From Page No.124 Onwards

फॉस्फरसयुक्त व पोटॅशयुक्त खते चिखलणीच्या वेळी एका हप्त्यात द्यावीत. नायट्रोजनयुक्त खते तीन हप्त्यांतून पुढीलप्रमाणे विभागून द्यावीत : (१) ४०% नायट्रोजनचा पहिला हप्ता चिखलणीच्या वेळी, (२) ४०% नायट्रोजनचा दुसरा हप्ता लावणीनंतर एक महिन्याने, (३) उरलेला २०% नायट्रोजन पीक फुलोऱ्यावर आल्यावर द्यावा. ही वेळ प्रकाराप्रमाणे बदलते. हळवे प्रकार ६५-७० दिवसांनी, निमगरवे प्रकार ८५-९० दिवसांनी, तर गरवे प्रकार ११५-१२० दिवसांनी फुलोऱ्यावर येतात. चिखलणीच्या वेळी द्यावयाची खते खाचरात फेकून देतात परंतु दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यांचे नायट्रोजनयुक्त खत देताना ते भाताच्या रांगांमध्ये पानांवर पडणार नाही अशा पद्धतीने देतात वरखते देण्यापूर्वी खाचरातील पाणी काढून खत दिल्यावर दुसऱ्या दिवशी ते पुन्हा भरतात.

भारी जमिनीस नायट्रोजन थोडा कमी व हलक्या जमिनीस वाढवून देतात. उन्हाळी भाताला अधिक नायट्रोजन उपयुक्त ठरतो. पावसाचे प्रमाण कमी असलेल्या प्रदेशांत सर्व पोषक द्रव्ये खताच्या स्वरूपात एकाच हप्त्यात दिली तरी तरी चालतात. नायट्रोजनयुक्त, फॉस्फरसयुक्त व पोटॅशयुक्त खते मिश्र किंवा संयुक्त खताच्या स्वरूपात दिली, तरी तेवढीच उपयुक्त ठरतात.

भातासाठी सर्वसाधारणपणे नायट्रोजनयुक्त खताचा वापर अमोनियम सल्फेट, अनोनियम क्लोराइड अथवा यूरिया यांच्या स्वरूपात उपयुक्त ठरतो. अम्ल जमिनीत सुपरफॉस्फटाऐवजी रॉक फॉस्फेट किंवा हाडांचा चुरा वापरणे हितावह ठरते. पोटॅशयुक्त खत म्युरेट ऑफ पोटॅशच्या स्वरुपात दिले तरी चालते. या पिकाला नायट्रेटाच्या स्वरूपातील खते (उदा. कॅल्शियम अमोनियम नायट्रेट) देत नाहीत.

कॉपर सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट आणि झिंक सल्फेट या सूक्ष्म पोषक द्रव्यांचा स्वतंत्रपणे अथवा एकत्रितपणे वापर केल्यास भात पिकाच्या उत्पादनात १० ते २८% वाढ होते असे तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र व ओरिसा या राज्यांत दिसून आले आहे.

नील हरित शैवालाचा [⟶शैवले] भाताच्या शेतात वापर केल्याने हेक्टरी २५ किग्रॅ. नायट्रोजनची बचत होते, असे आढळून आले आहे. भातरोपांची लावणी झाल्यावर १० दिवसांनी वाळलेले नील हरित शैवल हेक्टरी १० किग्रॅ. या प्रमाणात मातीत मिसळून शेतात घालतात. अशा प्रकारे लागोपाठ तीन हंगामात शैवलाचा वापर केल्याने कमी प्रमाणात नायट्रोजन देऊनही जास्त उत्पादन मिळू शकते.

झोला वंशातील जल नेचे नील हरित शैवलांबरोबर सहजीवी असतात व ते हवेतील नायट्रोजनचे स्थिरीकरण करतात. मात्र त्यांनी स्थिरीकरण केलेला नायट्रोजन त्यांचे अपघटन (घटक द्रव्ये अलग होण्याची क्रिया झाल्यावरच भात पिकाला उपलब्ध होतो. यासाठी ॲझोलाचा उपयोग हिरवळीच्या खतासाठी करतात.

झोस्पिरिल्ल वंशातील नायट्रोजनाचे स्थिरीकरण करणाऱ्या सूक्ष्म जंतूचे प्रयोगशाळेत संवर्धन करून त्यात भाताच्या रोपांची मुळे लावणीपूर्वी बुडविल्याने उत्पादनात वाढ होते, असे भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या सूक्ष्मजीवविज्ञान विभागाने केलेल्या प्रयोगांत आढळून आले आहे. या सूक्ष्मजंतूंमुळे दर हेक्टरी २० किग्रॅ. नायट्रोजनाची बचत होते.

निंदणी व कोळपणी : लावणी पद्धतापेक्षा पेरणी पद्धतीत तणांचे प्रमाण जास्त असते. भाताच्या पिकात सर्वसाधारणपणे पुढील तणे प्रामुख्याने आढळून येतातः कुरडू, पांढरा माका, चिमणचारा, बंटी, केणा, नागर मोथा, हरळी व जंगली भाताच्या जाती [⟶ तण]. पेरणी पद्धतीतील तण टोकदार खुंट्यांच्या कुळवाने काढतात अथवा हाताने खुरपणी करून काढतात. लावणीच्या खाचरात नागर मोथा आणि बंटी (अगर तत्सम तण) यांचा विशेष उपद्रव असतो. लावणीच्या खाचरातील तण २० दिवसांच्या अंतराने दोन अगर तीन वेळा खुरपणी करून काढतात. खुरपणीच्या आधी खाचरातील पाणी काढून टाकण्यात येते. खुरपणीच्या वेळी झाडा भोवतालची माती हालवली जाते. पहिली खुरपणी लावणीनंतर एक महिन्याने करून लागलीच अमोनियम सल्फेट देऊन ते मातीत मिसळतात. तण काढण्यासाठी टोकदार खुंट्यांच्या कुळवाचाही उपयोग करतात. भाताच्या लागवडीच्या सुधारलेल्या पद्धतीप्रमाणे रांगेत रोपे लावून लावणी केल्यास निंदणीच्या फिरत्या जपानी कोळप्याने निंदणी करणे शक्य होते. या कोळप्याने निंदणीबरोबरच भाताच्या झाडाभोवतालची मातीही हालविली जाते. व त्यामुळे जास्त फुटवे येण्यास मदत होते.

तणांचा नाश करण्यासाठी २, ४-डी, एमसीपीए, स्टॅम एफ ३४, टीसीए, ईपीटीसी यांसारखी तणनाशके [⟶ तण] कमीजास्त प्रमाणात विशिष्ट तणांवर परिणामकारक असल्याचे आढळून आले आहे.

पिकातील भेसळ (खेड) काढणे : बियांची शुद्धता राखण्याच्या दृष्टीने पिकातील भेसळीची झाडे काढून टाकणे आवश्यक असते. लोंब्या येण्याच्या काळावरून भेसळीची झाडे उभ्या शेतात ओळखता येतात. हळव्या प्रकारांच्या पिकांत ज्यांना ठराविक मुदतीत लोंब्या येत नाहीत अशी व गरव्या प्रकारात ठराविक वेळेच्या अगोदर लोंब्या येतात अशी भेसळीची समजून काढून टाकतात.

रोग व किडी : भाताच्या पिकावर अनेक कवकजन्य व सूक्ष्मजंतुजन्य रोग पडतात आणि त्यांमुळे काही वर्षे उत्पादनात पुष्कळ घट येते. महत्त्वाच्या रोगांचे व किडणीचे वर्णन आणि उपाययोजना पुढे दिल्या आहेत

रोग : करपा (ब्लास्ट) व कडा करपा हे भातावरील प्रमुख रोग आहेत. याशिवाय खोडकूज, पिंगट टिक्का आणि पायकूज (बाकानी रोग) हेही रोग भारतात काही भागांत आढळून येतात.

करपा : पायरिक्युलेरिया ओरिझी या कवकामुळे होणारा व भारतात सर्वत्र आढळून येणारा भाताच्या पिकावरील हा फार महत्त्वाचा रोग आहे. या रोगामुळे १९२० साली दक्षिण भारतात ८०% भातपिकाचे नुकसान झाले. रोग झाडाच्या वाढीच्या कोणत्याही अवस्थेत पडतो. रोपांवर रोग झाडाच्या वाढीच्या कोणत्याही अवस्थेत पडतो. रोपांवर रोग फार प्रमाणात पडल्यास रोपे जळाल्यासारखी दिसतात. पुढे झाडे वाढत असताना पानांवर व देठांवर आणि लोंब्या बाहेर पडल्यावर त्यांच्या देठांवर (मानमोडी अवस्था) रोग आढळून येतो. पानांवर तांबूस अथवा निळसर-राखी रंगाचे व काहीसे सूत गिरण्यातील चात्यांच्या आकाराचे ठिपके पडतात.आणि रोगाचे प्रमाण वाढल्यास ठिपके एकमेकांत मिसळून पाने करपल्यासारखी दिसतात. पेऱ्यांवर रोग पडल्यास ती काळी पडतात. मानमोडी अवस्था सर्वांत नुकसानकारक असते कारण देठ कुजल्यामुळे लोंबी गळून पडते व सर्व पीक वाया जाण्याचीही शक्यता असते. भारतात रोपांवर हा रोग क्वचितच मोठ्या प्रमाणात आढळून येतो. पानावरील व लोंबीच्या देठावरील अवस्था आढळून येतात व त्यातही पानावरील अवस्था सर्वसाधारपणे जास्त प्रमाणात आढळून येते. रोगाच्या वाढीसाठी इष्ट तापमान (२४ ते २७ सें.) आणि ९०% पेक्षा जास्त हवेतील सापेक्ष आर्द्रता असल्यास रोगाची वाढ शीघ्र गतीने होते. रोगाच्या तीव्रतेप्रमाणे नुकसान २५ ते ७०% पर्यंत होते. रोगाचा प्रसार विशेषेकरून हवेतून होत असल्यामुळे बियांना पारायुक्त औषध लावल्याने विशेष फायदा होत नाही परंतु बियांमार्फतही रोगाचा प्रसार होत असल्याने बियांना १% पारायुक्त कवकनाशक लावण्याची शिफारस करण्यात येते. पानावरील अवस्थेसाठी वाफ्यात रोपांवर सतत ०.६% बोर्डो मिश्रण अगर फवारतात. लावणीनंतर पीक फुलावर येईपर्यंत तीन ते चार वेळा बोर्डो मिश्रण अगर इतर ताम्रयुक्त कवकनाशक फवारतात. रोगाची मानमोडणी अवस्था कवकनाशके फवारून आटोक्यात ठेवणे कठीण असते असे आढळून आले आहे. रोगप्रतिकारक भातांच्या प्रकारांची लागवड करणे हाच या रोगावर खात्रीशीर उपाय आहे. कृष्णसाळ, अंतरसाळ, जया, आयआर ८,२० व २२, रत्नागिरी-२४, कर्जत-१४-७, रत्नागिरी-६८-१, रत्ना, आरपी ४-१४ हे कमी जास्त प्रमाणात रोगप्रतिकारक प्रकार लावण्याची शिफारस करण्यात आलेली आहे.

