कापडावरील अंतिम संस्करण : कापडावर करण्यात येणाऱ्या कापड गिरणीतील ह्या शेवटच्या प्रक्रिया होत. या प्रक्रियांचे प्रमुख उद्देश कापडाची आकर्षकता व टिकाऊपणा वाढविणे हे असतात. ही दोन उद्दिष्टे साध्य करताना कापडाची सुबकताही वाढते व ते वापरण्यास सुखकारक बनते. कधीकधी काही विशिष्ट संस्कार करून कापड अग्निरोधक किंवा जलरोधक सुद्धा बनविले जाते. अर्थात हे सर्व संस्कार कापडाच्या अंतिम उपयोगावरच अवलंबून असतात. साधारणपणे प्रत्येक संस्कारामध्ये मुख्यत: दोन प्रकार असतात. पहिला तात्पुरत्या स्वरूपाचा व दुसरा कायम स्वरूपाचा. तात्पुरत्या स्वरूपाचे अंतिम संस्कार एक-दोन धुलायांपर्यंत टिकतात. उदा., कांजी केलेल्या कापडातील कांजी एक-दोन धुलायांपेक्षा जास्त टिकत नाही. कायम स्वरूपाचे संस्कार केलेल्या कापडामध्ये त्या संस्काराचा परिणाम बऱ्याच काळपर्यंत टिकतो. उदा., पूर्वकुंचन किंवा मर्सरायझेशन (सुती कापडाला कायम चकाकी आणण्याची  जॉन मर्सर यांनी शोधून काढलेली एक पद्धती). या सर्व अंतिम संस्कारांच्या पद्धती पुढील चार प्रमुख गोष्टींवर अवलंबून असतात : (१) कापडाच्या धाग्याचा (तंतूचा) प्रकार व त्याची कापडामधील वीण (२) तंतूचे भौतिकीय गुणधर्म, उदा., त्यांची आकुंचन अथवा प्रसरण क्षमता (३) कापडाच्या तंतूची शोषण क्षमता आणि (४) तंतूच्या रासायनिक फेरफेरातील सहजता.

कापडावरील अंतिम संस्करण मुख्यत: दोन प्रकारांनी करता येते. पहिला प्रकार म्हणजे यांत्रिक (भौतिक) उपचार पद्धती व दुसरा रासायनिक. पहिल्या प्रकारामध्ये कोणतेही रासायनिक द्रव्य न वापरता केवळ यंत्राच्या साहाय्याने कापडावर योग्य तो परिणाम साधता येतो. दुसऱ्या प्रकारात वेगवेगळ्या रासायनिक द्रव्यांची प्रक्रिया कापडावर कमीअधिक प्रमाणात करून योग्य तो परिणाम घडवून आणतात.

यांत्रिक पद्धती : या पद्धतीत कापड वाफेने तापविलेल्या रूळांच्या पृष्ठभागावरून नेऊन वाळवितात किंवा स्टेंटर यंत्रामध्ये ताणलेल्या स्थितीत गरम हवेने वाळवितात. यांत्रिक उपचारांत कापड या दोन पैकी कोठल्याही प्रकाराने वाळविण्यापासून ते दोन किंवा अधिक, वजनदार, तापलेल्या आणि एकमेकांच्या विरुद्ध दिशेने फिरणाऱ्या रूळांमधून सरकवून कापडाच्या सुरकुत्या नाहीशा करण्यापर्यंतचे सर्व प्रकार मोडतात.

कॅलेंडरिंग : रुळाच्या साहाय्याने कापडास झिलई, चमक, तकाकी इ. गुणधर्म आणून देणारी, तसेच काही वेळा त्यावर विविध स्वरूपांचे उमटरेखन (उठावाच्या आकृत्यांचे रेखाटन) करणारी यांत्रिक प्रक्रिया म्हणजेच कॅलेंडरिंग होय. या प्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्राला कॅलेंडर म्हणतात. सर्व संस्करणांमध्ये कॅलेंडरिंग हे अत्यंत महत्वाचे अंतिम संस्करण आहे. यामध्ये गरम हवेने तापविलेल्या दोन वजनदार रूळांमधून कापड सरकविले जाते. त्यावेळी कापडावर देण्यात येणारा दाब हा त्या कापडाच्या पुढील अंतिम संस्करणावर अवलंबून असतो. कॅलेंडरमध्ये साधारणपणे दोन ते अकरापर्यंत रूळ असतात. त्यांतील काही धातूचे बनविलेले असतात तर काही कागद, कापड किंवा रबर यांचे बनविलेले असतात. धातूच्या रूळांचा व्यास हा कागदाच्या किंवा कापडाच्या रूळांच्या व्यासाच्या निम्मा असतो व त्याची कॅलेंडरमधील मांडणी कापडास देण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या संस्करणांवर अवलंबून असते. कॅलेंडरिंग संस्करण (१) चेझिंग, (२) स्विझिंग व (३) घर्षण या तीन प्रकारांनी करता येते. चेझिंगमध्ये कापड सरकविण्याचा वेग हा रूळांच्या पृष्ठभागीय वेगाइतकाच असतो. स्विझिंगमध्ये सुद्धा कापड समान पृष्ठभागीय वेग असलेल्या रूळांमधून सरकवितात. परंतु घर्षण कॅलेंडरिंगमध्ये मात्र संपर्कातील दोन रूळांचा वेग असमान असून एकाच्या वेगाने कापड सरकते, तर दुसरा अधिक वेगाने कापडावरून फिरतो. त्यामुळे कापड अधिक गुळगुळीत बनते व त्यावरील तकाकी वाढते. हे तिन्ही प्रकार आ. १ मध्ये दाखविले आहेत.

या सर्व कॅलेंडरांमध्ये दोन रुळांमधील दाब व त्यांचा पृष्ठभागीय वेग कमीजास्त करण्याची सोय आहे. शिवाय ते रूळ आतून गरम हवेने तापविण्याची सोय असते. त्यामुळे ज्या प्रकारचे संस्करण पाहिजे असेल त्या प्रकारचे संस्करण कापडावर करता येते.

आ. १. कॅलेंडरिंग संस्करणाचे प्रकार : (चेझिंग), (आ) स्विझिंग, (इ) घर्षण.

