मण्यार (बंगारस सीरूलियस)मण्यार : जमिनीवर आढळणाऱ्या विषारी सापांची ही एक जात आहे. याचे विष अत्यंत जालीम असते. हे साप आकाराने लहान असतात. यांचे तोंड लहान असल्यामुळे यांना फार मोठा ‘आ’ वासता येत नाही. हे साप ‘इलॅपिडी’ कुलातले असून त्यांच्या सु. ११ जाती आहेत त्यांपैकी ६ – ७ जाती भारतात आढळतात. बहुतेक जाती बंगारस वंशातील आहेत.

बं. सीरूलियस या जातीचा मण्यार मुख्यतः महाराष्ट्रात मैदानी प्रदेशात आढळतो. कधीकधी तो १,३७२ उंचीवरही आढळला आहे. त्याचे शरीर चकचकीत काळे किंवा पोलादी निळ्या रंगाचे असून त्यावर पांढरे पट्टे असतात. हे पट्टे एकेकटे किंवा जोडीने असतात. ते डोक्यामागे बऱ्याच अंतरापासून शेपटापर्यंतच्या भागात असतात. पूर्ण वाढ झालेल्या सापाची लांबी अंदाजे १५० सेंमी. किंवा थोडी जास्त असते. शरीराची खालची बाजू पांढरी असते. पाठीवर मध्यभागी मोठ्या आणि षट्‍कोनी खवल्यांची एक लांब ओळ असते. डोळे मध्यम किंवा लहान असून बाहुली वाटोळी असते. शेपूट निमुळते व टोकदार असते.

बं. फॅसिएटस या जातीच्या सापास ⇨ पट्टेरी मण्यार म्हणतात, तर बं. नायगर या जातीच्या सापास काळा मण्यार असे म्हणतात. काळा मण्यार आसाम व दार्जिलिंग या प्रदेशात आढळतो. याचा रंग काळा किंवा पोलादी निळा असतो व याच्या अंगावर पट्टे नसतात. खालची बाजू पांढरी असून तीवर काळे ठिपके असतात. याची आणखी एक जात बं. लिव्हिडस हीदेखील या प्रदेशात आढळते.

मण्यार घराच्या जवळपास किंवा घरात, बागेत, गवतात, झुडपात, पडक्या इमारतीत किंवा दगडांच्या व विटांच्या ढिगाखाली आढळतो. उन्हाळ्यात तो पाण्याच्या डबक्याजवळ दिसतो. अन्न शोधण्यासाठी तो रात्री हिंडतो दिवसा सहसा बाहेर पडत नाही. त्यास दुखावले, तरच तो अंगावर येतो व चावतो. इतर लहान साप हे याचे मुख्य भक्ष्य पण बेडूक, उंदीर वगैरेंसारखे लहान प्राणीही हा खातो. मादी एप्रिल – मेमध्ये सहा ते दहा पांढरी अंडी घालते. ४५ ते ६० दिवसांनी पिले अंड्यांबाहेर पडतात त्या वेळी ती १५ ते २० सेंमी. लांबीची असतात.

मण्यारचे विष नागाच्या विषापेक्षाही जहाल असते. यामुळे याचा दंश झाल्यापासून ६ ते २४ तासांत माणूस दगावतो.

कर्वे, ज. नी. जमदाडे, ज. वि.