मांजर : कुत्र्याच्या खालोखाल मांजर हा लोकप्रिय प्राणी असून फार पुरातन काळापासून केवळ मनोरंजनासाठी मानव तो पाळीत आला आहे. सिंह, वाघ, चित्ता हे मांजराच्या कुलातील वन्य प्राणी आहेत व त्यांच्याप्रमाणे मांजर जात्या मांसाहारी आहे. ऑस्ट्रलियाच्या आसपासचा भाग. मॅलॅगॅसी (मादागास्कर) आणि ओशिॲनिया (पॅसिफिक महासागराच्या मध्यभागी पसरलेला विस्तृत द्वीपसमूह) या भागांशिवाय जगाच्या बहुतेक सर्व भागांत हे प्राणी आढळतात. आग्नेय आशियातील देशांमध्ये हे बहुसंख्येने आहेत [⟶ ऑसेलॉट कूगर चित्ता जॅगुआर बिबळ्या लिंक्स लेपर्ड वाघ सिंह].

प्राणिवैज्ञानिक वर्गीकरणानुसार कार्निव्होरा (मांसाहारी) गणातील फेलडी कुलातील फेलिस प्रजातीतील हा प्राणी आहे व फेलिस कॅटस ही माणसाळलेल्या मांजराची म्हणजे घरमांजराची जाती आहे. लंडनच्या प्राणिसंग्रहालयातील आर्. आय्. पोकॉक यांनी १९१६ मध्ये कंठामधील अस्थींच्या रचनेवरून या कुलातील प्राण्यांचे दोन विभाग केले आहेत. एका विभागातील प्राण्यांमध्ये जिभेच्या बुंध्याशी असलेल्या हाडांच्या साखळीतील एका हाडाची (कंठिकास्थीची) पूर्ण वाढ न होता ते दोरीसारखे बारीक असते. यामुळे जीभ व स्वरयंत्र कवटीच्या खालच्या आतील बाजूस सैलसर बसविलेले असते. या रचनेमुळे या प्राण्यांना गुरगुरता येत नाही पण गर्जना करता येते. तसेच यांच्या डोळ्यातील बाहुल्या वाटोळ्या असतात. सिंह, वाघ हे प्राणी या विभागात मोडतात व त्यांचा समावेश पँथेरा प्रजातीमध्ये करतात. दुसऱ्या विभागातील प्राण्यांमध्ये वर उल्लेखिलेले हाड पूर्णपणे वाढलेले असते. अशा प्राण्यांना गुरगुरता येते पण गर्जना करता येत नाही. यांच्या डोळ्यातील बाहुल्या उभ्या पण काही जातींमध्ये वाटोळ्या असू शकतात. मांजर या वर्गामध्ये मोडते व त्याचा समावेश फेलिस प्रजातीमध्ये करतात. चित्त्याचा समावेश स्वतंत्रपणे ॲसिनोनिक्स प्रजातीमध्ये केला जातो कारण त्याच्या कंठातील अस्थीची योग्य वाढ झालेली असली, तरी त्यांच्या पंज्याच्या नख्या अंशतः प्रतिकर्षी (आत-बाहेर काढता येणाऱ्या) असतात.

उत्पत्ती व इतिहास : सुमारे चार कोटी वर्षांपूर्वी ऑलिगोसीन काळाच्या शेवटी मांजराच्या कुलातील प्राणी अस्तित्वात होते, असे त्या काळातील सापडलेल्या जीवाश्मांवरून (शिळारूप अवशेषांवरून) दिसून येते. मांजराच्या कुलातील हल्लीचे प्राणी व हे जीवाश्म यांत कमालीचे साम्य दिसून येते. मात्र त्या वेळी ह्या प्राण्यांच्या वरच्या जबड्यातील सुळे हल्लीच्या मानाने बरेच लांब होते. येथपासून पुढे मांजराच्या कुलातील प्राण्यांच्या या पूर्वजांची दातांच्या क्रमविकासानुसार (उत्क्रांतीनुसार) दोन शाखांत विभागणी झाल्याचे दिसते. एका शाखेमध्ये वरच्या जबड्यातील सुळ्यांची लांबी वाढत गेली आणि ते तोंड मिटल्यावर तोंडाबाहेर हनुवटीच्या खालपर्यंत पोहचले. यातील स्मायलोडॉन नावाने ओळखले जाणारे प्राणी हल्लीच्या सिंहाएवढे होते व त्यांचे सुळे सु. १५ सेंमी. लांब होते. गेल्या काही हजार वर्षांत (उत्तर प्लाइस्टोसीन काळात) हे प्राणी नामशेष झाले. दुसऱ्या शाखेत सुळे लहान होत गेले. हल्लीच्या मांजराच्या कुलातील प्राण्यांचे हे खरेखुरे पूर्वज समजले जातात. यूरोप, आशिया, आफ्रिका या भागांतील रानमांजरापासून (फे. लायबिका) हल्लीच्या घरमांजराची उत्पत्ती झाली असावी, असे सुचविण्यात आले आहे. इतर स्तनी प्राण्यांच्या मानाने क्रमविकास होत असताना मांजराच्या कुलातील प्राण्यांमध्ये फारसा बदल झालेला दिसत नाही. एक कोटी वर्षांपूर्वी प्लायोसीन काळामध्ये हे प्राणी जसे दिसत असत, तसेच आजतागायत दिसत आहेत.

