टक्काचोर : याला परटीण असेही दुसरे नाव आहे. कोर्व्हिडी या कुलातील हा पक्षी असून ह्याचे शास्त्रीय नाव डेंड्रोसिट्टा व्हॅगॅबंडा असे आहे. भारतात याच्या चार प्रजाती आणि याच्याशी साम्य असणाऱ्या आणखी दोन जाती आहेत.

टक्काचोर

संबंध भारत आणि ब्रह्मदेशात हा सापडतो. डोंगराळ भागात मात्र १,५२५ मी.पेक्षा जास्त उंचीवर हा आढळत नाही. हा पक्षी वृक्षवासी  असून जमिनीवर कधीच उतरत नाही. झाडीत व झुडपांच्या रानात हा राहतो, घरांच्या किंवा बंगल्यांच्या आवारात व बगीच्यात हा पुष्कळदा येतो. दाट अरण्यात हा सहसा नसतो. हे पक्षी गोंगाट करणारे असून सामान्यतः यांची जोडपी असतात.

टक्काचोर साधारणपणे साळुंकीएवढा असतो. याचा रंग तांबूस पिंगट असतो सबंध डोके, मान व छाती धुरकट तपकिरी असते पंख गडद तपकिरी असून मिटलेल्या स्थितीत त्यांच्या बाजू करड्या, पांढऱ्या रंगाच्या असतात. याचे शेपूट लांब (३० सेंमी.), निमुळते व करड्या रंगाचे असते व त्याचे टोक काळे असते. नर व मादी दिसायला सारखीच असतात.

हा पक्षी स्वभावतः भित्रा असल्यामुळे झाडांवर दाट पानांमध्ये दडून बसतो. याच्या सगळ्या हालचाली चोरट्या असतात. हा सर्वभक्षक आहे. फळे, किडे, सुरवंट, गोमा, बेडूक, सरडे, लहान साप, पक्ष्यांची अंडी व पिल्ले हा खातो. चौर्य विद्येत हा निष्णात आहे. पक्ष्यांची अंडी व पिल्ले चोरून खाण्याकरिता हा नाना प्रकारच्या युक्त्या योजतो. हा पुष्कळ प्रकारचे आवाज वाढतो, काही कर्कश तर काही मंजूळ असतात. याचा नेहमीचा कोक्‌ली, कोक्‌ली हा आवाज मोठा पण मधुर असतो.

यांचा विणीचा हंगाम फेब्रुवारीपासून जुलैपर्यंत असतो. हा आपले घरटे मोठ्या झुडपात अथवा झाडांवर-विशेषतः बाभूळ, आंबा, कडूलिंब वगैरेंवर बांधतो. ते वाटीसारखे व काटक्यामुळ्यांचे केलेले असून झाडाच्या शेंड्यावर फांदीच्या दुबेळक्यात असते. मादी ४–५ अंडी घालते, ती सामान्यतः फिक्कट तांबूस पांढऱ्या रंगाची असून त्यांच्यावर तांबूस आणि तपकिरी डाग असतात. घरटे बांधणयापासून तो पिल्लांना खाऊ घालून वाढविण्यापर्यंतची सगळी कामे नर व मादी दोघेही करतात.

कर्वे, ज. नी.