कडा करपा : झँथोमोनास ओरिझी या सूक्ष्मजंतूमुळे होणारा हा रोग महत्त्वाचा असून तो प्रामुख्याने कोकणात आढळून येतो. हवेतील सापेक्ष आर्द्रता (सु.९०%) आणि २८ ते ३० से. तापमान रोगाला पोषक ठरते. पानावर मध्ययशिरेला समांतर असे पिवळसर पट्टे दिसतात व ते पानावर दोन्ही कडांनी खाली वाढत जातात. रोगट बी व पेंढा यांच्याद्वारे हा रोग पसरतो.

उपाय : रोगग्रस्त पिकाच्या शेतातील पीक काढून घेतल्यावर त्याचे बुडखे व इतर काडीकचरा गोळा करून जाळून टाकतात. बियांना पेरणीपूर्वी १% पारायुक्त कवकनाशक लावतात. पिकाला नायट्रोजन युक्त खत कमी प्रमाणात अथवा उशीरा देतात. रोगग्रस्त शेतातील पाणी कमी केल्यामुळे रोगाचे अंशतः नियंत्रण होते. स्ट्रेप्टोसायक्लीन ७.५ ग्रॅ. व ९०% कॉपर ऑक्सिक्लोराईड १,२५० ग्रॅ. ही दोन्ही ५०० लि. पाण्यात मिसळून पिकावर फवारतात. रत्नागिरी-६८-१, रत्ना आणि आयआर २० व २२ हे भाताचे प्रकार या रोगास कमी प्रमाणात बळी पडत असल्यामुळे ते लावण्याची शिफारस करण्यात आलेली आहे.

खोडकूज : स्क्लेरोशियम ओरिझी या कवकामुळे होणारा हा रोग कोकण, मावळ आणि चंद्रपूर व भंडारा या जिल्ह्यांत तुरळक प्रमाणात आढळतो. झाडांच्या बुंध्याजवळील एक-दोन पेरी काळी पडून कुजतात व तेथे कवचाच्या लहान मोहरीसारख्या गुठळ्या आढळतात. रोगग्रस्त शेतातील सर्व धसकटे गोळा करून जाळून टाकणे व प्रमाणाबाहेर खत व पाणी न देणे हे उपाय आहेत.

पिंगट टिक्का : हेल्मिथोस्पोरियम ओरिझी या कवकामुळे होणाऱ्या या रोगात पानांवर तांबूस लांबट गोल ठिपके दिसतात. रोपांवर रोग पडल्यास रोपे मरतात. लोंब्या तयार होण्याच्या सुमारास रोग पडल्यास दाणे काळपट पडतात. महाराष्ट्रात या रोगामुळे फारसे नुकसान होत नाही. इतरत्र ३०% पासून ९०% पर्यंत नुकसान होते.

पायकूज (बाकानी रोग): जिबरेल्ला फ्युजिकुरोई या कवकामुळे होणारा हा रोग भारत व आशियातील इतर देशांत आढळून येतो. दक्षिण भारतात या रोगापासून काही वेळा फार नुकसान होते. या रोगाचे वैशिष्ट्य म्हणजे रोगग्रस्त झाडांची वाफ्यात व लावणी नंतर शेतात प्रमाणाबाहेर उंची वाढते व झाडे पिवळी पडतात. ती बारीक असून त्यांना फुटवे फुटत नाही. रोगाचा प्रसार मुख्यतः बियांतून होतो. यामुळे बियांना पारायुक्त कवकनाशक लावल्याने रोगाचे पुष्कळ प्रमाणात नियंत्रण होते. हा रोग एके काळी जपानमध्ये महात्त्वाचा होता परंतु आता तो तेथे फारच क्वचित आढळून येतो. याचे कारण जपानमधील ८५% भाताच्या पिकाची लागवड पारायुक्त कवकनाशकात बुडवून काढलेल्या बियांपासून केली जाते.

कीड : जगात भाताच्या पिकावर कीटकाच्या ७० जाती आढळून आल्या आहेत. भारतातील महत्त्वाच्या (उपद्रवी) किडी पुढीलप्रमाणे आहेत : (१) खोडकिडा (२) लष्करी अळी, (३) तुडतुडे, (४) पिली अथवा गाद अथवा गंदी, (५) काटेरी भुंगेरे, (६)लोंबीवरील ढेकण्या. याशिवाय याशिवाय खेकडा हा कीटक वर्गात न मोडणारा उपद्रवी प्राणी बराच उपद्रवी आहे.

खोडकिडा : (सिफोफॅगा इन्सर्टुलास, स्कीनोबियस इन्सर्टुलास ). ही कीड भाताच्या पिकावरील सर्वांत जास्त नुकसानकारक समजली जाते. महाराष्ट्रात ती ठाणे व रायगड या जिल्ह्यांत विशेष उपद्रवी आहे. या किडीचा उपद्रव रोपाच्या अवस्थेपासून पीक तयार होईपर्यंत आढळून येतो. या किडीचा पिवळसर रंगारंगाची अळी खोडाला भोक पाडून आत शिरते व गाभ्यात चरत राहते. त्यामुळे गाभ्यातील पान वाळते. पीक फुलोऱ्यावर असताना कीड पडल्यास लोंबीत दाणे भरत नाहीत व ती वाळते. उपाय : कापणी झाल्याबरोबर जमीन ओलसर असताना भात खाचराची नांगरट करून जमिनीतील धसकटे व काडीकचरा गोळा करून जाळून टाकतात. बी पेरल्यानंतर १० दिवसांनी फॉस्फोमिडॉन अथवा एंडोसल्फान यासारखी कीटकनाशके रोपांवर फवारतात. निमगरव्या व गरव्या प्रकारांत लावणीनंतर २५ दिवसांनी क्विनॉलफॉस ५% दाणेदार हेक्टरी १५ किग्र. अथवा कार्बोफ्यूरॉन ३% दाणेदार १६.५ किग्रॅ. किंवा गमा बीएचसी ६% दाणेदार २५ किग्रॅ. किंवा फोरेट १०% दाणेदार १० किग्रॅ. टाकतात. दाणेदार कीटकनाशक टाकल्यानंतर चार दिवस शेतातील पाणी बाहेर जाऊ देत नाहीत व बाहेरील पाणी आत येऊ देत नाहीत.

लष्करी अळी : (सर्फीस यूनिपंक्टा). अळ्या रात्री भाताची पाने व लोंब्या खातात आणि त्यामुळे उत्त्पन्न घटते. सुरुवातीला भरपूर पाऊस पडून पुढे बरेच दिवस उघडीप पडल्यास या किडीचा उपद्रव वाढतो. उपाय : पीक कापणीनंतर धसकटे आणि इतर गबाळ गोळा करून जाळून टाकतात. सायंकाळी वारा नसेल अशा वेळी पिकावर १०% कार्बारिल आणि बीएचसी भुकटी हेक्टरी प्रत्येकी १० किग्रॅ. या प्रमाणात मिसळून पिकावर पिस्कारतात.

तुडतुडे : नेफ्रोटेटिक्स व इतर वंशांतील हिरव्या व तपकिरी अशा दोन प्रकारच्या तुडतुडयांपैकी तपकिरी तुडतुडयांमुळे पिकाचे जास्त नुकसान होते. तुडतुडे पानातील व खोडातील रस शोषून घेतात व व्हायरसजन्य रोग पसरवितात. पीक कमजोर होऊन उत्पन्न घटते. याशिवाय काही प्रकारांच्या तुडतुडयांच्या शरीरातून मधासारखा चिकट स्त्राव पानावर पडतो व त्यावर काजळीच्या कवकाची वाढ होते. उपाय : तुडतुडे दिसू लागताच कार्बारिल भुकटी हेक्टरी २०-२५ किग्रॅ. या प्रमाणात पिकावर पिस्कारतात किंवा ८० ग्रॅ. पाण्यात विरघळणारी ५०% डीडीटी भुकटी २० लि. पाण्यात मिसळून पिकावर फवारतात. [⟶ तुडतुडे].

पिली किंवा गाद माशी : (आर्सिओलिया ओरिझी, पॅचिडीप्लॉसिस ओरिझी). ही कीड माशी वर्गातीलअसून चंद्रपूर, भंडारा व रत्नागिरी या जिल्ह्यांत आढळून येते. काही वर्षे ही कीड विशेष उपद्रवी असते. पूर्ण वाढलेली माशी डासाएवढी असून तिचे पाय लांब असतात. मादी लाल रंगाची व नर काळसर रंगाचा असतो. या माश्या झाडाचा शेंडा पोखरतात व त्यामुळे वैशिष्टयपूर्ण अशा लांबट नळीसारख्या गाठी उद्‍भवतात. भाताचे सुवासिक प्रकार, तसेच गर्द रंगाच्या पानांचे प्रकार यांना ही कीड कमी उपद्रवी असते असे म्हणतात. तसेच पुष्कळशा अती हळव्या प्रकारांना या किडीचा कमी उपद्रव होतो. उपाय : लावणीनंतर १० दिवसांनी दाणेदार फोरेट १०% हेक्टरी १० किग्रॅ. या प्रमाणात टाकतात. त्यानंतर याच कीटकनाशकाचा दुसरा हप्ता लावणीनंतर ३० दिवसांनी प्रमाणात बदल न करता देतात. फोरेट टाकताना जमिनीत भरपूर ओल असावी किंवा शेतात ७ ते १० सेंमी. पाणी कमीत कमी चार दिवस थांबून राहील अशी व्यवस्था करतात. वरील औषधयोजनेशिवाय उभ्या पिकातील कीडग्रस्त ताटे मुळासकट काढून जाळून नष्ट करतात. तसेच बिगर हंगामात बांधावार वाढणाऱ्या देवधानासारख्या तणांचा जाळून नाश करतात कारण शेतात पीक नसताना ही कीड तणांवर वाढते. विक्रम, फाल्गुन, शक्ती, आरपीडब्ल्यू ६-१३ आणि ६-१७ हे भाताचे प्रकार गाद माशीला प्रतिकारक आहेत. [⟶ पिली].