घरमांजर कुठे व केव्हा माणसाळले गेले हे निश्चितपणे सांगता येत नसले, तरी ईजिप्तमध्ये ते प्रथमतः सु. ३५०० वर्षांपूर्वी माणसाळले असावे, असे मानतात. जगाच्या पाठीवर अजूनही काही रानमांजरे आढळतात व त्यांच्या शरीराची ठेवण व गुणविशेष घरमांजराप्रमाणे आहेत. इ. स. पू. २५०० ते २२०० या काळातील पाचव्या व सहाव्या ईजिप्शियन राजवंशांनी मांजर हा प्राणी पवित्र असल्याची घोषणा केली असली, तरी त्या वेळी ती माणसाळलेली असतीलच असे नाही. इ.स.पू. १५०० वर्षांपूर्वीचा त्यांच्या माणसाळण्याचा विश्वासार्ह पुरावा उपलब्ध नाही. ग्रीस व चीन या देशांमध्ये इ.स.पू. पाचव्या शतकात घरमांजराचे अस्तित्व होते. भारतामधील इ.स.पू. १०० वर्षांपूर्वीच्या संस्कृत वाङ्‌मयात मांजराचा उल्लेख आहे. अरब व जपानी लोकांना इ.स. सहाव्या शतकापर्यंत मांजर माहीत नसावे. दक्षिण मध्य वेल्समधील होबेलदा या राजपुत्राने इ.स. ९३६ मध्ये मांजरांच्या संरक्षणाचा कायदा केला ही ग्रेट ब्रिटनमधील मांजराच्या विषयीची सर्वांत जुनी नोंद आहे. अमेरिकेत १७५० च्या सुमारास घरमांजरे प्रथमतः पाळण्यात आली.

धर्म व चेटूकविद्या या दोन्ही क्षेत्रांमध्ये अनेक देशांत मांजराचा संबंध आलेला आहे. मांजराचे डोके असलेली बस्त नावाची ईजिप्शियन लोकांची देवी होती व ब्यूबॅस्तिस शहरात तिचे पूजास्थान होते. हीरॉडोटस (इ.स.पू. पाचवे शतक) यांच्या लिखाणावरून त्या देशांत मांजर मारणाऱ्याला देहान्ताची शिक्षा होती, असे दिसते. मांजर मेल्यावर त्याच्या शवाची ‘ममी’ करून ठेवीत. तेल बस्ता या गावी अशा अनेक ममी उत्खननात मिळाल्या आहेत. या ममींच्या शेजारी मांजराना खाद्य म्हणून ठेवलेल्या उंदराच्या ममी पण आढळून आल्या आहेत. रोमन लोकांच्या देवळात माणसाशिवाय फक्त मांजर या प्राण्यालाच प्रवेश असे. गेल्या २०० वर्षांत मात्र या लोकांचा मांजराबद्दलचा आदर नाहीसा होऊन त्याची बरीच निर्भत्सना व छळ करण्यात आला आहे. ख्रिश्चन जगतामध्ये मांजर, विशेषतः काळे मांजर व गूढविद्या यांचा संबंध लावून मांजराचे हाल केले गेले. जर्मनीमध्ये काही प्रसंगी मांजराचे दर्शन संकटाला आमंत्रण समजतात. त्यांना लहान मुलांच्या पाळण्याशेजारी जाऊ देत नाहीत. आजारी माणसाच्या बिछान्यावर काळ्या रंगाचे मांजर बसलेले दिसले, तर त्या माणसाचा मृत्यू नजीक आला आहे, असे समजतात. महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असताना मांजर आडवे गेल्यास कार्यसिद्धी होणार नाही अशी भारतामध्ये समजूत आहे. मांजराला ठार मारणे हे महापाप समजतात आणि त्याबद्दल प्रायश्चित्त म्हणून काशी यात्रा करावी व सोन्याचे मांजर दान करावे, असे सांगतात. मांजराच्या संदर्भात इतरही अनेक समजुती रूढ आहेत.

जगातील अनेक भाषांमधून मांजरांच्या स्वभावधर्मावरून त्याला अनेक म्हणी व वाक्प्रचारांमध्ये स्थान मिळाले आहे. अठराव्या शतकाच्या मध्यापासून मांजर हा प्राणी पुन्हा लोकप्रिय होऊ लागला व कृंतक (कुरतडून खाणाऱ्या) गणातील प्राण्यांच्या संहारासाठी ती कित्येक शहरातून पाळली जाऊ लागली. अलीकडे अमेरिकेत ती अधिकच लोकप्रिय झालेली दिसतात. तेथील २४% घरांमधून एक किंवा अधिक मांजरे पाळली जातात व त्यांची एकूण संख्या सु. ३ कोटी ४० लक्ष आहे. तेथे मांजरांसाठी खास पर्यटनस्थळे, आरामगृहे, मांजरे भाड्याने देणाऱ्या संस्था अस्तित्वात आल्या आहेत.


