चरक : या शब्दाचे अनेक अर्थ आहेत आणि या नावाच्या अनेक व्यक्तीही आहेत. त्यांतील एक अत्यंत प्रसिद्ध व्यक्ती आयुर्वेदातील चरकसंहिता  या नावाने प्रसिद्ध असलेल्या महान ग्रंथाचे कर्ते. त्यांच्या या ग्रंथात उत्तर भारताच्या पश्चिमोत्तर प्रदेशाची वर्णने आढळतात. यावरून ते त्या भागातील रहिवासी असावेत. ज्या कनिष्क राजाच्या पदरी ते राजवैद्य होते त्याची राजधानी याच भागात होती. इ.स.पू. पहिल्या शतकाच्या सुमारास हा राजा होऊन गेला असावा, असे एक मत आहे. राजा कनिष्क व आर्य नागार्जुन समकालीन व्यक्ती असाव्यात. कनिष्काचा काळ अनिश्चित असल्यामुळे चरकांचा काळही अनिश्चित आहे. याविषयी तीन भिन्न काळ पुढे केले जातात ते असे : इ.स.पू. ५८, इ.स. ७८ किंवा इ.स. १२३. यांपैकी शेवटच्यास जास्त पाठिंबा मिळतो. त्रिपिटक या बौद्ध ग्रंथाच्या चिनी भाषांतरात (इ.स. ४७७) कनिष्काच्या राजवैद्यांचे नाव चरक असल्याचा उल्लेख आहे. याच चरकांनी मूळच्या अग्निवेश- तंत्र  या ग्रंथाचे पुनःसंपादन केले असावे, असे मानले जाते.

चरक हे नाव फार प्राचीन वेदकालीन आहे. ‘चरक’ शब्दाचा भ्रमणशील असा व्युत्पत्त्यर्थ आहे. कृष्ण यजुर्वेदाच्या एका शाखेच्या प्रवर्तक ऋषीचे नाव चरक आहे. ललित विस्तार  ग्रंथात हिंडणाऱ्या संन्याशांना चरक संबोधिले आहे. चक्र धारण करणारे तसेच योगाभ्यास करणारे यांनाही चरक संज्ञा दिली जाते. बृहदारण्यक उपनिषदात ‘मद्रेषु चरकाः पर्यव्रजाम’ (म्हणजे ‘आम्ही फिरत फिरत मद्र देशाला गेलो’ ) असा उल्लेख आहे. वैशंपायनाच्या शिष्यांना चरक म्हणत.‘चरक’ म्हणजे ‘प्रायश्चित्त करणारे’ असाही एक अर्थ आहे. वैशंपायनाकरिता प्रायश्चित्त करणारे ते चरक. वैशंपायनशिष्य याज्ञवल्क्यांनी मात्र वैशंपायनाकरिता प्रायश्चित केले नव्हते. जे विद्यार्थी एका गुरूजवळ शिक्षण संपवून दुसऱ्याकडे ज्ञान संपादनाकरिता हिंडत जात त्यांनाही चरक म्हणत.

अशा प्रकारे चरक शब्दाचा उपयोग अनेक अर्थांनी केलेला आढळतो. ‘चरक’ मानवाचे हित करण्याकरिता हिंडत आणि जनतेची मानसिक व शारीरिक दुःखे दूर करीत. म्हणून पुढे चरक या शब्दास वैद्य हा अर्थ प्राप्त झाला असावा.

चरकसंहिता : आयुर्वेद किंवा वैद्यक या विषयावरचा संस्कृत भाषेतील आद्य व मुख्य असा ग्रंथ. या ग्रंथाची रचना इसवी सनापूर्वी प्रथम झाली असावी व नंतर त्यात भर पडली. पुनर्वसु आत्रेय यांच्याजवळ सहा शिष्य विद्यार्जन करीत होते. अग्निवेश, जतूकर्ण, पाराशर, भेड, हारीत आणि क्षीरपाणी अशी त्यांची नावे होती. या सर्वच शिष्यांनी वैद्यकावर ग्रंथ लिहिले. अग्निवेशाने लिहिलेल्या ग्रंथास अग्निवेश-तंत्र  असे म्हणत. अग्निवेशाने आपल्या पुनर्वसु आत्रेय या आचार्यांचा वारंवार उल्लेख यात केला आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकाच्या शेवटास ही सहा ‘तंत्रे’ उपलब्ध असावीत. हल्ली अग्निवेश- तंत्र  व भेडसंहिता  उपलब्ध आहेत. अग्निवेश-तंत्राचे पुनःसंपादन कनिष्क राजाच्या राजवैद्य चरकांनी केले व म्हणून तो ग्रंथ चरकसंहिता  म्हणून ओळखला जाऊ लागला. नंतर काही शतकानंतर कपिलबलपुत्र दृढबल नावाच्या काश्मिरी वैद्यांनी या चरकसंहितेत भर घातली. हल्ली उपलब्ध असलेल्या ग्रंथातील कोणता भाग कुणी संपादित केला हे सांगणे कठीण आहे. थोडक्यात मूळची आत्रेय संहिताच नंतर चरकसंहिता  बनली. या ग्रंथात एकूण आठ स्थाने (प्रकरणे) आहेत. चरकसंहितेवर संस्कृतमध्ये लिहिलेल्या पुष्कळ टीका आज उपलब्ध आहेत.

या ग्रंथाचा अरबी भाषेत अनुवाद झालेला आहे.चरकसंहिता  ग्रंथाचे महत्त्व केवळ आयुर्वेदापुरतेच मर्यादित नसून अध्यापन, देवतावाद, पूजा इ. त्या काळातील ग्रंथांवरही उत्तम प्रकाश पडतो. मुख्यत्वे चिकित्साविज्ञानविषयक मौल्यवान तत्त्वे या ग्रंथात विशद केलेली असली, तरी प्रसंगोपात्त सांख्य, योग, न्याय इ. विषयांचा परामर्षही त्यात घेतलेला आहे.

पहा : आयुर्वेद.

भालेराव, य. त्र्यं.