फोर्ट विल्यम –२ : ग्रेट ब्रिटनच्या स्कॉटलंड विभागातील इन्व्हर्नेस काउंटीतील शहर व पर्यटन स्थळ. लोकसंख्या ४,३०१ (१९७१). हे ग्‍लासगोच्या वायव्येस १२०किमी. बेन नेव्हिस (१,२२१मी.) या ग्रेट ब्रिटनमधील सर्वोच्‍चशिखराच्या पायथ्याशी, लॉख लिनी नावाच्या समुद्रफाट्याच्या किनाऱ्यावर वसले आहे. पाण्यापासून निर्मिलेल्या विजेने रस्त्यांवरील प्रकाशयोजना करण्यात आलेले ग्रेट ब्रिटनमधील हे पहिले शहर होय.

जनरल जॉर्ज मंग्क (१६०८–७०) याने या परिसरात शांतता राखण्याच्या हेतूने १६५४मध्ये किल्ला बांधला. त्याची पुनर्रचना जनरल ह्यू माकाय याने १६९०साली केली आणि त्यास ब्रिटनचा राजा तिसरा विल्यम (१६५०-१७०२) याचे नाव दिले. जॅकोबाइट पंथीय स्‍कॉटिश राष्ट्रवाद्यांनी १७१५व १७४६मध्ये या किल्ल्यास वेढा दिला होता परंतुदोन्ही वेळा त्यांना हा किल्ला जिंकता आला नाही. १८९०साली लोहमार्गाच्या सोयीसाठी हा किल्ला पाडण्यात आला. नंतर या किल्ल्याचेच नावशहरास मिळाले. शहराजवळच सु. ४·८किमी.वर इन्व्हेर्लॉची नावाच्या किल्ल्याचे अवशेष असून तेथे प्रेसबिटेरियन सैन्याचा माँट्रोझने१६४५मध्ये पराभव केला होता.

येथे ॲल्युमि‌नियम उद्योग प्रमुख असून, ऊर्ध्वपातन भट्‍ट्याही आहेत. याचा परिसर निसर्गसुंदर असल्याने अनेक पर्यटक येथे येतात. बेन नेव्हि‌स शिखरावर जाण्यासाठी हे सुरुवातीचे ठाणे होय. येथील वेस्ट हायलँड म्यूझीयम प्रेक्षणीय आहे.

गाडे, ना. स.