शेपूट : पृष्ठवंशीय प्राण्यांचा एक महत्त्वाचा अवयव. तो प्राण्यांना सौंदर्यही प्राप्त करून देतो. प्राण्याच्या गुदद्वाराच्या मागील बाजूला तो वाढलेला असतो. शेपटीत हाडे , स्नायू , तंत्रिका इ. महत्त्वाच्या कोशिका असल्या तरी तिच्यात पोकळी नसते. शेपटीमध्ये स्नायू व तंत्रिका असल्याने तिची स्वतंत्रपणे हालचाल होऊ शकते. तिला संवेदना असते. हाडामुळे तिला मजबुती व बळकटी येते. सामान्यतः प्राणी सर्वप्रथम पाण्यात उदयास आले. त्यामुळे शेपटीचा उपयोग पाण्यात पोहण्यासाठी होत असे. शेपटीच्या दोन्ही बाजूंना होणाऱ्या चपळ हालचालींमुळे प्राणी झपाटयाने पाणी कापत पुढे जातो. शेपटीवर कातडीचे आवरण असते. शेपटीच्या मध्यभागावरील कातडीचा भाग वाढून एक अखंड पर तयार होतो. या परामुळे पाण्यातील हालचाल चपळपणे करता येते.

पृष्ठवंशीय प्राण्यांच्या सर्व उपवर्गातील प्राण्यांना शेपूट असते. ⇨ अँफिऑक्सस या प्राण्याचे शेपूट आखूड असते. त्याच्या वरच्या व खालच्या बाजूवर पर असून ते टोकाकडे निमुळते झालेले असतात. या अत्यंत प्राथमिक स्वरूपाच्या शेपटीच्या प्रकाराला डायफायसर्कल असे म्हणतात. सायक्लोस्टोम जातीत याच प्रकारची शेपूट असून तिच्यात कूर्चा असतात.

सिलॅचिआय जातीतील ⇨ शार्क माशांची शेपटी परासारखी असल्याने तिला पुच्छपर असे म्हणतात. पुच्छपराचे दोन भाग असतात. वरील भागाला पृष्ठपाली व खालील भागाला अधरपाली असे म्हणतात. पुच्छपरातील मणक्यांची साखळी वरील बाजूने उचललेली असल्याने पृष्ठपांली आकाराने खूप लांब होते, तर अधरपाली खूप आखूड होते. त्यामुळे या माशांचे पुच्छपर असमरूप दिसते, अशा पुच्छपराला हेटरोसर्कल असे म्हणतात. स्टर्जन, ऑस्टिओलेपिडोटी आणि ⇨ डिप्नोई या अस्थिमत्स्यात अशा प्रकारचे शेपूट आढळते.

टेलिऑस्ट जातीच्या माशामध्ये पुच्छपराची पृष्ठपाली आणखीनच लहान झालेली व अधरपाली खूपच लांब झालेली असते. एक्झॉसीटस माशाच्या शेपटीला जिओफायरोसर्कल असे म्हणतात.

गॅडस या माशाच्या पाठीवर व पोटावर पर असतात. त्यांना मध्यपृष्ठपर आणि मध्यअधरपर असे म्हणतात. या दोन्ही परांशी या माशाची शेपूट (पुच्छपर) कातडीच्या पडद्याने जोडलेली असते. त्यामुळे अशा तऱ्हेच्या पुच्छपराला स्यूडोकॉडल असे म्हणतात. पुच्छपक्षाचे कंकाल तंत्रावर आधारित समखंडित, विषमखंडित व अखंडित असे तीन मूलभूत प्रकार आहेत. बाह्यात्कारी फरक पडून इतर प्रकार यापासून निर्माण झाले आहेत.

पाण्यात आणि जमिनीवर राहणाऱ्या बेडकासारख्या उभयचर वर्गातील प्राण्यांच्या डिंभकांना शेपूट असते. दिवसेंदिवस डिंभकांची वाढ होत असताना त्याचे शेपूट आकाराने कमी होत जाते. डिंभकांची पूर्ण वाढ होऊन त्याचे प्रौढ प्राण्यात रूपांतर झाल्यावर त्या प्राण्याला शेपूट नसते. त्याच वर्गातील न्यूट या प्राण्याला नळीसारखे शेपूट असते.

सरीसृप वर्गातील साप, पाली, सुसर, कासव इ. प्राण्यांना शेपूट असते. अनेक जातींच्या पालींमध्ये संकटाचे वेळी शेपूट शरीरापासून तुटून पडते. त्यामुळे शत्रूचे लक्ष या वळवळणाऱ्या शेपटीकडे वेधले जाऊन पालीला सुरक्षित ठिकाणी पळून जाणे शक्य होते. सुसरी आपल्या शेपटीच्या तडाख्याने पाण्यातील लहान नावा उलटवून टाकू शकते. सरड्याचे शेपूट लांब असून झाडाची फांदी पकडण्यास उपयोगी पडते.

