व्होल्फ्राम फोन एशेनबाख : (सु.१७७० – सु.१२२०). मध्ययुगीन जर्मन कवी. हा बव्हेरियन सरदार-कुळातील होता. स्वत:ला तो निरक्षर म्हणवीत असे. तत्कालीन काही सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाला तो होता. थुरिजियाच्या लँडग्रेव्हच्या दरबारी असतानाच त्याने पार्झिवाल ह्या आपल्या महाकाव्याची (सु.२५,००० ओळी) रचना सुरू केली. इ.स. १२०० ते १२१० ह्या दरम्यान ते पूर्ण झाले असावे. पार्झिवालची कथा थोडक्यात अशी: पार्झिवाल हा अरण्यात एकाकी वाढलेला मुलगा. त्याचे वडील युद्धात मारले गेलेले असतात. असे मरण पार्झिवालला येऊ नये, म्हणून त्याची आई त्याला शस्त्रांचे ज्ञान मिळू देत नाही. पुढे योगायोगाने पार्झिवालची गाठ काही सरदरांशी पडते व तो घराबाहेर पडतो तसेक सरदारांचे रीतिरिवाज शिकून घेतो. पुढे एका गढीमध्ये पवित्र ग्रेलच्या सेवेत असलेले काही सरदार त्याला भेटतात. देवदूतांनी पृथ्वीवर आणलेला एक रहस्यमय दगड, असे ग्रेलचे वर्णन कवीने ह्या महाकाव्यात केले आहे. हा ग्रेल सुरक्षिततेसाठी ज्याच्याकडे सोपविला जातो, तो ग्रेल राजा. त्या वेळी अँफॉर्टास हा पवित्र ‘ग्रेल’ चा राजा असतो आणि तो अंथरुणाला खिळून असतो. पुढे राजा आर्थरशी त्याची भेट होते. आर्थरला आपल्या सरदारांमध्ये त्याचा समवेश करण्याची इच्छा असते, पण तेवढ्यात पवित्र ‘ग्रेल’ चा निरोप घेऊन एक स्त्री येते. अंथरुणाला खिळलेल्या जखमी अँफॉर्टासच्या यातनांचा अर्थ पार्झिवालने जाणून घेतलेला नसल्यामुळे आर्थरच्या सरदारांत समाविष्ट होण्यची पात्रता त्याच्या ठायी नाही, तेंव्हा त्याच समावेश वरो नये असा निरोप असतो. हे कळताच पार्झिवाल परमेश्वराचा निषेध करून निघून जातो. त्यानंतर तो अनेक साहसी कृत्ये करतो. पुढे एक दिवस ईश्वरचा निषेध केल्याबद्दल त्याला पश्चात्ताप होतो. आणि तो सुधारतो. पवित्र ‘ग्रेल’च्या राज्यात त्याला प्रवेश मिळतो. तो खराखुरा ख्रिस्ती होतो. प्रतीकात्मक पातळीवर विचार केल्यास ही कथा ईश्वराचा शोध घेणा-या मानवाची ठरते. आलंकारिकतेच्या पलीकडे जाणारी व्होल्फ्रामची शैली अनेक गर्भितार्थांनी भरलेली आहे. विख्यात फ्रेंच रोमान्सकार ⇨क्रेत्यँ द त्र्वा (बारावे शतक) ह्याच्या पेर्सेवल ह्या अपूर्ण रोमान्सवर व्होल्फ्रामचे हे महाकाव्य आधारलेले असले, तरी त्याच्या स्वतंत्र प्रतिभेचा प्रत्यय त्यातून येतोच. डॉन सॉग्ज (इं. शी.) ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या त्याच्या आठ भावकविता, विलहेल्म हे अपूर्ण महाकाव्य अशी अन्य काही रचनाही त्याने केलेली आहे.

कुलकर्णी, अ.र.