आ. १. कार्केशियन : (१) जीवक, (२) देठासारखा जीवंत भाग (हा निवहाचे आकुंचन करण्यास मदत करतो).

निवह प्राणि : ‌‌‌प्राणी हे प्रामुख्याने स्वतंत्रपणे जीवन जगतात. अन्नभक्षण, हालचाल इ. ​क्रिया ते वैय​क्तिकपणे करतात. ​निवह प्रा​णिवर्गात अनेक प्राणी एका ​जिवंत पदार्थाने अगर भागाने एकमेकांना ​चिकटलेले राहून जीवन जगतात. तसेच अलैं​गिक प्रजननामुळे ​किंवा मुकुलनामुळे (शरीरावर अंकुरासारखे बारीक उंचवटे येऊन त्यांपासून ‌‌‌नवीन प्राणी तयार होण्यामुळे) या समुहातील प्राण्यांच्या संख्येत सतत वाढ होत जाऊन या प्राण्यांचा एक मोठा समूह ​निर्माण होतो. प्रा​णिसृष्टीत प्रोटोझोआ, पोरिफेरा, सीलेंटेरेटा, पॉलिझोआ व ट्यूनिकेटा या समुद्रात आढळणाऱ्या अनेक प्रा​णि वर्गांत ​निवह प्राण्यांची उदाहरणे आढळतात.

आ. २. क्लॅव्ह्युलॅ​रिया : (१) ​तिरश्चर, (२) पुर्वंगक ​किंवा व्य​क्तिगत प्राणी, (३) दोन पुर्वंगक जोडणारा आडवा भाग.

प्रोटोझोआ संघामध्ये बहुसंख्य प्राणी एककोशिकीय (शरीर फक्त एकाच पेशीचे असलेले) असून स्वतंत्रपणे जीवन जगतात. याच संघात कार्केशियम (आ. १) या नावाचा एक ​निवह प्राणी आढळतो. झाडाच्या फांदीवर ज्याप्रमाणे अनेक पाने ​चिकटलेली असतात त्याचप्रमाणे देठासारख्या एका ​जिवंत भागाने अनेक कार्के​शियम ‌‌‌प्राणी एकमेकांना ​चिकटून राहतात. याच प्राटोझोआ संघातील काही ​निवह प्राणी ​निर्माण होण्याची पद्धत मोठी ​विचित्र आहे. एका मूळ जीवकाचे (वसाहतीतील व्यक्तिगत प्राण्याचे) अपूर्ण ​विभाजन होते. यामुळे ​निर्माण झालेले दोन जीवन एकमेकांपासून सुटे न होता चिकटून राहतात. व्हॉ​र्टिसेलासारखे प्राणी फसवे ‌‌‌समूह करतात. हे अनेक प्राणी एकमेकांना ​निर्जीव दांड्यासारख्या भागाने ​चिकटलेले ‌‌‌आढळतात. म्हणून व्हॉ​र्टिसेला हा खरा ​निवह प्राणी म्हणता येत नाही.

आ. ३. अ​ल्सिओ​नियमाचा अशा​खित फुगीर ​निवह : (१) जीवक, (२) ​विस्ता​रित संस्पर्शक, (३) ​मिटलेले संस्पर्शक.

पोरिफेरा या प्रा​णिसंघात मोडणारे स्पंज जातीचे प्राणी परस्परांना जिवंत भागांनी जोडलेले असतात म्हणून स्पंज हे ​निवह प्राणी म्हणून ओळखले जातात.