करपा कीड किंवा कोटीरी मुंगेरे : (हिस्पा आर्मिजेरा). हे भुंगेरे काहीसे चौकोनी आकाराचे व ३-४ मिमी. लांबी-रुंदीचे असून त्यांच्या पंखावर सर्वत्र काटे असतात. या किडीचे डिंभ (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी व प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्था) कोवळ्या पानांची टोकाकडील भागाची त्वचा पोखरुन त्यात वळणावळणाचे लांब बोगदे करतात. त्यामुळे पानांवर पांढरे चट्टे पडून पाने वाळतात. वाढलेले भुंगेरेही रोपांच्या पानांतील हरितद्रव्य खातात. ही कीड रोपाला जास्त नुकसानकारक असते. उपाय : पानांचे शेंडयाकडील भाग कापून जाळून नष्ट करतात. किडीच्या डिंभांसाठी ०.२५% बीएचसी हेक्टरी १,१२५ लि. प्रमाणे पिकावर फवारतात व वाढलेल्या भुंगेऱ्यांसाठी ५% बीएचसी भुकटी हेक्टरी २०-२५ किग्रॅ. या प्रमाणात पिस्कारतात. [⟶ करपा कीड].

लोंबीवरील ढेकण्या : (लेप्टोकोरिसा ॲक्युटा). ढेकण्या कोवळ्या दाण्यांतील दुधाळ रस शोषून घेतात त्यामुळे दाणे भरत नाहीत. काही वेळा संपूर्ण पीक वाया जाते. ही कीड भारतातील सर्व हळव्या प्रकारांचे नुकसान करते. ती टोळधाडीसारखी मोठ्या संख्येने येते व थोडया दिवसांत दाणे भरत असलेल्या लोंब्यांचे नुकसान करते. उपाय : झाडे हालवून ढेकण्या पाण्यात पाडतात अथवा हाताने जाळ्यात पकडून नष्ट करतात. पीक फुलावर असताना हेक्टरी २५ किग्रॅ. बीएचसी भुकटी पिस्कारतात. पिकाची कापणी केल्यावर धसकटे, बांधावरील गवत वगैरे जाळून नष्ट करतात.

खेकडे : खेकडे तसेच मुठया व चिंबोरी हे बांधाजवळची भाताची रोपे कातरतात. त्यामुळे त्या जागेतील झाडे कमी झाल्याने उत्पन्न घटते. याशिवाय हे प्राणी शेताच्या बांधांना बिळे पाडत असल्यामुळे शेतातून पाणी निघून जाते त्याचा पिकावर अनिष्ट परिणाम होतो. उपाय : खेकडे हाताने पकडून नष्ट करतात अथवा शिजविलेल्या एक किग्रॅ. भातात ५०% डीडीटी १०० ग्रॅ. मिसळून त्याच्या सुपारीएवढया गोळ्या करुन त्या खेकडयांनी पाडलेल्या बिळांच्या तोंडापाशी ठेवतात. यासाठी प्रथम सर्व बिळे मातीने बंद करुन दुसऱ्या दिवशी तपासताना ज्या बिळांची तोंडे मोकळी केलेली दिसतील तेथेच विषारी आमिष ठेवतात. लावणीपूर्वी बांधाची दुरुस्ती करुन खेकडयांनी केलेली बिळे बुजविल्याने फायदा होतो.

भाताच्या लागवडीची सुधारित पद्धत : निरनिराळ्या भात संशोधन केद्रांत केलेल्या प्रयोगांच्या निष्कर्षावर आधारित अशा लागवडीच्या सुधारित पद्धतीची शिफारस करण्यात आलेली आहे. या पद्धतीची वैशिष्टये पुढीलप्रमाणे आहेत : (१) गादी वाफ्यावर रोपे तयार करणे, (२) पेरणीसाठी स्थानिक पद्धतीपेक्षा हेक्टरी कमी बियांचा वापर, (३) नायट्रोजनयुक्त खत जास्त प्रमाणात दिल्यास त्याला प्रतिसाद देणाऱ्या व जास्त उत्पादन देणाऱ्या प्रकारांचा वापर, (४) खताचा जास्त प्रमाणात वापर, (५) लावणी करताना रोपे रांगेत लावणे आणि एका जागी फक्त तीन-चार रोपे लावणे, (६) कवकनाशकांची व कीटकनाशकांची फवारणी, (७) कोळपणी करुन तण काढणे. या सर्व बाबींचे तपशील निरनिराळ्या सदरांत देण्यात आले आहेत. खात्रीच्या पाणीपुरवठयाची सोय असलेल्या भागातच या पद्धतीचा वापर करणे शक्य आहे.

वायंगण (उन्हाळी) भात : ठाणे, रायगड, रत्नागिरी, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत पाणीपुरवठयाची हमखास सोय असलेल्या ठिकाणी सु. ३५-४० हजार हे. क्षेत्रात नोव्हेंबर-डिसेंबर ते मार्च-एप्रिल या मुदतीत हे पीक घेतात. वाफ्यात रोपे तयार करुन लावणी पद्धतीने लागवड करतात. रायगड जिल्ह्यात जलविद्युत केंद्रातून बाहेर सोडलेल्या पाण्याचा उपयोग करुन पीक घेतले जाते. पुढील हळव्या अथवा निमगरव्या सुधारित प्रकारांची लागवडीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे : (१) हळवे प्रकार : कर्जत १८४, रत्नागिरी-२४, रत्ना, कावेरी, कर्जत ३५-३. हळव्या प्रकारांवर खोडकिडीच्या बंदोबस्तासाठी कीटकनाशके वापरण्याची बहुधा गरज भासत नाही. (२) निमगरवे प्रकार : जया, आयआर ८, २० ते २२, आरपी ४-१४ व रत्नागिरी ७११. भरपूर सूर्यप्रकाश, खात्रीचा पाणीपुरवठा, तणांचा आणि रोग व किडींचा कमी उपद्रव तसेच पिकाच्या वाढीच्या काळातील योग्य तापमान (२४ ते ३२ से.) या सर्व अनुकूल परिस्थितीमुळे सर्वसाधारणपणे उन्हाळी पिकापासून खरीप हंगामातील पिकापेक्षा जास्त उत्पादन मिळते, असा अनुभव आहे. कोकण विभागात डिसेंबरच्या मध्यास पेरणी करतात. इतर ठिकाणी ती नोव्हेबंरमध्ये करणे आवश्यक असते. तसेच जानेवारीच्या अखेरीस रोपांची लावणी संपविणे आवश्यक असते. थंडीमध्ये वाफ्यात रोपे मंद गतीने वाढतात. यासाठी वाफ्यात संध्याकाळी पाणी भरून सकाळी ते काढून टाकतात. रोपांना तिसरे पान आल्यावर वाफ्यात वेताचे पाणी ठेवतात. खते, निंदणी व कोळपणी खरीप पिकाप्रमाणे करतात. खोडकिडा व तपकिरी तुडतुडे या किडी विशेष उपद्रवी असतात.

भारतातील भाताच्या लागवडीच्या इतर पद्धती : केरळराज्यातीलखाऱ्या जमिनीतील लागवड : केरळ राज्याच्या दक्षिण भागात समुद्राच्या भरतीचे पाणी शिरत असल्यामुळे जमिनी खाऱ्या झाल्या आहेत. या दोन प्रकारच्या आहेत. (१) पोक्काली अथवा कैपाड व (२) कथाल. या दोन्ही प्रकारच्या खाऱ्या जमिनींत भाताची लागवड वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात येते.

पोक्कालीजमिनीतील लागवड : केरळ राज्याच्या एर्नाकुलम् व कननोर जिल्ह्यांतील किनारी भागातील दलदलीच्या खाऱ्या जमिनींना पोक्काली हे नाव आहे. एकूण क्षेत्र २८,००० हे. असून जमीन कठीण व अछिद्र असून त्यात सेंद्रिय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात. खोली ३० ते ६० सेंमी. असते. त्या फार अम्लधर्मीय असून pH मुल्य ३ ते ५.५ असते. या जमिनीत भाताची लागवड करण्यासाठी शेतीला बाहेरच्या बाजूने बांध घालून त्यावर कच्छ वनस्पती (दलदलीच्या जागी वाढणाऱ्या ऱ्हायझोफोरा व अन्य वंशातील वनस्पती) लावतात. बांधामुळे समुद्राच्या भरतीचे पाणी आत येत नाही. पुराचे अथवा पावसाचे जास्त आलेले पाणी बाहेर काढून टाकण्यासाठी मोऱ्या असतात. पाऊस जास्त असलेल्या काळात (जून-जुलैपासून आँक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत) वर्षातून भाताचे एक पीक घेतात. यासाठी फेब्रुवारी-मार्च महिन्यात शेतातील वरच्या थरातील मातीचे सु. १ मी. उंचीचे ढीग शेतात जागोजाग तयार करतात. पावसाला सुरुवात झाल्यावर पाण्याने ढिगातील लवणे धुवून निघतात व शेतातील पाणीही खारे न राहता गोडे बनते. मोड आणलेले भाताचे बी ढिगाच्या सपाट माथ्यावर पेरतात. रोपे ३०-३५ दिवसांची झाल्यावर तीन-चार रोपे असलेल्या ढिगाचे तुकडे कापून त्यांची शेतात सर्वत्र लावणी करतात. खताचा वापर केला जात नाही. पाऊस संपल्यावर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खारे पाणी शेतात येते व त्यामुळे जमिनीतील लवणांचे प्रमाण वाढले. अशा वेळी भात कापणीला येते. हेक्टरी उत्पादन ५०० ते ८०० किग्रॅ. मिळते. १२० ते १३५ दिवसांत तयार होणाऱ्या व खाऱ्या जमिनीत लागवडीस योग्य अशा भाताच्या प्रकारांची लागवड करण्यात येते. जास्त पाऊस झाल्यास पुराच्या पाण्यामुळे बांध वाहून जाण्याचा धोका असतो आणि पाऊस कमी झाल्यास शेतातील लवणांचे प्रमाण वाढते व त्याचा पिकावर अनिष्ट परिणाम होतो.

