रक्तदाब : रक्ताचा रक्तवाहिनीच्या भित्तीवर पडणारा दाब म्हणजे रक्तदाब. सर्वसाधारणपणे  ‘ रक्तदाब ’  ही संज्ञा जेव्हा वापरतात तेव्हा रक्ताच्या सार्वदेहिक रोहिणीभित्तीवरील दाबाचाच त्यात समावेश असतो. रोहिण्यांशिवाय केशवाहिन्यांतून  ( सूक्ष्मतम रक्तवाहिन्यांतून) व नीलांतूनही रक्तदाब असतोच. 

  डाव्या निलयातून  [⟶  हृदय] प्रत्येक आकुंचनाच्या वेळी महारोहिणीत रक्त ढकलले जाते [⟶ रक्ताभिसरण तंत्र] ,  त्या वेळी त्याचा दाब रोहिणीभित्तीवर पडतो आणि तो तिच्या सर्व शाखा व उपशाखांमध्ये पसरतो. निलयाच्या प्रसरणाच्या वेळी रोहिणीभित्तीची प्रत्यावस्था  ( लवचिकता) दाब चालू ठेवून रक्त पुढे ढकलण्यास मदत करते. यामुळे रक्ताभिसरणाची अखंडता कायम राहते. निलयाचे आकुंचन-प्रसरण रोहिणीतून वाहणाऱ्या रक्तामध्ये स्पंदन उत्पन्न करते व हे स्पंदन जेव्हा पृष्ठस्थ रोहिणीत बोटाच्या स्पर्शाला जाणवते तेव्हा त्याला ‘नाडी’ म्हणतात. रोहिणी कापल्यास राहून राहून उडणारी रक्ताची चिरकांडी हेच स्पंदन दर्शविते. रक्तप्रवाह निलयाच्या दोन्ही अवस्थांत म्हणजे आकुंचन व प्रसरणाच्या वेळी चालू राहण्याकरिता विशिष्ट रक्तदाब कायम राहण्याची गरज असते. 

    आ. १. लूटव्हिख यांचे उपकरण : (१) यू – नलिकेचा दाबमापक, (२) कायमोग्राफ.

 इ. स. १६२८ मध्ये विल्यम हार्वी यांनी रक्ताभिसणाचा शोध लावल्यानंतर सु. शंभर वर्षांनी १७३२ मध्ये इंग्लिश धर्मोपदेशक स्टीफन हेल्स यांनी रोहिणीतील रक्त दाबाखाली प्रवाहित असते हे सप्रयोग दाखवून दिले. याकरिता त्यांनी एक जिवंत घोडी आडवी पाडून खांबास जखडली. पोटापासून सु. ७·५ सेंमी. दूर तिच्या डाव्या मांडीतील रोहिणी उघडी केली. सुमारे ४·२ मिमी. व्यासाची पितळी नळी त्या रोहिणीत खुपसली व जवळजवळ त्याच व्यासाची काचेची नळी तिला जोडली. त्यानंतर रोहिणीच्या वर अगोदर बांधलेला बंध सुटा केला . त्याबरोबर काचेच्या उभ्या नळीत सु. २·५ मी. उंचीपर्यंत रक्त आले. प्रथम अर्ध्या उंचीपर्यंत रक्त चटकन गेले  पण नंतर ते प्रत्येक स्पंदनाबरोबर ५ ,  ७·५ ,  १० सेंमी. वाढत वाढत सु. २·४ मी. वर गेले. 

  रक्त दाबाखाली वाहते हे सिद्ध झाल्यानंतर ते मोजण्याकडे लक्ष गेले. मूळची लांब काच नळीची कल्पना प्राण्यापुरतीच मर्यादित व गैरसोयीची होती. त्यातही ती अचूक नव्हती. काच नळीतील रक्त एकूण रक्तप्रवाहापेक्षा अलग असून त्याचे घनफळही कमी असल्यामुळे प्रत्यक्ष दाबापेक्षा मिळणारा दाब कमीच असे. तसेच प्रयोगातील अखंडता रक्ताच्या क्लथित होण्याच्या  ( गोठण्याच्या) गुणधर्मामुळे टिकवणे अशक्य असे. 

  जे. एल्‌. एस्‌. प्वाझय यांनी १८२८ मध्ये पारा भरलेली इंग्रजी यू  ( U )  आकाराची काचनलिका व रक्तक्लथनरोधक द्रव्य वापरून रक्तदाबमापक बनविला. पारा रक्तापेक्षा तेरा पटींनी जड असल्यामुळे तो नलिकेत काही मीटरांऐवजी काही सेंमी. वर जातो. प्वाझय यांचे उपकरण प्रचारात आल्यानंतर रक्तदाबाचा उल्लेख मिलिमीटर पारा स्तंभ  (mm.Hg)  असा करण्याची पद्धत रूढ झाली. 

  कार्ल लूटव्हिख यांनी १८४७ मध्ये रक्तदाब आलेखरूपात दर्शविणा ऱ् या  ‘ कायमोग्राफ ’  नावाच्या उपकरणाचा शोध लावल्यानंतर प्राण्यांतील रक्तदाबाचा अभ्यास करण्याकरिता त्याचा उपयोग करण्यात आला. 

आ. २. रक्तदाबमापक : निर्द्रव प्रकार : यात रक्तदाब तबकडीवर दर्शविला जातो.रक्तदाबमापक : मानवी रक्तदाबाचे मापन करण्यासाठी ‘रक्तदाबमापक’ या उपकरणाचा उपयोग करतात. या उपकरणामध्ये प्रौढ व्यक्तीचा रक्तदाब मोजण्याकरिता सु. १२·७० सेंमी. रुंद व सु. २०·३० सेंमी. लांब रबरी पिशवी कापडी पिशवीत बंदिस्त केलेली असते. तिला दोन नळ्या जोडलेल्या असतात. त्यांपैकी एक दाबमापकास  ( निर्द्रव अथवा पारायुक्त) आणि दुसरी छोट्या रबरी हात पंपास जोडलेली असते. पंपाजवळ उघडझाप करता येणारी झडप असते. रक्तदाब मोजावयाच्या व्यक्तीच्या प्रथम दंडाभोवती रबरी पिशवी गुंडाळून घट्ट बसवितात व नंतर तीत पंपाने हवा भरतात. या हवेच्या दाबामुळे भुज रोहिणीतील रक्तप्रवाह आडवला जातो. पिशवीच्या खाली कोपराच्या पुढे स्टेथोस्कोप ठेवून वैद्य हळूहळू पिशवीतील हवा सोडतो. रक्त जसे रोहिणीतून खाली उतरू लागते ,  तसा त्याच ्या कानात आवाज येऊ लागतो.  आवाज प्रथम आला त्या वेळी दाबमापकातील पारा ज्या अंकावर असेल तो त्या व्यक्तीचा आकुंचक रक्तदाब  ( उदा. ,  १२० मिमी.) असतो. आवाज नंतर हळूहळू नाहीसा होतो व ज्या वेळी तो पूर्णपणे नाहीसा होतो त्या वेळी दाबमापकातील अंक  ( उदा. ,  ८० मिमी.) प्रसरणात्मक रक्तदाब दर्शवितो.

