वस्तरे : चेहरा, डोके किंवा शरीराच्या इतर भागांवरील त्वचेलगतचे केस काढण्याकरिता वापरण्यात येणारे धारदार हत्यार. इतिहासपूर्व काळातील गुहांमधील चित्रांवरून असे दिसून येते की, शार्क माशांचे दात आणि धार लावलेली गारगोटी व शिंपले यांचा वापर केस काढण्याकरिता केला जात होता. अद्यापही काही भागांत आदिम जमातींमध्ये गारगोटीचा असा वापर केला जातो. इ. स. पू. ४,००० वर्षांपूर्वीच्या ईजिप्तमधील थडग्यांमध्ये सोने व तांबे यांचे वस्तरे सापडले आहेत. पश्चिम यूरोप आणि ब्रिटनमधील लोहयुगातील वसाहतींच्या उत्खननांमध्ये योध्यांबरोबर त्यांच्या तलवारी व वस्तरे पुरलेले असल्याचे आढळून आले आहे. रोमन इतिहासकार टायटस लिव्ही (इ.स.पू. पहिले शतक ते इ.स. पहिले शतक) यांच्या मते रोमचे राजे ल्यूशस टार्क्विनीअस प्रिस्कस यांनी इ. स. पू. सहाव्या शतकात लोकांना वस्तऱ्याची माहिती करून दिली होती परंतु इ. स. पू. पाचव्या शतकापर्यंत तरी वस्तऱ्याने केस काढण्याची पद्धत रूढ झाली नव्हती. भारतात हे हत्यार वेदपूर्व काळापासून माहीत आहे. याला वेदात ‘क्षुर’ हा शब्द आहे. त्यावरूनच ‘क्षौरकर्म’ हा शब्द आलेला आहे.  

वस्तऱ्याचे पुढील तीन प्रकार वापरात आहेत : (१) साधा (उघडे पाते असलेला,) (२) सुरक्षित (निर्भय) आणि (३) विद्युत् (विजेवर चालणारा). 

 

साधा वस्तरा : उघडे पाते आणि मूठ असे याचे भाग असतात. पाते सामान्यपणे पोलादाचे असून त्याची लांबी ८ किंवा १० सेंमी. असते. जुने वस्तरे पुढे पोलादी पाते व त्याला लाकडाची बारीक गोल मूठ असे होते. अलीकडील वस्तऱ्यांचे धारदार पाते अस्थी, हस्तिदंत, शिंग किंवा सेल्युलॉइड यांच्या दोन पट्ट्यांनी तयार केलेल्या मुठीला रिव्हेटच्या साह्याने जोडलेले असते, पाते वापरायचे नसेल तेव्हा ते मुठीमध्ये (दोन पट्ट्यांच्या मध्ये) घालून सुरक्षित ठेवता येते. यामुळे हा वस्तरा जवळजवळ स्प्रिंग नसलेल्या मिटणाऱ्या वा घडीच्या चाकूसारखा असतो. मात्र हा वस्तरा वापरण्याच्या दृष्टीने सुरक्षित नसल्यामुळे याला इंग्रजीत ‘कट थ्रोट’ म्हणजे गळा कापणारा वस्तरा असेच म्हणत असत.  

विविध वस्तरे : (अ) ईजिप्तमधील दगडाचा वस्तरा (आ) ब्रॉंझयुगातील वस्तरा (इ) हाताने घडवण केलेला सरळ पात्याचा मुठीसह वस्तरा (ई) सुरक्षित वस्तरा व खाचा असलेले पातळ पाते (उ) विद्युत् वस्तऱ्याचा एक प्रकार.या वस्तऱ्याचे पाते तयार करण्यासाठी विशिष्ट प्रमाणात कार्बन असलेले पोलाद वापरतात. घडवण पद्धतीने पाते तयार केल्यानंतर ते अचूक प्रमाणात घासून, धार लावून त्याची एक कड केस काढण्यासाठी काळजीपूर्वक तयार करतात. पूर्वी हे पाते पट्टीसारखे सपाटच असे. आता पात्याच्या एका कडेला धार असते आणि दुसरी कड जाड असते. धारेची कड निमुळती असून पात्याच्या मधल्या भागाला वक्राकार दिलेला असतो. तो संपूर्ण, तीन चतुर्थांश किंवा अर्धा अंतर्गोल असतो. या आकारामुळे कडांना धार लावणे सोपे व सोयीस्कर होते. हा अंतर्गोलाकार देण्यासाठी ७.५ सेंमी. (३ इंच) व्यासाचे शाणन (घासण्याचे) दगड वापरतात. पात्याला एमरी चूर्णाच्या साह्याने चकाकी आणतात.