 शरीराची ठेवण व गुणविशेष : घरमांजराचे सर्वसाधारण वजन २·५ ते ५ किग्रॅ.च्या आसपास असते. त्याचा बांधा रेखीव असून स्नायू बळकट असतात. त्यामुळे ते चांगलेच ताकदवान असते. मांजर चपळ असून त्यांची चाल ऐटदार असते. त्याच्या विविध अवयवांच्या हालचालीत कमालीची एकसूत्रता असल्यामुळे उंचावरून खाली पडल्यास किंवा टाकल्यास ते चार पायांवर सुरक्षित उभे राहते. मांजराचा मेंदू शरीराच्या मानाने मोठा असून त्याची पूर्ण वाढ झालेली आहे. त्याच्या अंगावरील लोमपुटकांना (केस ज्यांतून उगवतात त्या त्वचेमधील खोलगट भागांना) असलेल्या छोट्या छोट्या उत्थानक्षम स्नायूंमुळे ते आपले केस ताठ उभे करून शरीराचे आकारमान विस्तारित करू शकते. मांजर पायांच्या बोटांवर चालते. चालताना किंवा पळताना एकाच बाजूचा प्रथम पुढचा व नंतर मागचा पाय उचलते व मग दुसऱ्या बाजूचा पुढचा व मागचा उचलते. मांजराशिवाय उंट व जिराफ हे प्राणी अशा तऱ्हेने चालतात. मांजराच्या पृष्ठवंशामधील (पाठीच्या कण्यामधील) कशेरूक (मणके) संधिबंधाऐवजी स्नायूंनी बद्ध असतात. त्यामुळे ते शरीराची पूर्ण कमान करू शकते व शरीर लवचिकपणे हालवू शकते.

आ. १. विविध प्रकारांचे दात दर्शविणारी मांजराच्या कवटीची आकृती : (१) दाढ, (२) उपदाढा, (३) सुळे, (४) कृंतक दात.मांजराच्या दातांची व पंज्याची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याच्या वरच्या जबड्यात १६ व खालच्या जबड्यात १४ दात असतात. दंत्यसूत्र (कृं. ३/३, सु.१/१,उदा, ३/२, दा. १/१ = ३०) असे आहे [⟶ दांत]. पिलांच्या दुधाच्या दातांची संख्या २४ असते व ते वयाच्या पाचव्या महिन्यात पडून जातात. त्याच्या खालच्या जबड्याचे दोन्ही बांजूचे सांधे कवटीशी घट्ट बसवलेले असून फक्त खालीवर हालचाल होईल अशीच त्यांची रचना असते. यामुळे मांजराला दातांनी तुकडे करणे शक्य होते पण चर्वणासाठी लागणारी बाजूची हालचाल करता येत नाही. सुळे लांब व तीक्ष्ण असल्यामुळे शिकार भोसकून घट्ट पकडून ठेवण्याला फार उपयोगी पडतात. वरच्या उपदाढा व खालची दाढ यांना असणाऱ्या धारदार पात्यांच्या कात्रीत भक्ष्यांचे तुकडे करणे सोपे जाते.

आ.२ मांजराच्या प्रतिकर्षी नख्यांची हालचाल : (अ) पेऱ्यांच्या वरच्या बाजूची कंडरा खेचून घेतल्याने नखी आत गेलेली आहे (आ) पेऱ्यांच्या खआलच्या बाजूची कंडरा खेचून घेतल्यामुळे नखी बाहेर काढली गेली आहे.पुढच्या पायाच्या पंज्याला पाच बोटे असतात, तर मागील पंज्याला चार असतात. बोटांच्या शेवटच्या पेऱ्याच्या हाडावर नख्या असून त्या प्रतिकर्षी असतात. बोटांच्या शेवटच्या पेऱ्याच्या हाडावर नख्या असून त्या प्रतिकर्षी असतात. नख्या आतबाहेर काढणे हे पेऱ्यांच्या हाडावरील व खालील लवचिक कंडरांमुळे (हाडाला स्नायू घट्ट बांधणाऱ्या तंतुसमूहांमुळे) शक्य होते आणि ही व्यवस्था वैशिष्ट्यपूर्ण आहे (आ. २). पंज्याचा तळवा मऊ असल्यामुळे मांजराला आवाज न करता चालता येते.

