साप : सरीसृप वर्गातील स्क्वॅमेटा गणाच्या ऑफीडिया उपगणात सापांचा समावेश होतो. ते सरपटणारे, शरीरावर खवले असणारे, पाय नसलेले, अनियततापी व कवचयुक्त अंडज, तर काही जरायुज प्राणी आहेत.

सापांच्या सु. २,५०० जाती असून भारतात ३४० जाती आढळतात. त्यांपैकी फक्त ६९ जातींचे सापविषारी आहेत. महाराष्ट्रात सापांच्या सु. ५२ जाती असून त्यांपैकी १२ जाती विषारी आहेत. साप प्रामुख्याने उबदार हवामानात आणि गवताळ व सुपीक प्रदेशांत आढळतात. साप जमिनीवर तसेच पाण्यातही आढळतात. समुद्रात आढळणारे सर्व साप विषारी, तर गोड्या पाण्यातील सर्व साप बिनविषारी असतात. न्यूझीलंड, आयर्लंड व बर्म्यूडा या प्रदेशांत साप आढळत नाहीत. प्वेर्त रीको, क्यूबा, हैती, हवाई, जमेका, मादागास्कर इ. प्रदेशांत विषारी साप आढळत नाहीत.

सापांच्या जीवाश्मांच्या (शिळारूप झालेल्या अवशेषांच्या) अभ्यासात त्यांचे १० कोटी वर्षांपूर्वीचे जीवाश्म आढळले आहेत. मानवनिर्मितीच्या अगोदरपासूनच साप पृथ्वीवर अस्तित्वात होते. सरीसृपांच्या क्रम-विकासात (उत्क्रांतीत) प्रथम सरडे व त्यानंतर साप निर्माण झाले. पूर्वी सापांना लहान पाय होते परंतु साप बिळात राहत असल्याने त्यांना पायांचा अडथळा होऊ लागला व क्रमविकासात पाय अनावश्यक ठरल्याने हळूहळू सापांचे पाय नष्ट झाले.

अधिवास : साप सर्व प्रकारच्या अधिवासांत आढळतात. गोड्या तसेच समुद्राच्या पाण्यात, गवताळ व खडकाळ प्रदेशांत, दलदली जवळ व पर्वतावर सापांचे वास्तव्य असते. उष्णकटिबंधातील जंगलात ते मोठ्या प्रमाणावर आढळतात. वाळवंटात राहणाऱ्या या सापांच्या अंगावरील खवल्यांना बारीक उंचवटे असतात, त्यामुळे वाळूवरून सरपटताना त्यांना पकड मिळते. या सापांच्या डोक्यावरील भागास उंचवटे असल्याने त्यांना वाळूत पुरून घेण्यास मदत होते. रेड स्पॉटेड स्नेक व रजतवंशी (रॉयल स्नेक) हे वाळवंटात राहणारे साप आहेत.

काही साप झाडावर राहतात. या सापांचे वास्तव्य फांद्यांवर, झुडपांत व झाडांच्या ढोलीत असते. त्यांची शेपटी लांब असल्याने वरच्या फांदीवरून खालच्या फांदीवर येताना ते वरच्या फांदीस वेटोळे टाकून आपल्या शरीराचा पूर्ण भार पेलू शकतात उदा., वाईन स्नेक, उडता सोनसर्प (फ्लाईंग स्नेक). नद्या, तळी व नाले यांच्या आसपास आढळणाऱ्या या सापांना पाणसर्प म्हणतात. या सापांची नासाद्वारे डोक्याच्या वरील बाजूस असतात. त्यांना श्वसनासाठी पूर्ण डोके पाण्याबाहेर काढण्याची गरज भासत नाही. उदा., विरोळा, पट्टेरी पाणसाप, पाणदिवड इत्यादी.

साप कायम एकाच प्रकारच्या अधिवासात राहत नाहीत. पाणसर्प जमिनीवर किंवा जमिनीवरील साप पाण्यात आढळू शकतात. साप जमिनीवर बिळात राहतात परंतु ते स्वतः बिळे तयार करत नाहीत. मुंग्यांच्या वारूळात किंवा उंदीर व इतर प्राण्यांनी तयार केलेल्या बिळात ते राहतात.

जगात सर्वांत लांब असणारा बिनविषारी साप पायथॉन रेटिक्युलेटस [ ⟶ अजगर] हा असून त्याची लांबी ११–११·५ मी. असते. ⇨ ॲनॅकाँडा याची लांबी सु.९ मी. व वजन सु. ५०० किग्रॅ. असते. बिनविषारी सापांमध्ये सर्वांत लहान ⇨आंधळा साप (ब्लाइंड स्नेक) हा असून त्याची लांबी सु. १० सेंमी. असते. ⇨नागराज (किंग कोब्रा) हा विषारी सापांतील मोठा साप असून त्याची लांबी ४·५–५·४ मी. असते. वजनाने मोठा व विषारी साप ईस्टर्न डायमंडबॅक रॅटलस्नेक हा असून त्याची लांबी २-३ मी. व वजन सु. १५·५ किग्रॅ. असते. विषारी सापांमध्ये सर्वां लहान साप स्लाईड स्नेक (वार्म स्नेक) हा आहे.

हालचाल : साप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सरपटत जातो. तो सरपटताना तोंडापासून शेपटीपर्यंत संपूर्ण शरीराचा वापर करतो. त्याच्या शरीरात १००–३००  मणके (कशेरुक) असतात. प्रत्येक मणक्यास दोन बरगड्या जोडलेल्या असतात. त्यामुळे त्याचे शरीर लवचिक व सहज वळण्यासारखे बनते. शरीर जमिनीला सपाट ठेवून त्याच्या शरीराला ‘S’ आकाराची अनेक वळणे तयार होतात. तो खडक व जमीन अशा कठिण भागांवर दाब देऊन सरपटत पुढे सरकत असतो.

