ब्यूफाँ, झॉर्झल्वील क्लेरद : (७ सप्टेंबर १७०७ – १६ एप्रिल १७८८). फ्रेंच निसर्गवैज्ञानिक व तत्त्वज्ञ. निसर्गविज्ञानावरील विस्तृत कार्याबद्दल प्रसिद्ध. Histoire naturelle generale et particuliere या प्रसिद्ध ग्रंथाचे प्रमुख लेखक. त्या काळात उपलब्ध असलेली सर्व निसर्गवैज्ञानिक माहिती या ग्रंथात संकलित करण्यात आलेली होती. त्यांच्या कार्यामुळे निसर्गाविषयीच्या अध्ययनाला विज्ञानाचा दर्जा प्राप्त झाला व जीवनविज्ञान हे शास्त्र म्हणून प्रस्थापित झाले.

ब्यूफाँ यांचा जन्म माँटवर्ड (फ्रान्स) येथे झाला. त्यांचे आधीचे शिक्षण दीझाँ येथील जेसुइस्ट महाविद्यालयात झाले (१७१७ – २३). नंतर वडिलांच्या इच्छेनुसार त्यांनी तेथेच कायद्याचाही अभ्यास केला (१७२३-२६). १७२८ साली ते अँजर्झला गेले व तेथे त्यांनी वैद्यक, वनस्पतिविज्ञान व गणित या विषयांचा अभ्यास केला असावा. १७३०-३२ या काळात त्यांनी दक्षिण फ्रान्स, इटली व इंग्लंड या प्रदेशांत प्रवास केला आणि १७३२ साली ते फ्रान्सला परतले. सर्वप्रथम त्यांनी बांधकामाच्या लाकडाच्या ताणबलाविषयी (पदार्थ ज्या कमाल ताणाला न तुटता टिकून राहू शकतो त्या ताणाविषयी) अभ्यास केला. १७३४ साली ते पॅरिस येथील रॉयल अकॅडेमी ऑफ सायन्समध्ये दाखल झाले व नंतर सर्व आयुष्यभर त्यांनी निसर्गेतिहासाच्या अभ्यासाला वाहून घेतले. त्यांनी १७३५ साली स्टव्हेन हेल्स यांच्या व्हेजिटेबल स्टॅटिक्स आणि १७४० साली आयझॅक न्यूटन यांच्या द मेथड ऑफ फ्लक्शन्स अँड इन्फाइनाइट सीरीज या ग्रंथाचा फ्रेंचमध्ये अनुवाद केला. १७३९ साली ब्यूफाँ पॅरिस येथील झारदँ द्यू रवाचे (हल्लीच्या झारदॅ दे प्लँतचे) आणि त्याचाच एक भाग असलेल्या शाही संग्रहलायाचे अभिरक्षक (व्यवस्थापक) झाले. शाही संग्रहालयासाठी सूची तयार करण्याचे कामही त्यांच्याकडे सोपविण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे कार्यक्षेत्र विस्तृत झाले आणि त्यातूनच त्यांच्या प्रसिद्ध Histoire naturelle या ग्रंथाची निर्मिती झाली. याकरिता त्यांनी भौतिकी (प्रकाशकी), कृषी, वैद्य, वनस्पतिविज्ञान, वनविद्या, प्राणिविज्ञान, रसायनशास्त्र, खनिजविज्ञान, गणित, भूमिती, जीवरसायनशास्त्र वगैरे विविध विषयांचे अध्ययन करून त्यांतील माहिती एकत्रित करण्याचा प्रयत्नय केला. त्यांच्या या कार्यामुळे हे ठिकाण विशेषतः प्राणिविज्ञान, वनस्पतिविज्ञान, रसायनशास्त्र आणि खनिजविज्ञान यांच्या अध्ययनाचे प्रमुख केंद्र बनले होते.

  पॅरिसची अँकॅडेमी ऑफ सायन्स, फ्रेंच अँकॅडेमी, लंडनची रॉयल सोसायटी, बर्लिन व सेंट पीटर्झबर्ग येथील अँकॅडेमी इ. यूरोपातील बहुतेक विद्वत संस्थांचे ते सदस्य होते. राजे पंधरावे लुई यांनी १७५३ साली त्यांनी सरदारकी बहाल केली.


ब्यूफाँ यांच्या कार्याचे दोन भाग पडतात. अकॅडमी ऑफ सायन्सला १७३७-५२ या काळात त्यांनी सादर केलेल्या संस्मरणिका आणि Histoire naturelle या ग्रंथातील त्यांचे कार्य. या संस्मरणिकांमध्ये पुढील विषयांतील कार्याचा समावेश होतो : वनस्पतिविज्ञान (लाकजांचे ताणबल, वनविद्या), गणित (संभाव्यता सिद्धांत, कलन), ज्योतिषशास्त्र (आकर्षणाचे नियम), वैद्यक (शरीरक्रियाविज्ञान), आतषबाजी (हवाई रॉकेट) इत्यादी.