दाढी करतेवेळी केस वाढतात त्या दिशेच्या विरुद्ध पाते वापरल्यास चांगल्या प्रकारे केस कापले जातात. पाते सारखे वापरल्यास त्याची धारदार कड वाकते व बोथट होते. म्हणून ती कड विशेष प्रक्रिया केलेल्या कातड्याच्या म्हणजे पलाटण्याच्या जाडसर पट्टीवर उलट सुलट घासून सरळ करावी लागते. पात्याला दगडावर वारंवार धार लावणे आवश्यक असते. हा वस्तरा अनेक वर्षे टिकतो. सर्वसाधारणपणे ह्याचा वापर नाभिक करतात.

सुरक्षितवस्तरा : साधा वस्तरा स्वतः सहजसुलभ रीतीने वापरणे प्रत्येकाला जमत नसे. त्यामुळे नाभिकावर अवलंबून राहावे लागे. तसेच नाभिकाजवळ असलेली हत्यारे सर्वांसाठी असल्यामुळे त्वचारोगांचा फैलाव होण्याची भीती असते, म्हणूनच वापरण्यास सुरक्षित असे वस्तरे तयार करण्यासंबंधी संशोधन व प्रयत्‍न चालू होते. सरळ पात्यावर संरक्षक आवरण बसवून तो काही प्रमाणात सुरक्षित करावयाचे प्रयत्‍न चालू होते. या प्रयत्नांतूनच सुरक्षित वस्तऱ्याचा शोध लागला व स्वतः हातानेच दाढी करणाऱ्यांची संख्या वाढली.

इ. स. १८२८ मधील शेफील्ड निर्देशिकेमध्ये आधुनिक सुरक्षित वस्तऱ्याचे पूर्वरूप असलेल्या व एका धारेच्या कडेला संरक्षण आवरण असलेल्या वस्तऱ्याची जाहिरात दिलेली होती. १८८० मध्ये अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत फावड्यासारखा आकार असलेला सुरक्षित वस्तरा तयार करण्यात आला. किंग कॅम्प जिलेट या अमेरिकन संशोधकांनी १८९५ मध्ये दोन्ही कडांना धार असलेले पातळ पोलादी पाते (वेफर ब्लेड) तयार केले आणि ते संरक्षक धारकामध्ये अडकविता येईल अशा वस्तऱ्याचे एकस्व त्यांनी घेतले.

सुरक्षित वस्तऱ्याचे तत्त्व एकच असले तरी त्याचे अनेक प्रकार आढळतात. दांडी आणि पात्याला आधार देणाऱ्या दोन पट्‌ट्या असे भाग असलेला वस्तरा सर्वांत अधिक वापरात आहे. एक पट्टी पात्यापेक्षा अरुंद आणि दुसरी पात्यापेक्षा रुंद व बाजूच्या कडा वळविलेल्या असतात. पातळ पात्यांचे प्रतल आणि दांडीचे प्रतल ९० मध्ये असतात. दांडीला बसविलेली कळ मळसूत्रासारखी फिरविली म्हणजे पाते पकडणारा भाग विभागून त्यात पाते ठेवता येते. काही चांगल्या वस्तऱ्यांत अगदी त्वचेजवळ किंवा किंचित दूर केस कापण्याची आणि पात्यावरचा दाब कमी-अधिक करण्याची सोय केलेली असते.


