जॅगुआर : साधारणपणे बिबळ्या वाघाएवढा आणि जवळजवळ त्याच्यासारखा दिसणारा मार्जार कुलातील (फेलिडी कुलातील) प्राणी. याला अमेरिकन वाघ असेही म्हणतात. हा टेक्सस, न्यू मेक्सिको आणि ॲरिझोनापासून दक्षिणेकडे मेक्सिको, मध्य अमेरिका व द. अमेरिकेत आढळतो. अमेरिकेत आढळणारा मार्जार कुलातील हा सर्वांत मोठा प्राणी होय. याचे शास्त्रीय नाव पँथेरा आँका  असे आहे.

 पूर्ण वाढ झालेल्या जॅगुआरच्या शरीराची (डोक्यासहित) लांबी १·५–१·८ मी., शेपटीची ७०–९१ सेंमी. आणि वजन सामान्यतः ६८–१३६ किग्रॅ. असते. याच्या शरीराचा रंग दालचिनी-पिवळसर असून त्यावर गुच्छाकृती मोठे काळे ठिपके असून काही ठिपक्यांच्या आत लहान काळे बिंदू असतात. बिबळ्याच्या शरीरावर असेच गुच्छाकृती काळे ठिपके असतात, पण त्यांच्या आत लहान काळे बिंदू केव्हाही नसतात. जॅगुआरचा बांधा बिबळ्याइतका डौलदार नसतो त्याची शेपटीही बिबळ्याच्या शेपटीपेक्षा आखूड असते.

जॅगुआर

दाट जंगलात आणि रुक्ष व झुडपे असलेल्या प्रदेशात जॅगुआर राहतो. तो सामान्यतः रात्रिंचर आहे, पण भक्ष्य मिळविण्याकरिता तो दिवसाही बाहेर पडतो. पेकारी, कॅपिबारा, हरणे, टॅपिर, ॲगुटी वगैरे प्राणी आणि पाळीव जनावरे तो मारून खातो. यांशिवाय ॲलिगेटर, पाणकासवे (कूर्म) आणि गोड्या पाण्यातील मोठे मासेदेखील तो खातो. हा उत्तम पोहणारा असून पुष्कळदा नदीच्या काठाजवळ आढळतो. तो वरचेवर पाण्यात शिरून मोठे मासे आणि कूर्म पकडतो. जॅगुआर हा जवळजवळ सिंह किंवा वाघ यांच्या इतकाच बलवान असून मारलेल्या घोड्याला किंवा गाईला वाटेल तितक्या दूरवर तो ओढून नेऊ शकतो.

 यांच्या प्रजोत्पादनाचा ठराविक मोसम नसतो. वीण वर्षातून एकदाच होते. गर्भावधी १००–११० दिवसांचा असतो आणि मादीला दर खेपेस १–३ पिल्ले होतात. तीन वर्षांनी पिल्लांना प्रौढावस्था प्राप्त होते. जॅगुआर सु. २० वर्षे जगतो. याला माणसाखेरीज दुसरे शत्रू नाहीत.

कर्वे, ज. नी.