Histoire naturelle (१७४९-१८०४) या ग्रंथाचे ५० खंड असावेत अशी मूळ योजना होती परंतु शेवटी हा ग्रंथ ४४ खंडांत पुरा होऊन पॅरिस येथे प्रकाशित झाला. त्यांपैकी शेवटचे आठ खंड ब्यूफाँ यांच्या मृत्युनंतर प्रसिद्ध झाले. पहिल्या आवृत्तीत सुंदर चित्रपत्रे होती. नंतर या ग्रंथाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या व अनेक भाषांत याची भाषांतरेही झाली. या ग्रंथाची भाषा सोपी व आकर्षक असून फ्रेंच साहित्य आणि वैज्ञानिक लेखन यांतील हा एक उत्कृष्ट ग्रंथ गणला जातो. या ग्रंथाच्या पहिल्या खंडात सर्वसाधारण प्रश्नांविषयी विवरण आलेले असून त्यापुढील १४ खंडांत मुख्यत्वे स्तनी प्राण्यांविषयीची माहिती असून त्यापुढील सात खंड पूरक माहितीचे आहेत. तदनंतरच्या नउ खंडांत पक्ष्यांविषयी व पुढील पाच खंडांत खनिजांविषयी माहिती आहे. शेवटच्या आठ खंडांत सरीसृप (सरपटणारे प्राणी), मासे व सिटॅसियन (जलचर स्तनी) प्रामी यांची माहिती आहे. ब्यूफाँ यांचे महत्त्वाचे कार्य खाली थोडक्यात दिले आहे. क्रमविकासातील (उत्क्रांतीतील) वस्तुस्थितींचे स्पष्टीकरण करण्याचा त्यांनी प्रयत्नि केला होता (उदा., सर्व तऱ्हेची कुत्री धनगरी कुत्र्यांपासून आली, असे त्याचे मत होते). अशा तऱ्हेने त्यांनी क्रमविकासाचा सिद्धांत सूचित केला होता पण त्याला मान्यता मिळाली नाही.

प्रजोत्पादनक्षमता हा सजीवाचा आवश्यक गुणधर्म असल्याचे त्यांनी मानले होते. जीवनिर्मितीसाठी ‘जैव रेणूं’ ची गरज असते, असे त्यांचे मत होते. आकर्षणाची प्रेरणा व उष्णता यांची सुक्ष्म केंद्रे असलेले हे रेणू सजीवाच्या शरीराचे अविनाशी घटक असतात, अशी त्यांची कल्पना होती.

सूर्यकुलाच्या उत्पत्तीविषयी त्यांनी लिहिले आहे. सूर्यावर धूमकेतू (कदाचित तारा) आदळल्याने सूर्यातून बरेच द्रव्य बाहेर पडले व ते थंड होऊन पृथ्वीसह इतर ग्रह बनलेय १७७७ साली धूमकेतूची घनता कमी असल्याने कळून आल्याने ही कल्पना मागे पडली. पृथ्वीच्या इतिहासाची कालगणना करण्याच्या दृष्टीने त्यांनी त्याची ७ युगांत विभागणी करून प्रत्येक युगाचा कालावधीही दिला होता व पृथ्वीचे वय ७० हजार वर्षांहून जास्त असल्याचे म्हटले होते. अशा तऱ्हेने पृथ्वीच्या उत्पत्तीचा विचार करताना त्यांनी प्रथमच धर्मशास्त्र विचारात न घेता भूविज्ञानाचा विचा केला. यात संबंधात त्यांनी जीवाश्मांचाही (शिळारूप झालेल्या जीवावशेषांचाही) विचार केला होता. त्यासाठी त्यांनी जीवाश्मांचा तपशीलवार अभ्यास केला. त्यामुळे ते पुराजीवविज्ञानाचे एक संस्थापक मानले जातात. दगडी कोळसा व खनिज तेले ही जैव पदार्थांचे अपघटन (रासायनिक बदल) होऊन बनल्याचे त्यांनीच प्रथम सुचविले होते. वन्य जमातींची वैशिष्ट्ये, नागर समाजातील विकृती, मुलात होणारा वाचेचा विकास, भावनांचा चेहऱ्यावरली हाव भावांवर होणारा परिणाम इ. गोष्टींची चर्चा करून त्यांनी मानवशास्त्राचा पाया घातला, असे मानतात.

ब्यूफाँ यांनी लेखनाशिवाय अनेक व्याख्यानेही दिली होती. त्यांपैकी १५ ऑगस्ट १७५३ रोजी फ्रेंच अँकॅडेमीपुढे दिलेले ‘Discours sur la style’ हे व्याख्यान महत्त्वाचे मानतात.

धार्मिक प्रभावापासून विज्ञान मुक्त करून त्याचे स्वरूप निश्चित होण्यास ब्यूफाँ यांचे कार्य उपयुक्त ठरले. आजच्या वैज्ञानिक प्रगतीच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास त्यांचे कार्य फारसे यशस्वी म्हणता आले नाही तरी त्यांनी घालून दिलेल्या बौद्धिक चौकटीतच डार्विन यांच्यापर्यंतच्या बहुतेक निसर्गवैज्ञानिकांनी आपले संशोधनाचे कार्य केल्याचे दिसून येते. ते पॅरिस येथे मृत्यु पावले.

जमदाडे, ज. वि. ठाकूर, अ. ना.