कृंतक गण : (रोडेंशिया). स्तनि-वर्गातील प्राण्यांचा सगळ्यात मोठा गण. हल्ली अस्तित्वात असणाऱ्‍या सस्तन प्राण्यांपैकी १/३ किंवा त्यापेक्षाही जास्त प्राणी या गणातील आहेत. हे प्राणी आपले भक्ष्य दातांनी कुरतडतात म्हणून यांना कृंतक म्हणतात. सगळ्या जगभर या प्राण्यांचा प्रसार झालेला आहे. उंदीर, घूस, खार इ. प्राण्यांचा या गणात समावेश होतो. हे प्राणी विविध निवासस्थानांत राहतात. शुष्क वाळवंटे, वर्षा-वने (२५० सेंमी. किंवा त्यापेक्षाही जास्त पाऊस असणारी वने), दलदली, गोडे पाणी आणि ५,८०० मी. उंचीवर असणाऱ्‍या प्रदेशातही ते आढळतात. समुद्रात मात्र ते मुळीच नसतात.

साळीची कवटी (कृंतक दाताची सगळी लाबी दाखविण्याकरिता जबड्यांचा काही भाग काढून टाकला आहे).

सामान्य लक्षणे: सर्वसामान्यपणे कृंतक लहान असतात, पण बरेच मध्यम आकारमानाचेही असतात. दक्षिण अमेरिकेतील कॅपिबारा हा सर्वांत मोठा कृंतक असून त्याची लांबी १२२ सेंमी. पर्यंत असते. या प्राण्यांच्या संरचनात्मक लक्षणांमध्ये विलक्षण एकसारखेपणा दिसून येतो. अंगावर दाट केस, पण कधीकधी काटे असतात. पुढच्या पायाला बहुधा पाच बोटे असतात पण कधीकधी अंगठा नसतो मागच्या पायाला ३–५ बोटे असतात. बोटांवर नखर (नख्या) असतात. हे प्राणी पादतलचारी (पायांच्या तळव्यांवर चालणारे) असतात. कृंतक दात (कुरतडण्यासाठी किंवा कातरण्यासाठी असणारे पुढचे दात) लांब व मजबूत असतात रदनक (सुळे दात) नसतात दाढा थोड्या असतात व कृंतक दात आणि दाढा यांच्यामध्ये मोकळी जागा अथवा खिंडार असते या खिंडारात मखमली अथवा मृदुलोमी (मऊ केस असलेली) त्वचेची एक घडी असून तिच्यामुळे मुख-गुहेचे (तोंडाच्या पोकळीचे) दोन भाग पडतात पुढच्या कोष्ठात कृंतक दात आणि मागच्यात दाढा असतात. काही कृंतकांना मुखाच्या कोनाजवळ आंतरिक किंवा बाह्य कपोल-कोष्ठ (गालाच्या पिशव्या) असतात. पुष्कळ कृंतकांत दातांचा एकच संच असतोत्यांना दुधाचे दात (सस्तन प्राण्यांना प्रथम आलेले अस्थायी दात) नसतात. उंडुक (अन्नमार्गाच्या एखाद्या भागापासून निघालेली बाहेरच्या टोकाशी बंद असणारी नळी अथवा पिशवी) बहुतेक नेहमी असतो तो फार मोठा असून त्याची संरचना जटिल असते. मेंदूवर थोड्या सुरकुत्या असून प्रमस्तिष्क-गोलार्ध (मेंदूचा पुढचा भाग) निमस्तिष्कावर (मागच्या मेंदूच्या जाड झालेल्या वरच्या भागावर) आलेले नसतात. कवटीचे उत्तर पृष्ठ काहीसे सपाट असते तालू अगदी अरुंद असून तिच्यावर लांबट कृंतकी रंध्र (कृंतक दातांची टोके आत बसणारी छिद्रे) असतात. जबड्यांचे स्‍नायू अतिपरिवर्तित असतात खालच्या जबड्याचा कवटीशी असलेला सांधा काहीसा सैल असतो चर्वणाच्या वेळी जबडे वरखाली, मागेपुढे आणि दोन्ही बाजूंना हालविता येतात. जत्रू (गळपट्टीचे हाड) सामान्यतः असते. वृषण (पुं-जनन ग्रंथी) बहुधा उदरात असतात. अपरा (वार) बिंबाभीय (तबकडीसारखी) आणि पतिष्णू म्हणजे गळून पडणारी असते.