अजगर व घोणस यांसारखे वजनाने जड साप सरळ रेषेत सरपटत पुढे जातात. त्यांचे पोटाखालचे अधर शल्क पृष्ठभागामध्ये घट्ट रोवतात व त्वचेच्या आतील शरीर स्नायूंसह पुढे सरकते. अधर शल्काची पकड ढिली होते. तेव्हा ते पुढे सरकतात व पुन्हा पृष्ठभागात घट्ट पकड घेतात. या पद्घतीत सर्व शरीर जमिनीला घासत असल्याने या सापाचा वेग मंद असतो. रेताड प्रदेशातील सापाची वक्रगती (वेलांटी) चाल असते. ज्या दिशेला त्याला पुढे जायचे त्या दिशेच्या काटकोनात तो शरीर सरकवितो. पुढे सरकताना साप डोके व मान जमिनीपासून वर उचलून त्या दिशेच्या बाजूस फेकतो जमिनीवर प्रथम मान व नंतर शेपटी टेकते. शेपटी जमिनीवर टेकल्यावर पुन्हा डोके व मान उचलून त्या दिशेच्या बाजूस फेकतो. कोकणात आढळणारा फुरसे हा साप या पद्घतीने हालचाल करतो.

सगळेच साप पाण्यात पोहू शकतात परंतु पाण्यात दीर्घकाळ पोहण्याची व राहण्याची क्षमता फक्त पाणसर्पांमध्येच असते. पोहताना तो डोके पाण्याच्या वर काढतो. शरीराला हेलकावे देऊन पुढे सरकतो. तो शेपटीचा वापर वल्ह्यासारखा करतो.


अन्न : सापांना मेलेले भक्ष्य खाणे आवडत नाही. उंदीर, घुशी, सरडे, पाली, बेडूक इ. सापांचे अन्न आहे. पाणसाप बेडूक व मासे खातात. काही साप झाडावरील घरट्यांमध्ये असलेली पक्ष्यांची अंडी खातात. सापांच्या तोंडाच्या विशिष्ट रचनेमुळे ते स्वतःपेक्षा मोठ्या आकारमानाचे प्राणीही गिळू शकतात. नाग व घोणस यांसारखे विषारी साप भक्ष्याला पकडतात, त्यास दंश करून ठार मारतात. धामण व पाणसाप भक्ष्य पकडतात आणि ते जिवंत असतानाच गिळून टाकतात. ते डोक्याकडून भक्ष्य गिळतात. अजगरासारखे बिनविषारी साप दबा धरून बसतात. भक्ष्य जवळ आले की, त्यावर झडप घालून पकडतात आणि त्याच्याभोवती घट्ट वेटोळे घालून त्यास ठार मारतात. सापाला एकदा अन्न मिळाले की, त्याला काही दिवस अन्नाची गरज भासत नाही. काही साप अन्नपाण्याशिवाय कित्येक महिने जिवंत राहू शकतात. नागराज व मण्यार हे इतर सापांनादेखील अन्न म्हणून खातात.

त्वचा व व रंग : सर्व सापांच्या शरीरावर शुष्क व खरबरीत खवल्यांचे आवरण असते. हे खवले केराटिनापासून तयार झालेले असतात. साप स्वतःची त्वचा नियमित बदलत असतो, यास कात टाकणे असे म्हणतात. कात टाकताना त्याच्या हालचाली मंद होतात व त्यास डोळ्याने दिसत नाही. वरची त्वचा पूर्णपणे निघून जाते व आतमध्ये नवीन त्वचा तयार होते. कात टाकण्याची क्रिया विशिष्ट काळानंतर पुनःपुन्हा होत असते. साप वर्षातून एकापेक्षा अधिक वेळा कात टाकत असतात.

सापांचा रंग निसर्गनियमानुसार सभोवतालच्या वातावरणाशी मिळता-जुळता असणारा असतो. यामुळे साप अगदी जवळ गेल्याशिवाय दिसत नाहीत. या रंगसंगतीचा फायदा सापांना भक्ष्य शोधण्यासाठी तसेच शत्रूपासून बचाव करण्यासाठी होतो. साप विविध रंगांमध्ये आढळतात. रंगातील विविधता, शरीरावरील ठिपके व खुणा या गोष्टींची सापाची जात ओळखण्यास मदत होते.

सापाचे शरीर दोरीसारखे लांबट व लवचिक असते. ते डोके, धड व शेपटी यांमध्ये विभागलेले असते. त्याला बाह्य कर्ण नसतात. त्याच्या डोक्यावरील खवले सापाची जात ओळखण्यास उपयुक्त असतात. सापाची वाढ आयुष्यभर होत असते. शीतनिष्कियतेच्या काळात सापाची हालचाल मंदावते. तो सुरक्षित जागी पडून राहतो. त्याच्या शरीरातील सर्व क्रिया मंद होतात शरीरात साठविलेल्या चरबीवर तो जिवंत राहतो.

कंकाल तंत्र : सापाचे कंकाल तंत्र पृष्ठवंशी प्राण्यांसारखे असते. ते अस्थियुक्त असून मेरुदंड (कशेरुक दंड) लांब असतो. यामध्ये २०० ते ३०० कशेरुक असतात. पहिले दोन मणके व शेपटीचे मणके सोडून, सर्व मणक्यांना बरगड्या असतात. शेपटीमधील मणके व बरगड्या यांचे एकत्रीकरण झालेले असते. सापामध्ये स्कंध मेखला, श्रोणी मेखला व उरोस्थी नसतात.

पचन तंत्र : सापांचे पचन तंत्र सरीसृप प्राण्यांसारखे असते. यामध्ये तोंड, लालाग्रंथी, ग्रसिका, जठर व अवस्कर यांचा समावेश होतो. त्यांना पित्ताशय, यकृत व प्लीहा असतात. तोंडवरचा जंभ (जबडा) व खालचा जंभ यांपासून तयार झालेले असते. खालचा जंभ कवटीला लवचिक बंधांनी जोडलेला असतो. जीभ मऊ असून दोन भागांत विभागलेली असते. ती जबड्यातून आत बाहेर हालचाल करीत असते. दोन्ही जंभांत आतील बाजूस वळलेल्या दातांची रांग असते. विषारी सापामध्ये लालाग्रंथींच्या एका जोडीचे रूपांतर विषग्रंथीमध्ये झालेले असते. पचन तंत्रामध्ये त्वचा, पिसे, हाडे (अस्थी) व शिंगे यांचेही पचन होते.

