स्टोटस्टोट : मुस्टेलिडी कुलातील लहान मांसाहारी सस्तन प्राणी. त्याला इंग्रजीत शॉर्ट-टेल्ड वीझल किंवा बोनापार्ट वीझल म्हणतात. त्याचे शास्त्रीय नाव मुस्टेला एर्मिनिया आहे. त्याच्या फरचा रंग वरच्या बाजूला तपकिरी, तर खा ल च्या बाजूला पांढरट असतो. हा प्राणी सडपातळ, चपळ आणि रक्तपिपासू असून त्याची लांबी १३—२९ सेंमी. असते. शेपटी लांब (५—१२ सेंमी.) म्हणजे शरीराच्या एकूण लांबीच्या सु. ४०%. असते हिवाळ्यात फरचा रंग पांढरा शुभ्र असतो व फक्त शेपटीचे टोक काळे असते. या अवस्थेत त्याला ‘ एर्माइन ’ हे लोकप्रिय नाव देतात. सौम्य थंड हवामानात फरचा रंग अंशतः पांढरा होतो.

आर्क्टिकपासून दक्षिणेस पूर्व अमेरिका ते पेनसिल्व्हेनिया व पश्चिमेस उत्तर न्यू मेक्सिकोपर्यंत त्याचा प्रसार आहे. तसेच ब्रिटिश बेटे ते जपान व दक्षिणेस अल्जीरियापर्यंतही त्याचा आढळ आहे. तो आपली राहण्याची जागा सहज बदलू शकतो. झाडेझुडपे असलेला प्रदेश, जंगल तसेच दमट व गवताळ भागात तो विपुल प्रमाणात आढळतो. उत्तरेकडील प्रदेशात आढळणारे प्राणी दक्षिणेस आढळणार्‍या प्राण्यांपेक्षा लहान असतात. लहान सस्तन प्राणी, पक्षी, अंडी, बेडूक व प्रसंगी अपृष्ठवंशी ( पाठीचा कणा नसलेले ) प्राणी यांवर तो उपजिविका करतो. ते लहान आकाराच्या भक्ष्याच्या डोक्याच्या खालच्या भागाला, तर मोठ्या भक्ष्याच्या गळ्याला दाबून धरून शिकार करतात. मोठे मांसाहारी प्राणी व शिकारी पक्षी स्टोटवर उपजीविका करतात. मादी नरापेक्षा लहान असते. वसंत ऋतूच्या शेवटी किंवा उन्हाळ्याच्या सुरुवातीला नर-मादीचे मिलन होते. गर्भावधी काल दहा महिन्यांचा असतो. एका वेळेला बिळात ३—१३ पिले जन्माला येतात. त्यांचे आयुर्मान ७-८ वर्षांचे असते.

स्टोट हिवाळ्यातील तलम व शुद्ध रंगाची फर यांसाठी प्रसिद्ध असून फरच्या व्यापारात तिला फार महत्त्व आहे. अशी फर मिळविण्याचा व्यवसाय मुख्यत: उत्तर यूरेशियात चालतो. इंग्लंडमध्ये एडवर्ड ( तिसरा ) याच्या काळात (१३२७—७७) ‘ एर्माइन ’च्या फरपासून बनविलेले कपडे फक्त राजघराण्यातील लोकांनाच वापरण्याची परवानगी होती. नंतर व्यक्तीची पत व प्रतिष्ठा लक्षात येईल या पद्धतीने फरचे कपडे वापरण्यास सुरुवात झाली. फरवरील काळ्या ठिपक्यांची उपस्थिती वा अनुपस्थितीवरून व्यक्तीचा स्तर वा पद ठरविले जात असे.

पहा : वीझल.

जमदाडे, ज. वि.