मोरारजी रणछोडजी देसाई

देसाई, मोरारजी रणछोडजी : (२९ फेब्रुवारी १८९६– ). भारताचे चौथे पंतप्रधान (२६ मार्च १९७७ पासून). सुरत जिल्ह्यातील भदेली गावी मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म. त्यांचे वडील रणछोडजी हे प्राथमिक शिक्षक, तर आई मणिबेन (वाजिबेन) ही निरक्षर होती. मोरारजींचे प्राथमिक शिक्षण बलसाड येथे झाले. ते १५ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे अपघाती निधन झाले (१९११). त्याच वर्षी गजराबेन यांच्याशी त्यांचा विवाह झाला. वडिलांच्या पश्चात कुटुंबाची सर्वच जबाबदारी ज्येष्ठत्वाच्या नात्याने त्यांच्यावर पडली. १९१२ मध्ये मोरारजी मॅट्रिक व पुढे १९१७ मध्ये मुंबईच्या विल्सन महाविद्यालयातून बी. ए. झाले. १९१८ मध्ये तत्कालीन मुंबई प्रांतात उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. मोरारजींना एक मुलगा व एक मुलगी आहे.

उपजिल्हाधिकारीपदाचा राजीनामा देऊन (१९३०) ते गांधीजींच्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सहभागी झाले. त्याबद्दल त्यांना पुढे तीन वेळा तुरुंगवास भोगावा लागला. ते गुजरात काँग्रेस कमिटीचे चिटणीस झाले (१९३१–३७). मुंबई प्रांताचे महसूल, सहकार, कृषी आणि जंगल खात्यांचे ते मंत्री होते (१९३७–३९). ‘छोडो भारत’ आंदोलनात भाग घेतल्यामुळे त्यांना १९४५ पर्यंत पुन्हा तुरुंगात जावे लागले. मुंबई प्रांतात गृह व महसूल मंत्री म्हणून त्यांनी १९४६–५२ या काळात काम केले व पुढे ते मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री झाले (१९५२–५६). या काळात त्यांनी प्रथमच जमीनमहसुलाबाबत काही सुधारणा केल्या व मुंबई प्रांताची प्रशासनव्यवस्था अत्यंत कार्यक्षम केली. त्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात व्यापार व उद्योगमंत्री म्हणून प्रवेश केला (१९५६–५८). या वेळी त्यांनी भारताला कर्ज मिळवून देण्यासाठी विविध देशांना भेटी दिल्या. १९५८ नंतर ते अर्थमंत्री असताना त्यांनी परराष्ट्रमदतीसाठी फ्रान्स, स्वित्झर्लंड, अमेरिका, जपान वगैरे देशांचा दौरा केला आणि राष्ट्रकुल परिषद (१९५९), जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय चलन निधी परिषद (१९६०) यांना ते उपस्थित राहिले. कामराज योजनेनुसार त्यांनी राजीनामा दिला. मार्च १९६६–६७ या काळात त्यांनी प्रशासकीय सुधारणा आयोगाची धुरा सांभाळली. मंत्र्यांवरील आरोपांची चौकशी करण्यासाठी लोकपाल व लोक–आयुक्त यांची स्थापना करावी, अशी महत्त्वाची शिफारस मोरारजींनी याच काळात केली होती. १९६७ मध्ये ते इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री व उपपंतप्रधान म्हणून आले. त्यांनी जपान, इंग्लंड, कॅनडा वगैरे देशांचे सदिच्छा दौरे केले. पण १९६९ च्या काँग्रेस पक्षातील दुहीनंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि ते संघटना काँग्रेसचे लोकसभेतील नेते झाले. ते १९६२, ६७ व ७१ मध्ये लोकसभेवर निवडून आले होतेच. गुजरात विद्यापीठाचे कुलगुरू, नवजीवन ट्रस्टचे अध्यक्ष, हिंदी प्रचार सभेच्या सल्लागार मंडळाचे सदस्य, अखिल भारतीय दारूबंदी परिषदेचे सदस्य, गांधी स्मारक निधी, गांधी शांतता प्रतिष्ठान व कस्तुरबा ट्रस्ट यांचे विश्वस्त इ. नात्यांनी अनेक विधायक, सांस्कृतिक व सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध आला. संघटना काँग्रेसचे ते एक निष्ठावान कार्यकर्ते व नेते होते. २५ जून १९७५ रोजी सबंध देशात आणीबाणी जाहीर करण्यात येऊन त्याच मध्यरात्री मोरारजींना अटक करण्यात आली. पुढे १८ जानेवारी १९७७ रोजी लोकसभेच्या निवडणुका घेण्यासंबंधीची घोषणा जाहीर झाल्यानंतर त्यांची मुक्तता करण्यात आली. त्यानंतर संघटना काँग्रेस, भारतीय जनसंघ, भारतीय लोकदल व समाजवादी पक्ष या चार पक्षांचे विलिनीकरण होऊन ‘जनता पक्षा’ची स्थापना झाली (२३ जानेवारी १९७७). या पक्षाचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. मार्च १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाला बहुमत मिळून ह्या पक्षाचे केंद्र सरकार स्थापन झाले आणि मोरारजींची पंतप्रधान म्हणून निवड झाली.

एक निष्ठावंत व कडवे गांधीवादी कार्यकर्ते, शिस्तप्रिय, उत्कृष्ट प्रशासक, सत्य व अहिंसा यांचे निस्सीम पुरस्कर्ते, स्पष्टवक्ते, निःस्पृह व साध्या राहणीचे म्हणून मोरारजींचा लौकिक भारतात व परदेशांतही आहे.

संदर्भ: 1. Desai Morarji,  In My View, Bombay, 1966.

           2. Karaka, D. F. Morarji, Bombay, 1965.

केळकर, इंदुमति