श्वसन तंत्र : बहुतेक साप फुप्फुसाच्या साहाय्याने श्वसन करतात. काही सापांमध्ये डावे फुप्फुस नसते. उजव्या फुप्फुसाचे दोन भाग असतात. ते लांबट असून वृक्कापर्यंत पसरलेले असते. नासीय छिद्रे व श्वासनलिका यांद्वारे हवा फुप्फुसात घेतली जाते. अजगरामध्ये दोन फुप्फुसे असतात.

रुधिराभिसरण तंत्र : सापाच्या हृदयामध्ये तीन कप्पे असतात. दोन अलिंदे व एक निलय असते. निलय पडद्याने अपुरे विभागलेले असते. फुप्फुसाकडून शुद्घ रक्त निलयामध्ये येते. हृदयात शुद्घ व अशुद्घ रक्ताचे मिश्रण थोड्याफार प्रमाणात होत असते. रक्तवाहिन्यांमार्फत असे रक्त शरीराच्या सर्व भागांना पुरविले जाते.


 उत्सर्जन तंत्र : या तंत्रामध्ये लांबट वृक्कांची एक जोडी, उत्सर्जन नलिका, मूत्रवाहिनी व अवस्कर यांचा समावेश होतो. स्वतंत्र मूत्राशय बऱ्याच सापांमध्ये नसते.

आ. १. पाण्यात राहणाऱ्या मोकॅसीन (नर) सापाचा सांगाडा व आतील इंद्रिये

तंत्रिका तंत्र : (मज्जासंस्था). सस्तन प्राण्यांच्या तुलनेत सापाचा मेंदू लहान असतो. यामध्ये गंधकंद, प्रमस्तिष्क गोलार्ध, अनुस्तिष्क व लंबमज्जा यांचा समावेश होतो. लंबमज्जेपासून अधर बाजूस मेरुरज्जू तयार झालेला असतो.

ज्ञानेंद्रिये : वातावरणातील उद्दीपनाचे आकलन होण्याकरिता सापांमध्ये ज्ञानेंद्रिये असतात. ज्ञानेंद्रिये तंत्रिका तंत्राशी संलग्न असतात. दृष्टी, श्रवण व गंध यांची ज्ञानेंद्रिये सापांना असतात.

दृष्टी : सापांच्या डोळ्यांवर पापण्या नसतात, त्यामुळे डोळे सतत उघडे असतात. त्यांची दृष्टी एकनेत्री असते. नेत्रभिंगाचा आकार गोल किंवा उभट असतो. स्नायूच्या दाबाने नेत्रभिंगाचे आकारमान कमी-जास्त होते त्यामुळे एखाद्या वस्तूचे चित्र त्यांना दिसते. नेत्रभिंग लहान टप्प्याच्या मर्यादेपर्यंत फिरू शकतात. त्यांच्या नजरेचा टप्पा मर्यादित असतो.

श्रवण : सापांना सस्तन प्राण्यांसारखे बाह्यकर्ण व मध्यकर्ण नसतात. नाग व फुरसे यांच्या अंतर्कर्णामध्ये एक अस्थी आढळते. सापाच्या शरीरावर कर्णछिद्रे नसतात. यामुळे सापांना कान (कर्ण) नसतात असे म्हटले जाते. साप जमिनीच्या कंपनांद्वारे हालचाल ग्रहण करतात. मोठ्या आवाजाचा सापावर फारसा परिणाम होत नाही. आवाज करणाऱ्या वस्तूने हालचाल केल्यास सापाला धोक्याची जाणीव होते.

घाणेंद्रिये : सापांना गंधज्ञान जीभ व याकॉपसन अवयवामार्फत (मुखात उघडणाऱ्या दोन धानीसारख्या म्हणजे पिशवीसारख्या अंगामार्फत) होते. त्याची जीभ लांब असून बाहेरील टोकाजवळ विभागलेली असते. जिभेच्या साहाय्याने हवेतील सूक्ष्म धूलिकण व गंधकण याकॉपसन अवयवापर्यंत पाठविले जातात. या अवयवामध्ये धूलिकण व गंधकणांचे पृथक्करण केले जाते व सापांना गंधज्ञान होते. यासाठीच सापाची जीभ तोंडाबाहेर सतत वळवळत असते. सापाला याकॉपसन अवयवाचा उपयोग भक्ष्य शोधणे, शत्रू ओळखणे, प्रजननासाठी जोडीदार निवडणे इत्यादींसाठी होतो.

जनन तंत्र : साप एकलिंगी प्राणी असून त्यांचे प्रजनन लैंगिक प्रकाराने होते. नर व मादी बाह्य रूपावरून ओळखता येत नाहीत. नरामध्ये देहगुहेत कण्याच्या दोन्ही बाजूंस पिवळ्या रंगाचे लंबगोल वृषण असतात. यांत शुकाणू तयार होतात. प्रत्येक वृषणापासून शुक्रनलिका निघते. त्यांतून शुक्राणूचे वहन होते. शुक्रनलिका मूत्रनलिकेत उघडते. मूत्रनलिका अवस्करात असलेल्या मैथुनांगामध्ये उघडते. मिलनाच्या वेळी नरमैथुनांगाच्या साहाय्याने रेत मादीच्या अवस्करात सोडतो.

मादीच्या देहगुहेत कण्याच्या दोन्ही बाजूंस लांबट आकाराचे अंडाशय असतात. यांमध्ये अंडी तयार होतात. अंडाशयाच्या बाजूस अंडनलिका असतात व त्या अवस्करात उघडतात.


मिलन : बहुतेक सापांचा वर्षांतून एकदाच त्यांच्या जातीच्या माद्यांशीच समागम होतो. प्रत्येक जातीचा विणीचा हंगाम ठरलेला असतो. फुरसे, पट्टेरी पाणसाप व कवड्या साप यांची वीण वर्षातून दोनदा होते. प्रजनन काळात मादी योनी ग्रंथीतून सुगंधी स्राव सोडते. या स्रावाच्या वासामुळे नर मादीकडे आकर्षित होतो. नर मादीला मीलनासाठी उत्तेजित करतो. नर-मादीचे मीलन मादी जमिनीवर आडवी पडलेली असताना होते. समागमासाठी मादी नराच्या ज्या बाजूला असते त्या बाजूच्या अर्धशिश्नाचा (मैथुनांगाचा) समागमासाठी वापर होतो (नराच्या मैथुनागांत दोन अर्धशिश्नांची जोडी असते). नागराजामध्ये नर प्रतिसाद देणाऱ्या मादीवर बसतो. मादी डोके उचलते, फणा काढते व शेवटी त्यांचे मीलन होते. त्यांचे मीलन सु. दोन तास चालते.

