रेनडियर : सर्व्हिडी या मृग कुलातील रँगिफर प्रजातीच्या या प्राण्याचे शास्त्रीय नाव रँगिफर टॅरँडस हे आहे. हे उत्तर यूरोप व उत्तर आशिया खंडांत आढळतात. याच जातीचे पण आकाराने थोडे मोठे मृग उत्तर अमेरिकेत आढळतात, त्यांस कॅरिबू असे म्हणतात. मृगांच्या जातीत रेनडियर हीच जात माणसाळविता आली आहे. नर आणि मादी या दोहोंनाही शिंगे असतात, हे ह्या जातीचे दुसरे वैशिष्ट्य आहे. मादीची शिंगे नरापेक्षा आकाराने लहान असतात.

माणसाळविलेले रेनडियर आकाराने गाढवाएवढे असतात, तर अमेरिकेत आढळणारे कॅरिबू बरेच मोठे असतात. डोक्यासकट शरीराची लांबी १·२ ते २·२ मी., शेपूट १० ते २१ सेंमी., खांद्यापाशी उंची १·१ ते १·४ मी. इतकी असते. प्रौढ प्राण्याचे वजन ९० ते ३१८ किग्रॅ. इतके असते. कडाक्याच्या थंडीपासून बचाव होण्याकरिता अंगावर २ ते ४ सेंमी. लांबीच्या जाड केसांचे आच्छादन असून त्याच्या बुडाशी लोकरीसारख्या दाट मऊ केसांचा जाड थर असतो. शिंगे लांब पसरलेली, अनियमित आकाराची असून त्यांच्या शाखा टोकदार असतात. भुवयांवर उगवणारी शिंगे पुढे कपाळावरून मुस्कटावर पसरलेली असतात पण इतर शिंगांच्या शाखा मागील बाजूस फैलावलेल्या असतात. दरवर्षी हिवाळ्यात (नोव्हेंबरात) शिंगे गळून पडतात व नंतर लगेच नवी शिंगे उगवण्यास प्रारंभ होतो. सुरुवातीस उगवणारी शिंगे मऊ व स्पंजाप्रमाणे छिद्रिष्ट असतात. त्यांना रक्ताचा पुरवठा भरपूर प्रमाणात होतो व त्यांवर मखमलीसारखे आच्छादन असते. काही काळाने रक्तपुरवठा कमी होत जाऊन बंद होतो व शिंगे कठीण बनतात. या स्थितीत शिंगे कठीण पदार्थावर घासून मखमली आच्छादन काढले जाते. या प्रकारास शिंगाला पॉलीश करणे असे म्हणतात.

रेनडियरचा रंग प्रामुख्याने तपकिरी किंवा करडा असतो. खालची बाजू व ढुंगण पांढऱ्या किंवा फिकट रंगाचे असते. हिवाळ्यात तपकिरी रंगाचे रूपांतर फिकट पांढऱ्या रंगात होते. खूर रुंद, पसरट व मोठी फट पडलेले असल्यामुळे मऊ जमीन किंवा बर्फावरून चालणे त्यांना अवघड जास्त नाही. चालताना त्यांच्या घोट्याचा ऐकू येण्याइतका मोठा आवाज होतो.

रेनडियर"

रेनडियर हे प्राणी संघचारी आहेत. प्रवास करताना ते कळप करतात. शत्रूची चाहूल लागताच ते वर्तुळात उभे राहतात आणि शिस्तीत पुढे जातात. त्यावेळी त्यांची शिंगेही एका विशिष्ट पद्धतीने चक्राकार फिरताना दिसतात. रेनडियर हे उत्तम पोहणारे प्राणी आहेत. ते उन्हाळा आणि हिवाळा या ऋतूत स्थलांतरण करतात. सप्टेंबरच्या अखेरीस हजारो रेनडियर एके ठिकाणी येऊन वृक्षहीन प्रदेशातून दाट अरण्यात जातात. सबंध हिवाळा तेथे काढून वसंत ऋतूच्या सुरुवातीस लहान टोळकी करून ते परत येतात. मार्गावर असलेल्या नद्या, तलाव किंवा सरोवरे ते पोहून पार करतात. झाडांची कोवळी पाने व गवत हे त्यांचे खाद्य होय. हिवाळ्यात ते दगडफूल वा शैवाल खातात.

त्यांच्या प्रवासाची गती साधारणपणे ताशी ३२ किमी. इतकी असते. या गतीने लांबवर ते उड्या मारत धावतात. बर्फाच्छादित प्रदेशात त्यांना गाडीस जुंपतात. एक रेनडियर बर्फावरून दोन माणसे बसलेली गाडी ताशी १८ किमी. या वेगाने १६ तास सतत ओढत असल्याचे व एकाच वेळी पाठीवर ४० किग्रॅ. व जुंपलेल्या गाडीतून २५० किग्रॅ. सामान, एका दिवसात ४० किमी. अंतरावर वाहून नेत असल्याचे आढळले आहे. एवढ्या लांबवर एक फेरी केली की, मग काही काळ त्यांना विश्रांती लागतो.

अश्मयुगात सु. २५ ते ३० हजार वर्षांपूर्वी रेनडियर यूरोपात आढळत होते. या युगातील मानवाचे हे एक मुख्य खाद्य असावे. यासंबंधीची चित्रे गुहांत आढळतात. हे प्राणी फार पुरातन काळी माणसाळविलेले असावेत. पूर्व सायबीरियातील तुंगस व चुकची या जमाती रेनडियरचा उपयोग त्यांवर बसून दूरवर जाण्यासाठी आणि बर्फावरील बिनचाकाची गाडी ओढण्यासाठी करीत असत. उत्तर यूरोपातील स्कँडेनेव्हियन देशांतील भटक्या जमातींचे लॅप लोक ओझे वाहण्यास रेनडियरचा उपयोग करत असत. या प्राण्यांपासूनच त्यांना मांस व दूध मिळत असे. रेनडियरच्या दुधातून गाईच्या दूधापेक्षा चौपट लोणी निघते व दुधाचा उपयोग नुसता पिण्याकरिता न करता चीझ करण्याकरिताही होत असे. यांच्या कातड्यांपासून कपडे, जोडे व तंबू यांच्या केसांपासून सतरंज्या आणि यांच्या अन्ननलिकेपासून पिशव्या बनवीत असत.

यांची दृष्टी व श्रवणशक्ती फार तीव्र नसली, तरी घ्राणेंद्रिये तीक्ष्ण असते. धोक्याची सूचना देण्याकरिता रेनडियर आपली शेपटी वर करतो.

स्थलांतराच्या सुमारास नर व माद्या माजावर येतात. या वेळी माद्यांचा ताबा मिळविण्याकरिता नर एकमेकांशी त्वेषाने झुंजतात. साधारणतः एका नराच्या जनान्यात चाळीसपर्यंत माद्या असतात. गर्भावधी सु. २४० दिवसांचा असतो. मादी १ ते २ पिले प्रसवते. एक ते दीड वर्षांनी पिले वयात येतात. यांचे आयुष्य सु. पंधरा वर्षांचे असते.

इनामदार, ना. भा. जमदाडे, ज. वि.