श्रायनरिंग : कापसापासून बनविलेल्या कापडास रेशमासारखी चकाकी आणण्यासाठी श्रायनरिंगचा उपयोग केला जातो. कॅलेंडरमध्ये धातूच्या रूळावर थोडासा कोन करून रेषा कोरतात. या रेषा साधारणपणे २.५० सेंमीं मध्ये १२५ ते ५०० इतक्या असतात. कापडावर करण्यात येणाऱ्या विशिष्ट संस्करणावर या रेषांचे प्रमाण अवलंबून असते. सर्वसाधारणपणे रूळांचाच श्रायनर कॅलेंडर बनविलेला असतो. त्यातील वरील रूळ धातूचा असून त्यावर या रेषा कोरलेल्या असतात. हा रूळ आतून  तापविण्याची सोय असते. १५० से. तपमानापर्यंत हा रूळ तापविला जातो. जेव्हा कापड दोन रूळांमधून सरकविले जाते त्यावेळी त्यावर दिलेला दाब १०० टन असतो. या रूळांमधून कापड जाताना उष्णता व दाब यांच्यामुळे कापडाला रेशमासारखी झळाळी येते. जेव्हा मोठ्या प्रमाणावर हे संस्करण करावयाचे असते तेव्हा तीन रूळ वापरतात. कधीकधी खालचा रूळसुद्धा स्क्रूप्रमाणे कोरतात. त्यामुळे कापडास जास्त चकाकी येण्यास मदत होते.

उमटरेखन कॅलेंडरिंग : यामध्येसुद्धा धातूच्या रूळावर वेगवेगळे नक्षीकाम कोरलेले असते व तो रूळ दोन कागदांच्या किंवा कापडाच्या रूळांमध्ये बसविलेला असतो. शिवाय तो आतून तापविण्याची आणि कापडावर कमीजास्त दाब देण्याची सोय असते. त्यामुळे रूळावर जे नक्षीकाम असते तेच कापडावर हुबेहूब उठत असे. कॅलेंडरिंगचा दुसरा मुख्य फायदा म्हणजे कापडावर जे अनावश्यक तंतू वर आलेले असतात ते दबले जाऊन कापडाचा पृष्ठभाग गुळगुळीत होतो.

सॅन्फोरायझेशन : जर नवीन कापड पाण्यामध्ये बुडविले तर ते धुतल्यानंतर आकसते. असे होऊ नये म्हणून कापड रंगवून व छपाई

आ. २. सॅन्फोरायझेशन यंत्र : (१) कापड, (२) बाणा (आडवे सूत), (३) ताणा (उभे सूत), (४) धातूचा गरम केलेला ठोकळा, (५) संभरण रूळ, (६) पामर शुष्कक रूळ, (७) जाड आच्छादन.

करून आल्यावर कृत्रिम दाब देऊन त्याची लांबी व रूंदी कमी करतात. असे कापड धुतल्यानंतर त्याच्या लांबी रूंदीत फरक पडत नाही. या विशिष्ट पद्धतीस सॅन्फोरायझेशन असे म्हणतात. या पद्धतीने संस्करण करण्याची पद्धत आ. २ मध्ये दाखविली आहे.

आकृतीवरून असे दिसून येईल की, जेव्हा कापड जाड आच्छादनाच्या वक्रभागावर असते त्या वेळी वक्र  पृष्ठभागावर आच्छादन प्रसरण पावल्याने त्याची लांबी जास्त होते. येथेच ते कापड धातूच्या गरम केलेल्या ठोकळ्याने तापविले जाते. नंतर ते कापड पुढे सरकविले जाते व पामर रूळ नावाने ओळखल्या जाणाऱ्या शुष्कक रूळाशी त्याचा संपर्क होतो  त्यावेळी आच्छादनाच्या पृष्ठभागाची लांबी कमी झालेली असते. त्यामुळे कापडास थोड्याशा सुरकुत्या पडतात. याच स्थितीत त्यावर पामर रूळाच्या साहाय्याने दाब दिल्याने यावेळी जी लांबीरूंदी असते तीच पुढे कायम राहते. अशी प्रक्रिया केलेल्या कापडास सॅन्फोराइज्ड कापड म्हणतात. हल्ली सर्व कापड गिरण्यांमध्ये सूटिंग, शर्टिंग वगैरे कापडांवर ही प्रक्रिया करतात.

रिगमेल पद्धती : सॅन्फोरायझेशन पद्धतीने ज्या प्रकारचे कापड तयार होते त्याच प्रकारचे कापड दुसऱ्या एका पद्धतीने तयार करता येते. या पद्धतीस रिगमेल पद्धती असे म्हणतात. या प्रकारच्या संस्करणासाठी बरीच यंत्रे तयार करण्यात आलेली आहेत. दोन चाकांवरून फिरणारा एक जाडसा व निरंत असा रबरी पट्टा हा या पद्धतीच्या यंत्राचा मुख्य कार्यकारी भाग असतो. (आ. ३).

आ. ३. रिगमेल पद्धती : (१) रबरी पट्टा, (२) कापड, (३) आतून तापविलेला रूळ.

जेव्हा कापड या बिंदूपासून रबरी पट्ट्याबरोबर जाते तेव्हा ते तापविलेल्या रूळाच्या संपर्कात आल्यामुळे तापते. ते जेव्हा पट्ट्याबरोबर सरकत सरकत या बिंदूजवळ येते त्यावेळी पट्टा आकुंचन पावलेल्या स्थितीत असतो व त्यामुळे कापड येथे थोडे सैल पडते. याच वेळी वरील तापलेल्या रुळामुळे ते दाबले जाते व त्यामुळे  ते तेथून बाहेर पडले, तरी दाबलेल्या आकसलेल्या स्थितीतच राहते. अशा तऱ्हेने या अगदी सोप्या पद्धतीने येथे कापडाची लांबी कमी केली जाते व कापड धुतल्यानंतरही ती कायम राहते.

रासायनिक पद्धती : कापडाला काही विशिष्ट गुणधर्म आणण्यासाठी त्यावर रसायनांच्या साहाय्याने मर्सरायझेशन, `धुवा व वापरा’ (वॉश अँड वेअर) इ. प्रक्रिया केल्या जातात. कापडाच्या प्रकारानुसार ह्या प्रक्रिया करतात. ह्या प्रक्रियांमुळे कापड चकचकीत, सुबक, टिकाऊ, अग्निरोधी, जलरोधी, कीटकरोधी, चुणीरोधी इ. गुणधर्मांचे बनते.

