शिलण (सायलुंडिया सायलंडिया)

शिलण : या माशाचा समावेश चॅसिडी (सिल्युरिडी) कुलात होतो. शास्त्रीय नाव सायलुंडिया सायलंडिया (सायलुंडिया गँजेटिक, सायलोनिया सायलोंडिया). सायलोंडिया हे जातिवाचक नाव सायलोंड या पंजाबी नावावरून आले असावे. त्याचा भारत व म्यानमार येथील नदीमुखात असून तो नद्यांच्या उगमापर्यंत वर गेलेला आढळतो. याला गंगा नदीतील मुशी (शार्क) असेही म्हटले जाते व तो भारताच्या उत्तर भागात अधिक प्रमाणात आढळतो. लांबी १८३ सेंमी. पर्यंत पण उत्तर बंगालसारख्या डोंगराळ प्रदेशात २३ सेंमी. लांबीपर्यंतचेही मासे आढळतात. पाठीचा रंग निळसर व दोन्ही बाजू रुपेरी असून परावर करडे ठिपके असतात. ओठ लाल असतात.

मुस्कटाशिवाय डोक्याची रुंदी लांबीएवढी असते, खालचा जबडा अधिक लांब, मुस्कट काहीसे रुंदट व तोंडाचा आकार डोक्याच्या लांबीच्या निम्म्यापेक्षा मोठ असतो. वरच्या जबड्यावर बारीक स्पृशांची (स्पर्शग्राही अंगाची) जोडी असते, पण खालच्या जबड्यावर स्पृशा नसतात. दात अणकुचीदार असून टाळूवर त्यांचा चंद्रकोरीसारखा पट्टा असतो. हा मासा फार खादाड आहे.

सायलोनिया प्रजातीतील सा. चिल्ड्रनी (सायलुंडिया सायकेसिई) जातीचा मासा कृष्णा व गोदावरी नद्यांत त्यांच्या उगमांकडे व कावेरी नदीत सर्वत्र आढळतो. एप्रिल-जुलै या काळात खोल पाण्यात सापडणाऱ्या माशांत याचे प्रमाण जास्त असते.

जमदाडे, ज. वि.