  

  वरील श्रवणावलंबी पद्धतीशिवाय मानवी रक्तदाब स्पर्श पद्धतीने व दोलनमापन पद्धतीनेही मोजता येते. पहिल्या पद्धतीला एस्‌. रीव्हारोसी या इटालियन शास्त्रज्ञांचे नाव असून तीमध्ये मनगटावरील नाडीचा उपयोग करतात. ही पद्धत फारशी उपयोगात नाही कारण तीमध्ये प्रसरणात्मक रक्तदाब मोजता येत नाही. दोलनमापक एम्‌. व्ही. पॅचॉन या फ्रेंच शरीरक्रियावैज्ञानिकांच्या नावाने ओळखतात आणि तो फ्रान्स व इतर काही देशांतून वापरतात. हे उपकरण बरेच क्लिष्ट असून त्याचा विशेष उपयोग काही विकृतींच्या निदानाकरिता होतो. 


 आ. ३. रक्तदाबमापक : पारा स्तंभ प्रकार : (अ) रक्तदाब मोजण्याची पद्धत (आ) उपकरण : (१) पाऱ्याच्या स्तंभाचा उपयोग करणारा दाबमापक, (२) पंप, (३) झडप, (४) रबरी पिशवी, (५) भुज रोहिणी. प्राकृतिक  रक्तदाब  : सर्वसाधारण प्राकृतिक रक्तदाब ठरवण्याच्या दृष्टीने अनेक पाहण्या केल्या गेल्या आहेत. त्यांतून मिळालेली माहिती व सरासरीची आकडेवारी फक्त सापेक्षतः उपयोगी ठरते. वैयक्तिक फरक फार मोठ्या प्रमाणावर आढळतात. एकाच वयोगटातील एका व्यक्तीचा आकुंचक रक्तदाब १०० मिमी. असून तो अगदी प्राकृतिक असू शकतो ,  तर दुसऱ्या व्यक्तीचा १३० मिमी. असूनही प्राकृतिकच असेल. सर्वसाधारणपणे वयाच्या विशीत १४०/९० ,  पन्नाशी १६०/९५ आणि पंच्याहतरीत १७०/१०५ असे रक्तदाब प्राकृतिक समजावयास हरकत नाही. 

   आ. ४. श्रवणावलंबी पद्धत : (१) आवाजदर्शक रेषा, (२) मोठा करून दाखविलेला रक्तदाबमापकाचा काही भाग. आवाजाच्या सुरुवातीचा आकडा १२० हा आकुंचन रक्तदाब दाखवतो, तर आवाज पूर्णपणे बंद झालेला आकडा ८० हा प्रसरणात्मक रक्तदाब दर्शवितो.रक्तदाबामध्ये काही शरीरवैज्ञानिक परिस्थितींत बदल होतात. नवजात अर्भकात आकुंचक रक्तदाब ४० मिमी. व पहिल्या महिन्याच्या शेवटास ८० मिमी. होतो  ( नवजाताकरिता दंडाला गुंडाळावयाची पिशवी २५ मिमी. रुंदीची योग्य असते. ३ ते १२ वर्षे वयापर्यंत वापरण्याकरिता ५० ,  ८० ,  १२० मिमी. रुंदीच्या पिशव्या मिळतात). बालवयात सतत वाढत जाणारा रक्तदाब बाराव्या वर्षी १०० व सतराव्या वर्षी १२० होतो. पंचविशीपर्यंत तो कायम राहून पुढे प्रतिवर्षी ०·५ मिमी. वाढ होते. या वाढीचा कोणताही निश्चित नेम नसतो. सारख्याच वयाच्या स्त्री-पुरुषांमध्ये ,  पुरुषापेक्षा स्त्रीमध्ये रक्तदाब कमी असतो. पौर्वात्यांमध्ये यूरोपियन व अमेरिकन गोरे यांच्यापेक्षा रक्तदाब कमी आढळतो. झोपेमध्ये  ( विशेषेकरून स्वप्नरहित झोपेत) आकुंचक रक्तदाब १५ ते ३० मिमी. आणि प्रसरणात्मक रक्तदाब ५ ते १० मिमी. कमी होतो. भावना ,  राग ,  भीती ,  चिंता इ. आकुंचक रक्तदाब वाढवतात. शारीरिक व्यायामाच्या सुरुवातीस आकुंचक रक्तदाब प्रथम जलद वाढतो. नंतर थोडा कमी होऊन व्यायाम चालू असेपर्यंत टिकून राहतो. व्यायाम थांबताच रक्तदाब लगेच प्राकृतिक होतो व त्यानंतर हृद् ‌ गती प्राकृतिक बनते. 