कापडावरील विविध रासायनिक उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या अनेक पदार्थांपैकी कांजी हा एक महत्वाचा पदार्थ आहे. कांजीचा मुख्य उपयोग सुताचे ताणे मागावर चढवण्यापूर्वी त्यांना लावण्यासाठी होतो. ताण्याच्या सुताला कांजी लावली म्हणजे सुताला मजबुती व ताठपणा येतो व माग चालू असताना त्याच्या हालचालीत व त्यावरून धोटा सरकत असताना सुताला इजा पोहोचत नाही. तसेच कापडाला ताठपणा आणण्यासाठीही कांजीचा उपयोग करतात. कधीकधी कापडाला मऊपणा आणण्यासाठी आणखी काही रासायनिक द्रव्ये कांजीत मिसळतात. कांजी ही मुख्यत: गहू, तांदूळ, मका आणि   वनस्पतींच्या मुळांपासून तयार करतात. प्रत्येक प्रकारच्या कांजीमध्ये काही खास वैशिष्ट्ये असतात व त्यांचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारच्या उपचारासाठी करतात. प्रथम थोड्याशा पाण्यामध्ये कांजीचे मिश्रण तयार करून ते तापवितात. याच वेळी ते सारखे घुसळत रहावे लागते. जेव्हा ते मिश्रण पारदर्शक बनते त्या वेळी त्यात पुरेसे पाणी घालून ज्या प्रकारच्या कापडासाठी ते वापरावयाचे असेल त्याला योग्य असे विरल मिश्रण करतात. नंतर त्यामध्ये कापड बुडवून ते दोन लाकडी रूळांमधून नेतात. रूळांमधून जाताना कापडावर त्याच वेळी काही प्रमाणात दाब बसतो व त्यामुळे कांजी योग्य प्रमाणात कापडावर बसते. नंतर ते कापड मोठ्या तापलेल्या रूळाच्या पृष्ठभागावरून नेतात. त्यामुळे कापडास सुरकुती न पडता ताबडतोब वाळते. कांजी वापरून केलेले संस्करण हे तात्पुरत्या स्वरूपाचे असते. जेव्हा कांजीचा परिणाम बराच वेळ टिकणे आवश्यक असते तेव्हा तीत रेझिनांसारखी वेगवेगळी रासायनिक द्रव्ये मिसळतात. कांजीचा मुख्य उपयोग कापडाला ताठपणा आणण्यास व अन्य सहाय्यक पदार्थ कापडावर टिकवून धरण्यास होतो. कांजीचा दाट विद्राव केवळ पृष्ठभागीय मऊपणा आणण्यासाठी वापरतात. याउलट ताठपणाच्या संस्करणामध्ये जास्त पातळ विद्राव वापरला जातो. त्यामुळे कापडाच्या अंतर्भागातही कांजीचे शोषण होते. कांजीचे जास्त प्रमाण `लाँगक्लॉथ’ या प्रकारच्या कापडासाठी वापरतात, तर पॉपलिन व रंगविलेल्या कापडासाठी पातळ विद्राव वापरतात.

मर्सरायझेशन : या पद्धतीमध्ये मुख्यत्वेकरून दाहक (कॉस्टिक) सोडा अथवा सल्यूरिक अम्ल यांचा उपयोग केला जातो. दाहक सोड्याच्या उपयोगाची पद्धत प्रथम सर जॉन मर्सर यांनी १८४४ मध्ये शोधून काढली म्हणून या पद्धतीस मर्सरायझेशन असे म्हणतात. या पद्धतीमध्ये २०% दाहक सोड्याच्या विद्रावात कापड प्रथम १८ ते २० से. तपमानास ३ ते ५ मिनिटे बुडवून ठेवतात. यावेळी ते कापड सर्व बाजूंनी ताणलेल्या अवस्थेत असते. नंतर ते रूळांमधून सरकविले जाते व त्यावरील दाहक सोड्याचा विद्राव निर्वात पंपाने शोषून घेतला जातो. नंतर ते कापड धुवून सुकविले जाते. या पद्धतीचा परिणाम दाहक सोड्याच्या विद्रावाची संहती (विद्रावातील सोड्याचे प्रमाण), कापडास दिला जाणारा ताण व प्रक्रियेतील तपमान या गोष्टींवर अवलंबून असतो. या पद्धतीचे प्रमुख फायदे पुढीलप्रमाणे आहेत : (१) कापडाची चकाकी वाढते, (२) कापडाच्या रंगशोषणक्षमतेत वाढ होते आणि (३) कापडाची मजबुती वाढते.

ही पद्धत टिकाऊ किंवा कायम स्वरूपाच्या संस्करण पद्धतीमध्ये मोडते. कापसातील तंतू फुगीर होऊन मुळच्या आकुंचित तंतूचा दंडगोलासारखा आकार बनतो. त्यामुळे तंतूची जलशोषकता वाढते. या पद्धतीमध्ये कापडाची चकाकी त्यास दिलेल्या ताणावर अवलंबून असते. ही पद्धत सोपी व कमी खर्चाची आहे. कमी वजनाचे व तलम सूत वापरून तयार केलेल्या मलमल, वायल, अर्ध व पूर्ण वायल, लोन आणि तत्सम कापडावर ही प्रक्रिया प्रामुख्याने केली जाते.

सल्फ्यूरिक अम्ल वापरूनही कापडाचा सुबकपणा व चकाकी काही प्रमाणात वाढविता येतात. ५०% सल्फ्यूरिक अम्लाच्या विद्रावात जर कापड बुडविले व   नंतर ते अम्ल संपूर्णपणे निघेपर्यंत धुवून वाळविले, तर कापडाचा मऊपणा बऱ्याच प्रमाणात वाढतो. तेच कापड ५५% सल्फ्यूरिक अम्लात बुडविले तर ते पारदर्शक व ताठ बनते. दोन वजनदार व गरम रूळांमधून नेल्यास कापड अधिक पारदर्शक होण्यास मदत होते. ही प्रक्रिया सर्वसाधारण तपमानास करतात.

चुणीनिरोधक संस्करण : कापसापासून तयार केलेल्या कापडाचा प्रमुख दोष म्हणजे त्यास चुणी किंवा सुरकुती पडणे हा होय. हा दोष घालविण्यासाठी अनेक रासायनिक पदार्थांचा व पद्धतींचा अवलंब केला जातो. `धुवा व वापरा’ प्रकारचे कापड याच प्रकारात मोडते. असा उपचार सेल्युलोज अनुजात (सेल्युलोजपासून तयार केलेली संयुगे) किंवा रेझिने वापरून करता येतो.

