सॉल्क, जोनास एडवर्ड : (२८ ऑक्टोबर १९१४–२३ जून १९९५). अमेरिकन वैद्य व वैद्यकीय संशोधक. ⇨ बालपक्षाघात (पोलिओ) या असाध्य रोगावर प्रभावी लस शोधून काढणारे शास्त्रज्ञ. त्यांनी प्रतिरक्षाविज्ञान आणि विषाणुविज्ञान या विषयांतील संकल्पनांचा आणि तंत्रांचा विकास केला.
सॉल्क यांचा जन्म न्यूयॉर्क येथे झाला. त्यांनी सिटी कॉलेज ऑफ द सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क या विद्यापीठाची बी.एस्. (१९३४) आणि न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिसीन या विद्यापीठाची एम्.डी. (१९३९) या पदव्या संपादन केल्या. ते युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन, स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ येथे रिसर्च कौन्सिल फेलो (१९४२–४४) आणि रोगपरिस्थितिविज्ञान या विषयाचे संशोधन सहायक (१९४४–४६) व सहायक प्राध्यापक (१९४६-४७) होते, ते युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग, स्कूल ऑफ मेडिसीन येथे सूक्ष्मजंतुशास्त्र विषयाचे सहप्राध्यापक (१९४७–४९) आणि व्हायरस रिसर्च लॅबोरेटरीचे प्रमुख (१९४७–६३) होते. ते सूक्ष्मजंतुशास्त्राचे संशोधक प्राध्यापक (१९४९–५४), प्रतिबंधक वैद्यकाचे प्राध्यापक (१९५४–५७) आणि प्रायोगिक वैद्यकाचे प्राध्यापक (१९५७–६३) होते. ते सॅन डिएगो येथील सॉल्क इन्स्टिट्यूट फॉर बायॉलॉजिकल स्टडिज ( स्था. १९६३) या संस्थेचे संस्थापक संचालक आणि निवासी अधिछात्र होते. १९८० च्या मध्यापासून ते मृत्यूपर्यंत ह्याच संस्थेत एड्स प्रतिबंधक लस शोधण्याचे काम करीत होते.
सॉल्क यांनी न्यूयॉर्क विद्यापीठात व मिशिगन विद्यापीठात टॉमस फ्रान्सिस ( ज्युनिअर ) यांच्याबरोबर विषाणुविज्ञान व प्रतिरक्षाविज्ञान या विषयांत ⇨ इन्फ्ल्यूएंझा व्हायरसाविरोधी रोगप्रतिकारक्षमता निर्माण करण्यासंबंधी संशोधन केले. इन्फ्ल्यूएंझा व्हायरस मारुन टाकला तरी, प्रतिपिंड निर्माण करण्यास उत्तेजन देणारी त्याची क्षमता नष्ट होणार नाही, अशा पद्घतीने त्यांनी संशोधन केले. १९४३ मध्ये त्यांनी इन्फ्ल्यूएंझा-ए आणि इन्फ्ल्यूएंझा-बी या व्हायरसांवर परिणाम करणाऱ्या लशींची चाचणी घेतली.
सॉल्क १९४७ मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग, स्कूल ऑफ मेडिसीन येथील व्हायरस रिसर्च लॅबोरेटरीचे प्रमुख झाले. तेथे त्यांनी पोलिओ व्हायरसांचे विविध प्रकार ठरविण्याकरिता आणि ते वेगळे करण्याकरिता चालू असलेल्या संशोधन कार्यक्रमात भाग घेतला. १९५१ मध्ये सॉल्क यांनी अगोदरच शोध लागलेल्या पोलिओ व्हायरसाचे तीनही प्रकार खरे आहेत, असा आपल्या संशोधनावरुन निष्कर्ष काढला.
सॉल्क यांनी पोलिओ व्हायरसांच्या ( I, II, III ) प्रत्येक वाणाची माकडाच्या वृक्क ऊतकाच्या संवर्धकात वाढ करुन आणि फॉर्माल्डिहाइड या रासायनिक द्रव्याने ते वाण मारुन तयार केलेली लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे दाखविले.
