बोझांकेट, बर्नार्ड : (१४ जून १८४८ – ८ फेब्रुवारी १९२३). प्रसिद्ध केवल चिद्‌वादी ब्रिटीश तत्त्ववेत्ता. ह्या कालखंडातील सर्वश्रेष्ट ब्रिटिश तत्त्ववेत्ते ⇨ फ्रान्सिस हर्बर्ट ब्रॅड्‌ली  यांच्याशी बोझांकेट यांचे नाव निगडित होते. हेगेलला अनुसरणाऱ्या केवल चिद्‌वादाची ब्रिटनमध्ये सुव्यवस्थित मांडणी करण्यात हे दोघे तत्त्ववेत्ते अग्रेसर होते आणि त्यांचा परस्परांवर प्रभावही होता.

बोझांकेट यांचा जन्म नॉर्थम्‌बरलंडमधील आल्नविक जवळील रॉक हॉल येथे झाला. त्यांचे वडील पाद्री (क्लर्जिमन) होते. त्यांचे शिक्षण हॅरो आणि बेल्यल कॉलेज, ऑक्सफर्ड येथे झाले. १८७१ ते १९८१ पर्यंत ते ऑक्सफर्ड विद्यापीठात प्राचीन इतिहास आणि तत्त्वज्ञान या विषयांचे अध्यापक होते. त्यानंतर लंडन येथे ‘लंडन एथिकल सोसायटी’ आणि ‘चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटी’ या संस्थात त्यांनी सक्रिय भाग घेतला. १९०३ ते १९०८ या कालखंडात सेंट अँड्रयूज विद्यापीठात ते नैतिक तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांचा मृत्यू लंडन येथे झाला.

बोझांकेट हे बहुप्रसव लेखक होते आणि तर्कशास्त्र, सौंदर्यशास्त्र, नीतीशास्त्र, सामाजिक तत्त्वज्ञान आणि तत्त्वमीमांसा ह्या तत्त्वज्ञानाच्या सर्व शाखांवर त्यांनी लिखाण केले आहे. नॉलेज अँड रिॲलिटी  (म. शी. ज्ञान व वास्तवता – १८८५), लॉजिक ऑर द मॉर्फालॉजी ऑफ नॉलेज   (तर्कशास्त्र किंवा ज्ञानाचा रुपविचार -१८८८), हिस्टरी ऑफ इस्थेटिक्स  (सौंदर्यशास्त्राचा इतिहास – १८९२), फिलॉसॉफिकल थिअरी ऑफ द स्टेट  (राज्यसंस्थेची तत्त्वज्ञानात्मक उपपत्ती – १८९९), द प्रिन्सिपल ऑफ इंडिव्हिज्युॲलिटी अँड व्हॅल्यू   (व्यक्तित्व आणि मूल्य यांचे तत्त्व – १९१२) आणि द व्हॅल्यू अँड डेस्टिनी ऑफ द इंडिव्हिज्युअल  (व्यक्तीचे मूल्य आणि भवितव्य – १९१३) हे त्यांचे विशेष प्रसिद्ध व प्रभावी ग्रंथ होत. बोझांकेट यांच्या मताप्रमाणे अंतिम दृष्ट्या पहाता तर्कशास्त्र, तत्त्वमीमांसा आणि ज्ञानशास्त्र यांची एकमेकांपासून फारकत करता येत नाही. एका विधानापासून दुसऱ्या विधानाचे अनुमान करता येते ह्याचे कारण असे, की विधाने सुटी आणि एकमेकांपासून अलग नसतात. ती एकमेकांत ‘अनुस्यूत’ असतात. पण ह्याचा अर्थ असा होतो, की ज्या वस्तुस्थितीविषयी (फॅक्ट्स) ही विधाने असतात त्या वस्तुस्थितीही परस्परांत अनुस्यूत असतात, त्यांची एक व्यवस्था असते. वस्तू, घटना, वस्तुस्थिती यांची सर्वसमावेशक आणि सुसंगत व्यवस्था म्हणजे वास्तवता किंवा सत्.

