लोइकार्ट, (कार्ल गेओर्ख फ्रीड्रिख) रूडोल्फ: (७ ऑक्टोबर १८२२−६ फेब्रुवारी १८९८). जर्मन प्राणिवैज्ञानिक. त्यांचा जन्म हेल्मश्टेट येथे व शिक्षण तेथील खाजगी शाळेत झाले. विद्यार्थीदशेत त्यांनी कीटकांच्या नमुन्यांचा संग्रह केला होता व तेव्हाच त्यांनी प्राणिवैज्ञानिक होण्याचे ठरविले. १८४२ मध्ये त्यांनी गर्टिगेन विद्यापीठात वैद्यकाचा अभ्यासक सुरू केला. लवकरच त्यांचा रूडोल्फ व्हाग्नर या प्राणिवैज्ञानिकांशी परिचय झाला. १८४५ मध्ये व्हाग्नर यांनी लोइकार्ट यांना स्वतंत्रपणे संशोधन करण्यास प्रोत्साहन दिले व आपल्या संस्थेमध्ये त्यांना साहाय्यक म्हणून घेतले. त्याच वर्षी लोइकार्ट यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रबंधास विद्यापीठाचे पारितोषिक मिळाले व लगेचच ते साहाय्यक व्याख्याते झाले. १८४७ मध्ये लोइकार्ट गर्टिगेन विद्यापीठात प्राणिविज्ञानाचे व्याख्याते झाले. पुढील वर्षी ते जर्मनीच्या उत्तर समुद्र किनाऱ्याच्या पहिल्या शोध मोहिमेवर गेले. तेव्हा त्यांनी सागरी अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) प्राण्यांवर संशोधन केले.  त्यातूनच आंतरगुही संघ (फायलम सीलॅटेरेटा) प्रस्थापित झाला.

इ.स. १८५० मध्ये त्यांची गीसेन विद्यापीठात प्राणिविज्ञानाचे सहयोगी प्राध्यापक म्हणून नेमणून झाली. येथेच त्यांची भावी पत्नीशी भेट झाली व दोघांनी १८५०−६९ या काळात मानवी व प्राणी परजीवींवर (इतर जीवांवर उपजीविका करणाऱ्या प्राण्यांवर) संशोधन केले. त्यामुळे त्यांना जागतिक किर्ती मिळाली. १८६९ मध्ये ते लाइपसिक विद्यापीठात दाखल झाले. १८८० मध्ये लोइकार्ट यांच्या इच्छेप्रमाणे प्राणिवैज्ञानिक संस्था उभारण्यात आली. तेथे जगातील अनेक प्राणिवैज्ञानिक अतिथी संशोधक म्हणून येत होते. लोइकार्ट यांची शिकविण्याची हातोटी व विचारातील स्पष्टपणा यांमुळे त्यांना अनेक जागतिक कीर्तीचे विद्यार्थी लाभले. 

इ.स. १८४७-४८ मध्ये त्यांनी क्यूव्ह्ये यांच्या रेडिॲटा या प्राणिगटाचे सीलेंटेरेटा व एकायनोडर्माटामध्ये विभाजन केले. त्यांच्या या पहिल्या वैज्ञानिक कार्यामुळे प्राणिविज्ञानात नव्या पर्वाला सुरुवात झाली म्हणजेच प्राण्यांचे वर्गीकरण सूक्ष्म आकारवैज्ञानिक अनुसंधानावर आधारले गेले. मेटॅझोआ संघाचे सहा प्रमुख संघांत विभाजन हे त्यांचे कार्य अभिजात समजले जाते. १८५२ मध्ये कार्ल गेओर्ख बर्खमान यांच्या सहकार्याने त्यांनी Die anatomisch−pohysiologische ϋbersicht des Tierreichsहे पुस्तक प्रसिद्ध केले. त्यामध्ये लोइकार्ट यांनी क्रियावैज्ञानिक दृष्टिकोनावर जास्त भर दिला होता. त्यामुळे पुष्कळ परजीवींच्या विकासाच्या प्रक्रियांचा शोध घेणे शक्य झाले. कनिष्ठ दर्जाच्या प्राण्यांची लैंगिक इंद्रिये व अनिषेकजनन तसेच बहुरूपता या विषयांत त्यांना विशेष रस होता. पेंटास्टोमम, टीनिया, यकृत कृमी व ट्रिकिना स्पायरॅलिस यांच्यावरील त्यांचे संशोधन मोलाचे असून टीनिया सॅजिनाटा कृमी फकत गुराढोरांत तर टी. सोलियम कृमी फक्त डुकरात आढळतो, असे त्यांनी दाखवून दिले. 

परजीवीविज्ञानातील त्यांच्या कार्याचे फळ म्हणजे Die menschlichen Parasiten (१८३६−७६ द पॅरासाइट्स ऑफ मॅन, १८८६) हा दोन खंडातील ग्रंथ होय. सॅक्सनी राजाचे विशेष खाजगी सल्लागार, गीसेन विद्यापीठाची सन्मानयीय पीएच्. डी. पदवी  (१८६१), सेंट पीटर्झबर्गच्या इंपीरियल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सन्माननीय सदस्यत्व, तसेच सर्वोच्च प्रशियन व बव्हेरियन सन्मान हे बहुमान त्यांना मिळाले होते. १८७३ मध्ये ते तत्त्वज्ञान विभागाचे अधिष्ठाता व  १८७७-७८ मध्ये लाइपसिक विद्यापीठाचे कुलमंत्री (रेक्टर) होते. ते लाइपसिक येथे मृत्यू पावले. 

 

जमदाडे, ज. वि.