छत्री उघडी राहते. अटकाव स्प्रिंगेसारखा असतो व तो दाबला म्हणजे छत्री मिटते. मुठीच्या वरतीही अशाच प्रकारचा खाचेत अडकणारा अटकाव असून तो दाबल्याशिवाय मिटलेली छत्री उघडत नाही. सांगाड्यावर कापड ताणून शिवतात. कापड दांड्यापासून निसटू नये म्हणून प्रथम रबरी वा कातडी पातळ चकती व नंतर त्यांवर पत्र्याचे टोपण बसवितात आणि खिळ्याने ते पक्के करतात. दांड्याच्या दुसऱ्या टोकाला आवश्यक त्या आकाराची मूठ बसवितात. मुठीच्या खाली छत्री मिटलेल्या स्थितीत व्यवस्थित राहण्यासाठी एक टोपणवजा चकती असते, तीत सर्व काड्या बसतात.

भारतीय उद्योग :एकोणिसाव्या शतकात इंग्रजाच्या कारकीर्दीत भारतात छत्र्या तयार करण्याचा कारखाना सुरू झाला. पण त्या काळी छत्र्यांचे कापड व इतर माल आयात करण्यात येऊन त्या फक्त जोडल्या जात. इंग्लंडहून तयार छत्र्या येत पण त्या महाग असत. दुसऱ्या महायुद्धानंतर काही छत्री कारखानदारांनी देशातच तयार होणारा माल वापरण्यास सुरुवात केली. पण कापड मात्र निकृष्ट प्रतीचे वापरावे लागे. स्वातंत्र्यानंतर मात्र या धंद्याची प्रगती झाली. छत्रीसाठी लागणारे कापड सेंच्युरी मिल्स या मुंबईतील कापड गिरणीने बनविण्यास सुरुवात केली. ही गिरणी छत्रीच्या कापडाच्या निर्मितीबरोबरच त्यासंबंधी संशोधनही करते. भारतात इतरही काही गिरण्या छत्रीचे कापड तयार करतात.  

 

देशाच्या विविध भागांत सु. ५०० लहान मोठे कारखाने विविध प्रकारांच्या छत्र्या तयार करतात. यांपैकी बहुतांशी कारखाने लहान स्वरूपातील आहेत, तर मोठे कारखाने फारच थोडे आहेत. ठराविक काळातच छत्र्यांचा खप होत असल्यामुळे हा व्यवसाय काही काळापुरताच चालू असतो. काही थोडे कारखाने बारमाही चालणारे असतात. लहान कारखान्यांची उत्पादनक्षमता दररोज पाच डझन तर मोठ्या कारखान्यांची ५०० डझनांपर्यंत आहे. 

जपान-हाँगकाँग येथून येणाऱ्या मालाशी स्पर्धा करावी लागत असल्यामुळे भारतातून छत्र्यांची निर्यात थोड्याच प्रमाणात होते. भारतातून पू. आफ्रिका, फिजी, ईजिप्त इ. ठिकाणी छत्र्यांची निर्यात होते. समुद्रकिनारा, उपाहारगृहे येथे वापरावयाच्या छत्र्या गोल्फ खेळाडूंच्या छत्र्या भूसर्वेक्षणाच्या छत्र्या इ. प्रकारांच्या छत्र्यांची निर्यात फ्रान्स, इटली इ. देशांकडे होते. १९६४—६५ मध्ये ३५·७४ लाख रुपयांच्या, तर १९६६-६७ मध्ये सु. १५·०० लाख रुपयांच्या छत्र्या निर्यात करण्यात आल्या.

 

गोखले, श्री. पु. मिठारी, भू. चिं.