कापसामधील मूलघटक हा सेल्युलोज या नावाने ओळखला जातो. या सेल्युलोजाशी वेगवेगळ्या रासायनिक द्रव्यांचा संयोग करून सेल्युलोज ईथर किंवा सेल्युलोज एस्टर तयार करतात. या दोहोंचा उपयोग कापडावरील अंतिम संस्करणासाठी  करतात. एका पद्धतीमध्ये प्रथम मर्सरायझेशन करून कापडाची संयोगक्षमता वाढविली जाते व नंतर ते कापड सेल्युलोज ईथर किंवा सेल्युलोज एस्टर विरघळविलेल्या दाहक सोड्याच्या विद्रावातून आणि मग सल्फ्यूरिक अम्लाच्या विरळ विद्रावातून नेतात. यामुळे सेल्युलोज अनुजाताचा पातळ थर कापडाच्या पृष्ठभागावर बसून कापडास ताठपणा येतो. दुसऱ्या प्रकारात वेगवेगळ्या रासायनिक द्रव्यांची मर्यादित प्रक्रिया कापडावरच करून त्यांचे मर्यादित प्रमाणात सेल्युलोज ईथर किंवा एस्टर तयार करतात. यामुळे कापडास एक विशिष्ट प्रकारचा ताठपणा येतो.

हल्ली कापडावर रेझिनासारख्या कार्बनी एकवारिक (कमी रेणुभार व साधी संरचना असलेल्या कार्बनयुक्त) पदार्थांच्या साहाय्याने चुणीनिरोधक परिणाम अधिक टिकाऊ बनविता येतो. फॉर्माल्डिहाइड, यूरिया, मेलॅमीन वगैरे अथवा ग्लायॉक्झॉल, ॲसिटोन कार्बामेट इ. पदार्थांच्या संयोगाने रेझीन बनलेले असते. अम्लधर्मीय अथवा क्षारधर्मीय (अम्लाशी विक्रिया होऊन लवणे देण्याचा गुणधर्म असलेल्या) साहाय्यकांच्या उपयोगाने १५० से. तपमानास एकवारिक पदार्थाचे बहुवारिकामध्ये (अनेक रेणू एकत्रित येऊन तयार झालेल्या मोठ्या रेणूमध्ये) रूपांतर होते. कापडावरील अंतिम संस्करणासाठी अशा प्रकारच्या द्रव्यांचा उपयोग प्रथम १९२६च्या सुमारास फोल्ड, मार्श वगैरे शास्त्रज्ञांनी केला. या संस्करणामध्ये कापड प्रथम जलविद्राव्य रेझीन साहाय्यक आणि अन्य साहाय्यक पदार्थ यांच्या मिश्रणात बुडवून विशिष्ट दाबाखाली दोन अथवा तीन रूळांमधून नेले जाते. नंतर ते ७०-८० से. तपमानास सुकविले जाऊन त्वरित १५० से. तपमानास ३ ते ४ मिनिटे ताणलेल्या स्थितीत ठेवले जाते. नंतर ते धुण्याच्या सोड्याच्या विरल विद्रावात बुडविले जाऊन साबणाच्या विद्रावाने धुतले जाते. या संस्करणाची कार्यक्षमता सुताचा दर्जा, कापडाच्या धाग्याची रचना, रेझिनाचा प्रकार, साहाय्यकाचा प्रकार, बहुवारिकीकरणाचे तपमान व काल यांवर अवलंबून असते. जास्त ताठपणा आणण्यासाठी रेझिनाचे कापडावरील प्रमाण वाढवावे लागते. या संस्करणाने होणाऱ्या प्रमुख फायद्यांत चुणीनिरोधकतेबरोबरच सहज व सुलभ वळण्याचे गुणधर्म, धुलाईमुळे होणाऱ्या आकुंचनाचा अभाव, कोरड्या अथवा ओल्या कापडाच्या ताणण्याच्या ताकदीतील वाढ (फक्त व्हिस्कोज म्हणजे सेल्युलोजाचे विरघळणाऱ्या झॅंथेटामध्ये रूपांतर करून त्यापासून तयार केलेल्या तंतूंच्या बाबतीत), पाणी समावून घेण्याची शक्ती इत्यादींचा समावेश होतो. उलट ह्या संस्करणातील कापडाची कमी अपघर्षणरोधकता, कापसापासून बनविलेल्या कापडातील सु. ३० ते ४० टक्क्यांनी कमी होणारी ताकद, विरंजक (रंग काढून टाकणाऱ्या) चूर्णातील क्लोरिनामुळे कमी होणारी मजबुती आणि काही दिवसांनी त्यातील रेझिनामधील फॉर्माल्डिहाइडमुळे कापडास येणारा अनावश्यक दर्प हे ठळक दोष होत.

धुवा व वापरा : या पद्धतीत वापरल्या जाणाऱ्या रेझिनांचे मुख्यत: दोन प्रकार होतात. हे म्हणजे ऊष्मामृदू (उष्णतेने मऊ होणारे) व उष्मादृढ (उष्णतेने घट्ट होणारे) हे होत. उष्मामृदू प्रकारातल्या रेझिनांचा मुख्य गुणधर्म म्हणजे ती उष्णतेमुळे मऊ होतात आणि शेवटी वितळतात. याउलट उष्मादृढ प्रकारात उष्णतेमुळे द्रवाचे घनीभवन होऊन तो टणक व कठीण बनतो. उष्मादृढ रेझिनांमध्ये मुख्यत्वेकरून एकवारिक फिनॉल व फॉर्माल्डिहाइड यांच्यापासून तयार होणारी रेझिने मोडतात म्हणून त्यांना फेनोप्लास्ट असे म्हणतात. या रेझिनांच्या बहुवारिकीकरणासाठी क्षारधर्मीय साहाय्यकांचा वापर केला जातो. या पदार्थांना किंचित पिवळसरपणा अथवा तांबुसपणा असल्याने त्यांचा वापर मर्यादित प्रमाणात केला जातो. यूरिया आणि तत्सम नायट्रोजनयुक्त पदार्थांपासून फॉर्माल्डिहाइडच्या संयोगाने बनविलेल्या रेझिनांचा वापर हल्ली फार मोठ्या प्रमाणावर केला जातो. या पदार्थांना ॲमिनोप्लास्ट असे म्हणतात. या पदार्थांमध्ये यूरिया, फॉर्माल्डिहाइड, तसेच यूरियापासून तयारे केलेली अन्य रासायनिक द्रव्ये (उदा., डायमिथिलॉल एथिलीन यूरिया, डायमिथिलॉल डायहायड्रॉक्सी एथिलीन यूरिया, डायमिथिलॉल प्रोपिलीन यूरिया वगैरे), बहुभुजाकृती अणुरचना असलेले रासायनिक पदार्थ, मेलॅमीन फॉर्माल्डिहाइड, ट्रायाझोन, ॲसिटिलीन डाययुराइड, युरॉन्स इ. पदार्थ मोडतात. एथिल कार्बामेट अथवा युराथेन व त्यांची संयुगे तसेच नायट्रोजन विरहित रासायनिक पदार्थ, उदा., ॲसिटले, इपॉक्सी, सल्फोन इ. रासायनिक पदार्थांचा तुरळक प्रमाणात वापर केला जातो. या पदार्थांच्या बहुवारिकीकरणासाठी अम्ल अथवा अम्लोत्पादक लवणे यांचा साहाय्यक म्हणून वापर केला जातो.