१९५२ मध्ये त्यांनी पोलिओ व्हायरस प्रकार I पासून तयार केलेली लस बालपक्षाघात झालेल्या मुलांच्या गटाला टोचली ( कारण त्यांच्या रक्तप्रवाहामध्ये पोलिओ व्हायरस प्रतिपिंडे असतात ). अंतःक्रामणानंतर त्यांना असे आढळून आले की, मुलांच्या प्रतिपिंड पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. नंतर सॉल्क यांनी तीनही प्रकारचे मृत व्हायरस असलेली ट्रिपल लस पोलिओ न झालेल्या व्यक्तींना टोचली. १९५३ मध्ये त्यांनी आपले निष्कर्ष जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल ॲसोसिएशन या नियतकालिकात प्रसिद्घ केले. नंतर युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनमधील टॉमस फ्रान्सिस यांनी ६ ते ९ वर्षे वयोगटांतील ४,२२,७४३ मुलांना ठराविक कालावधीच्या अंतराने दिलेल्या या लशीच्या तीन मात्रांचा परिणाम पाहिला व त्याचे मूल्यमापन केले. मार्च १९५५ मध्ये फ्रान्सिस यांनी निर्वाळा दिला की, ही लस ८०–९० टक्के सुरक्षित व प्रभावी आहे. पुढे ही लस सुरक्षित असल्याचे अधिकृत रीत्या (६ मे १९५५) जाहीर करण्यात आले आणि ती लस संपूर्ण अमेरिकेत वापरास खुली करण्यात आली.
मृत व्हायरस लस समष्टीमध्ये ( समुदायात ) त्याचप्रमाणे व्यक्तीमध्ये बालपक्षाघात प्रतिबंधक म्हणून कार्य करते, असा सिद्घांत सॉल्क यांनी मांडला. रक्तरसातील व्हायरस प्रतिपिंडे ( किंवा तत्पर प्रतिपिंडाचा पुनःसंसर्गानंतरचा प्रतिसाद ) रक्तप्रवाहातून मेरुरज्जू, मेंदू व घसा यांमध्ये होणाऱ्या व्हायरसाच्या प्रवेशाला विरोध करतात. आरोग्य दृष्ट्या चांगल्या वातावरणात राहणाऱ्या समाजामध्ये घशाद्वारे, तर खराब वातावरणात राहणाऱ्या लोकांमध्ये शरीरातून बाहेर टाकलेल्या संदूषित द्रव्याद्वारे (विष्ठेद्वारे) व्हायरसाचा जलद प्रसार होतो.
सॉल्क यांनी मॅन अनफोल्डिंग (१९७२), द सर्व्हायव्हल ऑफ द वाइझेस्ट (१९७३), वर्ल्ड पॉप्युलेशन अँड ह्यूमन व्हॅल्यूज (१९८१) आणि ॲनॅटॉमी ऑफ रिॲलिटी (१९८३) ही पुस्तके लिहिली.त्यांना प्रेसिडेन्शिअल सायटेशन (१९५५), अमेरिकन पब्लिक हेल्थ ॲसोसिएशनचा लास्कर पुरस्कार (१९५६), अमेरिकन कॉलेज ऑफ फिजिशिअन्सचा ब्रू स मेमोरियल पुरस्कार (१९५८), रॉबर्ट कॉख पुरस्कार (१९६३), जवाहरलाल नेहरु ॲवॉर्ड फॉर इंटरनॅशनल अंडरस्टँडिंग (१९७५), काँग्रेशनल गोल्ड मेडल (१९७७) आणि प्रेसिडेन्शिअल मेडल फॉर फ्रीडम (१९७७) हे बहुमान मिळाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड विल्सन रेगन ह्यांनी ६ मे १९८५ हा दिवस ( पोलिओ लस वापरण्यास सुरक्षित असल्याचे जाहीर केल्याच्या तिसाव्या वार्षिक दिनास ) ‘जोनास सॉल्क दिवस’ म्हणून घोषित केला होता.
सॉल्क यांचे ल हॉईआ ( कॅलिफोर्निया, अमेरिका ) येथे निधन झाले.
गोगटे, म. ग. जाधव, ज्योती आ.
“