वास्तवतेचे ज्ञान करून देणे हे तर्काचे उद्दिष्ट असते. म्हणून तर्काची सुरुवात जरी वस्तुस्थितीपासून झाली, तरी ज्या सुसंगत व्यवस्थेचा वस्तुस्थिती हा घटक असतो आणि जिच्या इतर घटकांशी असलेल्या संबंधातून ह्या वस्तुस्थितीचे स्वरुप निर्णित झालेले असते, त्या व्यवस्थेचा शोध तर्क सतत घेत असतो. म्हणून बोझांकेट निर्णय किंवा विधान (जज्‌मेंट) आणि अनुमान यांच्यात मूलगामी भेद आहे असे मानीत नाहीत. निर्णय वस्तुस्थितीविषयीचा असतो, तर अनुमानात एका वस्तुस्थितीपासून दुसरी वस्तुस्थिती निष्पन्न करून घेण्यात आलेली असते. पण कोणत्याही वस्तुस्थितीमध्ये तिचे इतर वस्तुस्थितींशी असलेले संबंध अनुस्यूत असतात. म्हणून वस्तुस्थितीचे स्वरूप निश्चित करणाऱ्या निर्णयामध्ये तिचे इतर वस्तुस्थितींशी असलेले संबंध अस्फुटपणे (इम्प्लिसिट्ली) अंतर्भूत असतात आणि अनुमानामध्ये ते सुस्पष्टपणे व्यक्त होतात. अनुमानामध्ये आधारविधानांपासून निघून आपण निष्कर्षापर्यंत पोहोचतो आणि मग आधारविधाने सोडून देऊन निष्कर्ष काय तो स्वीकारतो असे अनुमानाचे स्वरूप असते, असे सर्वसाधारणपणे मानले जाते. हे मत बोझांकेट यांना अमान्य आहे. अनुमानामध्ये विधान (किंवा वस्तुस्थिती) ज्या संबंधाद्वारे इतर विधानांशी (किंवा वस्तुस्थितींशी) जोडले जाऊन एका सुसंगत व्यवस्थेत समाविष्ट झालेले असते, ते संबंध स्पष्ट केलेले असतात. वस्तुस्थितींची सुसंगत रचना हे अनुमानाचे फलित असते सुटा निष्कर्ष नव्हे.

निरपेक्ष (कॅटेगोरिकल) निर्णय, सोपाधिक (हायपॉथेटिकल) निर्णय आणि वियोजनात्मक (डिस्‌जन्क्टिव्ह) निर्णय ही सुसंगत व्यवस्थेचा शोध घेणाऱ्या विचाराने धारण केलेली वेगवेगळी रुपे होत. निरपेक्ष निर्णय हा विशिष्ट वस्तुस्थितीविषयी असतो. पण आपण पाहिल्याप्रमाणे विशिष्ट वस्तुस्थिती ही नेहमी स्वतःपलीकडे जाणारी, इतर वस्तुस्थितींशी संबंधित अशी असते. सोपाधिक निर्णयात वस्तुस्थितीचे विशिष्टत्व मागे पडलेले असते आणि तिच्या इतर वस्तुस्थितींशी असलेल्या अनिवार्य संबंधावर भर देण्यात आलेला असतो. वैकल्पिक निर्णयात निरपेक्ष निर्णयाचे विशिष्टत्व किंवा मूर्तत्व आणि सोपाधिक निर्णयाची अनिवार्यता यांचा संगम झालेला असतो. जिच्या ठिकाणी आंतरिक अनिवार्यता आहे अशा एका सुसंगत व्यवस्थेचे वर्णन वैकल्पिक निर्णय करीत असतो. तेव्हा निरपेक्ष, सोपाधिक व वैकल्पिक निर्णय ही वास्तवतेचे स्वरुप समजून घेणाऱ्या विचाराची अधिकाधिक विकसित रुपे होत.  

निगमन आणि विगमन असे जे अनुमानाचे दोन प्रकार मानले जातात तेही मूलतः भिन्न आहेत, असे बोझांकेट मानीत नाहीत. अखेरीस वस्तुस्थितींची सुसंगत व सुव्यवस्थित रचना करणे हे अनुमानाचे कार्य असते आणि ह्या कार्याला हे अनुमानप्रकार वेगवेगळ्या रीतीनी साहाय्य करीत असतात. विशिष्ट वस्तुस्थितीशी आपली जी ओळख होते ती प्रत्यक्षानुभव किंवा निरीक्षण यांच्या द्वारा होते खरी आणि दोन प्रकारच्या घटनांमध्ये किंवा गुणांमध्ये जे नियमबद्ध संबंध असतात, त्यांची माहितीही आपल्याला ह्या द्वारे होते. पण ही माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. हे जे संबंध आढळून येतात, ते जसे आहेत तसे ते असणे अनिवार्य आहे, असे आकलन होणे म्हणजे त्यांचे ज्ञान होणे. घटकांच्या परस्परांशी असलेल्या अनिवार्य संबंधातून वास्तवतेचे, एक सुसंगत व्यवस्था असलेल्या वास्तवतेचे स्वरूप कसे सिद्ध होते आणि तिच्यात विशिष्ट वस्तूचे जे स्थान असते त्याच्यामुळे, ह्या वस्तूचे इतर घटकांशी जे संबंध असतात त्यांच्यामुळे तिचे स्वरुप अनिवार्यपणे कसे निश्चित होते, हे समजून घेणे म्हणजे वास्तवतेचे ज्ञान करून घेणे होय. निगमनाने किंवा विगमनाने असे ज्ञान होत नाही पण असे ज्ञान प्राप्त करून घेण्यात हे अनुमान प्रकार उपकारक ठरतात.