आधुनिक काळात सेल्युलोज ॲसिटेट या पदार्थाचा उपयोग कापसापासून तयार केलेल्या कापडावर संस्करण करण्यासाठी करतात. यामुळे कापड तजेलदार बनून त्यास सुरकुत्या पडत नाही. यामध्ये सेल्युलोज ॲसिटेटाचे कापड व कापसापासून तयार केलेले कापड एकावर एक ठेवून त्यामध्ये विशिष्ट प्रकारचे रसायन घालून त्यावर विशिष्ट प्रमाणात दाब दिला जातो व त्याचे तपमान १५० से. इतके ठेवतात. त्यामुळे दोन्ही कापडे एकजीव होतात व यामुळे कापसापासून तयार केलेल्या कापडावर सेल्युलोज ॲसिटेटाचा मुलामा दिल्यासारखा वाटतो आणि कापड टिकाऊ व आकर्षक बनते. या प्रकारच्या अंतिम संस्करण केलेल्या कापडाला पत्रित (किंवा ट्रुबेनाइज्ड) कापड असे म्हणतात.

कायम घडी : धुवा व वापरा या प्रकारचे संस्करण केलेल्या कापडाचा मुख्य दोष असा की, कापड चुणीनिरोधक असल्यामुळे अशा प्रकारच्या कापडापासून तयार केलेल्या कपड्यावर, उदा., शर्ट, पॅंट वगैरेंवर इस्त्रीचा योग्य तो परिणाम होऊ शकत नाही. संस्करणाच्या पद्धतीमध्ये योग्य तो बदल करून ज्या ठिकाणी चुणीची अथवा घडीची आवश्यकता असेल त्या ठिकाणी चुणी अथवा घडी योग्य ती प्रक्रिया करून साधता येते. या पद्धतीमध्ये मुख्यत्वे रेझिनाचा व साहाय्यकांचा निरनिराळ्या प्रकारे वापर केलेला असतो. अशा तऱ्हेने पाडलेली घडी कपडा धुतल्यानंतरही टिकून रहाते हे या प्रक्रियेचे वैशिष्ट्य आहे.

विलंबित कायम घडी पद्धती : या पद्धतीमध्ये कापड प्रथम रेझीन व साहाय्यकांचे विशिष्ट मिश्रण आणि अन्य पूरक पदार्थ असलेल्या विद्रावात बुडवून काढल्यानंतर सुकविले जाते आणि रेझिनाच्या बहुवारिकीकरणासाठी आवश्यक असलेले तपमान व वेळ यांपेक्षा कमी तपमानास थोडा वेळ ठेवले जाते. यामुळे कापड अपूर्ण बहुवारिकीकरणाच्या अवस्थेत राहते. अशा प्रकारच्या कापडाचे कपडे शिवून योग्य त्या ठिकाणी चुणी अथवा घडी पाडल्यानंतर त्या कपड्यांवर इस्त्री केली जाते आणि त्यानंतर १५० – १७०से. तपमानास सु. ३-५ मिनिटेपर्यंत ठेवून रेझिनाचे बहुवारिकीकरण पूर्ण केले जाते. त्यामुळे अगोदर पाडलेली घडी कायम स्वरूपात राहते आणि कपड्याचा उरलेला पृष्ठभाग चुणीनिरोधक राहतो. या संस्करणासाठी कार्बामेट व संस्कारित यूरिया फॉर्माल्डिहाइड रेझिने, तसेच दोन अथवा तीन साहाय्यकांचे मिश्रण (झिंक नायट्रेट व मॅंगॅनीज क्लोराइड) ही रसायने सर्वसामान्यपणे वापरली जातात.

पुनर्बहुवारिकीकरण : या पद्धतीमध्ये डायमिथिल एथिलीन यूरिया, साहाय्यक आणि उच्च उकळबिंदू असलेले निष्क्रिय फुगवटाकारक पदार्थ यांच्या विद्रावात बुडवून काढलेले कापड सुकवून उकळबिंदूपेक्षा कमी तपमानास रेझिनाचे बहुवारिकीकरण केले जाते. नंतर कपडा शिवून उकळबिंदूहून अधिक तपमानास ठेवल्यानंतर फुगवटाकारक पदार्थ उडून जातो आणि कापडावरील घड्या कायम स्वरूपाच्या बनतात. या पद्धतीमध्ये फुगवटाकारकाच्या योग्य त्या निवडीला आणि त्याच्या किंमतीला महत्त्व असते. यामुळे सुकलेल्या स्थितीतील चुणीनिरोधकता व अपघर्षणरोधातील वाढ हे प्रमुख फायदे मिळतात.