कयाल’ जमिनीतील लागवड : अलेप्पी व कोट्यम या जिल्ह्यांतील कुट्टेनाड प्रदेशातील खाऱ्या जमिनीचे क्षेत्र सु. ५२,००० हे. आहे. संपूर्ण क्षेत्राचे २० पासून ८० हेक्टरचे भाग पडलेले असतात आणि प्रत्येक भागाला (शेताला) चारी बाजूंनी चिखलाने बांध घालतात. या जमिनी समुद्रसपाटीखाली १ ते ३ मी. असून वर्षातील पाच महिने (सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत) पावसाच्या पाण्याखाली बुडालेल्या असतात. जमिनी गाळवट चिकण मातीच्या असून फार अम्लधर्मीय असतात. पाऊस कमी झाल्यावर शेतातील बहुतेक सर्व पाणी पंपाने काढून बाहेर कालव्यात सोडतात. शेताच्या बाजूला असलेले पाण्याचे पाट शेताच्या जमिनीच्या वरच्या पातळीत असल्यामुळे जरुर लागल्यास पाटातील पाणी शेतात घेता येते. चिखल केलेल्या शेतात मोड आणलेले भाताचे बी पेरतात. खाऱ्या जमिनीत लागवडीत योग्य अशा एम. ओ. १, २ आणि ३ या उंच वाढणाऱ्या इंडिका उपजातीचे प्रकार लावतात. या शेतीला रोग व किडी यांचा फार उपद्रव होतो. १०० ते १२० दिवसांत तयार होणाऱ्या भाताच्या प्रकारांची लागवड केली जाते. हेक्टरी २,००० ते ३,००० किग्रॅ. उत्पादन मिळू शकते. भाताचे पीक काढल्यावर जमीन नांगरतात.

वरील वर्णनावरुन दिसून येईल की, पोक्काली जमिनीत पावसाळ्यात पीक घेतात व कयाल जमिनीत ते पावसाळा कमी झाल्यावर घेतात.

तरंगते भात : पश्चिम बंगाल, आसाम, ओरिसा, तमिळनाडू व केरळ या राज्यांतील सखल प्रदेशात भाताच्या लागवडीच्या हंगामाच्या अखेरीस शेतात ०.५ ते १.५ मी. पावसाचे पाणी साठते. जमीन कोरडी असताना जमीन नांगरुन पुरेशी ओल असताना बी फोकून पेरतात. जसजसे पावसाचे प्रमाण वाढते तेव्हा नद्यांना पूर येतात व शेतातील पाण्याची पातळी वाढते. अशा वेळी पाण्याची पातळी जसजशी वाढेल, तसतशी पिकाची उंची वाढते. शेतातील पाणी चढण्याचे थांबल्यावर झाडांची वाढ थांबते व त्यांना फुटवे येतात आणि वरच्या भागातील पेऱ्यांवर मुळे फुटून येतात. झाडांची चार दिवसांत ५२ सेंमी. उंची वाढल्याची नोंद आहे. निरनिराळ्या उंचीपर्यंत वाढणारे भाताचे प्रकार आहेत व त्यांपैकी शेतातील पाण्याच्या खोलीप्रमाणे योग्य असे प्रकार लावले जातात. तरंगत्या भाताचे सर्व प्रकार सात अथवा त्यापेक्षा जास्त महिन्यांत तयार होणारे असतात. कापणीच्या वेळेपर्यंत शेतातील पाण्याची पातळी पुरेशी कमी न झाल्यास होडीत बसून भाताच्या लोंब्या तोडणे आवश्यक असते.

बियासी’ पद्धत : मध्ये प्रेदश, महाराष्ट्राचा पूर्व भाग, ओरिसा, प. बंगाल व पंजाब येथे या पद्धतीचा अवलंब केला जातो. पावसाच्या सुरुवातीला शेतात बी फोकून पेरतात. रोपे २० ते २५ सेंमी. उंचीची होतात त्या सुमारास (सामान्यतः जुलैच्या अखेरीस) शेतात १०-१५ सेंमी. खोलीपर्यंत पावसाचे पाणी साठते. अशा वेळी शेतात आडवी उभी उथळ नांगरणी केली जाते. त्यामुळे तणे उपटली जातात व त्याचबरोबर काही भाताची रोपेही उपटली जातात. नांगरणीमुळे तण काढणे, रोपांची विरळणी आणि कोळपणी असे तिरेही फायदे होतात. रोपे पुन्हा सावरून वाढीला लागण्यासाठी पिकाला नायट्रोजनयुक्त खत थोडया प्रमाणात देतात. पेरणी पद्धत व लावणी पद्धत या दोन्ही पद्धतींचा काहीसा मिलाफ या पद्धतीत आहे. भाताचे क्षेत्र मोठे असल्यास लावणी पद्धतीने शेती करण्यासाठी पुरेसे मजूर मिळणे कठीण असते म्हणून या पद्धतीचा अवलंब केला जातो.

कापणी व मळणी : महाराष्ट्रात साधारणपणे हळवे प्रकार ऑक्टोबर सुरुवातीस व गरवे प्रकार नोव्हेंबरमध्ये कापणीला तयार होतात. लोंब्या बाहेर पडल्यास सु. चार आठवडयानंतर पीक पिवळे दिसू लागते व दोणेही टणक होतात. हीच कापणीची योग्य वेळ होय. यानंतर पीक शेतात उभे ठेवले, तर दाणे झडपण्याचे प्रमाण वाढते आणि तांदळाच्या प्रतीवर अनिष्ट परिणाम होतो.

भारतात साधारणपणे मजूर लावून भाताची कापणी करण्यात येते. विळ्याने ते जमिनीलगत कापून शेतातच तीन-चार दिवस वाळू देतात. त्यानंतर १० ते २० किग्रॅ. वजनाचे भारे बांधून खळ्यावर आणून त्यांची गोल व वर निमुळती होत गेलेली गंजी रचून ठेवतात. गंजीमध्ये पावसाचे पाणी शिरून ती खराब होणार नाही याची खबरदारी गंजी रचताना घेतात. मळणी बैलाच्या पायाखाली अथवा खळ्यावर अथवा लाकडी फळीवर भाताच्या पेंढया हाताने झोडपून करतात. मळणीसाठी पायाने चालविण्याचे जपानी पाय-मळणी यंत्र या कामासाठी उपयुक्त असून मळणी कमी खर्चात होते व शिवाय वेळेचीही बचत होते. आंध्र प्रदेशात बैलांऐवजी ट्रॅक्टरचा मळणीसाठी उपयोग करण्यात येतो आणि ही मळणी थोडया वेळात व बैलांच्या पायाखालील मळणीपेक्षा जास्त चांगली होते, असे आढळून आले आहे. तेल अथवा विजेच्या शक्तीवर चालणारी मळणी यंत्रे काही ठिकाणी प्रयोगादाखल वापरण्यात आली असून ती समाधानकारक असल्याचे दिसून आले आहे. या यंत्रात मळणीबरोबरच चाळणी आणि उफणणी ही दोन्ही कामे एकाच वेळी होतात. एक अश्वशक्ती असलेल्या मळणी यंत्रात जपानी पाय-मळणी यंत्रापेक्षा सु. तिप्पट वेगाने मळणी होते.

कापणी व मळणी यांमध्ये भात भिजल्यास आणि ते न वाळविता साठविल्यास त्यापासून तयार केलेल्या तांदळाचा रंग पिवळा अथवा बदामी असतो. बदललेल्या रंगाचे तांदळांचे प्रमाण फार असल्यास तांदळाला कडूपणा प्राप्त होतो व तो खाण्यात आल्यास पचनाचे विकार होतात.

उत्पादन : इतर कोणत्याही तृणधान्यापेक्षा भाताच्या हेक्टरी उत्पादनात जगातील निरनिराळ्या भागांत फार तफावत आढळून येते. उपोष्ण व समशीतोष्ण या कटिबंधांतील देशांत जॅपोनिका उपजातीच्या प्रकारांची लागवड केली जाते व जास्त नायट्रोजनयुक्त खत दिल्यास या प्रकारांचे उत्पादनही पुष्कळ येते. जपान, चीन, इटली, स्पेन, ईजिप्त, ऑस्ट्रेलिया व अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात दर हेक्टरी भाताचे उत्पादन इंडिका उपजाती पिकवणाऱ्या देशांपेक्षा जास्त असते. १९७८ साली जपानमध्ये भाताचे हेक्टरी सरासरी उत्पादन ६,२५० किग्रॅ. (बिनसडलेले भात) होते. कॅलिफोर्नियात १९७९ साली हेक्टरी ७,३२५ किग्रॅ.उत्पादन मिळाले.

भारतात १९७८-७९ साली भाताचे हेक्टरी सरासरी उत्पादन १,३१४ किग्रॅ. (तांदूळ) होते व महाराष्ट्रात ते १,४७६ किग्रॅ. होते. निरनिराळ्या राज्यांतील १९७८-७९ सालचे सरासरी हेक्टरी उत्पादन कोष्टक क्र. २ मध्ये दिले आहे. अधिक उत्पादन देणाऱ्या भाताच्या प्रकारांचे हेक्टरी उत्पादन कोष्टक क्र. ३ मध्ये दिले आहे.