मीलन काळात मादीसाठी नरांमध्ये स्पर्धा आढळते. दोन नर साप कित्येक तास एकमेकांना विळखे घालतात व मागील भागावर उभे राहून दुसऱ्यास हतबल करण्याचा प्रयत्न करतात.

मादीच्या शरीरात अंड्याचे फलन होते. मादी फलनानंतर सुरक्षित ठिकाणी अंडी घालते. अजगर, धामण, नाग व मण्यार हे साप अंडी घालतात. घोणस, समुद्रसाप, फुरशी व हरानाग हे साप पिलांना जन्म देतात. या जातीत गर्भाची वाढ अंड्यातील पीतकावर होते. अंड्यांची संख्या सापाच्या जातीवर व त्याच्या आकारमानावर अवलंबून असते. सापाची मादी ४ पासून १०० पर्यंत अंडी घालते. नागराजाची मादी बांबूची पाने व काटक्यांचा वापर करून शंक्वाकार घरटे तयार करते आणि त्यात अंडी घालते.

अंडी उबविणे : सापाचा गर्भावधी काळ ६० ते ८० दिवसांचा असतो. भ्रूणाची वाढ होण्यासाठी अंड्याला उष्णता मिळणे आवश्यक असते. अजगराची मादी स्वतःच्या अंगातील उष्णतेने अंडी उबविते. नाग, मण्यार व नागराज अंड्यांतून पिले बाहेर पडेपर्यंत अंड्यांच्या जवळपास राहतात.

अंड्यांतील पिलांची पूर्ण वाढ झाली की, ती नासिकेच्या शेंड्यावर असलेल्या दातांनी (एग टूथ) अंड्यांचे कवच फोडून बाहेर पडतात. अंड्यांतून पिले बाहेर पडताच मादी त्यांना सोडून निघून जाते. साधारणपणे पिले आठवडाभर एकत्रित राहतात व नंतर वेगवेगळ्या ठिकाणी निघून जातात.

वाढ व जीवनकाल : पिलांची वाढ पहिल्या दोन-तीन महिन्यांत वेगाने होते. सापाची पिले दिसायला त्याच्या कुलातील मोठ्या सापासारखीच (आकारमानाने लहान) दिसतात. सुरुवातीच्या एक-दोन महिन्यांत ती कात टाकतात. त्यांना पक्षी, मुंगूस व घोरपड यांपासून सावध राहावे लागते. लपून राहणे व शत्रूपासून सुटका करून घेण्यासाठी त्यांना फसविणे यांद्वारे ती स्वतःचे रक्षण करतात.

नैसर्गिक परिस्थितीत साप किती वर्षे जगतात हे सांगणे कठिण आहे. नैसर्गिक परिस्थितीत साप २५ ते ३० वर्षे जगत असावेत असे प्राणिशास्त्रज्ञांचे अनुमान आहे. पाळीव साप ५ ते ६ वर्षे जगतात. अजगर सु. २० वर्षे जगतात.

सापाचे शत्रू : सापाबद्दल असलेल्या गैरसमजुती व भीती यांमुळे मानवाकडून साप मोठ्या प्रमाणावर मारले जातात. यामुळे मानव हा सापाचा प्रमुख शत्रू आहे, असे मानले जाते. सापांच्या कातडीचा व्यापार करणारे लोक कातडीसाठी सापांना मारतात. बहिरी ससाणा, घुबड, बगळा, करकोचा व गरुड यांसारखे पक्षी साप मारून खातात. तसेच साप हे मुंगसाचे आवडते भक्ष्य आहे. ऑस्ट्रेलिया, आफ्रिका व अमेरिका या खंडांत आणि चीन व थायलंड या देशांत सापांचा खाद्यात उपयोग केला जातो. जपानमध्ये सापाच्या चरबीपासून मद्य बनवितात.

साप स्वसंरक्षणासाठी निरनिराळ्या युक्त्या योजतात. फुरसे, अजगर व रजतवंशीसारखे साप जोरजोराने सतत फुत्कार सोडतात. काही साप फण्यासारखी आपली मान उंच करून शत्रूला भीती दाखवितात. नाग चपळाईने फणा काढून शत्रूवर आक्रमणाचा पवित्रा घेतो. बिनविषारी पाणसापदेखील फणा काढल्यासारखे डोके व मान उंचावतात आणि फुत्कार सोडतात. काही साप त्यांच्या समोर आलेला शत्रू दूर जाईपर्यंत निपचित पडून राहतात, तर काही अंगाचे वेटोळे करून जमिनीवर पडून राहतात. काही साप पकडताच दुर्गंधी सोडतात. त्यांना डिवचले, त्यांच्या अंगावर पाय पडला किंवा त्यांना इजा केली तर ते चावा घेतात. साप शक्यतो मानवापासून दूर राहण्याची काळजी घेतात.


वर्गीकरण : प्राणिशास्त्राच्या नियमांनुसार सापांचे वर्गीकरण पुढील १३ कुलांत केले आहे : (१) बोइडी, (२) पायथॉनिडी, (३) टिफ्लॉपिडी, (४) लेप्टोटिफ्लॉपिडी, (५) ॲनिलिडी, (६) युरोपेल्टिडी, (७) झिनोपेल्टिडी, (८) ॲकोकॉर्डिडी, (९) कोल्युब्रिडी, (१०) इलॅपिडी, (११) हायड्रोफिडी, (१२) व्हायपरिडी व (१३) क्रोटॅलिडी. यांपैकी पहिली नऊ कुले बिनविषारी व उरलेली चार कुले विषारी सापांची आहेत.

स्नेक्स ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक पी. जे. देवरस यांच्या मतानुसार भारतात बिनविषारी सापांच्या १६४ जाती व विषारी सापांच्या ५२ जाती अशा एकूण २१६ जाती आहेत.