त्याच्या नाकपुड्यांवरील व तुरळकपणे जबड्यावर असणाऱ्या स्पर्शदृढ रोमांमुळे (तंत्रिकातंतूंचा-मज्जातंतूंचा-पुरवठा असलेल्या राठ केसांमुळे) अंधारातही स्पर्शामुळे वस्तूंचे ज्ञान होऊ शकते. त्याच्या डोळ्यामधील जालपटलाच्या (प्रकाशाला संवेदनाशील असणाऱ्या स्तराच्या) संवेदनाशील कोशिकांमागे (पेशींच्या मागे) प्रकाश परावर्तित करणाऱ्या ऊतकाचा (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहाचा) थर असल्यामुळे डोळ्यात येणारा प्रकाश जालपटलावर दोनदा पडतो. यामुळे अंधुक प्रकाशात सुद्धा मांजराला चांगले दिसते. जालपटलावर असणाऱ्या ग्वानिनाच्या पातळ थरामुळे रात्री डोळ्यावर पडणाऱ्या प्रकाशात त्याचे डोळे चमकतात. मांजराचे डोळे निळे, हिरवे, पिवळे किंवा तांबूस असू शकतात. एका डोळ्याचा रंग निराळा असू शकतो. डोळ्यांचा रंग आनुवंशिक आहे. निळे डोळे असणाऱ्या मांजराच्या केसांचा रंग सहसा भडक असत नाही. चार्ल्स डार्विन यांना निळ्या डोळ्यांची पण पांढऱ्या रंगाचे केस असलेली मांजरे बहिरी असतात, असे आढळून आले होते.

मांजराचे घ्राणेंद्रिय तीक्ष्ण आहे व शिकार करते वेळी आवाजापेक्षा वासावर ते जास्त अवलंबून राहते. असे असले, तरी ते सूक्ष्म आवाज ऐकू शकते. २५,००० कंप्रतेचा (दर सेकंदाला होणाऱ्या कंपनांचा) श्राव्यातीत (मानवी कानाला न ऐकू येणारा) ध्वनी ते ऐकू शकते. कानांना ३० स्नायू असल्यामुळे ते आपले कान आवाजाच्या दिशेला कुत्र्यापेक्षा पुष्कळ चपळाईने वळवू शकते.

मांजराचा स्वभावधर्म चोरटा असून ते दबा धरून आपल्या भक्ष्यावर चपळाईने झडप घालते म्हणून पक्ष्यांची शिकार करण्यात ते पटाईत आहे. कितीही प्रेमाने वागवले, तरी मांजर कुत्र्याप्रमाणे इमानी होऊ शकत नाही कारण त्याचा तो स्वभावधर्मच नाही. मांजर बुद्धिमान, स्वातंत्र्यप्रिय प्राणी आहे. त्याला एके जागी कोंडून अगर बांधून ठेवलेले आवडत नाही. रागावले असता ते गुरगुरते व आपल्यापेक्षा आकारमानाने व शक्तीने मोठ्या असलेल्या प्राण्यावर त्वेषाने हल्ला करण्यास ते मागेपुढे पाहत नाही.


जीवनचक्र : सर्वसाधारणपणे मांजराची शारीरिक वाढ वयाच्या एक वर्षाच्या सुमारास पूर्ण होते. नर (बोका) १० महिन्यांनी व मांजरी ७ ते १२ महिन्यानंतर प्रजननक्षम होते. ऋतुकाल वर्षातून ४ ते ५ वेळा येतो व प्रत्येक वेळी तो ५ दिवस टिकतो. या काळामध्ये नराशी संयोग होतो त्या वेळी अंडाशयातून अंडमोचन (अंडे बाहेर पडण्याची क्रिया) होते. अंड्याचे निषेचन (फलन) निरनिराळ्या वेळी होऊ शकते, यामुळे ऋतुकालामध्ये जर मादीचा एकापेक्षा अधिक नरांशी संयोग झाला, तर एका विणीत निरनिराळ्या नरांची प्रजा असणे शक्य असते. गर्भावधी सरासरीने ६३ ते ६५ दिवसांचा असतो. सामान्यपणे एका विणीत ४ ते ५ पिले जन्माला येतात. सयामी अभिजातीच्या (अस्सल जातीच्या) मांजरीला ८ ते ९ पिले होतात, तर ॲबिसिनियन अभिजातीच्या मांजरीला एक-दोन पिलेच होतात. मांजरी विण्यापूर्वी ६ तास खाणेपिणे सोडते. विण्यापूर्वी एक आठवडा तिला ३० सेंमी. X ४० सेंमी. X ५० सेंमी. आकारमानाच्या पेटीमध्ये तळाला मऊ कपडा घालून तिथे बसण्याची सवय करतात. पहिले पिलू जन्मल्याबरोबर मांजरी उल्ब (भ्रूणाभोवतील पातळ कोशिकामय बंदिस्त पिशवी) फोडून पिलाला मोकळे करते व वार खाऊन टाकते. यानंतर सु. १५ मिनिटांनी दुसरे पिलू जन्माला येते. त्यानंतर दोन पिलांच्या जन्मामधील अंतर वाढत जाऊन शेवटचे पिलू त्या आधीच्या नंतर सु. ३५ मिनिटांनी जन्मते. जन्मतः पिलांचे डोळे मिटलेले असतात व ती सर्वस्वी पराधीन असतात. सात ते दहा दिवसांनी त्यांचे डोळे उघडतात. पिले ४ ते ६ आठवडे मांजरीच्या अंगावर दूध पितात व या काळात तिचे अनुकरण करून बऱ्याच गोष्टी शिकतात. दोन महिन्यांनी ती स्वतंत्रपणे वावरू लागतात.