   कोणत्याही प्रकारच्या रक्तदाबमापकाने रक्तदाब तंतोतंत मोजता येत नाही. रोहिणीत बसवलेले दाबमापकसुद्धा निश्चित माहिती देत नाही. प्राकृतिक श्वसनक्रिया चालू असताना अल्पशी हृद्स्पदंन असमतोलता ही आकुंचक व प्रसरणात्मक रक्तदाबांमध्ये कित्येक मिमी.चे फेरबदल दाखवते. ज्या वेळी असमतोलता गंभीर असते त्या वेळी हे फेरबदलही मोठ्या प्रमाणात आढळतात. भुजरोहिणीतील रक्तदाब श्रवणावलंबी पद्धतीने तपासल्यास तंतोतंत अथवा खऱ्या रक्तदाबापेक्षा ३ ते ४ मिमी. कमीच मिळतो. हा फरक सर्वसाधारणपणे± ८ मिमी. असू शकतो. प्रसारणात्मक रक्तदाबातही अशीच± ८ मिमी. पर्यंत चूक असण्याची शक्यता असते. व्यवहारात वैद्य रक्तदाबमापनाची अप्रत्यक्ष पद्धत वापरीत असल्यामुळे तंत्रासंबंधीच्या अनेक चुका संभवतात आणि त्या टाळण्याकरिता पुढील गोष्टींकडे लक्ष देणे महत्त्वाचे असते :  ( १) तपासणीच्या वेळी रुग्ण आरामात पहुडलेला किंवा बसलेला असावा. यामुळे तपासणी होणार या कल्पनेच्या जागरुकतेने होणारा फरक टाळता येतो.  ( २) दंडाला गुंडाळावयाची पिशवी हृदयाच्या पातळीबरोबर असावी.  ( ३) दंड-पिशवी योग्य आकाराची असावी. सर्वसाधारणपणे रुंदी दंडाच्या परिघाच्या निम्मी असावी. मांडीवर बांधावयाची दंड-पिशवी  ( १७·५ सेंमी. रुंद व ३५ सेंमी लांब) अतिस्थूल व्यक्तीकरिता वापरता येते.  ( ४) पाऱ्याचा स्तंभ उतरविताना प्रत्येक वेळी दर सेक ं दास २ ते ३ मिमी. उतरवावा.  ( ५) प्रसरणात्मक रक्तदाब नोंदतेवेळी तपासणारा वैद्य श्रवणातील फरकावरून नोंद करतो. या फरकाचे पाच टप्पे मानले असून पाचवा टप्पा म्हणजे आवाज पूर्ण बंद होणे. सर्वसाधारणपणे नोंदणी योग्य समजतात.  ( ६) तपासणाऱ्याचे काही आवडीचे अंक असतात. बहुधा तो ० किंवा ५ या अंकांनी शेवट होणारी संख्या पसंत करतो. यामुळे ० ते ५ मिमी.पर्यंत चूक होण्याचा संभव असतो. ही चूक टाळण्याकरिता लंडन स्कूल ऑफ हायजीन या संस्थेने काही नवी उपकरणे शोधिली आहेत. नवी इलेक्ट्रॉनीय किंवा स्वयंचलित उपकरणेही वापरात आहेत.


  प्राकृतिक रक्तदाब कायम ठेवण्यास खालील गोष्टी मदत करतात  :

  काही घनफळ रक्त महारोहिणी व तिच्या शाखांमध्ये हृदयाच्या प्रत्येक आकुंचनाबरोबर टाकले जाते. हे रक्त पुढे केशवाहिन्यांत व नंतर नीलांत जाण्यापूर्वी आणि पाठोपाठचे हृद्-आकुंचन होण्यापूर्वी निर्माण होणारा दाब म्हणजेच रक्तदाब होय. याचा अर्थ असा की ,  रोहिणी तंत्र  ( संस्था) सतत रक्ताने भरलेले असते. यामुळे रोहिण्यांच्या प्रत्यास्थ भित्ती सतत कमीजास्त ताणाखाली असतात. 

  ( १) हृद्क्षेपित रक्त  :  प्रत्येक आकुंचनाबरोबर बाहेर पडणाऱ्या रक्त घनफळाची वाढ व हृद् ‌ गतीतील वाढ हृद्क्षेपित रक्ताचे प्रमाण वाढवण्यास कारणीभूत होतात. वाढीव रक्त घनफळ रोहिणीभित्ती ताणून सामावले जाते. वाढीव घनफळ जेव्हा बहुतांश आकुंचनजन्य असते. तेव्हा आकुंचक रक्तदाब प्रसरणात्मक रक्तदाबापेक्षा अधिक वाढतो. वाढीव घनफळ जेव्हा हृद् ‌ गतिवाढजन्य असते तेव्हा प्रसरणात्मक रक्तदाब वाढतो. 

  ( २) परिसरीय रोध  :  रोहिणिका अथवा परिसरीय छोट्या रोहिण्या रक्त नीलांमध्ये जाण्यास काहीसा प्रतिरोध करतात. या रोहिणिकांना तंत्रिका  ( मज्जातंतू) पुरवठा असून तो त्यांच्या आकुंचन व विस्फारणावर नियंत्रण करतो. आकुंचनाबरोबर प्रतिरोध वाढतो व रक्तदाब वाढतो. याउलट विस्फारण झाल्यास तो कमी होतो. उदरगुहीय रोहिणिकांचे आकुंचन-विस्फारण रक्तदाबावर अधिक परिणाम करते. 

  ( ३) रक्ताचे एकूण घनफळ  :  रोहिणी तंत्र पूर्णपणे भरण्याएवढे रक्ताचे घनफळ असावयासच हवे म्हणजेच प्राकृतिक प्रसरणात्मक दाब असतेवेळी सुद्धा रोहिणीभित्ती ताणलेल्याच असाव्यात. ⇨रक्तस्रावामुळे जेव्हा घनफळ कमी होते तेव्हा रक्तदाब ताबडतोब कमी होतो. ⇨रक्ताधानामुळे घनफळ वाढते व रक्तदाबही वाढतो. 

  ( ४) रक्ताची श्यानता  :  एखादा द्रवाची श्यानता म्हणजेच त्याचा दाटपणा एखाद्या नलिकेतून वाहताना त्याला होणाऱ्या प्रतिरोधाचे प्रमाण ठरवतो. पाण्याची श्यानता एक मानल्यास रक्ताची त्याच्या पाचपट अधिक आहे. दोन सारख्या पिचका ऱ्यां पैकी एकीत पाणी व दुसरीत रक्त भरून ते दाबाने बाहेर ढकलण्याकरिता पाण्यापेक्षा रक्त बाहेर ढकलावयास अधिक दाब लागेल. रक्ताची श्यानता रक्तदाब सारखा ठेवण्यास मदत करते. 

 

  आ. ५. हृदयाचे आकुंचन-प्रसरण व रोहिणीभित्तीची हालचाल : (अ) हृद्‌ आकुंचन : (१) झडप (उघडी), (२) रक्तप्रवाहाची दिशा, (३) रोहिणीभित्तीच्या हालचालीची दिशा (आ) हृद्‌ प्रसरण : (१) झडप (बंद), (२) रक्तप्रवाहाची दिशा, (३) रोहिणीभित्तीच्या हालचालीची दिशा.

( ५) रोहिणीभित्तीची प्रत्यास्थता  :  रोहिणीभित्ती जर दृढ असत्या ,  तर आकुंचन दाब फार वाढला असता. दोन हृद् स्पंदनांमधील प्रसरणात्मक दाब शून्यावर आला असता. रोहिणीभित्तींची प्रत्यास्थता व परिसरीय रोध हे दोन्ही प्रसरणात्मक रक्तदाबास कारणीभूत असतात. आकुंचनाच्या वेळी भित्ती बाहेर ताणली जाते  परंतु प्रसरणाच्या वेळी प्रत्यास्थतेमुळे ती पूर्वावस्थेकडे येते. अशा प्रकारे रोहिणीभित्ती ही रक्त पुढे ढकलणारा दुय्यम पंपच असते. 

