सहस्रलिंग तलावाचे दृश्य

पाटण – १: गुजरात राज्याच्या मेहसाणा जिल्ह्यातील शहर. लोकसंख्या ६४,५१९ (१९७१). मेहसाण्याच्या वायव्येस ३८ किमी.वर सरस्वती नदीकाठी वसलेले हे शहर पूर्वी अनहिलवाड किंवा अनहिलपुर व नहरवारा किंवा नहरवाला या नावांनी ओळखले जाई. रूपसुंदरी राणीच्या पोटी, जंगलात जन्मलेल्या वनराजानामक चावडा घरण्यातील राजाने इ. स. ७६५ मध्ये हे वसविले असावे. काहींच्या मते याची स्थापना तत्पूर्वी ७४६ मध्ये झाली असावी. चावडा व सोळंकी यांच्या आधिपत्याखाली पाटण राजधानीचे ठिकाण होते. १०२४ मध्ये महंमद गझनीने सोमनाथवरील स्वारीत ते लुटले. १२९८ मध्ये मुसलमानांनी हे नगर जमीनदोस्त केले. श्रीचंद्र या लेखकाच्या कथाकोश  या धार्मिक उपदेशपर कथासंग्रहाची रचना येथेच झाली.

आधुनिक पाटण मराठ्यांच्या प्रयत्नांमळे उभारले गेले असून, सरस्वती नदीपासून दोन किमी. वर आहे. शहरात कापूस, गळित व  तृणधान्ये यांचा व्यापार आणि वस्त्रोद्योग, लाकूड व हस्तिदंती नक्षीकाम, भरतकाम, मृत्पात्रे व तलवारी बनविणे इ. उद्योगधंदे चालतात. येथे सु. १०८ जैन मंदिरे आहेत, परंतु ती. कलात्मक नाहीत. येथील विहीर (अकरावे शतक), सहस्रलिंग तलाव, १४६७ मधील शिलालेख व एका जैन मंदिरातील वनराजाचा संगमरवरी पुतळा, खान सरोवर इ. उल्लेखनीय आहेत.

सावंत, प्र. रा. खांडवे, म. अ.