आहार : मांजर प्रायः मांसाहारी आहे. वन्य अवस्थेत लहान प्राणी मारून त्यावर ते उपजीविका करीत असे. पाळलेल्या मांजराचाही उंदीर, लहान पक्षी व इतर लहान प्राणी मारून खाण्याकडे कल असतो. पिलांना चार आठवडेपर्यंत मांजरीच्या दुधाव्यतिरिक्त इतर खाद्य देण्याची जरूरी नसते. त्यानंतर मात्र त्यांना दोन महिन्यांची होईपर्यंत दिवसातून ३ वेळा, चार महिन्यांची होईपर्यंत २ वेळा व त्यानंतर १ वेळा खाद्य देतात. चार महिन्यांपर्यंत ५० ते ७५ ग्रॅ. व प्रौढाला २५० ग्रॅ. खाद्य लागते.

अंड्यातील पिवळा बलक, गाईगुरांचे किंवा मेंढ्यांचे कच्चे मांस, विशेषतः हृदय, मूत्रपिंड यांसारखी कच्ची इंद्रिये, मासे (शिजवलेले), पनीर, चीज, कोंबडीचे मांस हे खाद्य पदार्थ मांजरांना देतात. घोड्याचे मांस, भाजीपाला, शिजवलेले अन्न, यकृत व कच्चे मासे मांजरांना सहसा देत नाहीत. मांजराला ब जीवनसत्त्वाची विशेषत्वाने जरूरी असते. मुख्यत्वे सोयाबीन, मका व गहू यांपासून बनविलेले मांजरांचे तयार खाद्य उत्पादनाचे कारखाने अमेरिकेत आहेत व त्यांमधून वर्षाला १० लाख टन खाद्य तयार होते.

संगोपन : मांजर हा जात्या स्वच्छ प्राणी आहे. जिभेने चाटून ते आपले अंग नेहमी स्वच्छ करीत असतो व पिले लहान असताना त्यांचे अंग आई चाटून स्वच्छ करते. आंघोळ घालणे मांजराला आवडत नाही व जरूरही नसते. वर्षातून एक दोन वेळा आंघोळ घालतात. मात्र आंघोळीनंतर अंग कोरडे करणे आवश्यक असते. थंडीवाऱ्याचा त्रास त्याला सहन होत नाही म्हणून त्याची राहण्याची जागा उबदार ठेवतात. लांब केस असलेल्या मांजरांचे केस विंचरावे लागतात. नाहीतर सुटे झालेले केस अंग चाटण्याच्या वेळी पोटात जाऊन त्यांचे गोळे बनतात व त्यामुळे त्याला पोटाचे विकार होण्याचा संभव असतो. बोक्याच्या अंगाला मूत्रातील यूरियाचा उग्र वास येतो. खच्ची केल्यास हा वास कमी होतो. तीन ते चार महिने वयाच्या मांजरांच्या पिलांना खच्ची करणे योग्य असते. ते सहा महिन्यांपेक्षा अधिक वयाचे असल्यास शस्त्रक्रियेच्या वेळी शुद्धिहारकांचा वापर करणे ब्रिटनमध्ये कायद्याने बंधनकारक आहे. भटकी मांजरे ८ ते ९ वर्षे जगतात, तर पाळलेल्या मांजरांचे आयुष्य १४–१५ वर्षे असते.

अभिजाती : ईजिप्शियन लोकांनी प्रथमतः मांजर पाळले व त्याचे पूर्वज आफ्रिकेतील रानमांजर फे. लायबिका हे असावे, असे मानले जाते. हे रानमांजर कॉर्सिका, सार्डिनिया, अरेबिया व भारत या देशांमध्ये आढळत असे. आजच्या ॲबिसिनियन व इतर पट्टे व ठिपके असलेल्या मांजरांचे पूर्वज ईजिप्शियनांनी पाळलेल्या मांजरांच्या जाती असाव्यात, असा विचारप्रवाह आहे. पर्शियन मांजराच्या (लांब केस असलेल्या) अभिजातीची उत्पत्ती मध्य आशियातील मानुल किंवा पल्लास व ईजिप्शियन मांजर यांच्या संयोगाने झाली असावी. यानंतर आनुवंशिकी उत्परिवर्तनाने (आनुवंशिक गुणधर्मांत होणाऱ्या एकाएकी बदलाने) व निवड पद्धतीने पैदास होऊन सयामी, हिमालयन, मँक्स व रेक्स या अभिजाती निर्माण केल्या गेल्या. काही प्रमुख जातींची माहिती खाली दिलेली आहे.

