अंधत्व : (आंधळेपणा). पदार्थाचे रूप, आकार व रंग यांचे ज्ञान दृष्टीमुळे होते. तसे ते मुळीच होत नसल्यास त्या अवस्थेला ‘अंधत्व’म्हणतात. दृष्टिदोष आणि डोळ्याचे शारीर व शरीरक्रियाविज्ञान यांचे वर्णन डोळा, नेत्रवैद्यक व दृष्टी या शीर्षकांखाली केलेले आहे. या लेखात अंधत्वाची सामान्य कारणे, प्रतिबंध आणि अंधांचे पुनर्वसन यांसंबंधी वर्णन केलेले आहे.

प्रकाशामुळे बाह्य पदार्थाची प्रतिमा डोळ्यांतील दृष्टिपटलावर पडते. त्या पटलातील शलाका आणि दंडाच्या आकाराच्या कोशिकांमध्ये संवेदना उत्पन्न होऊन ती दृष्टितंत्रिकामार्गाने मस्तिष्कातील (मेंदूतील) दृष्टिकेंद्रात जाते. तेथे त्या संवेदनेचे विश्लेषण होऊन पदार्थ दिसल्याची जाणीव उत्पन्न होते.

अंधत्वाचे प्रमुख कारण म्हणजे स्वच्छमंडलापासून (बुबुळाचा पुढचा पारदर्शक भाग) मस्तिष्ककेंद्रापर्यंत जाणाऱ्या दृष्टीमार्गामध्ये झालेली विकृती हे होय. त्याशिवाय काही सार्वदेहिक रोगांमुळेही अंधत्व येऊ शकते.

कारणे : अंधत्वाच्या कारणांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करतात: (१) जन्मजात, (२) अभिघातजन्य, (३) संसर्गजन्य, (४) स्थानिक संसर्गजन्य आणि अपकर्षजन्य, (५) सार्वदेहिक-रोगजन्य, (६) विषजन्य आणि (७) अर्बुदजन्य.

(१) जन्मजात : काही अज्ञात कारणामुळे डोळ्यांतील विविध ऊतकांची उपत्ती आणि विकास यांमध्ये दोष उत्पन्न झाल्यामुळे अंधत्व येऊ शकते. गर्भावस्थेमध्ये मातेला कांजिण्यासारखे काही रोग झाल्यास किंवा थॅलिडोमाइडासारखी औषधे घेतल्यास गर्भावर परिणाम होऊन अंधत्व येते. काही वेळा डोळ्यातील भिंग अपारदर्शी असल्याची उदाहरणेही दिसतात. या सर्व प्रकारांमुळे जन्मांधत्व येते. 

(२) अभिघातजन्य : मुलांच्या खेळांमध्ये बाणासारखी तीक्ष्ण शस्त्रे डोळ्याला लागल्यामुळे डोळा गेल्याची उदाहरणे आढळतात. चेंडू किंवा त्यासारखा एखादा पदार्थ डोळ्यावर जोराने आपटल्यामुळे डोळ्याला अपाय होऊ शकतो. खाणीत, कारखान्यात वा शेतात काम करीत असताना अथवा लोखंडाच्या संधानक्रियेमध्ये डोळ्यात कण उडाल्यामुळेही अंधत्व येऊ शकते.

 (३) संसर्गजन्य : देवी, कुष्ठरोग, जन्माच्या वेळीच नवजात बालकाच्या डोळ्याला मातेच्या प्रसवमार्गातील पूयप्रमेहाचा [→परमा ] संसर्ग वगैरे कारणांनीही अंधत्व येते. सु. ५० वर्षांपूर्वी भारतात देवीने डोळे गेल्याची उदाहरणे पुष्कळ दिसत. अलीकडे देवी टोचण्याचा प्रघात सार्वत्रिक झाला असल्यामुळे हे प्रमाण पुष्कळ कमी झाले आहे. पूयप्रमेह व ⇨उपदंश या रोगांवरील चिकित्सा आता प्रभावी झाली असल्यामुळे त्यामुळे येणारे अंधत्वही कमी होत आहे. कुष्ठरोगातही त्वरित उपाय झाल्यास अंधत्व येत नाही.

 

(४) स्थानिक संसर्गजन्य व अपकर्षजन्य : (अ) स्वच्छमंडलावर खुपरीमुळे व्रण येतात. व्रण भरून आल्यानंतर स्वच्छमंडल अपारदर्शी झाल्यामुळे अंधत्व येते. अलीकडे स्वच्छमंडलाच्या प्रतिरोपणाची क्रिया बऱ्याच अंशी सुसाध्य झाल्यामुळे ह्या प्रकारच्या अंधत्वावर उपचार करणे शक्य झाले आहे [→खुपरी ]. (आ) डोळ्यातील द्रवाचा दाब वाढल्यामुळे ⇨कांचबिंदू येऊन अंधत्व येते. (इ) वयोमानाप्रमाणे डोळ्यातील भिंग अपारदर्शक होत जाऊन मोतीबिंदू झाल्यामुळे अंधत्व येते [→ नेत्रवैद्यक]. (ई) दृष्टीपटलातील विकृतीमुळेही अंधत्व येऊ शकते. रंजकीय दृष्टिपटलशोथ, फार तीव्र निकटदृष्टीमुळे दृष्टीपटलावर ताण पडून त्याचे वियोजन होणे, उपदंशासारख्या रोगामुळे दृष्टितंत्रिकेचा शोथ व अपकर्ष, तसेच डोळ्याच्या मागील भागातील अर्बुदाचा दाब दृष्टितंत्रिकेवर पडल्यामुळे होणारा अपकर्ष वगैरे कारणांमुळेही अंधत्व येते.

