सागरी सर्प : सर्व सागरी सर्प हायड्रॉफिडी या सर्पकुलातील असून अतिशय विषारी असतात. यांच्या सु.१० प्रजाती आणि ५५ जाती आहेत त्यांपैकी जवळपास २९ जाती भारतालगतच्या समुद्रांत आढळतात.

सागरी सर्प २ -३ मी. लांब असतात. त्यांचे रंग नजरेत भरण्यासारखे असतात कित्येकांच्या अंगावर झगझगीत रंगांचे आडवे पट्टे असतात. पाठीचा रंग मळकट हिरवा किंवा निस्तेज निळा असून त्यावर काळ्या, हिरवट अथवा निळसर रंगाचे ठळक पट्टे असतात. पोटाचा रंग पांढरा अथवा पिवळसर असतो. शेपूट दोन्ही बाजूंकडून (पार्श्विक) चपटे झालेले असल्यामुळे हे साप सहज ओळखता येतात . ते नेहमी समुद्र किनाऱ्याच्या जवळपासच राहतात.

सामान्यतः यांचे खवले लहान असतात पुष्कळ जातींत उदरशल्क मुळीच नसतात, मात्र थोड्या जातींत ते असतात. डोळे बारीक आणि बाहुली उभी असते. हे साप द्विशाखित जिभेचा फारसा उपयोग करीत नाहीत मधूनमधून जिभेची फक्त दोन्ही टोके तोंडाबाहेर काढतात.

विषदंत अगदी आखूड आणि कायमचे उभारलेले असतात त्यांच्या अग्र पृष्ठावर पन्हळी असली तरी विषदंताच्या आत असलेल्या पोकळ नळीत विष येऊन दंताच्या टोकावरील छिद्रातून बाहेर पडते. विष अतिशय जहाल असल्याने यांची गणना अत्यंत प्राणघातक सर्पांत करावी लागते. नागांच्या विषाप्रमाणेच या सापांच्या विषाने तंत्रिका-केंद्रे बधिर होतात.

सागरी सर्प (लॅटिकौडा कोलब्रिना)नाकपुड्या अगदी पुढे वरच्या पृष्ठावर असतात. श्वसनाकरिता यांना एकच फुप्फुस असून ते मुखापासून गुदद्वारापर्यंत पसरलेले असते. या फुप्फुसाचा फक्त पुढचा भागच श्वसनाकरिता उपयोगात आणला जातो उरलेल्या भागाचा उपयोग अंशतः हवा साठविण्याकरिता (वाताशयासारखा) होतो. हवा आत घेण्याकरिता यांना पाण्याच्या पृष्ठभागावर यावे लागते परंतु एकदा भरपूर हवा आत घेतल्यावर पुष्कळ वेळ ते पाण्याखाली राहू शकतात.

आपल्या शेपटीच्या तरंगित हालचालींनी ते पोहतात. त्यांना जमिनीवर व्यवस्थित सरपटता येत नाही त्यांच्या सर्व हालचाली अनिश्चित व अस्थिर असतात. पाण्याबाहेर त्यांची दृष्टीदेखील मंद होते आणि हालणाऱ्या कोणत्याही वस्तूला किंवा सावलीलादेखील ते दंश करीत सुटतात.

हे साप मुख्यतः मासे खातात. सर्व सागरी सर्प जरायुज आहेत. मादी एका वेळेला २-३ पिलांना जन्म देते. हे निरूपद्रवी असून सहसा चावत नाहीत. कोळ्यांच्या जाळ्यात पुष्कळ सागरी सर्प नेहमी अडकतात. जाळे बाहेर काढल्यावर कोळी त्या सापांना पुन्हा समुद्रात फेकून देतात परंतु हे साप कोळ्यांना चावल्याची उदाहरणे तुरळक आहेत. सागरी सर्पाची विषप्रतिबंधक लस प्रामुख्याने जपान व ऑस्ट्रेलियात तयार होते. भारतातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर आढळणाऱ्या सामान्य जाती लॅटिकौडा कोलब्रिना, हायड्रोफिस सेरूलेसेन्सएनहायड्रिना शिस्टोसा या आहेत.

पहा : वाताशय.

संदर्भ : Ditmars, Raymond L. Snakes of The World, New York, 1957.

कर्वे, ज. नी.