सीलेंटेरेटा या प्रा​णिसंघात अनेक ​निवह प्राणी आढळतात. क्लॅव्ह्युलॅ​रिया (आ. २) हा प्राणी आपल्या शरीरापासून गवताच्या काडीसारखा एक ​तिरश्चर (खोडासारखी वाढ) तयार करतो. हा भाग पृष्ठभागावर पसरतो व त्यावर ठरावीक अंतरावर पुर्वंगके (वसाहती करून राहणाऱ्या प्राण्यांपैकी व्य​क्तिगत प्राणी पॉ​लिप) ‌‌‌तयार होतात. हा पुर्वंगक म्हणजेच एक संपूर्ण प्राणी होय. पुर्वंगके ​तिरश्चरापासून वेगळी केली, तरी ​जिवंत राहू शकतात. अ​ल्सिओ​नियम (आ. ३) या नावाचे प्राणी एकमेकांना ​चिकटलेले असतात व त्यांचे बाह्यावरण एकच असते. ओबेलिया या ​निवह प्राण्यात बहुरूपता आढळते. एकाच जातीच्या प्राण्याची तो करीत असलेल्या ‌‌‌​निर​निराळ्या कार्यांनुसार रूपे बदलतात. त्यांच्या शरीराच्या अवयवात बरेच बदल घडून येतात. अशा प्रकाराला बहुरूपता अशी संज्ञा आहे. ओबे​लियाच्या समूहात काही प्राणी फक्त प्रजोत्पादन करतात. या प्राण्यांना संस्पर्शक (स्पशें​द्रिय), मुख इ. अन्नग्रहण करणारे अवयव नसतात. जीवनाला आवश्यक असणारा ‌‌‌अन्नरस या प्राण्यांना त्याच समूहातील इतर प्राण्यांशी जोडलेल्या ​जिवंत भागावाटे ​मिळतो.


मिलिपोरा या प्राण्यातही बहुरूपता आढळते. गवताच्या काडीसारख्या भागावर जठर जीवक (​निवहाचे पोषण करणारा, मुख व संस्पर्शक असलेला व्य​क्तिगत प्राणी) व ‌‌‌मंडलरक्षी जीवक (​निवहाचे रक्षण करणारा व्यक्तिगत प्राणी) ​चिकटलेले असतात. या वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांचा त्यांच्या आधारभूत भागाच्या साहाय्याने सूक्ष्म नलिकांवाटे परस्परांशी संबंध असतो.

आ. ४. पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर : (१) वातप्लव, (२) प्रजोत्पादन जीवक, (३) जठर जीवक, (४) मंडलरक्षी जीवक .

पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर (आ. ४) या नावाच्या प्राण्यात बहुरूपता आढळते. या प्राण्याला पाण्यात तरंगणारा व हवेने युक्त असा फुगीर वातप्लव (वायुकोश ​किंवा हवेने भरलेली ​पिशवी) असतो. या​शिवाय संरक्षक आ​णि आक्रमक असे मंडलरक्षी जीवक, पोषण जठर जीवक आ​णि प्रजोत्पादक जीवक (​निवहातील प्रजोत्पादन ‌‌‌करणाऱ्या व्यक्ती) असे निरनिराळ्या आकारांचे सूक्ष्म प्राणी असून ते एकमेकांना एका ​जिवंत भागामुळे जोडलेले असतात. या सर्वांचा मिळून एक ​निवह प्राणी तयार होतो व त्याला पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर असे म्हणतात.

आ. ५. क्रिसिया : (१) जीवक, (२) कायटिनयुक्त सांधा, (३) पेअरच्या आकाराचे स्त्री−युग्मक, (४) युग्मकाचे नरसाळ्यासारखे तोंड.

पॉलिझोआ या प्रा​णिसंघातील ⇨एक्टोप्रॉक्टावर्गातील प्राण्यांपैकी ​क्रिसिया (आ. ५) या नावाचा एक प्राणी आहे. हा एक ​निवह प्राणी असून त्याच्या लांब व अरुंद अशा भागात फक्त स्त्री-युग्मकाची (अचर स्त्रीजनन का​शिकेची) ​निर्मिती होत असते. या प्राण्याच्या शरीरावरील इतर सर्व अवयव नष्ट झालेले असतात ‌‌‌परंतु या प्रजोत्पादक भागाला आवश्यक असणारा अन्नरस शरीराच्या इतर भागांपासून ​मिळतो. ब्युग्युला (आ. ६) हा एक ​निवह प्राणी आहे. या प्राणीसमूहात ए​व्हिक्युलॅ​रियम या नावाचा पक्ष्याच्या डोक्यासारखा आकार असलेला भाग असलेले प्राणी असतात. त्यांचे प्रमुख कार्य म्हणजे या प्राणिसमूहाचे शत्रूपासून संरक्षण करणे हे असते. या ​विशिष्ट कार्यामुळे त्यांचे शरीर इतर सामान्य संस्पर्शक असणाऱ्या प्राण्यांपेक्षा वेगळे ​दिसते.