निरोगी अवस्थेत वरील सर्व गोष्टी एकमेकींशी जुळते घेऊन प्राकृतिक रक्तदाब एकसारखा ठेवतात. एखाद्या व्यक्तीला गंभीर रक्तस्राव होताच रक्तदाब नियंत्रक यंत्रणेपुढे दोन समस्या उभ्या राहतात.  ( १) रक्तदाब पूर्व पातळीवर आणून सर्व जैव क्रियांना योग्य रक्तपुरवठा चालू ठेवून व्यक्ती जिवंत ठेवणे आणि  ( २) रक्त घनफळाची कमतरता भरून काढून रक्ताभिसरण तंत्र पूर्ववत कार्यक्षम करून रक्तदाब योग्य पातळीवर आणणे. याकरिता दोन यंत्रणा आहेत  : ( अ) जलद कृतिशील होणारी आणि  ( आ) दीर्घकालीन मूळ रक्तदाब पातळी नियंत्रित करणारी यंत्रणा. 

  ( अ) जलद कृतिशील होणाऱ्या यंत्रणेत रोहिणी दाबग्राहक प्रतिक्षेपी क्रिया [⟶ प्रतिक्षेपी क्रिया] महत्त्वाच्या असतात. बहुतेक सर्व मोठ्या रोहिण्यांच्या भित्तीत  ( महारोहिणीसहित) संवेदी तंत्रिकांची टोके विखुरलेली असतात. महारोहिणी चाप आणि ग्रीवा रोहिणीचा  ( मानेतील रोहिणीचा) कोटरभाग या ठिकाणी दाबग्राहक विपुल असतात. रक्तदाब प्रमाणपेक्षा वाढताच लंबमज्जा [⟶ तंत्रिका तंत्र] भागातील वाहिनी संकोचक केंद्राकडे दाबग्राहक निरोधक आवेग पाठवतात ,  तसेच प्राणेशा केंद्राकडे उद्दीपक आवेग जातात. परिणामी परिसरीय रोहिण्यांमध्ये वाहिनीविस्फार होतो आणि हृद् ‌ गती कमी होऊन आकुंचन प्रेरणाही कमी होते म्हणजेच दाबग्राहकांच्या उद्दीपनामुळे प्रतिक्षेपी क्रियेने रक्तदाब कमी होतो. दाबग्राहक वाढत्या रक्तदाबास स्थायी व पडत्या रक्तदाबापेक्षा अधिक संवेदनाशील असतात. 


 आ. ६. महारोहिणीभित्तीतील दाबग्राहक : (१) लंबमज्जा, (२) जिव्हाग्रसनी तंत्रिका, (३) प्राणेशा तंत्रिका, (४) हेरिंग तंत्रिका अथवा कोटर तंत्रिका, (५) ग्रीवा पिंड, (६) ग्रीवा कोटर, (७) महारोहिणी चापातील दाबग्राहक, (८) महारोहिणी, (९) हृदय.यांशिवाय आणखी काही यंत्रणा रक्तदाबावर नियंत्रण करतात. यांपैकी केंद्रीय तंत्रिका तंत्राशी [⟶ तंत्रिका तंत्र] संबंधित असलेल्या यंत्रणेला ‘केंद्रीय तंत्रिका तंत्र रक्ताल्पताजन्य प्रतिसाद ’ म्हणतात. मस्तिष्क रक्ताल्पता उद्‌भवताच अनुकंपी तंत्रिकांद्वारे परिसरीय रोहिण्यांचे जबरदस्त आकुंचन होते. ही यंत्रणा जेव्हा जेव्हा अल्प रक्तदाबामुळे मेंदूचा रक्तपुरवठा धोक्यात येतो तेव्हा तेव्हा ताबडतोब कार्यान्वित होते. 

  रासायनिक ग्राहक महारोहिणी चाप व ग्रीवा रोहिणीच्या द्विभाजन स्थानी विखुरलेले असतात. ते ऑक्सिजन न्यूनतेस व कार्बन डायऑक्साइडाच्या आधिक्यास संवेदनाशील असतात आणि ते उद्दीपित झाल्यास मेंदूतील वाहिनीप्रेरक केंद्रामार्फत रक्तदाब वाढवितात. 

   आ. ७. रेनीन व अँजिओटेन्सीन यांच्याद्वारे रक्तदाब नियंत्रण.वरील यंत्रणांशिवाय आणखी काही हॉर्मोनावलंबी यंत्रणा [⟶ हॉर्मोने] रक्तदाबावर जलद नियंत्रण करू शकतात. यांपैकी तीन प्रमुख यंत्रणा खालीलप्रमाणे आहेत  : ( क) अधिवृक्क ग्रंथीची नॉरएपिनेफ्रीन व एपिनेफ्रीन हॉर्मोने [⟶ अधिवृक्क ग्रंथि] . ( ख) वृक्कनिर्मित  ( मूत्रपिंडनिर्मित) एंझाइम  ( जीवरासायनिक विक्रिया घडून येण्यास मदत करणारे प्रथिन) रेनीन आणि अँजिओटेन्सीन नावाचे हॉर्मोन यांची मिळून बनणारी वाहिनी-संकोचक यंत्रणा.  ( ग) पोष ग्रंथीच्या पश्च-खंडाद्वारे वाहिनी-संकोचक  ( व्हॅसोप्रेसीन) नावाचे हॉर्मोन रक्तदाब कमी होताच मोठ्या प्रमाणावर निर्माण होते [⟶ पोष ग्रंथि] .  या हॉर्मोनाला मूत्रोत्सर्जन प्रतिबंधक हॉर्मोन असेही नाव आहे. मूत्रोत्सर्जन कमी करून ते रक्ताचे घनफळ वाढविण्यास व परिणामी रक्तदाब वाढविण्यास मदत करते.  ( आ) दीर्घकालीन रक्तदाब नियंत्रण करणाऱ्या यंत्रणांचा उल्लेख पूर्वी आलेलाच आहे. 

  येथपर्यंत रोहिणी रक्तदाबाचाच विचार झाला आहे  परंतु रक्तदाब रोहिण्यांपुरताच मर्यादित नसून संपूर्ण ⇨रक्ताभिसरण तंत्रा चा तो आवश्यक भाग आहे. आ. ८ मध्ये हृदयाच्या डाव्या निलयापासून उजव्या अलिंदापर्यंतचा रक्तदाब आलेखरूपाने दर्शविला आहे. 

  केशवाहिन्यांच्या रोहिणिकेच्या टोकाकडे ३० मिमी. व नीलेच्या टोकाकडे १२ मिमी. रक्तदाब असतो. महानीला जेथे अलिंदात शिरते तिथे फक्त ५ मिमी.  ( जलस्तंभ) एवढाच रक्तदाब असतो. हातापायांच्या नीलांतील रक्तदाब ६० ते १०० मिमी.  ( जलस्तंभ) एवढाच असतो. 