साठवण : तांदळापेक्षा भात (साळ) साठवणीमध्ये जास्त चांगले टिकते. मात्र ते सावलीत चांगले वाळविलेले आणि त्यातील आर्द्रता १४% च्या आत असावी लागते. साठवणीमध्ये त्यात हवा शिरणार नाही अशा तऱ्हेने कोरडया जागेत साठविणे आवश्यक असते. साठवणीची साधने भारतात निरनिराळ्या भागांत निरनिराळ्या आकारांची असून त्यासाठी वापरलेल्या पदार्थातही भिन्नता आढळून येते. माती, पत्रे, बांबू, लाकूड, भाताचा पेंढा इ. पदार्थाचा उपयोग यासाठी करण्यात येतो. काही ठिकाणी जमिनीखालील पेवांचाही वापर करण्यात येतो. घरी साठविलेले भात बांबूच्या कणगीत भरतात. कणगीच्या तळाशी आणि वर सागाची वाळलेली पाने घालून वरून मातीने लिंपून घेतात. बियांसाठी राखून ठेवलेले भात भाताच्याच पेंढ्यापासून वळलेल्या दोरीच्या कणगीत साठवितात. चांगले वाळविलेले (जलांश ९% पेक्षा कमी असलेले) भात साठवणीमध्ये दीर्घकाळ टिकते व त्याची उगवणशक्तीही कायम राहते. बहुतेक शेतकऱ्यांना पैशाची जरूरी असल्यामुळे मळणीनंतर थोडयाच दिवसांत भात बाजारात विकले जाते.

आ. ३. तांदळाचा उभा छेद : (१) फलावरण, (२) आपांडुर स्तर, (३) पुष्क, (४) अंकुर (गर्भ).

संघटन : मळणी केलेल्या भाताच्या दाण्यावर बाहेरच्या बाजूला टरफल असते त्याला तूस असेही म्हणतात. भातात टरफलाचे प्रमाण सु. २५% असते. टरफल वेगळे केल्यावर आतील भाग (गाभा) बगड,वेणा अथवा करड या नावाने निरनिराळ्या भागांत ओळखला जातो. बगडीच्या बाहेरील बाजूस फलावरण व आपांडूर स्तर (प्रथिन कणांचा स्तर) असतात. सर्वसामान्य भाषेत हे कोंडयाचे थर म्हणून ओळखले जातात. या थरांखाली पांढरा स्टार्चयुक्त पुष्क (बीजातील गर्भाबाहेरचा अन्नांश) असतो व तो सर्वसामान्यपणे तांदूळ या नावाने ओळखला जातो. भाताच्या खालील बाजूला अंकुर असतो. फलावरण, आपांडुर स्तर व अंकुर यांमध्ये पुष्काच्या मानाने प्रथिने व जीवनसत्त्वे पुष्कळ असतात आणि भात सडण्याच्या क्रियेत ती कमीजास्त प्रमाणात कोंडयाच्या स्वरूपात वाया जातात.

भारतातील निरनिराळ्या भागांतील १४ भाताच्या प्रकारांच्या तांदळाचे रासायनिक संघटन पुढीलप्रमाणे आढळून आले आहे : जलांश १०.९० ते १३.७८%, वसा (स्निग्ध पदार्थ) ०.५९ ते २.५९%, प्रथिने ५.५ ते ९.३२%, कार्बोहायर्ड्रेटे ७३.३५ ते ८०.८१%, तंतू ०.१८ ते ०.९५%, खनिज द्रव्ये ०.७९ ते २.००%.

तमिळनाडूतील जाडया भाताच्या प्रकारांत बारीक प्रकारांपेक्षा प्रथिने. फॉस्फरस व कॅल्शियम जास्त प्रमाणात असल्याचे आढळून आले आहे. तांदळात सोडियमाचे प्रमाण कमी असल्यामुळे ज्यांना आहारात कमी मीठ खाण्याचे पथ्य असते त्यांना भात हा सोयीस्कर आहार आहे. भाताचे काही प्रकार सुवासिक असून त्यांपैकी बासमती प्रकाराला विशेष स्थान आहे.

भात भरडणे अथवा सडणे : भारतात भातापासून तांदूळ तयार करण्याच्या दोन प्रमुख पद्धती आहेत : (१) हाताने सडून व (२) यांत्रिक साधनाने.

हाताने सडण्याची पद्धत : घरगुती वापरासाठी भात उखळात लाकडी मुसळाच्या अगर ढेंकीच्या साहाय्याने सडतात अथवा प्रथम लाकडी जात्यात (घिरटीत) भरडून साफ करून मुसळाने थोडे फर सडतात आणि नंतर पुन्हा साफ करून तांदुळ, कणी व कोंडा हे सर्व वेगळे काढतात. हाताने सडण्याची पद्धत फार प्राचीन काळापासून चालत आली आहे. विसाव्या शतकात यंत्राने सडण्याच्या क्रियेचा वापर सुरू झाल्यावर हातसडी मागे पडली. तथापि भारताच्या काही भागात, विशेषतः जेथे विद्युत् शक्ती सहज उपलब्ध नसते. अथवा जेथे बेकार मजूर मोठया संख्येने उपलब्ध असतात तेथे अद्याप या पद्धतीचा वापर करतात. ढेंकी हा उखळ व मुसळाचा सुधारित प्रकार आहे. दोन ते तीन मी. लांबीच्या लाकडी दांडयाच्या टोकाला लाकडी जड मुसळ जोडलेले असते. तरफेच्या तत्त्वावर दांडा पायाने वर खाली केल्याने मुसळ उखळतात काम करते. काही ठिकाणी लाकडी दांडयाला दोन अगर तीन मुसळे जोडलेली असतात व तेवढीच उखळे असतात. मुसळांच्या संख्येप्रमाणे आठ तासांत ७५ ते १४५ किग्रॅ. भात कांडले जाते. आसाम, प. बंगाल, ओरिसा, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा व आंध्र प्रदेश या राज्यांत ही पद्धत सर्वसाधरणपणे प्रचलित आहे.

यांत्रिक पद्धत : यांत्रिक साधनांत हलर, शेलर व आधुनिक भात गिरण्यांचा समावेश होतो.

हलर : या यंत्रात भाताचे टरफल काढणे व तांदळाला पॉलिश करणे या क्रिया एकाच वेळी होत असल्याने जास्त पॉलिश केल्यास कणीचे प्रमाण वाढते आणि कमी पॉलिश केल्यास तांदळात भाताचे दाणे (भातगोटे) जास्त प्रमाणात राहातात व हे भातगोटे वेगळे काढण्याची व्यवस्था नसते. घर्षणामुळे तांदूळ वाजवीपेक्षा जास्त गरम होतो आणि टरफलांच्या भुगा होऊन तो कोंडयात मिसळतो. भारतात हलर गिरण्यांची संख्या शेलर प्रकारच्या गिरण्यापेक्षा पुष्कळच जास्त आहे. हलर बसविण्यात खर्च कमी लागतो परंतु वर नमुद केलेल्या दोषांमुळे व तांदळाला पॉलिश करण्याचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याची सोय नसल्यामुळे ही यंत्रे बसविण्याला उत्तेजन न देण्याकडे शासनाचा कल आहे.

शेलर : लहान मोठे खडे, काडी कचरा वगैरे काढून भात साफ करणे, भरडून टरफल काढणे, टरफलापासून बगड वेगळी काढणे, भातगोटे वेगळे काढणे, बगडीला पॉलिश करून कणी व तांदूळ वेगळे काढणे या सर्व क्रिया अशा प्रकाराच्या गिरणीत क्रमाक्रमाने व आपोआप होतात. या गिरण्यांना मनुष्यबळ कमी लागते व त्यात तूस (टरफल), कोंडा, कणी व तांदूळ वेगळे काढून मिळतात, तसेच पॉलिशचे प्रमाण नियंत्रित करता येते. सडण्याच्या भातात वेगवेगळ्या आकारामानाचे दाणे असल्यास शेलरमध्ये सर्व भात भरडून निघत नाही. सुमारे २०% पर्यत भात मागे राहाते. हलरमध्ये एका तासात १६० ते २२५ किग्रॅ. भात भरडले जाते तर शेलरमध्ये १,००० ते १,२५० किग्रॅ. भात भरडले जाते.

आधुनिक भात गिरणी : या गिरणीत कोंडा काढण्यासाठी रबराचे रूळ बसविलेले असतात त्यामुळे तांदळात कणीचे प्रमाण कमी राहाते. शिवाय या गिरण्यांत उकडया तांदूळ तयार करण्यासाठी भातावर प्रक्रिया करण्याचीही सोय केलेली असते.

भारत सरकारने नियुक्त केलेल्या तज्ञांच्या शिफारसींप्रमाणे १९६४-६५ या काळात देशात सात ठिकाणी आधुनिक भात गिरण्या बसविण्यात आल्या. भारतात १९९६९-७० मध्ये सु. ६०,००० भात सडण्याची यंत्रे होती. त्यांत ५३,००० हलर ५,००० हलर-शेलर व २,००० शेलर पद्धतीची होती. बहुतेक यंत्रे ३० ते ५० वर्षापूर्वीची असल्याने त्यांची कार्यक्षमता कमी झालेली आहे.

हातसडीचा व गिरणीत सडलेला तांदूळ यांची तुलना : भात उखळात सडण्याचा अथवा यांत्रिक गिरणीत भरडण्याचा हेतू भाताचे टरफल वेगळे करणे व तांदळावरील कोंडयाचे थर काढणे (यालाच पॉलिश करणे असे म्हणतात) हा असतो. कोंडा काढून स्वच्छ केलेला तांदूळ चांगला शिजतो व साठवणी चांगला टिकतो. भाताचा अंकुर भरडण्यात निघून जातो. कोंडा व अंकुर यांमध्ये प्रथिने, ब जीवनसत्त्व व खनिज द्रव्ये असतात आणि जास्त पॉलिश करण्याच्या क्रियेत हे सर्व पदार्थ वाया जातात. यासाठी भारत सरकारने ५% पेक्षा जास्त प्रमाणात कोंडा काढण्यावर निर्बंध घातले आहेत. कमीत कमी ३% कोंडा काढणे आवश्यक असत. कारण तसे न केल्यास साठवणीत तांदूळ लवकर खराब होतो व आहारात त्याचा वापर केल्यास पचनाचे विकार जडतात. हातसडीच्या तांदळात ५% पेक्षा जास्त कोंडा काढला जात नाही आणि त्यामुळे गिरणीत सडलेल्या तांदळापेक्षा त्यात प्रथिने, जीवनसत्त्वे व खनिज द्रव्ये जास्त प्रमाणात असतात. [⟶ बेरीबेरी].

