झुरळ : डिक्टिऑप्टेरा गणाच्या ब्लॅटिडी कुलातील सु. दोन हजारांहून अधिक जाती असलेला कीटक. त्याचा मानवाबरोबर अनादिकालापासून संघर्ष असताना देखील अजूनही तो मानवाबरोबर त्याच्या घरात वावरत असलेला आढळतो. त्याचे मूलस्थान उष्ण कटिबंधी आफ्रिका आहे. झुरळ हा पंख असलेल्या सर्वांत आदिम कीटकांपैकी असून त्याची उत्पत्ती सु. २५ कोटी वर्षांपूर्वी झाली. कीटकांच्या अत्यंत पुरातन जीवाश्मांमध्ये (शिळारूप अवशेषांमध्ये) झुरळाचेही जीवाश्म आढळतात. हा इतका पुरातन कीटक असूनही त्याच्या मूळ स्वरूपात आजही विशेष फरक घडून आलेला नाही.

झुरळाच्या शरीराचे भाग व अवयव इतर प्रारूपिक (नमुनेदार) कीटकाप्रमाणे असतात [⟶ कीटक]. शरीर चपटे असते त्यामुळे ते लहान फटींत सहजपणे सामावू शकते. त्यांच्या अनेक वंशांमध्ये पंख नसतात. जवळजवळ निम्म्या वंशांतीलच झुरळांना पंख असतात. परंतु ती पंखांचा उपयोग उडण्यासाठी फारसा करीत नाहीत. झुरळे मुख्यत्वे उष्ण प्रदेशात आढळतात. जगात झुरळाच्या ज्या अनेक जाती आहेत त्यांच्यापैकी काही थोड्याच जाती माणसाच्या वसतिस्थानात राहत असलेल्या आणि पीडक रूप धारण केलेल्या दिसतात. त्यांपैकी पुढील चार प्रसिद्ध आहेत : (१) पौर्वात्य (ब्लॅटा ओरिएंटॅलीस), (२) अमेरिकन (पेरिप्लॅनेटा अमेरिकाना), (३) जर्मन (ब्लॅटेला जर्मनिका) आणि (४) ऑस्ट्रेलियन (पेरिप्लॅनेटा ऑस्ट्रेलॅसिई). पौर्वात्य झुरळ हा एक अत्यंत घाणेरडा असा घरातील पीडक प्रकार समजला जातो.

काष्ठ झुरळे ही घरातील पीडक प्रकारात मोडत नाहीत. अशा झुरळांच्या काही जातींत पचन तंत्रात (पचनसंस्थेत) काही आदिजीव (प्रोटोझोआ) असतात. त्यांच्या मदतीने ही झुरळे लाकूड पचवू शकतात. अशा काष्ठ झुरळाच्या अनेक पिढ्या लाकडाच्या ओंडक्यांखाली एकत्रित राहून समूहजीवन जगतात.

झुरळ माणसाच्या घरात स्वयंपाकघरातील आणि जेथे कोठे उबारा, अन्न आणि पाणी मिळण्यासारखे असेल तेथे दिवसा सांदीफटीत, अडगळीच्या जागेत (ग्रंथालयासारख्या जागांतही) लपून बसते. ते निशाचर असल्याने आणि अंधुक प्रकाशात अतिशय चपळ असल्याने रात्री दिवे मालविल्यानंतर काळोख झाला म्हणजे अन्नपाण्याच्या शोधासाठी बाहेर पडते. घरात अन्नपाणी मिळू शकेल अशा जागी रात्रीच्या काळोखात झुरळे एकत्र जमतात व त्यावर ताव मारतात. अशा वेळी माणूस तेथे येत असल्याची त्यांना जराशीही चाहूल लागली अगर एकदम दिव्याचा प्रकाश पडला, तर ती चपळतेने सैरावैरा पळून अगर उडून जाऊन सांदीफटीत लपून बसतात. त्यांच्या लपण्याच्या जागेला त्यांच्या शरीरातील ग्रंथींमधून स्रवणाऱ्या तेलकट द्रवामुळे व विष्ठेमुळे एक प्रकारचा अप्रिय उग्र वास येतो. झुरळे एखाद्या भांड्यातून चालत गेल्यास त्या भांड्यालाही हा घाण वास लागतो. अशा भांड्यात गरम खाद्य किंवा पेय वाढल्यास ते गरम झाले की, हा घाण वास तीव्रतेने जाणवतो. बिस्किटे इ. खाद्यपदार्थांचा झुरळे नाश करतात. कपडे खाऊन त्यांना भोके पाडतात. शेते, बागा, मळे अशा ठिकाणी जरी झुरळे आढळत असली, तरी ती घरातल्या एवढी तेथे उपद्रवी ठरत नाहीत.