   रक्तदाबाशी संबंधित विकृति : रक्तदाबामध्ये अपसामान्य बदल होण्याला रक्तदाबसंबंधी विकृती म्हणतात. प्राकृतिक रक्तदाबामध्ये अती वाढ होण्याला अतिरिक्त रक्तदाब अथवा अतिरक्तदाब म्हणतात. रक्तदाब जेव्हा प्राकृतिक प्रमाणापेक्षा सतत कमी आढळतो तेव्हा अल्परक्तदाब म्हणतात. 

  आ. ८. रक्ताभिसरण तंत्रातील रक्तदाब अतिरिक्त रक्तदाब अथवा अतिरक्तदाब : ( हायपरटेन्शन). प्राकृतिक व अपसामान्य रक्तदाब यांतील फरक दर्शविणारा कोणताही निश्चित मार्गदर्शक नाही. १४०/९० मिमी. हे आकडे स्वेच्छ असून कमीत कमी तीन तपासण्यांत जेव्हा रक्तदाब याहून अधिक आढळतो ,  तेव्हा तो धोकासूचक समजावा ,  असे अमेरिकेतील फ्रामिंगहॅम ,  मॅसॅचूसेट्स येथील काळजीपूर्वक केलेल्या पाहणीत आढळले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने प्रौढांमधील १६०/९५ मिमी. रक्तदाब अतिरक्तदाब समजावा ,  असे सुचविले आहे. 

  मृत्यूचे एक प्रमुख कारण व अतिरक्तदाब यांचा संबंध दर्शवणारी महत्त्वाची माहिती वरील पाहणीतून मिळाली आहे. हृदय व रक्तवाहिन्या यांच्याशी संबंधित असलेल्या विकृतीमुळे मरण पावणाऱ्यांमध्ये ३७% पुरुषांत व ५१% स्त्रियांत रक्तदाब कमीत कमी तीन तपासण्यांत १४०/९० च्या वर आढळला होता. अनेक वेळा मृत्यू कोणतीही पूर्वसूचना नसताना आलेला होता आणि एकूण मृत्युप्रमाण प्राकृतिक रक्तदाबाच्या लोकसंख्येच्या मानाने दुपटीपेक्षा अधिक होते.


 संप्राप्ती व वर्गीकरण :  अतिरक्तदाबाचे वर्गीकरण निरनिराळ्या प्रकारांनी करता येते व त्यांपैकी एक संप्राप्तीनुसार असल्यामुळे संप्राप्ती व वर्गीकरण यांचा विचार एकत्रित केला आहे.  ( अ) संप्राप्तीनुसार वर्गीकरण  : ( अ१) अज्ञातहेतुक अथवा प्राथमिक  :  कोणतेही निश्चित कारण नसलेला अतिरक्तदाब. ९०% रुग्ण या प्रकारात मोडतात.  ( अ२) दुय्यम अथवा सकारण  : ( १) वृक्कसंबंधी  :  उदा. ,  जन्मजात लघुवृक्क ,  रेनीन उत्पादक अर्बुद  ( नवीन कोशिकांच्या-पेशींच्या-अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणारी गाठ) ,  जलवृक्क वगैरे [⟶ वृक्क] . ( २) वृक्क – वाहिन्यासंबंधी. उदा. ,  काठिण्यजन्य रोहिणी संकोच.  ( ३) आघात. उदा. ,  परिवृक्क रक्तार्बुद.  ( ४) अंतःस्रावी ग्रंथीसंबंधीच्या विकृती  : उदा. ,  अधिवृक्क ग्रंथी-कुशिंग लक्षणसमूह [⟶ अधिवृक्क ग्रंथि] . ( ५) रक्तप्रवाहातील यांत्रिक बिघाड  :  उदा. ,  महारोहिणी अक्षमता व महारोहिणी संकोच.  ( ६) तंत्रिका तंत्र दोष. उदा. ,  मेंदूतील अर्बुद.  ( ७) गर्भिणी विषबाधा [⟶ गर्भारपणा] . ( ८) बाह्य विषबाधा :  उदा. ,  थॅलियम ,  शिसे.  ( ९) इतर :  उदा. ,  रक्तकोशिकाधिक्यरक्तता  ( रक्तातील तांबड्या कोशिकांच्या प्रमाणात वाढ होणे)  संततिप्रतिबंधक गोळ्या.  ( आ) गंभीरतेनुरूप वर्गीकरण  :  हे वर्गीकरण खाली कोष्टकरूपाने दाखविले आहे. 

  गंभीरतेनुरूप अतिरक्तदाबाचे वर्गीकरण 

  अतिरक्तदाब प्रकार 

  रक्तदाब (मिमी.) 

  नेत्रगोल परीक्षा *

 वृक्क कार्य

  अतिसौम्य 

  सौम्य 

  साधारण अथवा 

  माफक 

  गंभीर 

  

  मारक 

  १४१ /९१ ते १६०/१००

  १६१ /१०१ ते १८०/११०

  १८१ /१११ ते २२०/१२५

  

  २२० /१२५ ते २२०/१४०

  

  २२१ /१४१ ते अधिक

  प्राकृतिक 

  प्राकृतिक 

  रोहिणी 

  काठिण्य 

  जालपटल 

  रक्तस्त्राव 

  दृग्‌बिंबशोफ 

  प्राकृतिक 

  प्राकृतिक 

  मंद+ 

  

  मंद+ 

  

  मंद++ 

     *यासंबंधी अधिक माहिती पुढे दिलेली आहे. दृग्‌बिंबशोफ म्हणजे दृक्‌तंत्रिका जालपटलाला जेथे भेदून आत शिरते त्या ठिकाणाची सूज. 

  

  आ. १०. मारक अतिरक्तदाब : नेत्रपरीक्षकातून दिसणारे जालपटलाचे दृश्य : (१) दृग्‌बिंबशोफ, (२) रोहिणिका आकुंचन, (३) रक्तस्त्राव, (४) प्रथिन निःस्त्राव.

कधीकधी अतिरक्तदाबाचा उल्लेख साधा अथवा सुदम्य आणि मारक असा करतात. सुदम्य प्रकार हळूहळू वाढत जाऊन सहा ते बारा महिन्यांत मारक ठरतो. 