फॉर्माल्डिहाइड किंवा एपिक्लोरोहायड्रिनसारख्या पदार्थाच्या वायुरूप अवस्थेत त्याच्याशी संयोग होऊ शकणाऱ्या एकवारिक पदार्थांचा थर दिलेल्या कापडापासून शिवलेल्या कपड्याची घडी घालून योग्य वेळपर्यंत घडी दाबून ठेवली असता बहुवारिकी रेझीन कपड्यावरच तयार होते आणि मग घडी कायमची होते. या पद्धतीस बाष्प संस्करण असे म्हटले जाते. अशा प्रकारच्या प्रक्रिया वा पद्धती कोरेट्रान प्रेस, नेवा प्रेस, सुपर क्रीज, पॉलिसेट अथवा अतिरा (अहमदाबाद टेक्स्टाइल रिसर्च असोसिएशन या संस्थेने शोधून काढलेली) प्रेस, बिल (बिल्ट इन ल्यूब्रिकेशन) अशा व्यापारी नावांनी प्रचलित आहेत. यांतील बऱ्याच प्रक्रिया सुती तसेच टेरिलिनासारख्या कापडांपासून किंवा मिश्र स्वरूपाच्या कापडांपासून बनविलेल्या कपड्यांवर केल्या जातात.

काही खास संस्करणे : कापडामध्ये जलरोधी, अग्निरोधी वगैरे काही विशिष्ट गुणधर्म आणण्यासाठी काही विशिष्ट प्रकारची अंतिम संस्करणे केली जातात. जलरोधक संस्करणामुळे कापड एका बाजूने पाण्याने ओले केले तरी त्या कापडाची दुसरी बाजू कोरडीच राहते. छत्र्यांकरिता व पावसाळी कोटांसाठी वापरले जाणारे कापड याच प्रकारात मोडते. अग्निरोधक संस्करणामुळे कापड सहसा पेट घेत नाही व यदाकदाचित दुसऱ्‍या कापडाच्या सान्निध्यामुळे जर ते पेटले, तर ते ताबडतोब विझते. अग्निशामक दलात काम करणाऱ्या लोकांच्या कपड्यांसाठी असे संस्करण केलेले कापड वापरतात. काही संस्करणे कापडाला कृमिकीटकांचा उपद्रव होऊ नये म्हणून केली जातात. त्यामुळे कापड बराच काळपर्यंत चांगल्या स्थितीत रहाण्यास मदत होते. या संस्करणामुळे कापडाची किंमत अर्थातच वाढते व म्हणून अगदी आवश्यक तेथेच असे कपडे वापरतात.

जलरोधक संस्करण:कापडाच्याएकाबाजूसरबराचामुलामादेऊनकापडजलरोधकबनविण्याचीफारजुनीपद्धतआहे. यापद्धतीचा प्रथम उपयोग दक्षिण अमेरिकेत १७५९ मध्ये करण्यात आला. रबराच्या विद्रावामधून कापड बुडवून काढून ते दोन रूळांमधून काही प्रमाणात दाब देऊन नेतात. याच वेळी कापड थोडे ताणले जाते. नंतर ते पाण्याच्या वाफेच्या सान्निध्यात काही काळ ठेवले जाते किंवा तापवलेल्या मोठ्या रूळाच्या पृष्ठभागावरून नेले जाते. त्यामुळे रबराचा पातळ थर सारख्या प्रमाणात कापडाच्या पृष्ठभागावर बसतो. परंतु या पद्धतीमध्ये मोठा दोष म्हणजे हा रबराचा थर जास्त काळ टिकत नाही. काही काळानंतर रबराचे पापुद्रे सुटे होऊ लागतात. कधी कधी रबराच्या चिकात मेण, साबण किंवा वसाम्ले (फॅटी ॲसिड्स), जास्त अणुभार असलेली अल्कोहॉले, जस्त व मॅग्नेशियम या धातूंची स्टिअरेटे काही प्रमाणात मिसळून हे मिश्रण वापरतात. रबराच्या विद्रावापेक्षा हे मिश्रण अधिक परिणामकारी आहे. पॅराफीन मेण व विद्रावक नॅप्था यांचा सुद्धा कधीकधी वापर केला जातो. चिनी माती व जवसाचे तेल यांचे मिश्रण सुद्धा कधीकधी यासाठी वापरतात. प्रथम कापड या मिश्रणामधून नेऊन नंतर ते कॅलेंडरमधून थोडा दाब देऊन नेतात. या प्रकारचे मिश्रण वापरून केलेले कापड टेबलावरती वापरावयाचे कापड वगैरेंसाठी वापरतात.

सेल्युलोज नायट्रेट किंवा सेल्युलोज ॲसिटेट याचा थर कापडावर देऊन कापड जलरोधक बनविता येते. परंतु हे संस्करण कायम स्वरूपाचे नसल्यामुळे याचा जास्त वापर केला जात नाही. कधीकधी ॲल्युमिनियम हे मूलद्रव्य असणाऱ्या संयुगाच्या साहाय्याने कापड जलरोधक बनविता येते. प्रथम कापड नेहमीच्या साबणाच्या विद्रावात बुडवितात व नंतर त्यातील जास्त झालेला साबणाचा विद्राव कापड पिळून काढून मग ते ॲल्युमिनियम ॲसिटेटाच्या विद्रावात बुडवितात. त्यामुळे ॲल्युमिनियम साबणाचा पातळ थर कापडावर तयार होतो. हा साबण पाण्यात अविद्राव्य असल्यामुळे कापड जलरोधक बनते.

हल्ली जास्त अणुभार असलेली काही रासायनिक संयुगे कापड जलरोधक करण्यासाठी वापरतात. अमोनियम पॉलिॲक्रिलेट व ॲल्युमिनियम ॲसिटेट या दोहोंचा उपयोग करून कापड जलरोधक बनविले जाते. शिवाय सिलिकॉन हे मूलद्रव्य असणारी संयुगे तसेच डायमिथिल पॉलिसिलिओक्झेन व मिथिल हायड्रोजन पॉलिसिलिओक्झेन यांचे मिश्रण ही या संस्करणासाठी वापरतात. हे संस्करण करताना योग्य त्या कार्बनी विद्रावामध्ये २-३% ही द्रव्ये घालून त्या विद्रावामधून कापड नेतात व ते साधारणपणे १५०से. तपमानास पाच मिनिटे ठेवतात.

आधुनिक काळात व्हेलान पी. एफ. या रासायनिक पदार्थाचा जलरोधी कापडासाठी फार मोठ्या प्रमाणावर होत आहे. प्रथम व्हेलान पी. एफ. पाण्यामध्ये विरघळवून त्या विद्रावामधून कापड बुडवून काढून नंतर ते दोन रूळांमधून थोडासा दाब देऊन नेतात व मग वाळवून १३० ते १५० से. तपमानास २-३ मिनिटे ठेवतात. त्यानंतर ते साबणाच्या विरल विद्रावाने धुवून काढून वाळवितात.