सुरक्षित वस्तऱ्याच्या एका प्रकारात दोन भाग असतात. एक किंवा दोन (जुळी) पोलादी पाती घट्ट बसविलेली पेटिका व ही पेटिका चपखलपणे बसविता येईल असा दांडा हे ते दोन भाग होत. पेटिकेतील पात्याच्या एकाच कडेला धार असते. दांड्याच्या फावड्यासारख्या भागाच्या विशिष्ट कोनामुळे त्यात बसविलेल्या पेटिकेतील पाती दाढी करताना त्वचेशी योग्य कोनात राहतात. पाती वापरून बोथट झाली की, पेटिका टाकून देऊन तिच्या जागी तशीच नवी पेटिका बसवितात. हा वस्तरा विशेषेकरून प्रवासात नेण्याला सोईस्कर असून तुलनेने स्वस्त पडतो. यामुळे तो अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे.

अगदी आधुनिक वस्तऱ्यांना ६-१२ पात्यांची गुंडाळी घालावयाची सोय असते. त्यात एका भागाची धार केली की, गुंडाळी फिरवून धारेचा नवीन भाग पुढे आणता येतो. अशा तऱ्हेने सु. ८-१० महिने एक गुंडाळी चालते व पाते बदलण्याचा त्रास वाचतो. याला ‘जिलेट टेक्नोमॅटिक रेझर’ असे म्हणतात.

सुरुवातीला जिलेट यांच्या पातळ पोलादी पात्यांचे उत्पादन करण्यात मोठ्या तांत्रिक अडचणी होत्या. त्यामुळे १९०३ सालापर्यंत त्याची विक्री होऊ शकली नव्हती. त्या वर्षी त्यांनी या पात्यांचा पहिला कारखाना बोस्टन येथे सुरू केला. दोन महायुद्धांमुळे या उद्योगाला विशेष चालना मिळाली व पाते ही दैनंदिन गरजेची वस्तू बनली. १९६०च्या सुरुवातीला अनेक देशांतील उत्पादकांनी अगंज पोलादी पाती तयार केली. ती जास्त टिकाऊ असल्यामुळे अनेक वेळा पुन्हा वापरता येतात. या पात्यांची किंमत कमी असते आणि ती बोथट झाल्यानंतर फेकून देऊन दुसरी वापरता येतात. म्हणून मोठ्या प्रमाणात पातळ पात्यांचे व सुरक्षित वस्तऱ्यांचे उत्पादन केले जाते.

पातळ पोलादी पाती तयार करण्याची पद्धत : उच्च कार्बनयुक्त वा अगंज पोलादी पट्‌टी (२२.३८ मिमी. रुंद व ०.०६, ०.०८, ०.१० किंवा ०.१३ मिमी. जाड) प्रथम दाबछिद्रण यंत्रात घालून ती एकसारखी पुढे सरकवीत नेऊन खाचा असलेल्या पात्यांचा आकार देतात. यानंतर या पात्यांना प्रमाणित कठीणपणा व पाणी देण्यासाठी या पट्‌ट्याच विद्युत्‌ भट्टीत काळजीपूर्वक तापवितात व मग थंड करतात. नंतर अम्‍लरेखन यंत्राच्या साहाय्याने किंवा विशिष्ट शाईने पात्यावर व्यापारी नाव  वइतर मजकूर दोन्ही बाजूंवर उमटवितात. प्रत्येक यंत्रातील क्रिया करावयास सोयीस्कर जावे म्हणून पट्टी अखंडच ठेवलेली असते. सर्व क्रिया पूर्ण झाल्यानंतर तोडणाऱ्या यंत्राने प्रत्येक पाते वेगवेगळे करण्यात येते. सामान्यपणे १० लाख पात्यांसाठी १ टन पट्टी लागते.

शाणन व होनिंग (होन नावाच्या सूक्ष्मकणी खडकाच्या मदतीने धार लावावयाच्या) यंत्रांनी पात्यांच्या दोन्ही कडांना धार लावण्यात येते. सूक्ष्मदर्शकाने व केस कापून पात्यांची चाचणी घेण्यात येते. प्रमाणीकरण चाचणीत योग्य ठरलेल्या पात्यांच्या कडांवर गंज चढू नये म्हणून ती तेलाच्या टाकीत ठेवावी लागतात. नंतर स्वयंचलित यंत्राने ती पाती साठवणीसाठी मेण कागदात लपेटून छापील आवेष्टनांत घालतात.