  प्रवृत्तिकारक कारणांमध्ये आनुवंशिकतेचा भाग महत्त्वाचा आहे. अतिरक्तदाब मेंडेलियन प्रभावाप्रमाणे अपत्यात उद्‌भवू शकतो [⟶ आनुवंशिकी] .  माता-पिता दोघेही अतिरक्तदाब रुग्ण असतील ,  तर अपत्यात अतिरक्तदाबाची शक्यता ५०% आणि दोघांपैकी एक रुग्ण असल्यास २५% शक्यता असते. अतिरक्तदाब कौटुबिंक स्वरूपात आढळतो. ज्या कुटुंबात विकार आढळतो त्यातील अपत्यामध्ये विकार नसलेल्या कुटुंबापेक्षा विकार उद्‌भवण्याचे प्रमाण पाचपट अधिक आढळते. चाळीशीतील स्त्री-पुरुषांतील विकाराचे प्रमाण सारखेच आढळते. मधुमेह व मेदोवृद्धी असल्यास अतिरक्तदाबाची शक्यता अधिक असते. 

  लहान वयात म्हणजे तिशीच्या सुमारास उद्‌भवणाऱ्या अतिरक्तदाबास दैनंदिन भोजनातील मिठाचे जादा सेवन कारणीभूत असावे. जपानी लोकांच्या अन्नसेवनातील सोया सॉस प्रकारात मिठाचे भरपूर प्रमाण असल्यामुळे तेथे अतिरक्तदाब मोठ्या प्रमाणात आढळतो. 

लक्षणे :  संध्याकाळी रक्तदाब सर्वाधिक असतो ,  हा गैरसमज असून दैनंदिन फेरफारामध्ये रात्रीच्या उत्तरार्धात तो सर्वांत कमी आणि पहाटेस सर्वाधिक आढळतो. उपद्रवरहित अतिरक्तदाब लक्षणविरहित असतो. पुष्कळ वेळा नेहमीच्या वैद्यकीय तपासणीत अतिरक्तदाब असल्याचे अचानक आढळते. 

  बहुधा डोकेदुखीची तक्रार  ( विशेषेकरून सकाळच्या वेळी) असते. चक्कर येणे ,  अशक्तता ,  थकवा ,  छातीत धडधडणे ,  विसराळूपणा ,  चिडखोरपणा ,  कर्णश्वेड  ( कानांत घंटानाद होणे) इ. लक्षणे अतिरक्तदाबाकडे लक्ष वेधतात. कधी कधी वारंवार घोळणा फुटणे  ( नासारक्तस्राव) हे लक्षण अतिरक्तदाबाची शंका आणण्यास कारणीभूत ठरते. अतिरक्तदाबाचे गांर्भीय व लक्षणे यांचा परस्परसंबंध नसतो. काही नाडीतील फरक आढळतात. भुज रोहिणी दाबून पाहिल्यास सहज दाबली जात नाही व बोटास दोरीसारखी कडक लागते. रक्तदाबमापकाने रक्तदाब प्राकृतिकापेक्षा वाढलेला आढळतो. आ. ९ मध्ये वयोमानाप्रमाणे होणारे रक्तदाबातील फरक दर्शविले आहेत. 

नेत्रगोलाची [⟶ डोळा] नेत्रपरीक्षकातून केलेली परीक्षा जालपटलातील रोहिण्यांची परिस्थिती दर्शविते. आ. १० मध्ये मारक अतिरक्तदाबामुळे होणारे जालपटलातील बदल दाखविले आहेत. नेत्रगोल परीक्षेशिवाय विद्युत्‌ हृल्लेख  ( ‘हृद्स्नायूच्या आकुंचनामुळे निर्माण होणाऱ्या विद्युत्‌ प्रवाहाचा आलेख ’ ),  छातीची क्ष-किरण तपासणी ,  मूत्र व रक्ततपासणी इ. तपासण्या आवश्यक असतात. कधी कधी काही विशेष तपासण्या  उदा. ,  वृक्क जीवोतक परीक्षा  ( वृक्कातील जिवंत कोशिकासमूहाची परीक्षा) ,  अणुकेंद्रीय वृक्क क्रमवीक्षण इ. कराव्या लागतात.


  उपद्रव :  अतिरक्तदाबामुळे हृदय ,  वृक्क ,  मेंदू ,  डोळे व परिसरीय रोहिण्या यांवर अनिष्ट परिणाम होतात  : ( १) हृदय  :  डाव्या निलयाची निष्फलता नेहमी आढळते. कष्टश्वसन व ताठ बसल्यानंतर किंवा उभे राहिल्यास श्वसन-त्रास कमी होणे हे प्रमुख लक्षण असते.  ( २) उरःशूल अथवा हृद्शूल  :  हृद् ‌ रोहिणी काठिण्य बहुधा कारणीभूत असते. १०% रुग्णांमध्ये आकस्मिक मृत्यू संभवतो.  ( ३) वृक्क  :  १० ते २० टक्के रुग्ण वृक्क निष्फलतेमुळे दगावतात.  ( ४) मस्तिष्क  :  मेंदूतील रक्तस्राव किंवा वाहिनीक्लथन १५ ते २०% रुग्णांच्या मृत्यूचे कारण असते. 

 

  उपचार :  रक्तदाब १६०/९० च्या वर असणाऱ्या सर्वच रुग्णांना उपचारांची आवश्यकता असते. उपाययोजना कारणपरत्त्वे करावी लागते म्हणून प्राथमिक व दुय्यम अतिरक्तदाबातील फरक ओळखला पाहिजे आणि कारण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुय्यम अतिरक्तदाब शस्त्रक्रियेमुळे बरा होण्यासारखा असल्यास शस्त्रक्रियाविशारदाकडून तपासून योग्य उपाय योजता येतो. उदा. ,  महारोहिणी संकोच या जन्मजात विकृतीत रक्तप्रवाहास अडथळा येऊन शरीराच्या वरच्या भागात अतिरक्तदाबजन्य लक्षणे उद्‌भवतात. एका पाहणीत जवळजवळ ९५% रुग्णांचा रक्तदाब शस्त्रक्रियेनंतर प्राकृतिक आढळला होता. 

 

  उपाययोजना दोन प्रकारांत विभागता येते  : ( अ) सर्वसाधारण उपाय , ( आ) औषधी चिकित्सा. 

  ( अ) सर्वसाधारण उपाय  : ( १) दिलासा व धीर देणे  :  सर्वच अतिरक्तदाबाच्या रुग्णांना वैद्याने दिलासा व धीर देणे उपयुक्त असते. जरूरीशिवाय इतर किरकोळ जबाबदाऱ्या न स्वीकारणे ,  कामाचे तास शक्य झाल्यास कमी करणे ,  विश्रांती व पुरेशी झोप यांकडे लक्ष देणे हितावह असते. कधीकधी अतिताण उत्पन्न करणारे कामच बंद करावे लागते. 

