जातिवृत्त: एखाद्या जातीच्या [→ जाति] अथवा प्रजातीच्या विकासाच्या इतिहासाला जातीवृत्त म्हणतात. एखाद्या जातीच्या दीर्घकालीन इतिहासात हळूहळू साचलेले प्रागतिक फेरबदल आढळतात. याचा परिणाम असा होतो की, त्या जातीचे चालू काळातील प्राणी (वा वनस्पती) एकमेकांपासून आणि त्यांच्या प्राचीन पूर्वजांपासून भिन्न असतात. नवीन प्राण्याचे (वा वनस्पतीचे) जनकाशी किंवा मातापित्यांशी निकट साम्य असते, परंतु तो तंतोतंत त्याच्या किंवा त्यांच्यासारखा नसतो. नवीन व्यक्तींच्या आनुक्रमिक पिढ्यांचीच जाती बनलेली असते. एखाद्या जातीचे दीर्घकालीन इतिवृत्त म्हणजे जातिवृत्त होय, तर विकास पावणाऱ्या व्यक्तीच्या इतिवृत्ताला ⇨व्यक्तिवृत्त  असे म्हणतात.

जर्मन शास्त्रज्ञ हेकेल यांनी जातिवृत्ताचा अर्थ ‘क्रमविकासाच्या (उत्क्रांतीच्या) एका मार्गावरील प्रौढ रूपांचा अनुक्रम’ असा केलेला आहे. वरील मर्यादित अर्थ जरी अद्यापि प्रचारात असला तरी उत्तरोत्तर अशी जाणीव होऊ लागली आहे की, जातिवृत्ताची योग्य कल्पना येण्याकरिता विकास-क्रमातील व्यक्तींचे संपूर्ण व्यक्तिवृत्त विचारात घेणे आवश्यक आहे. क्रमविकासाला ज्या काळात मान्यता मिळाली तेव्हा सुरुवातीला जातिवृत्त व व्यक्तिवृत्त यांच्या परस्परसंबंधाविषयी अनेक अनर्थकारक तर्क केले गेले. हेकेन यांनी आपल्या ‘प्रजातिआवर्तन नियमा’मध्ये [→ पुनरावर्तन सिद्धांत] या संबंधाचा समावेश केलेला आहे. ‘जातिवृत्त हे व्यक्तिवृत्ताचे यांत्रिक कारण आहे. आणि व्यक्तिवृत्त हे जातिवृत्ताचे पुनरावर्तन होय’ हे विवरण चुकीचे आहे, असे हल्ली मानले जाते. जातिवृत्त हे व्यक्तिवृत्तांचे कारण नसून परिणाम आहे आणि ती एकामागून एक येणाऱ्या पिढ्यांमध्ये बदलतात. 

जीवांच्या आनुवंशिक परंपरांच्या क्रमविकास-वृत्तांशी जातिवृत्ताचा संबंध असल्यामुळे साहजिकच वंशावळी आणि प्राणी व प्राणिसमूह यांच्यात असणाऱ्या आप्तभावाच्या पायऱ्यांचा माग काढणे या गोष्टींचाही त्याच्या अभ्यासात समावेश होतो. म्हणून एखाद्या प्राणिसमूहाचे जातिवृत्त हे त्याच्या क्रमविकासाचे वृत्त होय. ⇨ पुराजीवविज्ञानाच्या अभ्यासाने कित्येक प्राणिसमूहांच्या जातिवृत्तांची संपुर्ण माहिती मिळाली आहे. उंट, हत्ती आणि घोडा यांची जातिवृत्ते ही यांची उदाहरणे म्हणून देता येतील.

जातिवृत्ताचा प्राण्यांच्या वर्गीकरणाशीही संबंध आहे. प्राण्यांच्या वर्गीकरणाचे उद्दिष्ट त्यांचे ‘नैसर्गिक वर्गीकरण’ करणे हे असेल, तर वर्गीकरणाचा जातिवृत्ताशी मेळ बसविल्याखेरीज दुसरा मार्ग नाही. याचीच आनुषंगिक आणखी एक गोष्ट अशी की, ‘नैसर्गिक’ प्राणीसमूहातील सगळ्या व्यक्ती एका समाईक पूर्वजापासून उत्पन्न झालेल्या असल्या पाहिजेत. म्हणजे असे समूह एकोद्‌भव (एका समाईक जनकापासून उत्पन्न झालेले) असले पाहिजेत. कल्पना म्हणून ही पद्धत कितीही इष्ट असली तरी प्रत्यक्षात बहुधा असे आढळून येते की, एखाद्या समूहाच्या जातिवृत्ताची माहिती अपुरी असते. असे जरी असले, तरी वर्गीकरणविज्ञाला अशा समूहाला वर्गीकरणाच्या योजनेत कोठेतरी स्थान द्यावे लागतेच व म्हणून इतर जिवांशी खरा संबंध दर्शविणाऱ्या लक्षणांचे वास्तविक मूल्य त्याला विचारात घेणे भाग पडते. शिवाय प्राणिसमूहांचे जातिवृत्त अपसारी असले, तरच जातिवृत्त हे वर्गीकरणाचा पाया होऊ शकते.

पहा : क्रमविकास प्राण्यांचे वर्गीकरण वनस्पतींचे वर्गीकरण वर्गीकरणविज्ञान.

गर्दे, वा. रा.