लांब केसाची : पर्शियन मांजर म्हणून प्रसिद्ध असलेल्या या अभिजातीच्या मांजराच्या सर्वांगावर लांब मुलायम चमकदार केस असून शरीराचा बांधा लहान असतो. जाडजूड गोलसर धष्टपुष्ट डोके व वाटोळे टपोरे डोळे ही या अभिजातीची वैशिष्ट्ये आहेत. अलीकडे या अभिजातीच्या मांजरांच्या रंगांमध्ये विविधता आढळत असली, तरी कित्येक शतके ती एकरंगी म्हणून प्रसिद्ध होती. काळी, निळी, तांबडी, चंदेरी, पिवळसर तसेच एका रंगावर दुसऱ्या रंगाचे पट्टे असलेल्या अशा १३ विविध रंगांच्या प्रकारांची पर्शियन मांजरे आज अस्तित्वात आहेत. या प्रकारांना मांजरे पाळणाऱ्यांच्या संघटनांनी मान्यता दिलेली आहे. इतकेच नव्हे, तर अंगाच्या कुठल्या भागावर कोणता रंग किती प्रमाणात असावा याविषयी आणि इतर शरीरसौष्ठवासंबंधीची मानके (प्रमाणे) ठरविण्यात आली आहेत.

आखूड केसाची : सयामी : ही अभिजाती मूळची चीनमधील असावी. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये थायलंडमध्ये (सयाममध्ये) असलेल्या अभिजातीच्या मांजराकडे यूरोपीयन लोकांचे प्रथम लक्ष गेले. अंगाबरोबर बसणारे आखूड, तुकतुकीत केस, निळे डोळे आणि चेहरा, कान, पाय व शेपटी यांचा एकच रंग ही या अभिजातीच्या मांजरीची वैशिष्ट्ये आहेत. चेहरा, कान, पाय व शेपटी यांना एकत्रित ‘पॉईंट’ असे संबोधितात. या अभिजातीच्या मांजराचे वर्णन करताना पॉईंट कोणत्या रंगाचे आहेत हे स्पष्ट करतात. उदा., निळे पॉईंट, लाल पॉईंट इत्यादी. पॉईंट व सर्वांगाचा रंग याविषयी मानके ठरविण्यात आली आहेत.

ॲबिसिनियन : ही अभिजाती मूळची नाईल नदीच्या खोऱ्यातली आहे. सर्वप्रथम माणसाळलेल्या मांजराचे हे वंशज असून ती वाळवंटामध्ये सहजासहजी ओळखू न येणाऱ्या पिंगट रंगाच्या विविध छटा असलेल्या रंगाची असतात. सयामीपेक्षा ही आकारमानाने मोठी असतात.

हिमालयन :या अभिजातीच्या मांजरांच्या शरीराची ठेवण पर्शियन मांजराप्रमाणे असून रंग मात्र सयामी मांजराप्रमाणे असतात. हिमालय पर्वताचा मांजराच्या अभिजातीच्या नावाशी काहीही संबंध नाही पण हिमालय नावाने ओळखल्या जाणाऱ्या सशांच्या साम्यामुळे हे नाव पडले.

मँक्स : क्वचित आढळणारी ही मांजरांची अभिजाती मूळची अतिपूर्वेकडील असावी, असा समज आहे. या अभिजातीच्या मांजरांचे केस दाट असून त्यांचे मागील पाय पुढील पायांपेक्षा लांब असतात. चालताना हे मांजर सशासारखे दिसते. त्यामुळे मांजर व ससा यांच्या संकरामुळे ही अभिजाती उत्पन्न झाली आहे, असा गैरसमज प्रसृत आहे. शेपटीच्या जागी आत हाड नसलेला केसांचा झुबका असतो. आनुवंशिक उत्परिवर्तनाने शेपटी नाहीशी झाली आहे, असे मानतात परंतु जपानमध्ये शेपटी नसलेला एक मांजरांचा प्रकार आढळात आहे. त्यामुळे मँक्स अभिजातीच्या मांजरांची तेथून आयात झाली असावी काय, अशी शंका व्यक्त करण्यात येते. मांजर खुंटवजा शेपटी असलेले जन्मते. अशा मांजराचा शुद्ध बीजाच्या म्हणजे शेपटी नसलेल्या मांजराशी संयोग करून या अभिजातीची प्रजा वाढत जाते. शेपटी नसलेल्या नर-मादीचा संयोग केल्यास पुढील पिढ्या कमजोर होत जातात व चवथ्या पिढीमध्ये सर्व पिले मेलेली जन्माला येतात. याचे कारण शेपटी नसणे हा गुणधर्म प्राणघातक जीनशी (गुणसूत्रामधील म्हणजे आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढील पिढीत नेणाऱ्या सूक्ष्म सुतासारख्या घटकीमधील एककाशी) संलग्न आहे.

