बोधिसत्त्व : बौद्ध धर्मातील एक संकल्पना. ‘बोधिसत्त्व’ ह्या शब्दाचा मूळ अर्थ म्हणजे ज्या प्राण्याला पुढे केव्हा तरी ‘बोधि’ म्हणजे ज्ञान प्राप्त होणार आहे, असा प्राणी. सिद्धार्थ गौतम ज्ञान प्राप्त होण्यापूर्वी अनेक जन्मांतून गेला, म्हणून त्याच्या पूर्वजन्मांच्या सर्व जातककथांतून आणि सिद्धार्थ म्हणून जन्माला आला त्या शेवटच्या जन्मातील बोधिप्राप्तीच्या अवस्थेपर्यंत बोधिसत्त्व ह्या नावानेच तो संबोधिला जात असे. [⟶ बुद्ध].

बोधिसत्त्व मंजुश्री : एक नेपाळी ताम्रमूर्ती.पुढे ⇨ महायान पंथ अस्तित्वात आल्यानंतर बोधिसत्त्वालाच महत्त्व प्राप्त झाले, बुद्ध आणि बोधिसत्त्व ह्यांपैकी बोधिसत्त्वाचेच ध्येय मान्य होऊ लागले. बुद्ध होणारी व्यक्ती स्वतःपुरतीच पाहणारी, स्वतः ज्ञान प्राप्त करून घेण्याचीच खटपट करणारी, स्वार्थी अशी मानली जाऊ लागली. याच्या उलट बोधिसत्त्व असणारी व्यक्ती परोपकारी, दुसऱ्याचा जीव वाचविण्याकरिता स्वतः संकटात पडण्यास तयार असणारी, करुणासंपन्न, इतर अन्य प्राण्यांना मुक्ती मिळेपर्यंत स्वताःच्या मुक्तीची पर्वा न करणारी म्हणून जास्त आदरणीय मानण्यात येऊ लागली. त्यामुळे बुद्ध होण्याचे ध्येय बाजूस सारले जाऊन बोधिसत्त्वाचे चे ध्येय मानले जाऊ लागले. बोधिसत्त्वाचा हा ‘करुणा’ गुण पुढे इतका श्रेष्ठत्वाला चढवला गेला, की कोणी एखादी स्त्री गृहस्थाश्रमी बोधिसत्त्वाशी समागम व्हावा म्हणून काकुळतीने त्याच्याकडे आल्यास, त्याने करुणार्द्र हृदयाने खुशाल तिची इच्छापूर्ती करावी, असे बोधिसत्त्वभूमी  ह्या ग्रंथात सांगितले आहे.

बोधिसत्त्वसंकल्पना महायानाने उचलून धरुन तिचा खुपच विकास केला. प्रज्ञावंत, सात्त्विक, लोकोपकारक व महाकारुणिक अशा अलौकिक सद्‌गुणांचा एक आदर्श पुरुषोत्तम बोधिसत्त्वाच्या रुपाने त्यांनी लोकांपुढे ठेवला. अर्हत्‌पदापेक्षाही बोधिसत्त्वपद महायानाने श्रेष्ठ मानले. बोधिसत्त्व हा निर्वाणासाठी प्रयत्नशील अवश्य असतो पण तो स्वतःच्या निर्वाणासाठी नव्हे, तर सर्व मानवमात्रांच्या निर्वाणासाठी. महायानाने बोधिसत्त्वसंकल्पनेस विशेष महत्त्व दिल्यामुळे निरनिराळे बुद्ध व बोधिसत्त्व यांच्या प्रतिमा व मूर्ती अस्तित्वात येऊन त्यांची उपासना, पूजा होऊ लागली. यातूनच चित्रकला व मूर्तिकला यांना मोठे क्षेत्र उपलब्ध होऊन त्यांची बौध्दांना आपल्या धर्मप्रचारकार्यात खुपच मदत झाली. परदेशांतही हे लोण पोहोचले व तेथेही बौद्ध धर्म लोकप्रिय झाला. दान, शील, शांती, वीर्य, ध्यान व प्रज्ञा ह्या सहा पारमितांवर महायानांनी विशेष भर दिला. ह्या पारमितांच्या आचरणाने बोधिसत्त्वप्राप्ती करून घेऊन त्याद्वारे लोकांचे दुःख कमी करण्याच्या व्रतावर ते भर देतात. बोधिसत्त्वसंकल्पनेमुळे केवळ आध्यात्मिकतेऐवजी ह्या आध्यात्मिकतेला सामाजिकतेचे भान देण्यात आणि अंतर्मुखतेऐवजी धर्मास बहिर्मुख करण्यात महायान पंथियांनी आपले वैशिष्ट्य दाखविले. म्हणूनच बोधिसत्त्वसंकल्पनेद्वारा भिक्षुधर्मास सेवाधर्माची जोड देऊन महायानाने मानवतेची फार मोठी सेवा केली आहे, असे म्हटल्यास चूक ठरु नये.

महायान पंथात असंख्य बोधिसत्त्व उत्पन्न झाले व त्यापैकी काहीना –उदा., ⇨ अवलोकितेश्वर, ⇨ मंजुश्री, ⇨ मैत्रेय, समंतभद्र इत्यादी – उपास्य दैवतांचे स्थान प्राप्त झाले.

पहा : बौद्ध देवता बौद्ध धर्म.

संदर्भ :

1. Shantideva, Ed. Vaidya, P. L. Bodhicharyavatara With Panjika of Prajnakulamatl, Darbhanga, १९६०. 2. शांतिदेव, मूळ श्लोकांसह हिंदी अनु. शांतिभिक्षुशास्त्री, बोधिचर्यावतार, लखनौ, १९५५.  

बापट, पु. वि.