जलकपोत : या पक्ष्याचा समावेश जॅकेनिडी पक्षिकुलात केलेला आहे. भारतात या पक्ष्याचा दोन जाती सगळीकडे आढळतात : एक बिरंजी (ब्राँझ रंगाच्या) पंखाचा जलकपोत आणि दुसरा लांब शेपटीचा जलकपोत. पहिल्याचे शास्त्रीय नाव मेटॅपोडियस इंडिकस  आणि दुसऱ्याचे हायड्रोफेजिॲनस कायरूर्गंस  हे आहे.

आ. १. बिरंजी पंखाचा जलकपोत

बिरंजी पंखाचा जलकपोत : हा पक्षी साधारणपणे तित्तिराएवढा असतो. दिसायला काहीसा पाण कोंबडीसारखा असला, तरी त्याचे पाय फार लांब असतात. डोके, मान व छाती तकतकीत काळ्या रंगाची पाठ व पंख हिरवट छटा असलेल्या बिरंजी रंगाचे शेपटी खुंटासारखी व काळसर तांबडी डोक्यावरून मानेच्या काट्यापर्यंत (मानेच्या पुढच्या टोकापर्यंत) गेलेला एक पांढरा पट्टा पायांची बोटे अतिशय लांब. नर व मादी यांत फरक नसतो.

हे एक एकटे किंवा यांचे लहान कळप असतात. तरंगणाऱ्या जलवनस्पती (कमळ, शिंगाडा इ.) ज्या तलावात मुबलक असतात अशा ठिकाणी हा राहतो पायाची बोटे अतिशय लांब असल्यामुळे या वनस्पतींच्या देठांवरून किंवा गुंताड्यांवरून व कमळाच्या पानांवरून हा सहज चालू शकतो. हा उत्तम पोहणारा व बुड्या मारणारा पक्षी आहे. स्वभावाने हो भित्रा आहे. जलवनस्पतींचे कोवळे देठ, मुळे, पाने, बी, किडे, गोगलगाई इ. याचे भक्ष्य होय.

पावसाळा हा यांच्या प्रजोत्पादनाचा काळ होय. लव्हाळी व जलवनस्पती एकमेकांत गुंतवून हा घरटे तयार करतो. तरंगणाऱ्या किंवा पाण्यात अर्धवट बुडालेल्या पानांवर किंवा काठावरील लव्हाळ्यांच्या बेटात ते बांधलेले असते. मादी बिरंजी तपकिरी रंगाची चार अंडी घालते त्यांच्यावर काळसर रंगाच्या बारीक रेषांचे जाळे असते. या पक्ष्यांत बहुभर्तृकत्व (एकापेक्षा अधिक नरांशी समागम करण्याचा प्रघात) आढळते.

आ. २. लांब शेपटीचा जलकपोत

लांब शेपटीचा जलकपोत : राहण्याची ठिकाणे, भक्ष्य, प्रजोत्पादनाचा काळ, घरटे आणि एकंदर वागणूक या बाबतींत याचे बिरंजी पंखाच्या जलकपोताशी साम्य दिसून येते.

सगळीकडे आढळणारा हा पक्षी हिमालयात देखील १,५२५ मी. उंचीपर्यंत आढळतो. हा सुद्धा साधारणपणे तित्तिराएवढाच असतो. प्रजोत्पादनाच्या काळात शरीराचा रंग प्रामुख्याने धुपेली (चॉकलेटी) असतो डोके व मानेची पुढची बाजू पांढरी मानेच्या दोन्ही बाजूंवर उभी काळी रेघ आणि यांच्या मधली मानेची मागची बाजू सोनेरी पिवळी शरीराच्या दोन्ही बाजू पांढऱ्या शेपटी लांब, टोकदार व खाली वाकलेली. इतर काळात शरीराचा रंग फिक्कट तपकिरी व पांढरा छातीच्या वरच्या भागावर काळे वलय असते.

मादी तांबूस तपकिरी रंगाची चार अंडी घालते त्यांवर ठिपके, डाग वगैरे नसतात.

कर्वे, ज. नी.