शितप : हे नाव माशांच्या कॅरॅंजिडी कुलातील कॅरॅंक्स, डेकॅप्टेरस व सेलर या प्रजातींतील विविध जातींना दिले जाते. कॅरॅंक्स प्रजातीतील कॅ. कॅरॅंगसकॅ. मेलॅंपायगस डेकॅप्टेरस प्रजातीतील डे. रसेली (कॅ. कुर्रा) ही एकमेव जाती आणि सेलर प्रजातीतील से. बूप्स (कॅ. बूप्स) व से. जेड्डाबा (कॅ. जेड्डाबा) या जातींनाही हे नाव दिलेले आढळते. इंग्रजीत सामान्यतः हॉर्स मॅकरेल, थ्रेड फिन, ब्लॅक टिप्ड इ. नावे शितपांना रूढ आहेत.

 

शितप (कॅरँक्स कॅरँगस)

कॅ. कॅरॅंगस जातीचा प्रसार भारतात अरबी समुद्र, हिंद महासागर व बंगालचा उपसागर, मलाया द्वीपसमूह ते उष्णकटिबंधी अमेरिकेचे अटलांटिक किनारे यांत आहे. या जातीच्या माशांचा रंग पाठीवर रुपेरी आणि दोन्ही बाजू व खालून सोनेरी असतो. प्रौढत्व प्राप्त न झालेल्या माशांमध्ये शरीरावर चार-पाच रुंद उभे पट्टे आढळतात. पाठीवरील पहिला पर (पक्ष) करडा असून बाकीचे इतर पर सोनेरी असतात. पाठीवरील दुसऱ्या पराची संपूर्ण वरची कडा व टोक आणि शेपटीच्या पराच्या वरच्या खंडाचे टोक हे सर्व काळे असते. सामान्यतः भारतात आढळणाऱ्या माशांमध्ये प्रच्छदावर ठिपका नसतो व असल्यास तो अगदी बारीक असतो.

कॅ. मेलँपायगस या जातीच्या माशांचा रंग पाठीवर हिरवट सोनेरी असून पोटाकडे रुपेरी होत जातो. प्रच्छदावर एक लहान काळा ठिपका असतो. पृष्ठभाग व गुदपक्ष पुढच्या बाजूने भडक रंगाचे असतात. शरीर व छाती लहान, गोल खवल्यांनी आच्छादलेली असते. छोटे पर नसतात. लांबी ३०–६१ सेंमी. पर्यंत असते.

डे. रसेली (कॅ. कुर्रा) जातीच्या माशांचा प्रसार तांबड्या समुद्रापासून अरबी समुद्र, हिंदी महासागर, बंगालचा उपसागर ते मलाया द्वीपसमूहापर्यंत असतो. त्यांचा रंग वरच्या बाजूला निळसर असून खालच्या बाजूकडे रुपेरी होत जातो. प्रच्छदाच्या वरच्या कडेवर एक गर्द काळा ठिपका असतो. डोक्याच्या वरच्या बाजूवर सूक्ष्म काळे ठिपके असतात. तमिळनाडूच्या सागरकिनाऱ्यावर ते अगदी सररास आढळतात. मंगलोर ते रत्नागिरी दरम्यानच्या मासेमारीमध्ये हे मोठ्या प्रमाणात मिळतात. त्यांची लांबी १५–१८ सेंमी. असते.

से. बूप्स (कॅ. बूप्स) या जातीच्या माशांचा प्रसार अंदमान ते मलाया द्वीपसमूह यांत असतो. त्यांचा रंग पाठीवर रुपेरी व भडक असून पोटावर सोनेरी ठिपके असतात. प्रच्छदावर एक लहान पण पूर्ण विकसित ठिपका असतो. पाठीवर व शेपटीच्या परांवर ठळक ठिपके असतात.

से. जेड्डाबा (कॅ. जेड्डाबा) जातीच्या माशांचा प्रसार तांबडा समुद्र, आफ्रिकेचा पूर्व किनारा, अरबी समुद्र, हिंदी महासागर, बंगालचा उपसागर ते मलाया द्वीपसमूह व त्याच्या पलीकडे अशा क्षेत्रात असतो. ते तमिळनाडूच्या सागरकिनाऱ्यावर सरास आढळतात. त्यांचा रंग पाठीवर रुपेरी निळा असून दोन्ही बाजू व खालचा भाग सोनेरी होत जातो. प्रच्छदावर पश्च-ऊर्ध्व कोनाशी एक मोठा काळा डाग असतो. पर पिवळे असतात. पाठीवरील परांना करडी छटा असते. शेपटीच्या पराचा वरचा खंड खालच्या खंडापेक्षा गडद रंगाचा असतो. ३३ सेंमी.पेक्षा जास्त लांबीच्या माशांत पाठीवरील मऊ पराचे टोक पांढरे असते व बाकी पर काळा असतो. गुदपक्षावर एक काळा ठिपका असतो.

जमदाडे, ज. वि.