आ. ६. ब्युग्युला : (अ) प्रत्यक्ष ​निवहाचा आकार (आ) ​निवहाचा मोठा करून दाखविलेला भाग : (१) जीवक, (२) ​विस्ता​रित संस्पर्शक, (३) ए​व्हिक्युलॅ​रियम (उघड्या ​स्थितीत), (४) ए​व्हिक्युलॅ​रियम (बंद ​स्थितीत).

ट्युनिकेटा या उपसंघात अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) प्राण्यांपेक्षा उच्च दर्जाच्या प्राण्यांचा समावेश होतो. ​डिप्लोसोमा व ऑसिडियन या वर्गांतील बॉट्रिलस आणि पेरोफोरा हे ​निवह प्राणी आहेत. पेरोफेरा या प्राण्याला एक समाईक ​तिरश्चरासारखा भाग असून त्याला अनेक फांद्या फुटतात व प्रत्येक ‌‌‌फांदीच्या टोकावर एक प्राणी असतो. बॉट्रिलस या प्राण्याच्या डाव्या व उजव्या बाजूंना प्राणी तयार होऊन या प्राण्यांच्या दोन्ही बाजूंना पुन्हा दोन नवे प्राणी उत्पन्न होतात. ही ​क्रिया सतत चालू राहिल्याने काही ​दिवसांनी एका समान आवरणाखाली असंख्य प्राणी तयार झाल्याचे आढळते.

निवह प्राणी हे पाण्यात समूहाने राहत असल्याने त्यांचा फायदा होतो. ते अलैं​गिक प्रजनन करतात व परस्परांना जोडलेल्या अवस्थेत राहतात. हे प्राणी दुर्बल असले, तरी प्र​तिकूल प​रिस्थितीशी इतर ब​लिष्ठ प्राण्यांपेक्षा संघटितपणे झगडू शकतात. ‌‌‌काही ​निवह प्राणी आपल्या शरीरातून ​चिकट स्राव टाकत असतात. हा स्राव काही काळाने घट्ट बनला की, या प्राण्यांच्या शरीरावर एक संरक्षक कवच ​निर्माण होते (उदा., प्रवाळ प्राण्याचे ​किंवा ट्युनिकेट प्राण्यांचे संरक्षक बाह्यावरण) ‌‌‌पंरतु फोरो​निस जातीचे प्राणी फसवे समूह करतात. त्यांच्या शरीराचे भाग एकमेकांना जोडलेले नसतात. प्रत्येक प्राणी स्वतंत्र असतो. याउलट ​निवह प्राणी परस्परांना एका ​जिवंत भागाने जोडलेले असल्याने अन्नरस परस्परांना पुरवू शकतात.

निवह प्राण्यांच्या उत्पत्तीसंबंधी संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की, प्रोटोझोआ प्राणिसंघातील काही एकपेशीय प्राणी स्वतंत्रपणे जीवन न जगता परस्परांना ​चिकटून राहू लागले. क्रमविकासाच्या (उत्क्रांतीच्या) काळात या साध्या एकको​शिकिय प्राण्यांच्या समूहापासून इतर उच्च ‌‌‌​प्रकारचे प्राणिसमूह तयार होऊन ते ​निवह प्राणी या नावाने ओळखण्यात येऊ लागले. एकूण प्रा​णिसृष्टीत ​निवह प्राण्याचे स्थान बरेच खालचे असले, तरी आपणास असे म्हणता येईल की, मधमाश्या, मुंग्या इ. कीटक ​किंवा मनुष्यासारख्या कुटुंबवत्सलउच्चवर्गीय प्राण्यात ‌‌‌आढळणाऱ्या कार्य ​विभाजन, समाजजीवन व कुटुंबसंस्था यांचे बीज या ​निवह प्राण्यांतच आढळते.

संदर्भ : 1. Borradaile, L. A. Potts, F. A. The Invertebrata, Bombay, 1962.

           2. Hyman, L. H.The Invertebrates : Protozoa through Ctenophora, Vol.I., New York, 1940.

रानडे, द. र.