बोझांकेट यांच्या तत्त्वमीमांसेचे सार पुढील वाक्यात सांगता येईल : सत् किंवा वास्तवता ही एक ही एक व्यक्ती असते आणि व्यक्ती हे ‘मूर्त सामान्य’ असते. ‘मूर्त सामान्य’ ह्या संकल्पनेचे स्पष्टीकरण केले, की ह्या वाक्याचा उलगडा होईल. बोझांकेट अमूर्त सामान्य आणि मूर्त सामान्य ह्यांच्यात भेद करतात. उदा., तांबडेपणा हे अमूर्त सामान्य आहे. तांबडेपणा हा गुण अनेक भिन्न वस्तूंमध्ये वसतो आणि म्हणून तांबडेपणा हे एक सामान्य आहे. ज्या विशिष्ट वस्तूंच्या ठिकाणी हा गुण असतो, त्या सर्व ह्या सामान्याखाली मोडतात. पण हे सामान्य अमूर्त आहे कारण तांबडेपणाचा गुण आणि ज्या भिन्न वस्तूंच्या अंगी हा गुण वसतो त्या वस्तू यांच्या दरम्यान आंतरिक, अनिवार्य संबंध नसतो. तो संबंध बाह्य, यादृच्छिक असतो. एखादा कपडा तांबडा असतो झाले. एखादे फूल तांबडे असते झाले. असा तो संबंध असतो. उलट एखादा माणूस आणि त्याच्या विशिष्ट कृती यांच्या दरम्यानचा संबंध घ्या. माणूस एक असतो आणि त्याच्या भिन्न कृती हा त्याच्या जीवनाचा तपशील असतो. म्हणजे एक (सामान्य) अस्तित्व आणि त्याच्याखाली मोडणारी अनेक विशिष्ट अस्तित्वे असाच हा संबंध आहे. पण हे जे सामान्य आहे, हा जो एक माणूस आहे त्याचा आविष्कार ह्या विशिष्ट कृत्यांद्वारा होतो. ह्या माणसाची प्रवृत्ती, त्याची उद्दीष्टे, प्रयोजने इ. ह्या कृत्यांमधून व्यक्त होतात आणि फलद्रूप होतात. ह्या विशिष्ट कृत्यांशिवाय त्या माणसाच्या जीवनाला आशय उरणार नाही. उलट, एका व्यक्तीत्वाचा भिन्नभिन्न प्रसंगी आणि परिस्थितीत झालेला आविष्कार असे ह्या कृत्यांचे स्वरुप असल्यामुळे एकतेच्या धाग्याने हा आशय एकत्रित झालेला असतो, त्याला अर्थपूर्ण आकार प्राप्त झालेला असतो. तेव्हा मूर्त सामान्य म्हणजे असे सामान्य, की जे स्वतःचा भिन्न विशिष्टांद्वारा आविष्कार करून स्वतःचे मूर्त स्वरुप आणि अस्तित्व प्रस्थापित करते. थोडक्यात मूर्त सामान्य म्हणजे सुसंगत व सुव्यवस्थित असा पूर्ण असतो. अनेक भिन्न, पण परस्परसंबंधित विशिष्टांद्वारे स्वतःला व्यक्त करणारे व ह्या विशिष्टांना सुव्यवस्थितपणे संघटित करणारे एकतेचे तत्त्व, असे ह्या पूर्णाचे स्वरुप असते. सत् किंवा वास्तवता हा असा पूर्ण आहे किंवा मूर्त सामान्य आहे, असा बोझांकेट यांचा सिद्धांत आहे. ज्या प्रमाणात कोणतेही अस्तित्व मूर्त सामान्य असते, म्हणजे ज्या प्रमाणात ते अस्तित्व म्हणजे आत्माविष्कारी असा पूर्ण असतो, त्या प्रमाणात ते अस्तित्व एक व्यक्ती (इंडिव्हिज्युअल) असते, सत् किंवा वास्तव असते. त्या दृष्टीने पहाता वास्तवता किंवा सत् हीच खरीखुरी आणि पूर्ण अशी व्यक्ती असते.

