धामण–१ : हा एक बिनविषारी साप असून कोल्युब्रिडी सर्पकुलातील कोल्युब्रिनी उपकुलातील आहे. याचे शास्त्रीय नाव टायास म्युकोसस आहे. सर्व भारत, अफगाणिस्तान, श्रीलंका, ब्रह्मदेश, मलेशिया, जावा, दक्षिण चीन व पूर्वेकडील इतर प्रदेशांत तो आढळतो. हा सपाट प्रदेशात राहणारा असला, तरी १,८३० मी. किंवा त्यापेक्षाही जास्त उंचीवर सापडतो.

धामण

हा दांडगा आणि भीती उत्पन्न करणारा साप आहे. याची लांबी २·२५ ते २·५० मी. किंवा त्यापेक्षाही थोडी जास्त असून घेर सु. १० सेंमी. असतो. शेपूट लांबीच्या एकचतुर्थांश असून टोकदार असते. डोके लांबट असून बारीक मानेपासून स्पष्टपणे वेगळे असते. डोळे मोठे आणि बाहुल्या वाटोळ्या असतात व त्यांच्या भोवतालचा पडदा (कनीनिका) सोनेरी असतो. नाकपुड्या मोठ्या असतात. पाठीचा रंग हिरवट किंवा हिरवट तपकिरी असतो. शरीराच्या पुढील भागावरील खवले एकाच रंगाचे असतात पण मागच्या बाजूला पुष्कळखवल्यांच्या कडा काळ्या असतात. यामुळे पाठीवर जाळे असल्यासारखे दिसते. पाठीवरील काही खवल्यांवर बारीक कणा असतो. ओठांच्या काठावरच्या व गळ्याच्या बाजूंवरच्या खवल्यांच्या कडादेखील काळ्या असतात. पोट पांढरट किंवा पिवळसर असते आणि गळ्याजवळ पिवळा रंग जास्त स्पष्ट असतो.

धामण सर्व प्रकारच्या परिस्थितींत आढळणारा नित्यातला साप आहे. घरांच्या जवळपास तो दिसतो. मनुष्यवस्तीत दिवसा तो एखाद्या सुरक्षित जागी लपून बसतो पण वस्ती नसलेल्या ठिकाणी तो निर्भयपणे दिवसा हिंडत असतो. जुन्या पडीक भिंती, झाडेझुडपे, कुजणारा पालापाचोळा, भातशेते वगैरे ठिकाणी तो असतो. तो उत्तम पोहणारा असून झाडावर चढण्यात तरबेज आहे. पाण्याच्या जवळपास राहून तो बेडूक खातो. त्याचप्रमाणे झाडावर चढून पक्षी आणि त्यांची अंडी खातो. घुशी आणि उंदीर हे त्याचे नेहमीचे खाद्य आहे.

शक्यतोवर माणसाचे सान्निध्य तो टाळतो पण त्याला कोंडीत पकडले, तर त्वेषाने हल्ला चढवायला तो कमी करीत नाही. हल्ला चढवताना शत्रूच्या तोंडावर नेम धरून तो प्रहार करतो व चावतो. पुष्कळ मोठा व भयंकर दिसणारा असला, तरी तो मुळीच विषारी नाही. हा चलाख असून याच्या सगळ्या हालचाली शीघ्र गतीने होत असतात.

या सापासंबंधी बऱ्याच समजुती प्रचलित आहेत : धामण हा ⇨नागांचा नर आहे गायीचे किंवा म्हशीचे आचळ तोंडात धरून तो सगळे दूध चोखून घेतो, नंतर आचळाला दंश करून तिला ठार करतो किंवा आपले शेपूट गायीच्या किंवा म्हशीच्या नाकात खुपसतो आणि नंतर ते जोराने बाहेर काढून तिला मारतो चाळीस वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या माणसाला चावला, तर तो आंधळा होतो इत्यादी. या सगळ्या समजुती चुकीच्या आहेत.

हा अंडी घालणारा साप असून पिल्ले पावसाळ्यात अंडी फोडून बाहेर पडतात.  धामण ज्या टायास  वंशातली आहे त्याच वंशाच्या पट्टेरी धामण (टायास फॅसिओलेटस) व वेलपाठी धामण (टायास ग्रॅसिलिस) या दोन जाती भारतात आढळतात.

कर्वे, ज. नी.