झुरळ

वरील जातींपैकी अमेरिकन झुरळ ही सर्वसामान्यपणे आढळणारी जाती होय. हे झुरळ आकारमानाने मोठे (सु. ३०–५० मिमी. लांब), लालसर तपकिरी रंगाचे असून नर व मादी या दोहोंनाही पंख असतात आणि ती पंखांचा उपयोग प्रसंगी उडण्यासाठीही करतात. झुरळांच्या जीवनक्रमात अंडे, अर्भक, पिलू, पूर्ण वाढ झालेले झुरळ ह्या अवस्था असतात. निषेचित (मैथुनाने फलित झालेली) मादी आडोशाच्या सुरक्षित जागी चवळीच्या दाण्याच्या आकाराच्या चॉकलेटी रंगाच्या चिवट आवेष्टनात १६ पर्यंत एकत्र अंडी घालते. हे अंडप्रावर (अंडी ठेवण्याच्या पेट्या) मादीच्या अंडनिक्षेपकातून (अंडी घालण्याच्या साधनातून) अर्धवट बाहेर पडलेल्या अवस्थेत १–२ दिवस राहिल्यावर मादी ते कपाटे, खोकी, धान्याची पोती वा वळचणीच्या सुरक्षित जागी टाकते. मादी आपल्या पूर्णावस्थेतील पाच महिन्यांच्या आयुष्यकाळात असे ५–८ अंडप्रावर घालते. हवेतील उष्णतामानाप्रमाणे त्यांच्यामधील अंडी सु. ४० दिवसांत फुटून त्यांच्यामधून बारीक आकाराची पितरांसारखी दिसणारी अर्भके (पिल्ले) बाहेर पडतात. त्यांची वाढ पूर्ण होण्यास ४–२४ महिने लागतात. झुरळाची एक पिढी ९–३० महिन्यांत पूर्ण होते.

लोकवैद्यकात (अनुभवसिद्ध पारंपरिक वैद्यकात) झुरळ कर्करोगाचे व अन्य व्रण बरे करण्यासाठी, कृमिनाशक म्हणून, तसेच शोफ (जलसंचय) परिहारासाठी वापरले जाते. अन्नपचनास मदत होण्यासाठी तेलात लसणीबरोबर झुरळ तळून दिले जाते. झुरळात बाल पक्षाघाताच्या (पोलिओच्या) विषाणूचे (व्हायरसाचे) काही वाण, रोगकारक सूक्ष्मजंतू व चापटकृमी (प्लॅटिहेल्मिंथ कृमी) ह्यांच्या काही जाती आढळत असल्याने हा कीटक माणसाच्या आरोग्याच्या दृष्टीने उपद्रवी आहे. अर्थात इतर पीडकांइतके मात्र झुरळ रोगनिर्मितीच्या दृष्टीने मानवास उपद्रवकारी नाही.

झुरळांच्या नाशासाठी पुढील उपाय योजतात. (१) धान्यांच्या पिठात टाकणखार (बोरॅक्स) भुकटी मिसळून रात्री झुरळे जमा होत असतील तेथे ते टाकतात. (२) डीडीटी, गॅमेक्झिन, पायरेथ्रम भुकटी, मॅलॅथिऑन वगैरे कीटकनाशके त्यांच्या लपून बसण्याच्या जागी टाकतात. झुरळे जगण्याच्या दृष्टीने अतिशय चिवट कीटक होत. उदा., डीडीटी प्रतिरोधी जाती आता निर्माण झाल्या असून त्यांना मारण्यास इतर परिणामकारक कीटकनाशके वापरावी लागतात.

काही गांधील माश्या झुरळाच्या अंडप्रावरात अंडी घालतात आणि त्यातून नव्याने निर्माण होणाऱ्या गांधील माश्या झुरळाची अंडी खाऊन वाढतात. अशा गांधील माश्या ह्या झुरळाच्या नैसर्गिक शत्रू होत. त्यांच्यामुळे अर्थातच झुरळांची उत्पत्ती खुंटण्यास मदत होते.

प्रयोगशाळांत व संशोधन कार्यात झुरळांचा बराच उपयोग केला जातो.

परांजपे, स. य. पाटील, ह. चिं.