कृंतकांचे स्पष्ट आणि अतिशय महत्त्वाचे शारीरीय लक्षण दात हे होय. त्यांना पुढे वर दोन आणि खाली दोन असे चार कृंतक दात असतात आयुष्यभर हे दात वाढत असतात त्यामुळे त्यांची होणारी झीज भरून येते. ही वाढ दातांच्या बुडाशी असणाऱ्‍या चिरस्थायी गोर्दापासून (मऊ स्पंजासारख्या पेशीसमूहापासून) होते. हे दात वाढून इतके लांब होतात की, मागे जबड्यात पसरून कवटीच्या मागच्या भागापर्यंत पोहोचतात. यांच्या फक्त पुढच्या बाजूवर दंतवल्क (दातावर असलेला कठीण कॅल्शियममय स्तर) असते आणि टोक छिन्नीसारखे व धारदार असते. पुढची बाजू पुष्कळदा तपकिरी किंवा पिवळ्या रंगाची असते. रदनक आणि अग्र उपदाढा नसतात. कृंतकांना सामान्यतः प्रत्येक जबड्यात प्रत्येक बाजूला तीन याप्रमाणे एकंदर बारा दाढा असतात. दाढा बहुधा दंतिनाच्या (कठीण लवचिक कॅल्शियममय पदार्थाच्या बनलेल्या असून बाहेरचा थर दंतवल्काचा असतो. बहुतेक कृंतकांमध्ये दाढेच्या मुख्य भागात दंतवल्काला फासे किंवा घड्या पडलेल्या असतात. पेषण-पृष्ठाकडून (अन्न बारीक करणाऱ्‍या दाताच्या पृष्ठाकडून) पाहिले तर या दातांच्या पुष्कळ तऱ्‍हा अथवा नमुने दिसून येतात. मृदू दंतिन आणि कठीण दंतवल्क यांच्या विविध मांडणीमुळे व एकीकरणामुळे हे नमुने तयार होतात. या प्राण्यांच्या वेगवेगळ्या गटांमध्ये दातांचे ठराविक नमुनेच असल्यामुळे प्राणिशास्त्रज्ञांना वर्गीकरणाकरिता त्यांचा उपयोग होतो. काही कृंतकांच्या दाढा बद्धमूल (मुळाशी बांधलेल्या) असल्यामुळे वाढत नाहीत, तर काहींच्या बुडाशी उघड्या असल्यामुळे आयुष्यभर वाढतात. दातांच्या शिखरावर दंतवल्कामुळे धारदार कंगोरे उत्पन्न होतात. दाढांचे शिखर (अन्न भरडणारा वरचा पृष्ठभाग) उंच अथवा बसके असते. या प्राण्यांना बावीसपेक्षा जास्त दात नसतात.

कृंतक सामान्यपणे शाकाहारी आहेत. सर्व प्रकारच्या गवतांचे बी आणि झाडांच्या बिया त्यांना आवडतात हिरव्या वनस्पतींची पाने, मुळे, देठ, कोंब वगैरे ते खातात. प्रसंगानुसार काही कृंतक अंडी, लहान पक्षी आणि कीटक खातात.

