मुटंडा (बॅगारियस बॅगारियस)मुटंडा : (मुळंडा). हा मार्जारमीन भारतातील सगळ्या मोठ्या नद्यांमध्ये व नैर्ऋत्य आशियात सापडतो. याचे शास्त्रीय नाव बॅगारीयस बॅगारीयस असे आहे. शरीर शेपटीकडे निमूळते डोके रुंद व चपटे सामान्य लांबी ४६–६१ समी. पण २ मी. लांबीचे मासेही आढळतात रंग फिरता, पिवळा करडा किंवा गुलाबी हिरवट, त्यावर तपकिरी अथवा काळी चिन्हे व आडवे पट्टे प्रत्येक परावर (हालचालीस वा तोल सावरण्यास उपयुक्त असलेल्या त्वचेच्या स्नायूमय घडीवर) गर्द रंगाचा पट्टा वरचा जबडा पुढे आलेला दात लहानमोठे, अणकूचीदार. स्पृशांच्या (स्पर्शग्राही वाढींच्या) चार जोड्याः एक नासीय, एक ऊर्ध्वहनूवर (वरच्या जबड्यावर) आणि दोन अधोहनूवर (खालील जबड्यावर) जबड्यांवरील स्पृशा लांब, मांसल. याला गोड्या पाण्यातील शार्क असेही म्हणतात. ह्याचे तोंड अधर(खालील) भागावर असते. हा मासा फार क्रूर आहे.

कर्वे, ज. नी.