कुरंग : स्तनि-वर्गातील गो-कुलात हरिण आणि कुरंग यांचा समावेश होतो. कुरंग मध्य मायोसीन कल्पात (सु. २ कोटी वर्षांपूर्वी) प्रथम उत्पन्न झाला. तो मेंढरे आणि बकरी यांचा निकटचा नातेवाईक असून या सर्वांचा एकच पूर्वज असला पाहिजे, पण कुरंग जास्त आद्य आहे.

हा गॅझेला  वंशाचा असून याच्या पुष्कळ जाती आहेत. त्या आफ्रिकेत आणि दक्षिण आशियात सर्वत्र आढळतात. प्रारूपिक (नमुनेदार)  जातीचे शास्त्रीय नाव गॅझेला डॉर्कास  असे आहे. कुरंगाची एक जाती भारतातही आढळते [→ चिंकारा] . कुरंग मूळचे वाळवंटी व निमवाळवंटी प्रदेशांत राहणारे आहेत.

तो आकाराने लहान किंवा मध्यम असतो दातांची मांडणी मेंढराप्रमाणे रंग राखी पोट पांढरे चेहरा व शरीराच्या बाजू यांवर काळपट आणि पांढुरके पट्टे शिंगे साधारण लांब मागे वळलेली व वीणाकृती असून त्यांच्यावर कंगोऱ्यांची वलये असतात मादीची शिंगे,  नराच्या शिंगांपेक्षा आखूड व बारीक असतात पाय लांब व बारीक असतात.

प्रारूपिक कुरंगाची (गॅझेला डॉर्कास) खांद्यापाशी उंची ७५ सेंमी पेक्षा जास्त नसते पण दोनतीन जातींमध्ये ती सु. ९० सेंमी. असते.  शिंगे सु.३५ सेंमी. लांब असतात. बांधा नाजूक असतो. हा अतिशय चपळ असतो. वेगाने धावत असताना तो उंच उड्या घेत जातो. पाठीचा रंग भुरा असतो पण बाजूकडे तो गडद तपकिरी होतो. पोट व ढुंगण पांढरे असते. सगळ्याच कुरंगांचे डोळे मोठे, सौम्य व तेजस्वी असतात म्हणूनच ज्या स्त्रीचे डोळे असे असतात तिला कवींनी  ‘कुरंगनयना’  म्हटलेले आढळते. गवत आणि काटेरी झुडपांची पाने हे यांचे भक्ष्य होय. यांचे कळप असतात व ते सामान्यतः पहाटे आणि संध्याकाळी चरतात २४ तासांनी एकदा पाणी पितात. गॅ. डॉर्का  ही जाती दुर्मिळ होत चालली असली, तरी अजून सहाराच्या आणि सीरियाच्या वाळवंटात आढळते.

कुरंगाच्या काही सुप्रसिद्ध जाती पुढीलप्रमाणे आहेत : (१) इराणी कुरंग (गॅझेला सबगटरोझा ). मादीला शिंगे नसतात. (२) गॅझेला  ग्रँटाय, सूदान व पूर्व आफ्रिकेत आढळतो. मोहक रंग, सुबक शिंगे व डौलदार शरीर यांमुळे हा आकर्षक दिसतो. (३) गॅझेला टॉम्सनाय. हा पूर्व आफ्रिकेत आढळतो. हा सतत शेपटी हालवीत असतो. (४) गॅझेला अरेबिका, जॉर्डनमध्ये वाळवंटी प्रदेशात आढळतो.

दातार, म. वि.