रेक्स : अगदी अलीकडे अस्तित्वात आलेली ही अभिजाती आहे. कृंतक जातीच्या प्राण्याप्रमाणे ह्या अभिजातीच्या मांजरांचे केस कुरळे असून त्यावर हात फिरविल्यास हाताला तरंग लागतात व त्यावरून रेक्स हे नाव पडले आहे.

अमेरिकेमध्ये ईजिप्शियन माऊ, सोमाली व कोरट या नव्याने मान्यता पावलेल्या अभिजातीही आहेत.

यांशिवाय ब्रह्मी, रशियन ब्ल्यू, ब्रिटिश ब्ल्यू व वरील वर्णने लागू पडणाऱ्या अंगावर काळे हिरवे चट्टेपट्टे अगर ठिपके असणाऱ्या अनेक अभिजाती जगात आहेत.


मांजर पाळणाऱ्या लोकांच्या संघटना : ग्रेट ब्रिटन, कॅनडा व विशेषतः अमेरिका या देशांमध्ये मांजर पाळणाऱ्या लोकांच्या संघटना आहेत. या संघटना मध्यवर्ती महामंडळाशी संलग्न असतात. या संघटना मांजरांच्या निरनिराळ्या अभिजातींची वैशिष्ट्ये, रंग, आकार इ. बाबतींत मानके ठरवितात. तसेच निरनिराळ्या अभिजातींच्या मांजरांची प्रदर्शने भरवितात. अमेरिकेत मांजर पाळणाऱ्यांच्या अनेक संघटना असून सात महामंडळे आहेत आणि यांच्यामार्फत दरवर्षी दोनशेच्यावर प्रदर्शने भरविण्यात येतात.

रोग : मांजरांच्या आजारांचा स्वतंत्रपणे अभ्यास अगदी अलीकडेच केला जाऊ लागला आहे. त्यांच्या आजारांची लक्षणे तितकीशी स्पष्ट असत नाहीत. त्यामुळे पुष्कळदा आजार दगावण्याइतका बळावल्यावरच लक्षात येतात. अंगावरील केस निस्तेज होणे, भूक न लागणे, सुस्तपणा वाढणे, नाका डोळ्यावाटे पाणी वाहणे, शिंका, हगवण ही सर्वसाधारण लक्षणे नैमित्तिक व संसर्गिक रोगांमध्ये दिसून येतात.

पॅनल्यूकोपीनिया : व्हायरसांमुळे होणारा हा संसर्गजन्य रोग असून आजारी झालेल्या मांजरांपैकी ९०% मृत्यूमुखी पडतात. मांजराच्या डिस्टेंपर या रोगाचाच हा एक प्रकार आहे, असे समजले जात असे परंतु आता या रोगाचे स्वतंत्र अस्तित्व मान्य झाले आहे. पाच ते सहा दिवसांच्या रोगपरिपाक काळानंतर (व्हायरस शरीरात गेल्यापासून रोगलक्षणे दिसू लागेपर्यंतच्या काळानंतर) ४०° ते ४०°·५ से. पर्यंत चढणारा ताप, भूक मंद होणे, अशक्तता व ओकाऱ्या ही लक्षणे दिसतात. ताप १२ ते १८ तासांनी उतरतो व ताप नेहमीपेक्षा कमी होऊन बहुधा २४ तासांमध्ये मांजर दगावते. त्यातूनही जगलेच, तर हगवण सुरू होऊन शरीरातील पाणी कमी होऊन निर्जलीभवन होते. या रोगामध्ये वजन झपाट्याने कमी होते व रक्तातील पांढऱ्या कोशिकांची संख्या घटते. रोगावर लक्षणात्मक उपचार करतात. त्यात शिरेमध्ये ग्लुकोज सलाइनाची अंतःक्षेपणे (इंजेक्शने) व शक्ती वाढविण्यासाठी खाण्यापिण्याची काळजी घेणे हे उपाय योजतात. रोगप्रतिबंधक लस उपलब्ध आहे व ती ७ ते ८ आठवड्यांवरील वयाच्या पिलांना देता येते.

डिस्टेंपर : या रोगाला मांजराचा इन्फ्ल्यूएंझा असेही नाव आहे. व्हायरसामुळे होणारा हा संसर्गजन्य रोग असून नाक वाहणे, शिंका येणे, डोळ्यांतून पाणी येणे, खोकला व ताप अशी या रोगाची लक्षणे आहेत. क्वचित पचन तंत्रामध्ये (पचन संस्थेमध्ये) दोष उत्पन्न होऊन ओकाऱ्या व हगवण ही लक्षणे आढळतात आणि १२ ते २४ तासांत मांजर मरण पावते. या रोगामध्ये गालाच्या आतील भागावर, टाळ्यावर, हिरड्यांवर व जिभेच्या कडांवर फोड येऊन ते फुटले म्हणजे चट्टे पडतात व तोंडाला घाण वास येतो. फुप्फुसशोथ (फुप्फुसांची दाहयुक्त सूज) झाल्यास प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधे टोचतात व इतर लक्षणात्मक उपचार करतात.