  ( २) मानसिक ताण कमी करणे  : ( क) योगासनांचा उपयोग होतो. सौम्य अतिरक्तदाब केवळ शवासनामुळे प्राकृतिक होतो [⟶ योग चिकित्सा]  . ( ख) अतिशायी ध्यान  :  मनातल्या मनात एखाद्या शब्दाचा  ( उदा. ,  मंत्र) पुनरुच्चार करीत राहण्यामुळे मानसिक शिथिलीकरण साधता येते.  ( ग) जैव प्रतिसंभरण  :  मानसशास्त्रज्ञांनी अनैच्छिक शारीरिक क्रियांवर इच्छेनुरूप नियंत्रण करता येणारे तंत्र शोधले आहे. यामुळे मानसिक ताण कमी होतो. रुग्णास त्याच्या अतिरक्तदाबाबद्दल जाणीव करून देतात व नंतर रक्तदाबावर मानसिक क्रियांनी नियंत्रण करण्याचे प्रयत्न केले जातात. अनेक पाश्चिमात्य शास्त्रज्ञांनी जैव प्रतिसंभरण तंत्रामुळे हृद् ‌ गती व रक्तदाब यांवर नियंत्रण साध्य होते असे म्हटले आहे.  ( घ) इतर काही पद्धतींनी मानसिक ताण घालवता येतो. उदा. ,  जपानी लोक झेन पंथीय तंत्राचा  ( एक प्रकारच्या चिंतनाचा) उपयोग करतात.

  ( ३) मेदोवृद्धी घालवण्याकरिता योग्य व्यायाम व योग्य आहार यांची योजना करणे. 

  ( ४) मिठाच्या सेवनावर नियंत्रण ठेवणे. दररोज ५ मिग्रॅ.पेक्षा कमी मिठाचे सेवन सौम्य व माफक अतिरक्तदाब आटोक्यात ठेवण्यास मदत करते. 

  ( ५) मद्यपान आणि धूम्रपान हे दोन्ही रक्तदाब वाढवतात म्हणून वर्ज्य करावे. 

    आ. ११. अतिरक्तदाबरोधी औषधे परिणाम करीत असलेली काही शरीरस्थाने : (१) वाहिनी भित्ती, (२) अनुकंपी ग्राहक, (३) अनुकंपी तंत्रिका तंतू, (४) अनुकंपी स्वायत्त तंत्रिका गुच्छ, (५) केंद्रीय तंत्रिका तंत्र, (६) अभिवाही तंत्रिका अंत. (यांतील संज्ञांच्या स्पष्टीकरणासाठी ‘तंत्रिका तंत्र’ ही नोंद पहावी). ( आ) औषधी चिकित्सा  :  अतिरक्तदाबाचे प्रमाण व त्याचे हृदय ,  मेंदू ,  वृक्क यांसारख्या अवयवांवरील संभाव्य गंभीर परिणाम यांमुळे त्यांवरील अनेक प्रकारची औषधे बाजारात उपलब्ध आहेत. निष्णात वैद्य प्रथम अतिरक्तदाब धोकादायक असल्याची खात्री केल्यानंतरच औषधयोजना काळजीपूर्वक करतो. उपचार बहुधा आयुष्यभर चालू ठेवावे लागत असल्यामुळे निश्चित निदान व एकदा सुरू केलेले उपचार बंद न पडू देणे महत्त्वाचे असते. 

 

अतिरक्तदाबरोधी औषधे शरीराच्या निरनिराळ्या यंत्रणांवर परिणाम करून रक्तदाब नियंत्रित करतात. या सर्वच औषधांचा उल्लेखही येथे करणे अशक्य आहे. आ. ११ मध्ये अतिरक्तदाबरोधी औषधे परिणाम करीत असलेल्या शरीरातील काही जागा दर्शविल्या आहेत. 

 

  वरील उल्लेखावरून अतिरक्तदाबावरील औषधी योजना क्लिष्ट व गुंतागुंतीची असल्याचे लक्षात येते. प्रत्येक रुग्णावरील औषधाचा विशेष अभ्यास करणे अगत्याचे असते. पुष्कळ वेळा एकाच औषधाऐवजी मिश्र औषधे द्यावी लागतात. जागतिक आरोग्य संघटनेने खालील टप्प्यांची योजना सुचवली आहे. 

  टप्पा १ – मूत्रल    ( मूत्रोत्सर्जनाचे प्रमाण वाढविणारी) औषधे देणे.

 

  टप्पा २  –  वरील औषधे १ ते २ महिने परिणाम करीत नसल्यास अनुकंपी ग्राहकावर परिणामकारी औषधे सुरू करणे  ( उदा. ,   प्रोप्रानोलाल). 

  टप्पा ३ –  वरील दोन्ही औषधे परिणामरहित असल्यास पुढीलपैकी तिसरे सुरू करावे  : ( अ) वाहिनी विस्फारक , ( आ)   क्लोनिडीन  ( केंद्रीय तंत्रिका तंत्रावरील परिणामकारी) , ( इ) प्राझोसीन  ( रोहिणिकांवर परिणामकारी). 

  टप्पा ४  –  वरील योजना परिणामरहित आढळल्यास ग्वानेथिडीन सुरू करणे  ( अनुकंपी तंत्रिका तंत्रावरील परिणामकारी). 

 

  स्त्रियांमधील ( १) संततिप्रतिबंधक गोळ्यांच्या सेवनामुळे उद्‌भवणारा अतिरक्तदाब आणि  ( २) गर्भिणी विषबाधा अथवा गर्भविषरक्तता यांबद्दल थोडक्यात माहिती खाली दिली आहे. 

 

  ( १) संततिप्रतिबंधक गोळ्यांचे सेवन अतिरक्तदाबास कारणीभूत असल्याचे सिद्ध झाले आहे. निरनिराळ्या पाहणीत १५ ते २०% प्रमाण आढळले असून प्रकार बहुधा सौम्य असतो. मुळातच अतिरक्तदाब असलेल्या स्त्रीने गोळ्यांचे सेवन टाळणे चांगले. 

  ( २) गर्भिणी विषबाधा  :  प्रत्येक गर्भवती स्त्रीच्या रक्तदाबात तिच्या हृद ्‌ -रक्ताभिसरणातील आवश्यक बदलामुळे फरक होतो. गर्भारपणाच्या पहिल्या अर्ध्या काळात १४०/९० रक्तदाब अतिरक्तदाब म्हणता येतो. दुसऱ्या अर्ध्या काळात एक चतुर्थांश स्त्रियांत तो वाढून १६०/१०५ ते १७०/११० होण्याची शक्यता असते. ८० किग्रॅ.पेक्षा जास्त वजन असलेल्या स्त्रीमध्ये ५० किग्रॅ. वजनाच्या स्त्रीपेक्षा १५ मिमी. रक्तदाब अधिक आढळतो. 