हातसडीमध्ये भाताच्या ७०% ते ७३% तांदूळ व कणी यांचे उत्पादन होते. हलर व शेलर प्रकारच्या यंत्रांत हे प्रमाण ६८% ते ७०% असते. शेलरमध्ये सडलेल्या तांदळांत संपूर्ण तांदळांचे प्रमाण जास्त असते. हातसडीच्या तांदळात कणीचे प्रमाण जास्त असते परंतु गिरणीत सडलेल्या तांदळापेक्षा तो जास्त पौष्टिक असतो. भरडण्यापूर्वी भात चांगले वाळविल्यास अथवा जुने, साठविलेले भात भरडल्यास कणीचे प्रमाण कमी असते. उशीरा कापलेल्या भाताचा तांदूळ केल्यास त्यात कणीचे प्रमाण जास्त असते.

हातसडीच्या तांदळापेक्षा अथवा बगडीपेक्षा गिरणीत सडलेल्या व चांगले पॉलिश केलेल्या आणि उकडया तांदळाला साठवणीत किडीचा उपद्रव कमी होतो. तसेच हातसडीच्या तांदळात अथवा कमी पॉलिश केलेल्या तांदळात कोंडयातील वसांचे प्रमाण जास्त असल्यामुळे साठवणीत खवटपणा उत्पन्न होतो आणि त्यामुळे वास व चव यांवर प्रतिकूल परिणाम होतो. तांदळात कणीचे प्रमाण जास्त असल्यास त्याला किडीचा उपद्रव जास्त होतो.

सडलेल्या तांदळावरील व्यापारी प्रक्रिया : गिरणीत पॉलिश केलेला तांदूळ आकर्षक दिसण्यासाठी व साठवणीत तो खराब होऊ नये यासाठी भारतातील काही भागांत निरनिराळे उपाय योजितात. हळद आणि पिवळी व तांबडी माती (ओकर) यांचा उपयोग तांदळाला रंग देण्यासाठी करतात. तसेच गव्हाचे अथवा मक्याचे पीठ, संगजिरे, सैंधवाची पूड. एरंडीचे तेल, शेंगदाणा तेल अथवा पांढरे खनिज तेल हे पदार्थ चोळून तांदळाचा मूळचा रंग जास्त उठून, दिसण्यासाठी अथवा दाण्याला चकाकी व तेज प्राप्त व्हावे यासाठी वापरतात. चांगल्या प्रतीच्या तांदळात हलक्या प्रतीच्या तांदळाची भेसळ ओळखता येऊ नये म्हणून अथवा नवा तांदूळ जुना म्हणून विकाण्यासाठीही या पद्धतींचा उपयोग काही वेळा केला जातो.

उकड्या तांदूळ : सर्वसाधारणपणे भात घरी अथवा गिरणीत सडून तांदूळ खाण्यासाठी वापरण्याची पद्धत आहे परंतु प. बंगाल, बिहार, ओरिसा, तमिळनाडू व केरळ या राज्यांत विशिष्ट प्रक्रिया करून भात सडण्याचा प्रघात आहे. या पद्धतीने तयार केलेल्या तांदळाला ‘उकडया तांदूळ’ म्हणतात आणि वरील राज्यांत तो मोठया प्रमाणावर आहारात वापरला जातो. या पद्धतीचा उगम भारतात झाला व ती प्राचीन काळापासून चालू आहे, असे म्हटले जाते. या पद्धतीत भात पाण्यात काही काळ भिजत घालून नंतर त्याला एकदा अगर दोन वेळा वाफेची उष्णता देतात. उष्णता दिल्यावर ते वाळवून भरडतात. ही पद्धत विशेषतः जाडया व मध्यम आकारमानाच्या आणि आतील भाग मऊ पिठूळ असलेल्या भाताच्या प्रकारांसाठी वापरण्यात येते, कारण अशा प्रकारांचे भात तसेच भरडल्यास फुटीचे प्रमाण जास्त असते. घरगुती पद्धतीने तयार केलेल्या उकडया तांदळाला वास कमी येतो आणि रंगही फारसा बदलत नाही परंतु व्यापारी पद्धतीने तयार केलेल्या उकडया तांदळापेक्षा हा तांदूळ कमी टणक असतो व त्यामुळे भात भरडताना कणीचे प्रमाण जास्त भरते. एका घरगुती पद्धतीत भातात पाणी घालून पाण्याला उकळी येईपर्यत तापवितात व सावकाश थंड केल्यावर पाणी काढून टाकून भात सावलीत पसरून वाळवितात व भरडून तांदूळ करतात. दुसऱ्या पद्धतीत भातात पाणी घालून पाण्याला उकळी आल्यावर त्यातील भात थंड पाण्यात २४ ते ३६ तास ठेवतात आणि पुन्हा उकळून व सावलीत वाळवून भरडतात. व्यापारी प्रमाणावर उकडया तांदूळ तयार करण्यासाठी भातावर प्रक्रिया करणाच्या निरनिराळ्या पद्धती आहेत आणि त्यात दिवसेंदिवस सुधारणा होत आहेत. प्रक्रिया करून उकडया तांदूळ तयार करण्यामध्ये पुढील फायदे असतात : (१) भात भरडताना भाताचे तूस सुलभतेने वेगळे होते. (२) दाणा टणक झाल्यामुळे भरडताना व पॉलिश करताना फूट कमी होऊन तांदळाचे प्रमाण जास्त राहाते. (३) उकडया तांदळाचे कवक व किडीपासून नुकसान होत नाही. (४) त्यातील प्रथिने व जीवनसत्वे नेहमीच्या पद्धतीप्रमाणे तयार केलेल्या तांदळापेक्षा जास्त प्रमाणात असतात कारण भरडण्यामध्ये ती कोंडयाबरोबर वाया जात नाहीत. (५) अशा तांदळाचा शिजविलेला भात मोकळा होतो व तो नेहमीच्या पद्धतीने तयार केलेल्या तांदळाच्या भातापेक्षा जास्त वेळ चांगला राहातो. हे सर्व फायदे असले, तरी भारतातील पुष्कळशा भागांत तो फारसा लोकप्रिय नाही याचे कारण त्याला अप्रिय वास येतो व त्याचा रंग आकर्षक नसतो. भातावरील प्रक्रिया करण्याचा सदोष पद्घतीमुळे हे सर्व दोष उदभवतात, असे आढळून आले आहे. या पद्धतीत सुधारणा करून वरील दोष नसलेला उकडया तांदूळ उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

भारताबाहेरील देशांत (उदा., मॉरिशस, दक्षिण आफ्रिका, अरब देश, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा) भारतातील तांदळाला जी मागणी आहे ती मुख्यत्त्वे करून बारीक व मध्यम प्रकारांच्या उकडया तांदळाची असते.

नवा व जुना तांदूळ : कापणीनंतर लवकरच तयार केलेल्या (नव्या) तांदळाचा भात कापणीनंतर सु. ६ महिने साठविलेल्या भातापासून तयार केलेल्या (जुन्या) तांदळाच्या भातापेक्षा कमी प्रतीचा असतो. नव्या तांदळाच्या भात चिकट असतो, शिजताना तो कमी फुगतो आणि खाल्ल्याने पचनाचे विकार होतात असे मानण्यात येते. जुना तांदूळ शिजल्यावर सु. चारपट फुगतो परंतु नवा तांदूळ जेमतेम दुप्पट फुगतो. चांगला फुगलेला भात पचनास सुलभ असतो कारण त्यात पाचक द्रव्यांचा शिरकाव चांगला होतो. नवा तांदूळ न साठविताही तो जुन्या तांदळाप्रमाणे शिजण्यालायक करण्यासाठी म्हैसूर येथील सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने एका साध्या पद्धतीचा शोध लावला आहे. या पद्धतीत नवा तांदूळ प्रथम पाण्यात भिजत घालून नंतर तो शिजविण्यापूर्वी सु. १० मिनिटे वाफारून घेतात. यासाठी विशिष्ट पद्धतीचे एक साधनही तयार करण्यात आले आहे.

उपयोग : भारतातील भाताच्या ऐकून उत्पादनापैकी सु. ८९% उत्पादन शिजवून भाताच्या स्वरूपात, सु.४.५% पोहे, मुरुमुरे (चुरमुरे) व लाह्या करण्यासाठी सु. ०.५% पशुखाद्य व अखाद्य उद्योगांसाठी आणि सु. ६.०% बिंयासाठी वापरले जाते. तांदूळ, पोहे, मुरमुरे व लाह्या ही मुख्य उत्पादने असून कोंडा [आणि त्यातील तेल व मेण ⟶कोंडा], तूस (टरफल) आणि पेंढा ही भाताची प्रमुख उप-उत्पादने आहेत.

तांदूळ : तांदाळाचा मुख्य उपयोग शिजवून भात करण्यासाठी आणि इडली, डोसा शेवया, पापड्या इ. खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी करतात. तसेच त्यापासून स्टार्च तयार करतात. स्टार्चाचा मुख्य उपयोग योग कापड उद्योगात आणि कपडे धुलाई उद्योगात होतो. पुडिंग, आईस्क्रीम,कस्टर्ड पावडर व सौंदर्यप्रसाधने यांसाठीही स्टार्चाचा थोडया प्रमाणात वापर केला जातो. भारतात मद्य तयार करण्यासाठी तांदळाचा मर्यादित प्रमाणात वापर होतो. कारण ते मद्य येथे फारसे लोकप्रिय नाही. चीन, जपान इ. पौर्वात्य देशांत तांदळापासून बिअर, वाइन वगैरे मद्य प्रकार मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात येतात. जपानमध्ये तांदळापासून तयार केलेले ‘साकी’ हे मद्य राष्ट्रीय पेय मानण्यात येते.