अग्निरोधक संस्करण : नीच वितळबिंदू असलेल्या लवणांचा उपयोग करून पूर्वीपासून (सुमारे १८२० पासून) कापड अग्निरोधक बनविले जात असे. कारण या लवणांचा पातळ पारदर्शक थर कापडावर बसल्यामुळे कापड अग्निरोधक होण्यास मदत होते, असा अनुभव होता. त्यासाठी सोडियम स्टॅनेट, व अमोनियम सल्फेट यांचे मिश्रण, अमोनियम ब्रामाइड, अमोनियम क्लोराइड, झिंक क्लोराइड, मॅग्नेशियम क्लोराइड वगैरे लवणांचा उपयोग केला जात असे. अमोनियम सल्फामेट ८५% व अमोनियम फॉस्फेट १५% यांचे मिश्रण वापरल्याने कापडावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. अमोनियम सल्फामेट, संहत सल्यूरीक अम्ल व यूरिया यांच्या संयोगाने वरील मिश्रण तयार करतात. अबॉपॉन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रासायनिक पदार्थाचा वापर हल्ली फार मोठ्या प्रमाणात केला जातो. रासायनिक दृष्ट्या हे बोरोफॉस्फेट या नावाने ओळखतात. १०-१५% रेझिनाच्या विद्रावात हे बोरोफॉस्फेट मिसळून त्यामध्ये कापड बुडवून नंतर ते दोन रूळांमधून थोडा दाब देऊन नेतात. नंतर ते कापड वाळवून १५० से. तपमानास २-३ मिनिटे ठेवतात. हा रासायनिक पदार्थ वापरून कापडास दिलेले संस्करण कायम स्वरूपात टिकते.

या संस्करणासाठी आणखी बरीच रासायनिक द्रव्ये वापरली जातात. बोरिक अम्ल व टाकणखार यांचे मिश्रण, फॉस्फरस मूलद्रव्ये असलेली संयुगे या संस्करणासाठी जास्त प्रभावी ठरली आहेत. टी. एच. पी. सी. (टेट्राकिश हायड्रॉक्सिमिथिल फॉस्फोनियम क्लोराइड) या नावाने ओळाखला जाणारा रासायनिक पदार्थ फारच मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. हा पदार्थ मेलॅमीन फॉर्माल्डिहाइड या रेझिनाच्या सान्निध्यात वापरतात.

सूक्ष्मजंतुरोधक व कीटकरोधक संस्करण : एखादे कापड बराच काळ एके ठिकाणी ठेवले असता कीटक व सूक्ष्मजंतू यांच्या उपद्रवामुळे ते खराब होते. विशेषत: ज्या कापडास कांजी असते त्या कापडास याची फारच भीती असते. उबदार व ओलसर हवेमध्ये या सूक्ष्मजंतूंची व कीटकांची वाढ झपाट्याने होते. म्हणून कापड शक्यतो थंड व कोरड्या हवेत ठेवतात. कापडात तयार होणारे सूक्ष्मजंतू व कीटक इतके सूक्ष्म असतात की, ते आपणास डोळ्यांनी दिसत नाहीत. यासच आपण कपड्यास कसर लागली असे म्हणतो. यावर सर्वांत सोपा उपाय म्हणजे जंतुनाशक द्रव्यांचा उपयोग करणे. फिनॉल, क्रेसॉल, सॅलिसिलिक अम्ल, फॉमॉल्डिहाइड, झिंक क्लोराइड वगैरे रासायनिक पदार्थ जंतुनाशक द्रव्ये म्हणून वापरतात. सॅलिसिलिक अम्ल आणि ॲनिलीन यांचे मिश्रण तर या बाबतीत फारच प्रभावी ठरले आहे. शिवाय ही द्रव्ये फार महाग नसतात.

काही कार्बनी – धातू संयुगेही (कार्बनाशी संयोग झालेले धातूचे अणू असलेली संयुगेही) जंतूनाशक म्हणून वापरतात. कॉपर, ॲसिटोनेट, मर्क्युरी सॅलिसिलेट व ओलेट, झिंक व कॉपर व नॅप्थानेट, कॅडमियम व कॉपर साबण, मॉर्फोलीन व हायेड्रोक्विनोलीन यांचे संघनित (सारखे किंवा भिन्न रेणू रासायनिक विक्रियेने जोडलेले) पदार्थ इ. रासायनिक द्रव्यांचा जंतुनाशासाठी वापर करतात. मोरचूद (कॉपर सल्फेट), कॅडमियम क्लोराइड, टाकणखार वगैरे द्रव्यांचा वापरसुद्धा यासाठी करतात. साधारण ३-५% द्रव्ये पाण्यात मिसळून त्यामधून कापड बुडवून काढतात व दोन रूळांमधून नेऊन काही प्रमाणात दाब देऊन नंतर ते कापड सुकवितात. अलीकडे मेलॅमीन आणि फॉर्माल्डिहाइड यांचे पूर्वसंघनित संयुग वापरतात. त्यामुळे कापडावर या पदार्थांचा पातळ थर तयार होऊन कापडाचे सूक्ष्मजंतूंपासून संरक्षण होते.

रेयॉन आणि कृत्रिम धाग्यांच्या कापडावरील चकाकी कमी करण्याची पद्धती : व्हिस्कोज रेयॉन, क्युप्रामोनियम रेयॉन, ॲसिटेट रेयॉन वगैरे कापडांवर जी पारदर्शक व अनावश्यक चकाकी असते ती कमी करण्यासाठी काही विशेष प्रक्रिया कराव्या लागतात. कारण काही ठिकाणी रेयॉनाच्या चकाकीची मुळीच आवश्यकता नसते. ही चकाकी काढण्यासाठी टिटॅनियम डाय-ऑक्साइड, झिंक सल्फेट वगैरेंचा वापर करतात. या पदार्थांच्या कणांचे आकारमान लहान असते. हे पदार्थ सूतकताई कुंडातच टाकतात. त्यामुळे विद्रावातून निर्माण होणारे रेयॉनचे धागे कमी पारदर्शक व शुभ्र बनतात.