विषारी व बिनविषारी साप ओळखण्याची सूची 

 

शेपटी 

 
 

|

 

|

 

|

दोन्ही बाजूंनीच पटी (विषारी)

उदरशल्क 

गोल(विषारी अथवा बिनविषारी)

 

|

 

|

|

|

लहान 

(बिनविषारी)

अपूर्ण 

(बिनविषारी)

अखंड/संपूर्ण 

(विषारी अथवा बिनविषारी)

 

डोक्यावरील शल्क 

 

|

 

|

लहान 

(विषारी)

 

खूप मोठे 

(विषारी अथवा बिनविषारी)

 

पृष्ठमध्य शल्क 

 

|

 

|

मोठे षट्‌कोनी (विषारी)

 

लहान (विषारी अथवा बिनविषारी)

 

ऊर्ध्व ओष्ठ शल्क 

 
 

|

 

|

 

|

तिसरा ऊर्ध्व ओष्ठ शल्क मोठा असून 

नासाशल्क व डोळ्याच्या शल्कास जोडलेलाआणि फण्यासह मान (विषारी) 

 

लहान व फणा नाही (बिनविषारी)

विषारी व बिन विषारी साप ओळखण्याची सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे त्या सापामध्ये विषग्रंथी व विषदंत आहेत काही होय. भारतातील महत्त्वाचे विषारी सापखालील खुणांवरून ओळखता येतात. 

(१) समुद्र साप : शेपटी दोन्ही बाजूंनीच पटी असते. (२) फुरसे (व्हायपर) : उदर शल्क मोठे, डोके त्रिकोणी आकाराचे व त्यावर लहान शल्क, डोळे व नासिका यांधील भागावर लोरियल शल्क अथवा खाच असते. (३) नाग : नासिका आणि डोळ्यांना स्पर्श करणारे तिसरे ऊर्ध्व ओष्ठ शल्क व फण्यासह मान असते. (४) मण्यार : काळसर रंग, पृष्ठमध्य शल्क मोठे व षट्‌कोनी तर पुच्छशल्क अखंड असते.

आ.२. विषदंत व विषग्रंथी दाखविणाऱ्या फुरसे सापाचा जबडा : (१)विषदंत, (२) विषदंताचा आतील बाजूस वळलेला पोकळभाग, (३) विषदंतावरील आवरण, (४) विषनलिका, (५) विषग्रंथी, (६)आतीलबाजूसवळलेलेदंत, (७)जीभ.विषसाधन : विषारी सापाच्या वरच्या जबड्यात विष ग्रंथीव विषदंत असतात, यांस ‘विषसाधन’ म्हणतात. लालाग्रंथीचे रूपांतर विषग्रंथीत झालेले असते. विषग्रंथी डोळ्यांच्या मागील बाजूस असतात. या विषग्रंथींपासून निघालेल्या विषनलिका वरच्या जबड्याच्या पुढील बाजूस असणाऱ्या विषदंतांत उघडतात. विषदंत दोन असून ते जबड्यातील इतर दातांपेक्षा मोठे, पोकळ व आतील बाजूस वळलेले असतात. नागाचे विषदंत उभे तर फुरशाचे आडवे असतात. काही कारणाने विषदंत पडले, तर नवीन विषदंत तयार होतात.

दंश करण्यापूर्वी साप डोके उंच करून शरीर थोडे मागे घेतो व क्षणार्धात भक्ष्य किंवा शत्रूचा चावा घेतो. साप चावा घेताना विषदंताच्या साहाय्याने विषग्रंथीतील विष भक्ष्य किंवा शत्रूच्या शरीरात सोडतो. विष सोडताना खालचा जबडावरच्या दिशेने ओढला जातो. चावा घेताना जबड्याच्या हालचालीसाठी कवटीतील अस्थी व स्नायूयांची मदत होते. भक्ष्याच्या किंवा शत्रूच्या शरीरात विष सोडल्यावर सापाच्या मानेचे स्नायू शिथिल होतात व तो विषदंत बाहेर खेचून घेतो.

सापाच्या विषग्रंथीतील विष एका चाव्यात संपत नाही. तो अनेक चावे घेऊ शकतो. नागाचे विष फिकट पिवळसर, पारदर्शक व काहीसे चिकट असते. फुरशाचे विष कधी पिवळसर तर कधी पांढरे असते. या विषामुळे भक्ष्य बेशुद्घ पडते. त्यामुळे सापाला भक्ष्य पकडून खाणे सोपे जाते. विष पचनास मदत करते. शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी सापाला विषाचा उपयोग होतो. विषारी सापाच्या पिलांमध्ये जन्मतः पहिल्या दिवसापासून विष असते. सुमारे ६५% सर्पदंश रात्री आणि ३५% दिवसा झाल्याचे आढळते.


सापाच्या दंशानंतरच्या खुणा : विषारी सापामध्ये दोन मोठे व आतील बाजूस वळलेले विषदंत असतात आणि जबड्यातील इतर दात लहान असतात.  ज्या वेळी विषारी साप चावा घेतो, तेव्हा त्याच्या दातांच्या खुणा उमटतात. यांमध्ये विषदंतांचे दोन मोठे खोल व्रण ठळकपणे दिसतात.  ज्या वेळी बिनविषारी साप चावतो, त्यावेळी त्याच्याबारीक दातांच्या खुणा उमटलेल्या दिसतात. काही वेळा अशा खुणा अस्पष्ट उमटतात. कारण सापाला दंश करणे व्यवस्थित जमलेले नसते. घाईगडबडीत साप दंश करून निघून जातो, त्यावेळी थोड्या खुणा किंवा बारीक ओरखडे उमटलेले दिसतात.

एका व्यक्तीला प्राणघातक ठरू शकणाऱ्या विषाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे : नाग १२ मिग्रॅ. घोणस १५ मिग्रॅ. मण्यार ६ मिग्रॅ. फुरसे ८ मिग्रॅ.