भारतात १९४८ साली मुंबई व कलकत्ता येथे पाती उत्पादनाचे पहिले दोन कारखाने सुरू झाले. नंतर जयपूर, हैदराबाद, दिल्ली, डेहराडून, मद्रास इ. ठिकाणी पाती व सुरक्षित वस्तरे यांचे कारखाने काढण्यात आले. १९६६ सालानंतर पात्यांची आयात करण्याची गरज उरली नाही. उलट भारतातून इथिओपिया, इराण, केन्या, कुवेत, नायजेरिया, रशिया इ. देशांत पात्यांची निर्यात होते.

पातळ पाते वापरलेला साधा वस्तरा : यात साध्या वस्तऱ्यांच्या पात्यांसारखे धातूच्या पत्र्याचे पोकळ पाते तयार केलेले असते. यामध्ये उतार असलेल्या कडेला सरळ फट असते. तसेच पुढील बाजूने आत-बाहेर करता येईल अशा पातळ पट्टीची सोय असते. ही पट्टी बाहेर काढून त्यात दोन्ही कडांना धार असलेल्या पातळ पात्याचा  (वेफर ब्लेडचा) अर्धा भाग अडकविता येऊ शकतो. नंतर ती पट्टी आत सरकविल्यास फटीतून पातळ पात्याची धारदार कड फक्त बाहेर येऊ शकते. साध्या वस्तऱ्याप्रमाणेच याला मूठ असते. अशा वस्तऱ्याचा केस काढण्याकरिता वापर करता येतो. यामध्ये पात्याची धारदार कड बोथट झाल्यानंतर ते काढून टाकून दुसरे अर्धे पाते वापरता येते. नाभिकांना अशा प्रकारचा वस्तरा फार उपयुक्त आहे.

विद्युत्‌ वस्तरा : हा एक प्रकारचा सुरक्षित वस्तराच आहे. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत १९०० सालापासून याची एकस्वे देण्यात आली होती परंतु १९२८ मध्ये जेकब श्चिक या निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी प्रथमच यशस्वीरीत्या तो तयार केला व त्याचे एकस्व घेतले. १९३१ मध्ये त्यांनी तो बाजारपेठेत विक्रीला आणला.

विद्युत्‌ वस्तऱ्याच्या शीर्षाचे दोन भाग असतात. बाहेरील भागात त्वचेवरील केस पकडण्याकरिता छिद्रांची मालिका असते. आतील भागात करवतीसारख्या कडा असलेल्या पात्यांची मालिका असते. ही पाती लहान विद्युत्‌ चलित्राने फिरविली जातात. हे चलित्र २२० किंवा ११० व्होल्ट विद्युत्‌ दाबावर चालते. दाढी करते वेळेस वस्तरा त्वचेवर दाबून चालू केला की, छिद्रांतून आत जाणारे केस पकडले जातात व फिरणाऱ्या पात्यांनी भराभर कापले जातात. ही पाती संपूर्णपणे झाकलेली असल्याने त्वचा कापून इजा होण्याची भीती नसते.

विद्युत्‌ वस्तऱ्यातील पात्यांची संख्या व रचना, शीर्षाचा आकार (गोलाकार किंवा चपटा) आणि त्यामध्ये असलेली साहाय्यकारी उपकरणे (उदा., कानापुढील केस कापावयाची कात्री इ.) यांनुसार त्याच्या नमुन्यांत विविधता असते.

साबण, पाणी स्नेहन (क्रिम) इ. वापरण्याची जरूरी लागत नसल्यामुळे विद्युत्‌ वस्तऱ्यांना ‘सुके वस्तरे’ असेही म्हणतात. पुष्कळांच्या मते त्याने दाढी चांगली होत नाही व केस वाकडेतिकडे वाढतात. तो साफ करण्याकरिता खास द्रावक वापरावा लागतो. यांमुळे ते अधिक वापरात नाहीत व त्यांचा परिणाम सुरक्षित वस्तऱ्यांवर विशेष झालेला नाही. 

आगरवाल, एस्‌. जी. सूर्यवंशी, वि. ल.