 

(५) सार्वदेहिक रोगजन्य : मधुमेह, अतिरिक्त रक्तदाब, तीव्र वृक्कशोथ वगैरे रोगांमुळे अनिष्ट परिणाम होऊन दृष्टिपटलाच्या अपकर्षामुळे हळूहळू कमी दिसू लागते व शेवटी अंधत्व येते. रक्तवाहिनीभेद ⇨अंतर्कीलन, रक्तक्लथन (रक्ताची गुठळी होणे) झाल्यासही अंधत्व येते.

 

(६) विषजन्य : तंबाखू, क्किनीन, मद्य वगैरे पदार्थांचा विपरीत परिणाम दृष्टिपटलावर झाल्यामुळेही अंधत्व येऊ शकते.

(७) अर्बुदजन्य : डोळ्यात किंवा दृष्टमार्गात कोठेही अर्बुदोत्पत्ती झाल्यास अंधत्व येते.

प्रतिबंध : वरील वर्णानावरून अंधत्वाचा प्रतिबंध करण्यासाठी त्याचे कारण वेळीच ओळखून योग्य तो उपचार करणे किती महत्वाचे आहे लक्षात येईल. विशेषतः स्थानिक व सार्वदहिक संसर्गाची वेळीच चिकित्सा केली असता अंधत्वाचे प्रमाण पुष्कळ कमी करता येईल. या दृष्टीने जगभर प्रयत्न चालू असून जागतिक आरोग्य संस्थेने त्यासंबंधी अनेक योजना हाती घेतल्या आहेत. देवीनिर्मूलन-योजना, खुपरीवरील प्रतिबंधक व चिकित्सात्मक योजना वगैरेचा अंतर्भाव यात होतो.

भारतात डोळ्याची खास रुग्णालये, दवाखाने, फिरते दवाखाने, डोळ्यांची तपासणी व चिकित्सा करण्यासाठी भरविण्यात येणारी शिबिरे वगैरे अनेक मार्गानी अंधत्व कमी करण्याचे प्रयत्न चालू असून त्यांचा फार चांगला उपयोग झालेला दिसतो. विशेषतः खेड्यापाड्यांत फिरते दवाखाने व शिबिरे भरविणे या रूपाने अंधत्वाविरूद्ध मोठीच मोहीम उभारण्यात आली आहे. महत्त्वाचे

अंधाचे पुनर्वसन : डोळ्यासारखे एक महत्त्वाचे इंद्रिय निकामी झाल्यामुळे एक महत्वाचे इंद्रिय निकामी झाल्यामुळे आंधळ्या माणसांचे समाजात पुनर्वसन करणे ही फार महत्वाची समस्या आहे. त्यासाठी अनेक खाजगी संस्था व सरकार यांचे प्रयत्न चालू आहेत. प्रगत देशांत तर अशा संस्था पुष्कळच कार्य करीत असून भारतातही अंधशाळा, अंधांची वसतिगृहे या ठिकाणी त्यांना झेपतील असे उद्योग शिकविण्याची खास व्यवस्था होत आहे. त्यामुळे कित्येक अंध स्वावलंबी होऊन समाजात अनेक उपयुक्त कामे करीत आहेत. जगप्रसिद्ध अंध हेलन केलर ह्यांच्या उदाहरणावरून ही गोष्ट सिद्ध झालेली आहे. अशा प्रयत्नांनी अंध स्वावलंबी तर होतातच पण मानाने जगून अनेक समाजोपयोगी कार्येही करू शकतात.

आंधळ्या माणसाची श्रवणशक्ती आणि स्पर्शज्ञान अधिक प्रभावी होऊन दृष्टी नसल्यामुळे झालेली हानी तो काही प्रमाणात भरून काढू शकतो. वाचनासाठी ⇨ब्रेल लिपीत लिहिलेली पुस्तके ते वाचू शकतात. अशी उठावदार लिपीतील अक्षरे अंधांना वाचता येतील ही गोष्ट अठराव्या शतकात प्रथम व्हॅलेंटाइन हॉई यांना आढळून आली त्यावर संस्कार करून प्रत्यक्ष लिपी तयार करण्याचे कार्य ल्वी ब्रेल (१८०९-५२) या अंधांच्या फ्रेंच शिक्षकांनी केले. या लिपीत उठावदार टिंबे वापरली जातात. रॉबर्ट मून यांनी तयार केलेल्या लिपीत उठावदार ओळी वापरतात. भारतातील देवनागरी लिपीवर ब्रेल-पद्धत बसविण्याचे कार्य नीळकंठराव छत्रपती यांनी केले. आता त्या लिपीत छापलेली पुस्तके अनेक भारतीय भाषांतून प्रसिद्ध होत आहेत.

पहा : अपंग : कल्याण व शिक्षण.

ढमढेरे, वा. रा.