आ. ३. सापाच्या दंशानंतरच्या खुणा : (अ) विषारी सापाचे दंतव्रण, (आ) बिनविषारी सापाचे दंतव्रण.सापाच्या विषाचे दोन प्रकार आहेत. न्यूरोटॉक्सिक (तंत्रिका विषाक्त) विषाचा परिणाम तंत्रिका तंत्रावर होतो. नाग व सागरी सापातील विष या प्रकारचे असते. हीमोटॉक्सिक (रक्तविषाक्त) विषाचा परिणाम रक्ताभिसरण तंत्रावर होतो. या विषाने रक्तातील तांबड्या (रक्तरुधिर) कोशिका व लहान रक्तवाहिन्या यांचा नाश होतो. फुरशाचे विष हीमोटॉक्सिक असते. विष अम्लधर्मी असून ते वाळविल्यास त्यापासून सुईसारखे स्फटिक तयार होतात. ते पाण्यात विरघळते. त्यामध्ये सु. ७१ ॲमिनो अम्ले असतात. नागाच्या विषामध्ये न्यूरोटॉक्सिन व फुरशाच्या विषामध्ये हेमोलायसिन हे प्रथिन आढळते. विषामध्ये विविध प्रकारची एंझाइमे, फॉस्फोलायपेज-ए, कोलिनएस्टरेज, ऑफिओ ॲमिनो ऑक्सिडेज, न्यूक्लिएज, हायड्रोनायडेज, पायरोफॉस्फेटेज इ. घटक आढळतात.

विषबाधेची लक्षणे : सर्पदंशामध्ये पायावरील दंशाचे प्रमाण अधिक असून हातावर दंशाचे प्रमाण कमी आहे. मेंदूकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीवर दंश झाला व पुरेसे विष गेले तर अशी व्यक्ती २-३ मिनिटांत मरण पावते. फुरशाचे विष रक्ताभिसरण तंत्रात मिसळले, तर ती व्यक्ती चटकन मरण पावते. बिनविषारी सापाच्या चाव्यामुळे मानसिक धक्का व ताण यांमुळे व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. विषारी सापाला घाईगडबडीमुळे वा चावा घेताना अंदाज चुकल्याने पुरेसे विष टोचणे शक्य होत नाही. व्यक्तीला विषबाधा झाल्यास पुढील लक्षणे दिसतात.

नाग : (१) दंशाच्या जागी सहा ते आठ मिनिटांत तांबूस पुरळ दिसू लागते आणि त्या जागी खाज सुटते व वेदनांची जळजळ सुरू होते. (२) सुमारे २५ मिनिटांनी रोग्यास झोप आल्यासारखे वाटते गुंगी येऊ लागते त्याला हालचाल करण्याची अगर चालण्याची इच्छा राहत नाही. (३) दंशानंतर ३५–५० मिनिटांनी तोंडातून लाळ बाहेर पडते ओकाऱ्या सुरू होतात शरीर जड होते जीभ व घसा सुजतो, त्यामुळे बोलता येत नाही व अन्न खाता येत नाही. (४) सुमारे दोन तासांनी अर्धांगवायूची बाधा होते श्वसनक्रिया मंद होत जाते हृदयाचे ठोके जलद पडू लागतात. रुग्ण शुद्घीवर असला, तरी तो बोलू शकत नाही. (५) श्वसनक्रिया आकडी येऊन थांबते व त्यापाठोपाठ हृदयक्रिया बंद पडते.

मण्यार : (१) दंशाच्या जागी तांबूस पुरळ उमटते परंतु त्या जागी सूज किंवा जळजळणाऱ्या वेदना होत नाहीत. (२) आकडीचे झटके सौम्य असतात सुस्ती व गुंगी तीव्र स्वरूपाची असते. (३) रुग्णाच्या मूत्रामध्ये पांढरी खर (श्वतक) सापडते. (४) सुमारे सहा तासानंतर पोटात व सांध्यांना अतिशय वेदना होतात.

घोणस व फुरसे : (१) दंशाच्या जागी सु. आठ मिनिटांत तीव्र वेदना व जळजळ जाणवू लागते. दंशाभोवतालची जागा सुजून लाल व दुखरी होते  (२) सुमारे पंधरा मिनिटांच्या आत सूज वाढू लागते जखमेतून रक्त व दूषित स्राव वाहू लागतो. (३) तीव्र वेदना सुरू होतात अंगावर काटा उभा राहतो ओकाऱ्या येतात घाम सुटतो डोळ्यांच्या बाहुल्या विस्फारतात व त्या प्रकाशाला प्रतिसाद देत नाहीत. (४) एक-दोन तासांत रुग्णाची शुद्घ हरपते. (५)जखमेतून पुरेसे रक्त वाहून गेल्यावर जखमेच्या जागी सूज येते ती जवळच्या भागात पसरते जखमेच्या जागी पू होतो व त्वचा कुजू लागते. (६) आतड्यातून व दातांच्या हिरड्यांतून रक्त वाहू लागते.


प्रथमोपचार : सर्पदंश झालेल्या व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जाण्यापूर्वी प्रथमोपचार केल्यास तिचा जीव वाचविण्यासाठी ते उपयुक्त ठरतात. सर्पदंश झालेली व्यक्ती अतिशय घाबरलेली असते तिला धीर द्यावा. अशा व्यक्तीला हालचाल करू देऊ नये तसेच तिला पाणी, चहा, कॉफी किंवा कोणतेही पेय पिण्यास देऊ नये. त्या व्यक्तीच्या शरीराचा भाग (हात, पाय) हृदयाच्या पातळीपेक्षा खालील पातळीवर ठेवावा.

आवळपट्टी बांधणे : दंश झालेल्या जागेच्या किंचित वर कापडी पट्टी किंवा मोठा रुमाल घट्ट बांधावा. यामुळे शरीराच्या इतर भागांत विष पसरण्यास प्रतिबंध होतो. रबराचा पट्टा असल्यास अधिक चांगले असते. ही आवळपट्टी दर १० मिनिटांनी सैल करून पुन्हा बांधावी लागते.

चिरा किंवा छेद घेणे : दंश झालेल्या ठिकाणी निर्जंतुक चाकू किंवा ब्लेडने दंशव्रणावर सु. अर्धा सेंमी. लांब व १ मिमी. खोल चिरा घ्याव्यात. चीर घेताना एखादी रक्तवाहिनी कापली जाणार नाही याची काळजी घ्यावी.

जखम निर्जंतुक करणे : चिरा घेतलेला भाग पोटॅशियम परमँगॅनेटाच्या सौम्य द्रावणाने धुवावा. या द्रावणाचा उपयोग विष निरूपद्रवी करण्यास काही प्रमाणात होतो. या द्रावणामुळे जखमा निर्जंतुक होतात.

