सुरैय्या मासा

सुरैय्या : या माशाचा समावेश ॲकँथुरिडी या मत्स्यकुलात होत असून त्याचे शास्त्रीय नाव ॲकँथुरस गाम (ॲ. माता ) असे आहे. त्याचा प्रसार तांबडा समुद्र, अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर ते मलाया द्वीपसमूह येथे आहे. त्याचा रंग काळसर तपकिरी असतो. त्याचे ओष्ठ व पर काळे असतात. पाठीवरील पराच्या काट्यांची उंची शेवटच्या काट्यापर्यंत वाढत जाते. काट्यांमधील पटल क्वचितच निम्नमध्य असते. या पराचा मागचा भाग व शेपटीचा पर कोनाकार गोलसर असतात. छातीवरील पर डोक्याएवढ्या लांबीचे असतात. शेपटीचा पर निम्नमध्य असून तिचा वरचा भाग लांब असतो. डोक्यावरील व मानेवरील खवले अल्पविकसित असतात.

शेपटीच्या दांड्याच्या दोन्ही बाजूंवर प्रत्येकी एक भाल्याच्या आकाराचा, धारदार व हलविता येणारा काटा (शल्याकाराचा चाकू) असतो, हे त्याचे खास वैशिष्ट्य होय. त्याला डिवचले असता हा काटा शरीराला काटकोनात ताठ केला जातो. त्याचे टोक पुढच्या दिशेला असते. शेपटीची फटकारणारी हालचाल झाल्यास या काट्यामुळे खोल व वेदनाकारक जखम होते. या वैशिष्ट्यामुळे त्यास ‘सर्जन फिश’ असे म्हणतात.

जमदाडे, ज. वि.