अलर्क रोग : व्हायरसामुळे होणारा व ज्या रोगामध्ये कुत्री पिसाळतात तो हा रोग असून मांजरांना सहसा होत नाही. पिसाळलेले मांजर माणसाला चावले, तर त्याला रोग होतो. रोगलक्षणे दिसू लागल्यावर कुठलीही उपाययोजना उपयोगी पडत नाही व मृत्यू अटळ असतो. पाळलेल्या मांजरांना दरवर्षी प्रतिबंधक लस टोचून घेतल्यास रोगाची भीती राहत नाही.

संक्रामक रक्तक्षय : प्रजीव (प्रोटोझोआ) संघातील हीमोबार्टोनेला फेलिस या परजीवीमुळे (दुसऱ्या जीवावर उपजीविका करणाऱ्या जीवामुळे) ब्रिटन, अमेरिका व दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये मांजरांना होणारा हा एक संसर्गजन्य रोग आहे. वयस्क मांजरांच्या रक्तामध्ये हे परजीवी अनेकदा आढळून येतात व इतर कारणामुळे मांजर अशक्त झाल्यास त्यांचा जोर होऊन मांजर आजारी पडते. टेट्रासायक्लीन हे औषध या रोगावर उपयुक्त आहे.

गजकर्ण :ट्रायकोफायटॉन, मायक्रोस्फोरम, ॲकोरिऑन या कवकांमुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतींमुळे) मांजरांना गजकर्ण होतो. पुढच्या पंजावर, डोके व मान या ठिकाणी गजकर्ण सुरू होतो व सर्वांगांवर पसरतो. खाज सहसा असत नाही. गजकर्ण झालेल्या ठिकाणी त्वचा जाड होते व कडा उंचावलेल्या दिसतात. दूषित भाग स्वच्छ करून क्रायसॅरोबिन मलम (१ : ५०), सॅलिसिलिक मलम (१ : २०), आयोडीन मलम (१ : ५०) लावल्यास ही औषधे गुणकारी आहेत. मांजराचा गजकर्ण मनुष्याला होऊ शकतो, ही बाब सार्वजनिक आरोग्यदृष्ट्या महत्त्वाची आहे.

परजीवीजन्य विकार :गोल व फीत कृमींमुळे होणारे विकार मांजरांमध्ये विशेषत्वाने होतात व त्यांवर परिणामकारक उपाययोजना उपलब्ध आहे. नॉटीड्रीस कॅटाय व ऑक्टोडेक्टस सायनॉटिस या माइटांमुळे मांजरांना खरूज होते. खरूज झालेल्या भागावर (उदा., कानाच्या बुंध्यावर) खाज सुटत असल्यामुळे त्यावर पाय मारून नख्यांमुळे जखमा होतात. बेंझीन हेक्झॅक्लोराइड (बीएचसी) १२% व गंधक ५०% यांची पूड अंगावर चोळण्याने किंवा मॅलॅथिऑनाच्या ०·५% निलंबनामध्ये (द्रवात लोंबकळत्या रूपात विखुरलेल्या मिश्रणामध्ये) १ ते २ सेकंद बुचकळण्याने खरूज बरी होते.

पिसवा सतत मांजराच्या अंगावर राहत नसल्यामुळे त्यांचा बीमोड करणे सुलभ असत नाही. पिसवांवर अनेक औषधे (बीएचसी, मॅलॅथिऑन इ.) उपलब्ध आहेत. डीडीटी हे औषध मांजरांना मानवत नाही. चाटण्यामुळे थोडे औषध पोटात गेले, तरी विषबाधा होऊन मांजर दगावते इतकेच नव्हे, तर डीडीटी खाऊन मेलेले उंदीर मांजराच्या खाण्यात आले, तरी विषबाधा होऊन मांजरे दगावल्याची अनेक उदाहरणे आहेत.

इंग्रजीमध्ये ‘आयव्ही’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कोणत्याही जातीच्या वनस्पती मांजरांच्या खाण्यात आल्यास त्यांना विषबाधा होते. 

संदर्भ :1. Bryant, D. Pet cats : Their Care and Handling, New York, 1963.

          2. Carr, W. H. A. The Basic Book of The Cat, New York, 1963

          3. Currah, A. The Cat Compendium, New york 1969.

          4. Denis, A. The Cats of the World, Boston, 1964.

          5. Miller, W. C. West, G. P. Black’s Veterinary Dictionary, London, 1962.

          6. Whitney, L. F. Pedigree cats, Their Varieties, Breeding and Exhibition, New York, 1958.

          7. Whitney, L. F. The Complete Book of Cat care, New York, 1953.


खळदकर, त्रिं. रं.दीक्षित, श्री. ग.

पर्शियनहिमालयनमॅक्सबिर्‌मनजपानी बॉबटेलसयामीॲबिसिनियनमेन कून