रक्त शोषणे : चिरा घेतलेल्या जागी आलेले रक्त दुसऱ्या व्यक्तीने तोंडाने किंवा रबरी शोषण पंपाने शोषून घ्यावे. तोंडाने रक्त शोषल्यास ते न गिळता ताबडतोब थुंकून टाकावे. जखमेवर मिठाच्या द्रावणात भिजविलेला कापडाचा तुकडा ठेवल्यास जखमेतील द्रव कपड्यात शोषला जातो.

सर्पदंश झाल्यावर १० मिनिटांत विषबाधेची कोणतीच लक्षणे न दिसल्यास दंश केलेला साप बिनविषारी आहे किंवा सापाने पुरेसे विष टोचलेले नाही, असे समजावे. न्यूरोटॉक्सिक विषाबाबत प्रथमोपचार फारसे प्रभावी ठरत नाहीत परंतु रुग्णाला मानसिक आधार देण्यासाठी ते उपयुक्त ठरतात. रुग्णास जवळच्या दवाखान्यात घेऊन जावे. सर्पदंश केव्हा झाला, कोणते प्रथमोपचार केले व सर्पदंशानंतर आढळलेली लक्षणे यांबाबतची माहिती डॉक्टरांना द्यावी.

सर्पदंशावरील प्रतिविष : विषारी साप चावल्यावर त्यावर उतारा वा उपाय म्हणून प्रतिविष टोचावे लागते. हे प्रतिविष भारतात ‘हाफकिन इन्स्टिट्यूट, मुंबई’ या संस्थेत तयार केले जाते. या प्रतिविषामुळे सर्पविषाचे उदासिनीकरण होते. सर्पदंश झालेल्या व्यक्तीस हे प्रतिविष १० मिली. शिरेतून लवक्ररात लवक्रर द्यावे. एका तासाने तिच्यात विषबाधेची लक्षणे आढळत असल्यास पुन्हा प्रतिविषाची दुसरी मात्रा द्यावी. फुरसे चावल्यास सर्पदंशाच्या जखमेभोवती थोडे प्रतिविष टोचावे लागते, त्यामुळे जखम चिघळत नाही. विषबाधेची लक्षणे जोपर्यंत आढळतात, तोपर्यंत दर दोन तासांनी प्रतिविषाची अंतःक्षेपणे (इंजेक्शने) द्यावी लागतात.

प्रतिविष तयार करताना तगड्या घोड्यांना नाग, मण्यार, घोणस व फुरसे यांचे सौम्य विष विद्राव म्हणून टोचतात. त्यामुळे घोड्याच्या शरीरात प्रतिजैविके (अँटिबायॉटिक) तयार होतात. ती सर्पविषाचा परिणाम नष्ट करू शकतात. घोड्याच्या शरीरात पुरेशा प्रमाणात प्रतिजैविके तयार झाल्यावर अशा घोड्याचे रक्त काढून यातून रक्तद्राव वेगळा करतात. हा द्राव सुकवितात. त्याची भुकटी (पावडर) तयार करतात. ही भुकटी सर्वसाधारण तपमानात ५-६ वर्षे उपयोगात आणता येते. १० मिली.च्या काचेच्या कुपीतून ती दवाखान्यात उपलब्ध असते. ॲलर्जी असलेल्या व्यक्तीस प्रतिविष टोचल्यास अगोदर ॲड्रेनॅलीन हे औषध टोचावे लागते.

सर्पदंश कसा टाळावा : सर्पदंश टाळण्यासाठी पुढील काळजी घ्यावी : (१) रात्री फिरताना बॅटरी घेऊन फिरावे. (२) अंधारात चालण्याचा प्रसंग आल्यास पाय किंवा काठी आपटत चालावे त्यामुळे जमिनीत कंप निर्माण होऊन साप दूर निघून जाईल. (३) साप दिसताच त्याला निष्कारण मारण्याचा प्रयत्न करू नये. अशा वेळी साप स्वतःचा बचाव करण्यासाठी चावण्याची शक्यता असते. (४) घराच्या जवळपास केरकचरा, विटा किंवा कौले रचून ठेवू नयेत. अशा ठिकाणी साप आसरा घेतात. (५) घराजवळ झाडे असतील व त्यांच्या फांद्या घरावर आलेल्या असतील,तर झाडावरून साप घरात येण्याची शक्यता असते. (६) घराशेजारी लाकूड किंवा गवत अशा वस्तूंचा साठा करू नये, केल्यास या वस्तू काढताना काळजीपूर्वक काढाव्यात. (७) झोपताना कॉट किंवा पलंग यांवर झोपावे, भिंतीच्या कडेला झोपू नये. (८) मांजर व कुत्री हे घराभोवतालच्या सापाच्या अस्तित्वाची जाणीव करून देतात. मांजर अंधारातदेखील सापाला ओळखू शकते. कुत्री वासावरून सापाचे अस्तित्व ओळखतात. (९)जंगलात फिरताना डोक्यावर टोपी घालावी व पायात बूट घालावेत.