   गर्भिणी विषबाधा ही एक गंभीर विकृती असून तिचे मारक अतिरक्तदाबाशी पुष्कळसे साम्य आहे  किंबहुना अतिशय वाढलेला रक्तदाब हे त्याचे एक प्रमुख लक्षण आहे. उपचारामध्ये रक्तदाब नियंत्रित करणे हा महत्त्वाचा भाग असून मिथिल डोपा हे औषध उपयुक्त ठरले आहे.[⟶ गर्भारपणा] .


 अल्परक्तदाब : ( हायपोटेन्शन). प्राकृतिक रक्तदाबापेक्षा कमी रक्तदाब म्हणजे अल्परक्तदाब होय. तो दोन प्रकारांत आढळतो.  ( १) तीव्र व  ( २) चिरकारी  ( दीर्घकालीन). 

  ( १) तीव्र प्रकार बहुधा अवसादासहित असतो  ( अवसाद म्हणजे ऊतक रक्तपुरवठ्यातील गंभीर कमतरतेमुळे सार्वदेहिक महत्त्वाच्या कोशिका कार्यात बिघाड होणे). अवसादरहित अल्परक्तदाबही असू शकतो. अवसादाची अनेक कारणे आहेत[⟶ अवसाद]. रुग्णावरील उपचार तातडीने आणि रुग्णालयात करणे आवश्यक असते.  ( २) काही व्यक्तींमध्ये आकुंचन रक्तदाब ९० ते ११० मिमी. असूनही त्यांची जीवनमर्यादा ज्यांचा रक्तदाब प्राकृतिक म्हणजे १२०/८० आहे त्यांच्यापेक्षा अधिक असल्याचे आढळले आहे. त्रासदायी अल्परक्तदाब असलेले रुग्ण आळस ,  अशक्तता ,  लवकर थकवा येणे ,  चक्कर येणे इ. तक्रारी करतात व त्या विशेषेकरून ताठ उभे असताना जाणवतात. हृद्रोग ,  काही अंतःस्रावी ग्रंथींचे रोग ,  अपपोषण ,  फार दिवस अंथरुणावर खिळवून टाकणारा आजार व काही तंत्रिका तंत्र विकृती चिरकारी अल्परक्तदाबास कारणीभूत असतात. अल्परक्तदाबाच्या एका प्रकारास अज्ञातहेतुक ऊर्ध्वस्थितिज अल्परक्तदाब म्हणतात. वृद्धावस्थेत बहुधा आढळणारी ही विकृती केंद्रीय आणि / किंवा परिसरीय स्वायत्त तंत्रिका तंत्राच्या अपकर्षामुळे होते. कोणताही विशिष्ट उपचार त्यावर उपलब्ध नाही.

  भालेराव ,  य. त्र्यं.

   आयुर्वेदीय वर्णन व चिकित्सा : रक्तदाब हा विकार म्हणण्यापेक्षा अनेक रोगांमध्ये हे यंत्राने ज्ञात होणारे चिन्ह असते. ह्याचे दोन प्रकार असतात  :  अधिक रक्तदाब व न्यून रक्तदाब. अधिक रक्तदाबामध्ये उभे डोके दुखणे ,  नाडी भरलेली आणि जोराने उडणारी अशी असते ,  तर कमी रक्तदाबामध्ये नाडी ही चल अशक्त अशी असते. अधिकामध्ये पित्त जास्त असते ,  तर न्यूनामध्ये वात जास्त असतो. पहिल्यामध्ये पित्त कमी करणारी चिकित्सा करावी ,  तर दुसऱ्यामध्ये वात कमी करणे जरूरीचे असते. आयुर्वेदाच्या दृष्टीने अधिक दाब हा रक्तपित्ताचे पूर्वरूप असते आणि रक्तपित्ताची दुसरीही पूर्वरूपे त्याच्याबरोबर असू शकतात. निरनिराळ्या मार्गांतून रक्तस्राव होऊ शकतो. ज्या मार्गाच्या रक्तवाहिन्या ताणलेल्या ,  भरलेल्या पातळ झाल्या असतील तेथे रक्ताचा दाब सहन न होऊन त्या फुटून रक्तस्राव होतो. वैद्याने नुसते रक्तदाबावरच विसंबून न राहता कोणत्या अवयवातील वाहिन्या वरीलप्रमाणे झाल्या आहेत हे पाहून चिकित्सा करावी. डोके भयंकर दुखत असेल ,  तर डोक्यामध्ये ,  नाकातून ,  तोंडातून अथवा डोळ्यामध्येही रक्तस्राव होण्याचा संभव आहे असे समजून त्या रोग्याला सयुक्तिक रेचक द्यावे ,  वमन मुळीच देऊ नये. अशा रोग्यांना वमन दिले ,  तर शिरोभागांतील रक्तवाहिन्यांमधील दाब वाढून त्या फुटण्याचा संभव असतो. म्हणून केव्हाही वमन देऊ नये ,  रेचक दिले म्हणजे अर्धांगवात ,  नाकातोंडातून खूप होणारा रक्तस्राव  ( रक्तपित्त) होण्याची आपत्ती टाळता येते. 

  रेचक दिल्यानंतर यकृत विकारांत सांगितलेले सर्व उपचार काढे द्यावेत ,  रक्तपित्ताची सर्व चिकित्सा करावी. न्यूनदाब असेल तर त्याबरोबर रसक्षीणता ,  मज्जाक्षीणता असण्याचा संभव असतो. अशा वेळी त्यांचा क्षय भरून आणणारी चिकित्सा करावी. 

   एरवी वातगुंजाकुशा ,  बृहद् ‌वा तचिंतामणी ,  मकरध्वज ,  शतावरी घृ त इ. वातनाशक औषधे द्यावीत. दोन्ही रक्तदाबांत शतावरी घृ ताचे नित्यसेवन हे अतिशय उपकारक होईल.  

  पटवर्धन ,  शुभदा अ.

 संदर्भ : 1. Laurence, D. R. Bennett, P. N. Clinical Pharmacology, Edinburgh, 1980.

            2. Macleod, D. J., Ed., Davldson’s Principles and Practice of Medicine, Edinburgh,   1984.

            3. Petersdorf, R. G. and others, Ed., Harison’s Principles of Internal Medicine, Singapore, 1983.

           4. Shah, S. J. and others, Ed., A. P. I. Textbook of Medicine, Bombay, 1986.

          5. Weathreall, D. J. and others, Ed., Oxford Textbook of Medicine, Oxford, 1984.