आर्किऑप्टेरिक्स या निर्वंश झालेल्या पक्ष्याला लांब शेपूट होते. उत्कांती व विकास घडल्यावर शेपटीत असलेले मणके एकमेकांशी जोडले गेले व शेपटाची लांबी खूपच कमी झाली. पक्ष्यांच्या शेपटीवरील भागावर असणाऱ्या पिसामुळे या पक्ष्यांच्या शेपटीच्या लांबीची कल्पना करता येणे कठीण आहे. मोर, कोंबडा यांसारख्या पक्ष्यांच्या शेपटीवरील पिसे खूप लांब असतात. मोराचा पिसारा या शेपटीवरील पिसांचाच बनलेला असतो.

सस्तन प्राणिवर्गातील जमिनीवर अगर पाण्यात राहणाऱ्या सर्व प्राण्यांना शेपूट असते. सिंह, वाघ, हत्ती यांसारख्या प्राण्यांच्या शेपटीच्या टोकावर केसांचा गोंडा असतो तर घोडयाची शेपटी केसांचीच बनलेली असते. माकडाची शेपूट खूप लांब असते तर हरिणाची शेपूट आखूड असते. सस्तन प्राण्यांना शेपटीचा उपयोग शरीराला आधार देणे, शरीराचा तोल सांभाळणे, झाडाची फांदी पकडणे, पाण्यात पोहणे इत्यादींसाठी होतो.

मध्यजीव महाकल्पामध्ये (सु. २३ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या काळा-मध्ये) अस्तित्वात असलेले व कालांतराने निर्वंश झालेले ⇨ डायनोसॉर यांची व सध्या आढळणाऱ्या ⇨ कांगारूंची शेपटी खांबासारखी जाड व मजबूत असते. कांगारूचे पुढील पाय आकाराने लहान असल्याने चालण्यासाठी अगर पळण्यासाठी उपयोगी पडत नाहीत, म्हणून पायांच्या जोडीला असणारे शेपूट तिसऱ्या पायासारखे उपयोगी पडते. या शेपटाच्या साह्याने कांगारू लांब लांब उड्या मारत धावते. जर्बोआ या उंदरासारख्या प्राण्याची पुढील पायांची जोडी आखूड असली तरी शेपूट खूप लांब असल्याने कांगारूच्या शेपटीप्रमाणे या शेपटीचा उपयोग धावण्यासाठी व शरीराचा भार सहन करण्यासाठी होतो. जमिनीत बिळे करून राहणाऱ्या प्राण्यांची शेपूट खूप आखूड असते. झाडावर राहणाऱ्या ऑपॉस्सम व माकडे यांची शेपूट लांब असून तिच्या साहाय्याने फांदी मजबूत पकडता येते. हाउलर आणि कॅप्युचिन या जातींच्या माकडांची शेपूट फांदी बळकटपणे धरू शकते. यामुळे ही माकडे हवेत लोंबकळू शकतात. त्यांच्या हाताचा अंगठा नष्ट झालेला असतो. उरलेल्या चार बोटांचा आकडीसारखा उपयोग करून व शेपटीची मदत घेऊन ही माकडे झाडावर लोंबकळत राहतात.

कपी आणि मान व यांना शेपूट नसते.भ्रूणावस्थेत मणक्याच्या साखळीतील शेवटच्या काही मणक्यांची शेपूट बनलेली असते. परंतु भ्रूणाची जसजशी वाढ होते तसतसे हे शेपूट शरीरात सामावून घेतले जाते, म्हणूनच मूल जन्माला आल्यावर त्याला शेपूट नसते. फार क्वचितपणे काही माणसांना लहान, आखूड, शेपूट असल्याचे आढळून आले आहे.

अपृष्ठवंशीय प्राण्यांत खरी शेपूट नसते. काही प्राण्यांच्या शरीराचा शेवटचा भाग थोडासा लांबट झाला असल्याने त्याला शेपूट असे म्हणतात. सॅजिट्टाची शेपूट आखूड व सरकॅरिया डिंभाची लांबट शेपूट असते. शेवंडामध्ये पुच्छपाद व पुच्छखंड मिळून पुच्छपक्ष बनलेला असतो. धोकादायक प्राणी जवळ आल्यास ते पुच्छपादाची जोरदार हालचाल करून संरक्षणासाठी बिळात शिरतात. विंचवामध्ये शेपटीत पाच खंड असतात व शेवटच्या खंडास विषाची नांगी असते. त्याचा उपयोग संरक्षणासाठी करतात.

सायाळ काटेरी शेपटाचा उपयोग संरक्षणासाठी, रॅटल साप (खडखड्या साप) इशारा देण्यासाठी, ॲलिगेटर हा अमेरिका व चीनमधील नदयांत आढळणारा मोठा सरडा आपल्या शेपटीचा उपयोग शिकारीसाठी करतो. काही प्राणी आपली भावना शेपटीच्या साहाय्याने व्यक्त करतात. घाबरलेला कुत्रा अगर मांजर आपली शेपटी मागील दोन्ही पायांत घालतात. फार आनंद झाला तर हेच प्राणी आपल्या शेपटीची विशिष्ट हालचाल करतात. राग व्यक्त करण्यासाठी हे प्राणी आपली शेपटी ताठ करतात व अशा वेळी शेपटीवरील केस ताठ उभे राहतात.

संदर्भ : 1. Dhami, P. S. Dhami, J. K. Chordate Zoology, New Delhi, 1995.

2. Lull, R. S. Organic Evolution, New York, 1961.

रानडे, द. र.