सापाबद्दलच्या गैरसमजुती : (अंधश्रद्घा). (१) सापाच्या नर-मादीच्या जोडीपैकी एकाची हत्या केली, तर दुसरा त्याचा सूड घेतो. (२) सापाला दूध आवडते. (३) सापाला संगीत आवडते. (४) सापाच्या डोक्यावर रत्न किंवा मणी असतो. (५) सापाच्या डोक्यावर केस किंवा कोंबड्यासारखा तुरा असतो. (६) नाग गुप्तधनाचे संरक्षण करतो. (७) वेल्या साप माणसाच्या डोक्यावर आघात करतो किंवा कपाळावर दंश करतो. (८) मांडवळ जातीच्या सापाने एखाद्याचे अंग चाटले ,तर त्याला कुष्ठरोग होतो. (९) सापाने दंश केलेल्या व्यक्तीची प्रेतयात्रा व दहन संस्कार तो साप झाडावरून पाहत असतो, अशी दक्षिण भारतातील लोकांची धारणा आहे. (१०) धामण पाहिल्यावर म्हैस अथवा गाय दूध देत नाही व ती मरते. (११) अंगावर कडे असलेल्या सापाने एखाद्या व्यक्तीला दंश केला, तर त्या व्यक्तीच्या अंगावर तसेच कडे उमटते. (१२) मण्यार साप झोपलेल्या माणसाचा श्वास शोषून घेत असतो. (१३) फुरसे जमिनीवरून सु. २ मी. किंवा त्यापेक्षा जास्त उंच उडी घेऊ शकतात. (१४) नागाचा समागम धामणीशी होतो. (१५) मंत्रतंत्रांनी सर्पविष उतरविता येते. (१६) तांबडा मांडवळ साप दुतोंडी असतो. (१७) सापांना सुगंधाचे आकर्षण असते. (१८) साप व मुंगसाची भांडणे होताना, सापाने चावा घेतला, तरी मुंगसाला विषबाधा होत नाही. (१९) सापाला जखम झाल्यास त्याला मुंग्या लागून साप मरतो. (२०) साप इच्छेनुसार रूप धारण करू शकतो. (२१) दंश झालेल्या व्यक्तीस कडुलिंबाचा पाला खायला देतात, त्यामुळे विष उतरते. (२२) सापाचे विषारी दात काढल्यास त्यापासून कोणताही धोका नसतो. (२३) कुष्ठरोग (महारोग) झालेल्या व्यक्तीस नागाने दंश केल्यास कुष्ठरोग बरा होतो. (२४) नुकत्याच मारलेल्या सापावर रॉकेल ओतल्यास तो साप जिवंत होतो. (२५) पट्टेदार साप चावल्यास व्यक्तीच्या अंगावर चट्टेपट्टे उमटतात. या सर्व गैरसमजुती वा अंधश्रद्घा असून त्यांस कोणताही वैज्ञानिक आधार नाही.

सापाचे महत्त्व : (१)सरीसृपांमध्ये साप हा महत्त्वाचा प्राणी आहे. भारतात उत्पादित होणाऱ्या अन्नधान्यांपैकी सु. २७% धान्य उंदीर खातात किंवा त्याची नासाडी करतात. सापाच्या खाद्यामध्ये प्रामुख्याने उंदीर व घुशी या कृंतक गणातील प्राण्यांचा समावेश होतो. साप उंदरांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतात. धामण एका वर्षात सु. २५० उंदीर खाते. उंदराच्या एका जोडीपासून साधारणतः दरवर्षी सु. ८८८ पिले होतात यावरून उंदरांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी सापाचे महत्त्व लक्षात येते. आफ्रिकेत उसाचे मळेवाले अजगर पाळतात, त्यामुळे उसाच्या मळ्याचे रक्षण होते. (२) पूर्वी सापाच्या कातडीपासून कमरेचे पट्टे, पाकिटे, बूट व खेळणी अशा विविध वस्तू बनवीत. (३) गारुडी सापाचे विविध खेळ दाखवून पैसे मिळवितात. (४) चीन, म्यानमार (ब्रह्मदेश), हाँगकाँग, अमेरिका व भारतातील काही आदिवासी भागांत सापांचा अन्न म्हणून उपयोग केला जातो. काही आदिवासी सापाची अंडी खातात. तसेच सापाच्या पित्ताशयाचा मद्य (वाईन) तयार करण्यासाठी हाँगकाँग येथे वापर करतात. (५) सापाच्या विषाचा उपयोग आयुर्वेदात आणि होमिऑपथीमध्ये औषधे तयार करण्यासाठी करतात. सापाचे विष अपस्मार व उन्माद यांवरील उपचारांसाठी उपयुक्त आहे. (६) सापाच्या चरबीपासून तयार केलेले तेल मालीश करण्यासाठी, त्वचारोग, सांधेदुखी व स्नायुदुर्बलता यांवरील उपचारांसाठी वापरतात. (७) मलायन पाम्बो व तांबुल सापांच्या मांसाची पावडर महारोगावर औषध म्हणून काही देशांत वापरतात. (८) प्रतिविष तयार करण्यासाठी सापाचे विष वापरतात. (९) हीमोफिलिया (रक्तस्रावी) रोगावर रक्त गोठविण्यासाठी घोणसाच्या विषाचा उपयोग केला जातो. (चित्रपत्रे).

पहा : अजगर ॲनॅकाँडा आंधळा साप कुकरी साप गवती साप घोणस दुतोंड्या साप धामण-१ नाग नागपूजा नागराज नानेटी पट्टेरी मण्यार पाणसाप प्रवाल-सर्प फुरसे बिळे करणारा साप बोआ मण्यार माँबा मुंगूस सरीसृप वर्ग सागरीसर्प.

संदर्भ : 1. Daniel, J. C. The Book of Indian Reptiles, Bombay, 1983.

    2. Deoras, P. J. Snakes of India, New Delhi, 1981.

    3. Saxena, O. P. Modern Textbook of Reptilia, New Delhi, 1981.

    4. Singh, Gurdarshan Bhaskar, H. Advanced Chordate Zoology, Vol. III, New Delhi, 2002.

पाटील, चंद्रकांत प.


नाग (फणी नाग), बायनोसिलेट कोब्रा (विषारी).काळा नाग (बंगाली नाग), मोनोसिलेट कोब्रा (विषारी).

साईड वाईंडर साप (वाळवंटातून इंग्रजी 'S' आकारात सरकणारा), क्रोटॅलस सिरेस्टीज (विषारी).फुरसे, सॉ स्केल्ड व्हायपर (विषारी).

मांजऱ्या (कॅट स्नेक), बोएगा अँग्युलेटा, (फुरशासारखी रंगसंगती असलेला बिनविषारी सर्प).आयलॅश व्हायपर (कॉस्टा रिका येथे आढळणारा), ब्रोथ्रिएशिज शिगेलाय (विषारी).

पुडीफुरसे (पोहूर-हिमालयीन), पीट व्हायपर (विषारी).


सोंगट्या (ट्रिंकीट), एल्की हेलेना (बिनविषारी).मण्यार (कॉमन क्रेट), बंगारस सीरुलियस (विषारी).

दिवड (चेकर्ड किल बॅक), नॅटेरिक्स पिस्केटर (बिनविषारी). हरणटोळ (व्हीप स्नेक), ड्रायोफिस नासुत्सुस (सर्पटोळासारखा दिसणारा बिनविषारी सर्प).सर्पटोळ (बांबू पीट व्हायपर), ट्रिनेरेसरस ग्रॅमिनियस (विषारी).घोणस, व्हायपेरा रसेलाय, (विषारी).अजगर, पायथॉन मोलुरस (बिनविषारी).