शिजविण्यापूर्वी तांदूळ पाण्यात धुतात त्याचा हेतू त्यातील माती, किडे, टरफले व दाण्याभोवती चिकटलेला स्टार्च धुवून काढण्याचा असतो.स्टार्च न धुता तांदूळ शिजविल्यास भातात चिकटपणा राहतो. धुण्याच्या क्रियेत पाण्यात विरघळणारी पौष्टिक द्रव्येही निघून जातात आणि त्यांचे प्रमाण तांदळातील काढलेल्या कोंड्याचे प्रमाण व तांदूळ धुण्याचे प्रमाण यावर अवलंबून असते. गिरणीत सडलेल्या तांदळातून चोळून जास्त प्रमाणात धुतल्यास त्यातील ५५% थायामीन जीवनसत्व वाया जाते परंतु उकड्या तांदूळ तशाच प्रकारे धुतल्यास फक्त ९% थायामीन जीवनसत्त वाया जाते. तांदूळ धुण्याच्या क्रियेत खनिज द्रव्येही मोठ्या प्रमाणावर वाया जातात. गिरणीत सडलेल्या तांदळातून सु. ५६% लोह धुण्यात वाया जाते. उकडया तांदळातील बहुतेक सर्व कॅल्शियम धुण्यात निघून जातो परंतु गिरणीत सडलेल्या तांदळातून तो जवळ जवळ मुळीच वाया जात नाही.

तांदूळ शिजविताना त्यात प्रथम जास्त पाणी घालून तो शिजल्यावर जास्त असलेले पाणी ओतून काढण्याची पद्धत पुष्कळ ठिकाणी प्रचलित आहे परंतु ती फार सदोष आहे कारण ओतून काढलेल्या पाण्यात थायामीन जीवनसत्त्व वाया जाते. फार चोळून धुणे व वरील पद्धतीने शिजविणे यांमध्ये पुढीलप्रमाणे पोषक द्रव्ये व खनिजे वाया जातात : थायामिन ८५%, प्रथिने १०%, लोह ७५%, कॅल्शियम व फॉसफरस ५०%.

म्हैसूर येथील सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट व दिल्ली येथील डिफेन्स सायन्स लॅबोरेटरी यांनी अल्प काळात भात तयार करण्यासाठी ‘झटपट भात’ या अगोदरच शिजवून तयार केलेल्या भाताची प्रक्रिया विकसित केली आहे.

मुरमुरे, लाह्या व पोहे : मुरमुरे तयार करण्यासाठी उकडया तांदूळ विशेष पसंत केला जातो कारण त्यापासून ८५-९०% मुरमुऱ्याचे उत्पादन मिळते. साध्या तांदळापासून फक्त सु. ५८.५% मुरमुरे मिळतात. लाह्या व पोहे तयार करण्यासाठी तुसासह भात वापरतात व त्यापासून ६१% लाह्या व सु. ६४% पोहे मिळतात. मुरमुरे, लाह्या व पोहे सामान्यतः कुटिरोद्योग स्वरूपात तयार करण्यात येतात. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, प. बंगाल, बिहार व ओरिसा ह्या राज्यांत मोठया प्रमाणावर तर इतर राज्यांत गरजेनुसार यांचे उत्पादन करण्यात येते.

मुरमुरे तयार करण्याची पद्धत प्रदेशपरत्वे किरकोळ बदल वगळता, सर्वत्र सारखीच आहे. उघडया मातीच्या वा लोखंडी घमेल्यात वाळू गरम करतात व तीत दोन-तीन मुठी तांदूळ टाकतात व व लगेच हलवितात. तांदूळ फुलल्यावर बारीक छिद्रे असलेल्या झाऱ्याने वाळूसह मुरमुरे बाहेर काढतात व चाळतात. आवश्यकतेनुसार तांदळावर मिठाचे पाणी शिंपडतात व खारे मुरमुरे तयार करतात.

लाह्या तयार करण्यासाठी भात एक दिवस उन्हात वाळवून संध्याकाळी मातीच्या भांड्यात भरतात व त्यात गरम पाणी ओततात. हे पाणी झिरपून जाते. नंतर जमिनीवर भांडे रात्रभर उलटे करून ठेवतात. दुसऱ्या दिवशी भात अल्प काळ उन्हात ठेवतात व ओले असतानाच बुडवितात व त्यावरील पुढील प्रक्रिया वरीलप्रमाणेच करतात. पाखडून कोंडा अलग करतात.

पोहे तयार करण्यासाठी भात दोन-तीन दिवस पाण्यात भिजत ठेवतात, नंतर ते पाण्यात काही मिनिटे शिजवितात. थंड झाल्यावर भात काढून उथळ मातीच्या वा लोखंडाच्या तव्यात टरफल उकलेपर्यंत गरम करून मग उखळात लाकडी मुसळाने बुडवून भात चपटे करतात आणि टरफल अलग करतात. यांत्रिक पद्धतीत रुळांचा वापर करून त्यांवर योग्य दाब देऊन पातळ पोहे तयार करतात. पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीने तयार केलेल्या पोह्यांत उकड्या तांदळाप्रमाणेच जीवनसत्त्वे असतात. खराब न होता पोहे कित्येक महिने साठवून ठेवता येतात.

कोंडा : तांदळाचा कोंडा हे चांगल्या प्रतीचे पशुखाद्य आहे. कोंड्यात बहुतेक करून तूस मिसळलेले असते. शेलर प्रकारच्या यंत्रातील कोंड्यात तुसाचे प्रमाण बरेच कमी असते परंतु हलर प्रकारच्या यंत्रात तुसाचा भुगा होऊन तो कोंड्यात मिसळतो. अशा प्रकारचा कोंडा जनावरांना खाऊ घालणे इष्ट नसते कारण त्यापासून पचनाचे विकार होण्याचा संभव असतो. तूस नसलेला कोंडा जनावरांना फार पौष्टीक असतो. त्यात सु. २५% तेल असून त्याचा उपयोग खाद्य तेल म्हणून अथवा वनस्पती व साबण उद्योगांत करतात. कोंड्यापासून तेल काढताना त्यापासून ३ ते ९% मेणाचे उप-उत्पादन मिळते. त्याचा उपयोग फळांवर व भाज्यांवर थर देण्यासाठी, सौंदर्यप्रसाधनात आणि कार्बन कागद तयार करण्यासाठी करतात. [⟶कोंडा].

तूस : भारतात तुसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असले, तरी त्याला व्यापारी महत्त्व नाही. त्याचा बहुतांशाने भात गिरण्यांत उकड्या तांदूळ तयार करण्याच्या यंत्रसामग्रीत अगर विटांच्या भट्ट्यांत जळण म्हणून उपयोग करतात. दगडमातीची घरे बांधताना चिखलात तूस मिसळतात, तुसापासून कंपोस्ट खत बनवितात व ते शेणखताइतकेच चांगले असते. तूस जाळून त्याचा कोळसा साखर स्वच्छ करण्यासाठी वापरतात. तांदळाला पॉलिश करण्यासाठीही तुसाचा उपयोग करतात. खडबडीत व कडक साबण तयार करण्यासाठीही तुसाचा भुगा त्यात घालतात. बांधकामामध्ये हलक्या व स्वस्त विटा करण्यासाठीही तुसाचा भुगाही त्यात घालतात. बांधकामामध्ये हलक्या व स्वस्त विटा करण्यासाठीही त्याचा वापर करण्यात येतो. कलकत्ता येथील सेंट्रल ग्लास अँड सिरॅमिक रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेने तुसाच्या राखेपासून सोडियम सिलिकेट तयार करण्याची पद्धत शोधून काढली आहे. सोडियम सिलिकेटाचा उपयोग साबण, प्रक्षालके (डिटर्जंट), आर्द्रताशोषक यांसाठी कोला जातो. पंजाब राज्याच्या उद्योग विस्तार मंडळाने पंजाब राज्याच्या उद्योग विस्तार मंडाळाने तुसापासून ⇨ फुरफुराल हे महत्त्वाचे संयुग तयार करण्यासाठी प्रकल्प हाती घेतला आहे. त्यामुळे हा पदार्थ आयात करण्यायाठी खर्ची पडणारे परकीय चलन वाचेल. तुसात १५% सिलिका (SiO2) नावाचा पदार्थ असतो. त्यापासून अतिशुद्ध असे सिलिकॉन मिळते. त्याचा उपयोग इलेक्ट्रॉनीय उद्योगात व सौर विद्युत घटात (सौर ऊर्जेचे सरळ विद्युत् उर्जेत रूपांतर करणाऱ्या प्रयुक्तीत) करतात.

पेंढा : (भातेण, भात्याण अथवा पिंजार). भाताचा पेंढा बहुतांशी जनावरांना खाऊ घालतात. तो इतर तृणधान्यांचा पेंढ्याप्रमाणेच कमी पौष्टिक असतो. यासाठी केवळ पेंढा न देता तो हिरव्या चाऱ्याबरोबर अथवा गळित धान्याच्या पेंडीबरोबर खाऊ घालणे इष्ट असते. पेंढ्यावर विशिष्ट पद्धतीने प्रक्रिया केल्यास त्याची सकसता वाढते. पेंढ्यापासून कागद, पुठ्ठे, हॅट, चट्या, दोऱ्या व टोपल्या तयार करतात. घरांच्या छपरांसाठीही त्याचा वापर केला आहे.

तांदळाची प्रत : तांदाळाच्या लांबी व रूंदी यांच्या गुणोत्तरावरून बारीक, मध्यम व जाड अशा तीन प्रती ओळखल्या जातात. हे वर्गीकरण सापेक्ष आहे. बारीक प्रतीमध्ये हे गुणोत्तर ३ पासून ३.७५ पर्यंत असते मध्यम प्रतीमध्ये ते २.५ पेक्षा जास्त व जाड तांदळात ते २.५ पेक्षा कमी असते. बारीक प्रतीत लांब बारीक व आखूड बारीक असे भेद आहेत. उत्तर प्रदेशातील डेहराडून बासमती, हंसराज, सहाराणपूर सेलाबासमती आणि रायमुनिया, पंजाबचा परमल प. बंगालचा पटनाई आणि बिहारचे कलमकट्टी व कलमदान हे लांब बारीक तांदळाचे प्रमुख व्यापारी प्रकार आहेत. लांबी-रूंदीचे गुणोत्तर सहाराणपूर सेलाबासमतीमध्ये सर्वांत जास्त म्हणजे ३.८३ असते. परमलमध्ये ते ३.७१ आणि डेहराडून बासमती मध्ये ते ३.६० असते. महाराष्ट्रातील कमोद, कोळंबा, जिरेसाळ, कोळपी, काळीकमोद, चिन्नूर हे प्रमुख व्यापारी प्रकार आखूड बारीक या प्रतीत मोडतात. लुचाई व आंबेमोहोर हे मध्यम प्रतीचे प्रकार असून पटणी प्रकार ‘जाड’ प्रतीचा आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जाड प्रतीच्या तांदळाच्या उत्पादनावर भर देण्यात आला आहे कारण त्याचे हेक्टरी उत्पादन बारीक व मध्यम प्रतीच्या प्रकारांपेक्षा जास्त असते आणि तांदळाचे उत्पादनही जास्त मिळते.

