झीब्रा : ईक्विडी कुलातील हा सस्तन प्राणी आहे. याच कुलात घोड्यांचा आणि गाढवांचा समावेश होतो. झीब्रा, घोडा आणि गाढव हे सगळे ईक्वस या वंशातील आहेत.

पूर्व, मध्य आणि दक्षिण आफ्रिकेत झीब्रा आढळतो. सामान्यतः हा सपाट प्रदेशात आणि गवताळ रानात राहतो परंतु काही जाती डोंगराळ भागातही राहतात. सरासरी मानाने झीब्ऱ्याचे शरीर (डोक्यासह) २―२·५ मी. व शेपूट ४७―५७ सेंमी. लांब असते आणि खांद्यापाशी त्याची उंची १·२―१·४ मी. असते. सगळ्या शरीरावर अथवा त्याच्या काही भागावर विविध मांडणी असलेले काळे पट्टे असतात. आयाळ मोठी आणि तिचे केस ताठ उभे असतात. शेपटीच्या टोकावर केसांचा झुपका असतो. झीब्रा संघचारी आहे त्यांच्या एका कळपात १०―१२ प्राणी असतात. वयस्कर नर कधीकधी एकटे असतात. यांचा धावण्याचा वेग ताशी ६४ किमी.पर्यंत असतो. हे गवत खाणारे असून त्यांची चरण्याची वेळ रात्रीची असते. ३४५―३९० दिवसांच्या गर्भावधीनंतर मादीला दर खेपेला एकच पिल्लू होते. सिंह या प्राण्याचा कट्टा शत्रू आहे.

झीब्रा (ईक्वस झीब्रा)

झीब्ऱ्याला माणसाळविण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण ते निष्फळ ठरले. झीब्रा व घोडा आणि झीब्रा व गाढव यांच्यापासून संकरप्रजा उत्पन्न होऊ शकते, पण या संकरांचा खेचरांप्रमाणे उपयोग होत नाही.

झीब्ऱ्याच्या हल्ली तीनच जाती जिवंत आहेत : (१) पहाडी झीब्रा, शास्त्रीय नाव ईक्वस झीब्रा (२) सामान्य झीब्रा, शास्त्रीय नाव ईक्वस बरचेलाय आणि (३) ग्रेव्हीचा झीब्रा, शास्त्रीय नाव ईक्वस ग्रेव्हिई.

पहाडी झीब्रा : प्रथम या जातीचेच शास्त्रीय वर्णन दिले गेल्यामुळे हा यथातथ्य झीब्रा होय. हा केप कॉलनी व अंगोलाच्या पर्वतात राहतो. याचे कान लांब, आयाळ आखूड, खूर लहान आणि शेपटीवर केस कमी असतात. याच्या शरीराचा रंग पांढरा आणि पोटाकडचा भाग सोडून सगळ्या अंगावर काळे पट्टे असतात. या जातीचे सु. १५० प्राणी हल्ली जिवंत आहेत.

सामान्य झीब्रा : मूळची प्रारूपिक (नमुनेदार) प्रजाती आता विलुप्त झालेली आहे. हिच्या पायांवर पट्टे नव्हते व इतर भागांवरील पट्ट्यांमधून ‘छाया-पट्टे’ होते. हल्ली या जातीच्या इतर प्रजाती ट्रान्सव्हालपासून युगांडापर्यंत सर्वत्र आढळतात. यांचा रंग फिक्कट पिवळा असून पट्टे रुंद असतात. काहींच्या पायांवर खुरापर्यंत पट्टे असतात, तर काहींत ते नसतात.

ग्रेव्हीचा झीब्रा : हा सगळ्यांत मोठा झीब्रा होय हा सोमालीलँड, उत्तर केनिया आणि इथिओपियाच्या काही भागांत आढळतो. याची उंची १·५ मी., आयाळ आखूड, सरळ उभी, १५ सेंमी. असते कान २३ सेंमी. लांब, रुंद, गोल व केसाळ असतात. पोट वगळून याच्या सगळ्या शरीरावर दाट पट्टे असतात. याच्या ढुंगणावरचे पट्टे इतर जातींतल्याप्रमाणे मोठे नसून लहान होत जातात. शेपटावरचा झुबका लहान असतो.

क्षीरसागर, ब. ग.