दुसऱ्या काही पद्धतींमध्ये रेयॉन कापड बेरियम सल्फेट किंवा बेरियम क्लोराइड यामध्ये प्रथम बुडवून मग ते सोडियम टंगस्टेटामध्ये बुडवून काढतात. त्यामुळे बेरियम टंगस्टेट हा अविद्राव्य पदार्थ तयार होऊन तो कापडावर बसतो व रेयॉनची चकाकी कमी होते. स्निग्ध अल्कोहॉल व धातू यांपासून बनविलेली लवणे, काही अविद्राव्य साबण वगैरे वापरूनसुद्धा रेयॉनाची चकाकी कमी करता येते. ॲसिटेट रेयॉनाच्या बाबतीत टिटॅनियम डाय-ऑक्साइड पद्धत वापरतात. सर्वसाधारणपणे नेहमी वापरण्यात येणारी पद्धत म्हणजे साबण व फिनॉल यांच्या विद्रावात तीस मिनीटे १००से. तपमानास रेयॉन बुडवितात. कधीकधी या विद्रावात सल्फोनामाइड ॲसिटील पिरिडीनियम ब्रोमाइड किंवा पायसीकृत (एकमेकांत न मिसळणाऱ्या दोन द्रवांच्या मिश्रणाच्या स्वरूपातील) पाइन तेल वगैरे पदार्थ टाकतात.

साहाय्यक किंवा पूरक पदार्थ : कापडावरील अंतिम संस्करणासाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक पदार्थांच्या उपयोगामुळे कापडात निर्माण होणारे दोष झाकण्यासाठी किंवा घालविण्यासाठी, काही विशिष्ट गुण आणण्यासाठी तसेच संस्करण अधिक सोपे व उपयुक्त होण्यासाठी अनेक रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो. त्यांना साहाय्यक किंवा पूरक पदार्थ असे म्हणतात. त्यांचे प्रमुख वर्ग खालीलप्रमाणे आहेत.

(अ) मृदुकारक पदार्थ : बऱ्याच संस्करण पद्धतींमध्ये मृदुता आणणारे पदार्थ वापरले जातात. कारण हे रासायनिक पदार्थ संस्करणाच्या विद्रावात घातल्यामुळे कापड मृदू व सुखदस्पर्शी बनते, उदा., चिनी माती, बेरियम सल्फेट. मृदुता आणण्याबरोबरच या पदार्थांचा उपयोग कापड भरण्यासाठी व त्याचे वजन वाढविण्यासाठीही होतो. अशा प्रकारच्या संस्करणामध्ये मृदुकारकाची फारच आवश्यकता असते. तसेच कॅलेंडरिंग करण्याच्या पूर्वी कापड मृदुता आणणाऱ्‍या पदार्थाच्या विद्रावामधून नेतात. त्यामुळे कॅलेंडरिंगचा परिणाम जास्त प्रभावी होतो, कापड गुळगुळीत व मृदु बनते. सामान्यपणे हे मृदुता आणणारे रासायनिक पदार्थ साखळीप्रमाणे लांब अणुरचना असलेल्या स्निग्ध अल्कोहॉलांपासून बनविलेले असतात. या पदार्थांचे वर्गीकरण पुढील प्रमाणे करण्यात येते : (१) तेले, वसा (चरबी) आणि मेणे यांची पायसे, (२) निरनिराळ्या प्रकारचे साबण, (३) सल्फोनीकृत तेले, (४) सल्फोनीकृत अल्कोहॉले, (५) वसाम्लांचे संघनित पदार्थ आणि (६) चतुर्थ अमोनियम संयुगे (ज्यांतील मध्यवर्ती नायट्रोजन अणू चार कार्बनी गटांशी तसेच एखाद्या अम्ल गटाशी जोडलेला असतो अशी संयुगे. उदा., हेक्झामिथोनियम क्लोराइड).

(आ) भारवर्धक पदार्थ : काही पदार्थांचा उपयोग कापडाचे वजन वाढविण्यासाठी करतात. या पदार्थांना भारवर्धक पदार्थ असे म्हणतात.बहुधा हलक्या प्रकारच्या कापडावर हे संस्करण करतात. त्यामुळे कापड भरल्यासारखे वाटते व कापडावरील लहानमोठी छिद्रे झाकली जातात. अशा काही विद्राव्य पदार्थांची उदाहरणे म्हणजे एप्सम लवण, ग्लॉबर लवण इत्यादी. रंगीत कापडासाठीही या पदार्थांचा उपयोग करतात. काही अविद्राव्य पदार्थांची उदाहरणे म्हणजे चिनी माती, फ्रेंच चॉक व बेरियम सल्फेट ही होत. प्रथम या पदार्थांच्या कलिल विद्रावातून (अतिसूक्ष्म कण लोंबकळत असलेला द्रव मिश्रणातून) कापड नेऊन ते दाब दिलेल्या दोन रूळांमधून नेतात. त्यामुळे हे पदार्थ कापडास घट्ट चिकटून बसतात. अशा प्रकारचे संस्करण हे तात्पुरत्या स्वरूपाचे असते कारण कापड धुतल्यानंतर हे पदार्थ निघून जातात.

(इ) शुभ्रता व चकाकी आणणारे पदार्थ : कापडावर संस्करण करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे कापड आकर्षक बनविणे हा होय. काही शुभ्रता व चकाकी आणणारे रासायनिक पदार्थ वापरून कापडाची चकाकी वाढविता येते. हे संस्करण सर्वांत शेवटी करतात. या चकाकी आणणाऱ्या रासायनिक पदार्थांमुळे जंबुपार (वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य) किरणांमध्ये निळसर रंगाचे अनुस्फुरण (दृश्य स्वरूपातील किरणांचे उत्सर्जन) होते. त्यामुळे हे पदार्थ जर कापडास लावले तर कापड बऱ्याच प्रमाणात चकचकीत वाटते. सर्वसाधारणपणे शुभ्र कापडाच्या बाबतीतच या सफेदी व चकाकी आणणाऱ्या पदार्थांचा उपयोग करतात. हे संस्करण तात्पुरत्या स्वरूपाचे असते. दर तीन किंवा चार धुलायांनंतर ही प्रक्रिया पुन्हा करावी लागते.

सदर्भ : 1. Hall, A. J. Textile Finishing, New York, 1966.

2. Marsh, J. T. Introduction to Textile Finishing, London, 1966.

3. Marsh, J. T. Self Smoothing Fabrics, London, 1962.

4. Noyes Data Corporation, Textile Processing Reviews, 1970

कुलकर्णी, मो. पु.