कृंतक मुख्यतः भूचर आहेत, पण काही जमिनीत बिळे करून राहतात तर काही आयत्या बिळात राहतात. काही जलचर तर काही वृक्षवासी असतात काही उडणारेही आहेत. ज्या परिसरात ते कायम राहतात तेथे राहण्याकरिता त्यांचे अनुकूलन झालेले असते. बिळात राहणाऱ्‍या कृंतकांचे स्वरूप उंदीर किंवा चिचुंदरीसारखे असून त्यांचे कृंतक दात मोठे असतात अथवा पुढच्या पायांवरील नखर बरेच मोठे असतात शेपटी, डोळे व कान लहान असतात. स्पॅलॅक्स या यूरोपीय कृंतकाला डोळे नसतात. खारींच्या काही जातींत शरीराच्या दोन्ही बाजूंना उड्डाण-कला (उडण्याकरिता उपयोगी पडणारी पातळ त्वचा) असते तिच्या साहाय्याने ह्या एका झाडावरून दुसऱ्‍या झाडावर हवेतून घसरत (विसर्पण करीत) जातात. आशियाच्या उष्णकटिबंधातील काही घुशींना आपले अंगठे इतर बोटांच्यासमोर आणता येतात त्यामुळे त्या झाडावर चढू शकतात. जर्बोआसारख्या पुष्कळ कृंतकांचे शेपूट आणि मागचे पाय बरेच लांब झालेले असतात त्यामुळे ते उड्या मारू शकतात. बीव्हरासारख्या कृंतकांचे पाण्यात पोहण्याकरिता आणि डॅसिप्रॉक्टासारख्यांचे जलद धावण्याकरिता विशिष्टीकरण झालेले असते.


 माणसाच्या दृष्टीने कृंतकांना फार महत्त्व आहे. काही कृंतक पुष्कळ कीटकांचा आणि तणांचा नाश करतात. उंदीर, गिनीपिग इ. प्राण्यांचा प्रयोगशाळांत प्रयोगांकरिता फार मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात. बीव्हर, चिंचिल्ला इ. कृंतकांपासून फर (बारीक मऊ केसांचे आच्छादन असणारी कातडी) मिळते. उंदीर, घुशी इ. कृंतकांचा आदिवासी खाण्याकरिता उपयोग करतात. उंदीरासारखे कृंतक शेतातील पिकांची त्याचप्रमाणे धान्याचे साठे आणि इतर खाद्यपदार्थ यांची फार नासाडी करतात. काही कृंतकांच्या शरीरावर असणाऱ्‍या परजीवींमुळे (दुसऱ्‍याच्या जीवावर उपजीविका करणाऱ्‍या जीवांमुळे,उदा., पिसू) काही रोगांचा फैलाव होतो. उपद्रवी कृंतकांचा नाश करण्याकरिता अनेक उपाय योजूनही त्यांची संख्या कमी झालेली दिसून येत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे कृंतकांचे जननप्रमाण फार मोठे आहे [→ कृंतकनाशके].

वर्गीकरण: कृंतक (रोडेंशिया) गणाचे सायूरोमॉर्फा, मायोमॉर्फा आणि हिस्ट्रिकोमॉर्फा असे तीन उपगण आहेत. सायूरोमॉर्फा उपगणात तेरा कुले असून त्यांपैकी सायूरिडी कुलात खारी, उडणाऱ्‍या खारी, मार्मोट इत्यादींचा आणि कॅस्टॉरिडी कुलात बीव्हरांचा समावेश होतो. मायमॉर्फा उपगणात नऊ कुले असून त्यांपैकी डायपोडिडी कुलात जर्बोआंचा आणि म्युरिडी कुलात उंदीर व घुशी यांचा समावेश होतो. हिस्ट्रीकोमॉर्फा उपगणात एकोणीस कुले आहेत, त्यांपैकी हिस्ट्रिसिडी कुलात साळींचा, केव्हीइडी गिनीपिगांचा, हायड्रोकीरिडी कुलात कॅपिबारांचा आणि डॅसिप्रॉक्टिडी कुलात ॲगुटींचा समावेश होतो.

पहा : ॲगुटी उंदीर उडणाऱ्‍या खारी कॅपिबारा खार गिनीपिग घूस चिंचिल्ला चिचुंदरी जरबिल जर्बोआ बीव्हर मार्मोट मोल साळ.

संदर्भ : 1. Beddard, F. The Cambridge Natural History, Vol. X. Mammalia, Codicote (England).

1968.

2. Walker, E. P. Mammals of the World, Vol. II, Baltimore, 1964.

कर्वे, ज. नी.