आयात व निर्यात : १९७८ ते १९८० या काळात भारतात तांदळाची आयात झाली नाही. बासमती तांदूळ परवान्याशिवाय निर्यात करता येतो. १९८० मध्ये १० लक्ष टन बिगर-बासमती तांदळाच्या निर्यातीला परवानगी देण्यात आली.

तांदळाचा खप : आशिया खंडात भाताचा दर माणशी वार्षिक खप सु. ९५ किग्रॅ. आहे व रोजच्या आहारातील कॅलरीपैकी एक तृतीयांश ते निम्मा कॅलरी भातातून मिळतात. तसेच या खंडातील लोकांच्या आहारातील प्रथिने मुख्यत्वेकरून भातातून मिळतात. अमेरिकेत माणशी वार्षिक भाताचा खप फक्त ५ किग्रॅ. आहे. भारतात आसाम, मणिपूर, त्रिपुरा, दक्षिण बिहार, पश्चिम बंगाल, ओरिसा, महाराष्ट्रातील समुद्रकिनारी प्रदेश व पूर्वेकडील जिल्हे, कर्नाटकाचा दक्षिण व समुद्रकिनारी प्रदेश, तमिळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश व पंजाबचे डोंगरी जिल्हे, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या प्रदेशांतील लोकांच्या आहारात तांदळाला प्राधान्य असते. पंजाब, उत्तर प्रदेशाचा पश्चिमेकडील भाग, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये उन्हाळ्याच्या २-३ महिन्यांत भाताचा खप जास्त असतो. पावसाळ्यात फारच कमी भात खाण्यात येतो. तांदळाचा सर्वांत जास्त माणशी खप आसाममध्ये असून डोंगरी जिल्हे वगळता पंजाबमध्ये तो सर्वांत कमी आहे.

भात संशोधन केंद्रे : फिलिपीन्समधील लॉस बान्यस येथे इंटरनॅशनल राइस रिसर्च इन्स्टिट्यूट ही भात संशोधनाची आंतरराष्ट्रीय संस्था रॉकफेलर फाउंडेशन व फोर्ड फाउंडेशन यांच्या सहकार्याने १९६२ मध्ये स्थापन झाली. भारतात कटक येथे सेंट्रल राइस रिसर्च इन्सस्टिट्यूट ही केंद्रीय भात संशोधन संस्था १९४६ साली भारत सरकारणे स्थापन केली. भात उत्पादनाशी संबंधित अशा निरनिराळ्या विषयांवर मौलिक संशोधन या संस्थेत केले जाते. निरनिराळ्या राज्यांत भात संशोधनाची एकूण ८२ केंद्रे आहेत. महाराष्ट्रात कर्जत (जि. रायगड) येथे प्रमुख भात संशोधन केंद्रे असून निरनिराळ्या जमिनींच्या व हवामानांच्या प्रदेशांत विखुरलेली अशी १२ उपकेंद्रे आहेत. प्रत्येक केंद्रात तीन प्रकारचे काम चालते. (१) वनस्पती सुप्रजाजननशास्त्राच्या [⟶सुप्रजाजनशास्त्र] आधारे नवीन प्रकारांची निर्मिती करणे. (२) सुधारलेल्या जातिवंत प्रकारांच्या शुद्ध बियांचे गुणन व पुरवठा करणे. (३) हेक्टरी उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने खत व पाणी देण्याच्या आणि इतर मशागतीच्या पद्धतींत सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयोग करणे.

भात खाचरात मत्स्यपालन : समुद्राच्या भरतीच्या पाण्याबरोबर आणि नदीनाल्यांच्या पाण्यातून भात खाचरात मासे वाहून येतात व भात पिकविणारे लोक शेतातील पीक कापल्यावर ते पकडतात अथवा शेतात पाणी असताना जाळी लावूनही पकडतात परंतु जोड व्यवसाय म्हणून त्याकडे पाहिले जात नाही. पद्धतशीरपणे हा व्यवसाय केल्यास दर्जेदार माशांचे उत्पादन करून जास्त उत्पन्न मिळते एवढेच नव्हे, तर अशा माशांच्या निर्यातीमुळे परकीय चलनही मिळते. १९७० नंतर प. बंगालमधील चोवीस परगणा जिल्ह्यात समुद्राच्या भरतीच्या खाऱ्या पाण्यात पेनीयस मोनोडॉन या जातीच्या कोळंबीचे उत्पादन वाढत्या प्रमाणावर होत आहे. सुमारे २०,००० हे. भाताच्या खाचरांत या कवचधारी प्राण्याचे उत्पादन होते व त्याच्या परदेशी निर्यातीला बराच वाव आहे. आंध्र प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेशात गोड्या पाण्याच्या सोपान पद्धतीच्या भात खाचरांत मत्स्योत्पादन केले जाते परंतु ते विशेष फायदेशीर नसते. याला अनेक कारणे आहेत. उन्हाळ्यातील जास्त तापमानामुळे मासे मरतात तसेच साप, पक्षी वगैरे प्राणी मासे खातात. शिवाय भातपिकावर रोग व किडीसाठी मारलेली कवकनाशके व कीटकनाशके पुराच्या पाण्यातून वाहून येतात व ती माशांना विषारी असतात. या सर्व कारणांचा अभ्यास करून मत्स्योत्पादन फायदेशीर करता यावे याबाबत शासनाचे प्रयत्न चालू आहेत. आंध्र प्रदेशात सिंचाईखालील काही भात खाचरे केवळ मत्स्यबीजोत्पादनासाठी राखून ठेवली जातात कारण त्यापासून भातापेक्षा तीनपट जास्त उत्पन्न मिळते.

मुंबई येथील मच्छीमारी शिक्षण संस्थेने भात खाचराच्या एका भागात छोटा तलाव निर्माण करून त्यात मासे व माशाची अंडी निर्माण करण्याचे मिश्रशेतीचे नवे तंत्र शोधून काढले आहे. भाताच्या एका हेक्टर शेतातून सु. ५,००० उत्पन्न मिळत असेल, तर तेवढ्याच क्षेत्रात माशांची अंडी निर्माण करण्यामुळे रु. १७,००० पर्यंत उत्पन्न मिळू शकते, असे सिद्ध झाले आहे. तसेच प. बंगालमध्ये बरॅकपूर येथील सेंट्रल फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटने सुधारित पद्घतीने गोड्या पाण्याच्या भात खाचरांत किफायतशीर मत्स्योत्पादन करून दाखविले आहे. नवीन पद्धतीत भातशेताच्या कडेला चारही बाजूंना बांध असतो व बांधाच्या आतील बाजूला भातशेताभोवती १.२ मी. खोल व तळाशी ३.६ मी. व वरच्या बाजूला ६ मी. रुंद असे खंदक खणतात व त्यात पाणी असते. खरीप हंगामात मे महिन्यात रोग व कीटक यांना प्रतिकारक आणि खोल पाण्यात जलद गतीने वाढणारा भाताचा प्रकार पेरतात. पेरणीनंतर एक महिन्याने रोहू, कटला व मृगळ या जातींची पिले शेतातील पाण्यात सोडतात व त्यांना भाताचा कोंडा आणि मोहरीच्या पेंडीची पूड १ : १ या प्रमाणात मिसळून खाऊ घालतात. डिसेंबरमध्ये भाताची कापणी झाल्यावर शेत वाळू देतात. त्या वेळी मासे खंदकातील पाण्यात जातात. रबी हंगामात जास्त उत्पन्न देणारे भाताचे प्रकार (उदा., रत्ना, जया) लावतात व त्यांवर कीटकनाशकांची फवारणी करतात परंतु कीटकनाशके खंदकातील पाण्यात मिसळू नये यासाठी भातक्षेत्राच्या कडेने लहान बांध घालतात (खरीप पिकावर फवारणी करीत नाहीत). जरुर पडल्यास खंदकातील पाणी रबी भातशेतीसाठी घेता येते. (चित्रपत्र १७).

पहा : ग्रॅमिनी ग्रॅमिनेलीझ.

संदर्भ : 1. C.S.I.R. The Wealth of India Raw Materials, Vol. VII, New Delhi 1966.

2. C.S.I.R. The Wealth of India, Industrial Products, Part VII, New Delhi, 1971.

3. Ghose, R. L., M. Ghatge, M.B. Subramanyan, V.Rice in India, New Delhi 1960.

4. Ministry of Food and Agriculture, Government of India, Rice Cultivation in Indian, (Farm Bulletin No.1) New Delhi, 1960 .

5. Poehlman, I.M. Borthakur, D., Breeding Asian Field Crops, Bombay. 1969.

6. Vaidya, V.G. Sahasrabuddhe, K.R. Khuspe, V. S. Crop Production and Field Experimentation, Poona, 1972.

७. काशीकर, चिं. ग. भारतीय वनस्पतींचा इतिहास, नागपूर, १९७४.

८. कृषि संचालनालय, महाराष्ट्र राज्य, भरघोस जातीच्या भाताची लागवड (माहितीपत्रक क्र. १४३), पुणे, १९७५.

९. तत्ववादी, गो. रा. भात, पुणे, १९६६.

ठोंबरे, म, वा.च परांडेकर, शं. आ. तत्त्ववादी, गो. रा.

गोखले, वा.पु. रुईकर, स. के.