भिन्न पण परस्परसंबंधित अशा विशिष्टांच्या सुव्यवस्थित रचनेद्वारा स्वतःचा आविष्कार करून स्वतःचे अस्तित्व सिद्ध करणारे तत्त्व, असेच वास्तवतेचे स्वरूप असते. असे तत्त्व म्हणजेच व्यक्ती, मूल्य अशा व्यक्तीच्या ठिकाणीच वसत असते हा सिद्धांत बोझांकेट वेगवेगळ्या क्षेत्रांत लावून दाखवितात. उदा., विज्ञान, कला, धर्म इ. अनुभवक्षेत्रे हे असे (तुलनेने) स्वायत्त आणि स्वयंपूर्ण असे अनुभव प्रकार आहेत व म्हणून त्यांच्या ठिकाणी मूल्य आहे. त्याचप्रमाणे समाज हाही आत्माविष्कारी स्वायत्त असा पूर्ण असतो, समाजाच्या घटक असलेल्या मानवी व्यक्तींना समाजाच्या चैतन्यमय जीवनाने घडविलेले असते, हे जीवन व्यक्तीच्या जीवनातून आविष्कृत होत असते. म्हणून समाज त्याच्या घटक-व्यक्तींहून अधिक खरीखुरी ‘व्यक्ती’ असते आणि सामाजिक जीवनात मूल्य वसत असते. जाणीवपूर्वक सामाजिक जीवनाशी तादात्म्य पावून त्याच्यात सहभागी होण्यात, स्वतःच्या वाट्याला येणारी कर्तव्ये त्यांच्याशी एकरुप होऊन पार पाडण्यात व्यक्तीच्या जीवनाला त्याचे मूल्य लाभते. व्यक्तीचे व्यक्तीमत्व तिच्या खाजगीपणात, खाजगी निर्णय घेण्याच्या स्वातंत्र्यात असते, व्यक्ती एकेकट्या आणि परस्पर व्यावर्तक असतात हा जॉन स्ट्यूअर्ट मिल इत्यादिकांचा व्यक्तिवादी सिद्धांत बोझांकेट नाकारतात. स्वातंत्र्य हे स्वतःचे नियमन करण्यात आणि स्वतःकडून दिग्दर्शित होण्यात असते. पण व्यक्ती हा सामाजिक जीवनाचा आविष्कार असल्यामुळे सामाजिक चैतन्य आणि जीवन हा व्यक्तीचा खराखुरा ‘स्व’ असतो. म्हणून सामाजिक जीवनाशी तादात्म्य पावल्याने स्वतःची जी कर्तव्ये प्राप्त होतात ती करीत रहाण्यात व्यक्तीचे खरेखुरे स्वातंत्र्य आणि कल्याण असते. कारण आपला खराखुरा ‘स्व’ हा आपल्याला घडविणाऱ्या आणि वेढणाऱ्या सामाजिक जीवनात असतो. त्याच्याशी एकरुप झाल्याने आपल्या जीवनाला जो आशय व जे रुप प्राप्त होते ते ह्या ‘स्व’ कडून निश्चित झालेले असते.

माणसाचा सामाजिक ‘स्व’ हा त्याचा खरा ‘स्व’ असतो हा बोझांकेट यांचा सिद्धांत आणि सर्वकषवाद यांच्यात भेद करणे आवश्यक आहे. सर्वकषवादाप्रमाणे व्यक्तीने समाजात लुप्त व्हायचे असते, व्यक्ती ही व्यक्ती म्हणून उरतच नाही. बोझांकेट यांच्या ‘मूर्त सामान्या’ च्या संकल्पनेप्रमाणे व्यक्ती (विशिष्ट) ही समाजापासून (सामान्यापासून) भिन्नही असते, पण समाजाचा आविष्कार असल्यामुळे त्याच्याशी ती एकात्मही असते. व्यक्तीने हे समाजाशी असलेले नाते ओळखून आपण होऊन समाजाशी तादात्म्य साधायचे असते. पण हे तादात्म्य जितके खोल असेल तितके त्या व्यक्तीचे विशिष्टत्वही पुष्ट होते.  

पहा : चिद्‌वाद.

संदर्भ : 1. Action, H. B. “The Theory of Concrete Universals,” Mind, Vol.45, Oxford, 1936.              2. Bosanquet, Helen, Bernard Bosanquet : A Short Account of His Life, London, 1924.              3. Muirhead, J. H. Ed. Bernard Bosanquet and His Friends : Letters Illustrating The Sources and Development of His Philosophical Opinions, London, 1935.  

रेगे, मे. पुं.