गुलाल : हिंदू लोकात लग्नसमारंभ, होळी, गणेशोत्सव व इतर उत्सवप्रसंगी वापरण्यात येणारी तांबड्या रंगाची पूड, प्रेतावरही गुलाल उधळण्याची पद्धत आहे. 

तांदूळ, शिरगोळा, शाडू इत्यादींच्या बारीक चूर्णापासून गुलाल तयार केला जातो. ह्याच्या निर्मितीच्या निरनिराळ्या पद्धती आहेत. ज्या पदार्थांपासून गुलाल तयार करावयाचा असेल ते पदार्थ प्रथम कुटून व नंतर मोठ्या जात्यात घालून त्यांचे वस्त्रगाळ पीठ करतात. हे पीठ तांबड्या रंगाच्या पाण्यात मिसळून काही वेळ ठेवून दिले म्हणजे त्याला रंग चढतो. ते चांगले वाळवून त्याची पूड तयार करण्यात येते. तांदळापासून बनविलेला गुलाला उच्च प्रतीचा व शाडूपासून बनविलेला कनिष्ठ प्रतीचा समजला जातो. 

कुलकर्णी, सतीश वि.