कंथा : भरतकामाचा वैशिष्ट्यपूर्ण बंगाली लोककलाप्रकार. कंथानिर्मिती स्त्रियाच करतात.जुन्या साड्या एकावर एक ठेवून व शिवून हव्या तितक्या जाडीची कंथा तयार करण्यात येते.त्यांवरील आकृतिबंध पारंपरिक, गुंतागुंतीचे परंतु मनोवेधक असतात. सु. १५५० ते १६५० या काळात यूरोप खंडात कंथांची निर्यात झाल्याचे उल्लेख मिळतात. शिकारीची दृश्ये, शेळ्यामेंढ्या,पाण्यात तरंगणारे मासे व मत्स्यकन्या यांनी सजविलेल्या आकृतिबंधांचा वापर त्यांत विशेषत्वाने केलेला असे. अशा कंथांना ‘सतगावी कंथा’ म्हणत.

परंपरागत कंथांचे लेप, सुजनी, बेतन, रुमाल, अरसीलता, ओआर व दुर्जनी असे विविध प्रकार आहेत. या सर्व प्रकारच्या कंथांत कापडाचे विविधरंगी व भिन्न भिन्न आकारांचे तुकडे एकत्र जोडून आकृतिबंध तयार करण्यात येतात. कंथा शिवताना पांढऱ्या धावदोऱ्याचा उपयोग करतात. भरतकामासाठी अर्थातच विविधरंगी धाग्यांचा उपयोग करण्यात येतो. विशेषतः कमलदलांसाठी लाल व काळ्या रंगांच्या धाग्यांचा व जललहरींचा आभास निर्माण करण्यासाठी धावदोऱ्यांचा वापर करतात. साखळी टाक्यांचा वापर मात्र सोळाव्या-सतराव्या शतकात इंडोपोर्तुगीज पद्धतीच्या कंथाप्रकारांसाठीच करण्यात आला. तसेच ‘स्टेम’ टाका, ‘फिल-इन’ टाका व ‘हेरिंगबोन’ टाका या पाश्चात्त्य पद्धतीच्या टाक्यांचाही वापर नंतर होऊ लागला. काही महत्त्वाचे कंथाप्रकार पुढीलप्रमाणे आहेत :

लेप : या कंथाप्रकारात प्रथम लांब साड्या एकावर एक ठेवून त्या शिवून काढतात. नंतर पांढऱ्या धावदोऱ्याने त्यावर भरतकाम करण्यात येते. कधी आकर्षकतेसाठी रंगीत धागा, तर कधी वळणाचा बदलता किंवा नागमोडी टाका वापरतात. पांघरूणासारखा याचा उपयोग करतात.

सुजनी : हा कंथाप्रकार म्हणजे एक कलापूर्ण हाथरी होय. त्यावरील आकृतिबंध खरोखरच काव्यात्म असतात. सुजनीला काठ असून त्यांवर पांढऱ्या धावदोऱ्याने भौमितिक आकृत्या व कलात्मक नक्षी भरलेली. असते. मध्यभागी कमळ असून चार कोपऱ्यांवर चारवृक्ष असतात. उरलेल्या भागात रामायणातील विविध दृश्ये, लोककथांतील प्रसंग त्याचप्रमाणे कृष्णलीला, लक्ष्मी, घोडेस्वार, नर्तक, मानवाकृती हत्ती, घोडे, वाघ इत्यादींचे कलाकाम केलेले असते. दोन तुकड्यांमधील जोड लक्षात येऊ नये, इतके ते भरतकाम सुबक व सफाईदार असते. मुसलमान स्त्रियांच्या सुजनीवर मात्र मानवाकृती नसतात, तर त्यांऐवजी चांदसितारा, अडकित्ता, आरसा, कंगवा, कात्री इ. दैनंदिन जीवनातील वस्तूंच्या आकृत्या भरलेल्या असतात.

मुसलमानी सुजनी कंथा

बेतन : या कंथाप्रकाराचा आकार चौकोनी असतो. बाजूला काठ, मध्यभागी कमळ व अन्यत्र विविध आकृतिबंध भरलेले असतात. बेतनचा उपयोग नातेवाईकांना भेट देण्याकरिता किंवा प्रवासात बरोबर नेण्यासाठी होत असल्यामुळे यावरील भरतकामात खूपच कौशल्य ओतलेले असते. ग्रंथ-पोथ्यांची आवरणे म्हणून उपयोगात येणाऱ्या बेतनवर स्वस्तिक, मूषक वा हंस अशी प्रतीके भरण्याची रूढी आहे. मध्यभागी भरलेले सहस्रदलपद्म हे या आकृतिबंधाचे मुख्य केंद्र असते. या सहस्रदलपद्माच्या मध्यभागी लहान वर्तुळांची वा नागमोडी रेषांची चौकोनाकृती असते. त्याभोवती कडा व त्यांच्या सन्‍निध शंख, कलश तसेच मनुष्य व प्राणी यांच्याही प्रतिकृती असतात. या सर्वांमधून विश्व व जीवजगत यांचा आध्यात्मिक संबंध सूचित होतो.

रुमाल : रुमालासारखी ही कंथा मध्यभागी कमळ आणि कडांना सुंदरशी नक्षी भरून तयार करतात. विशेषतः चार बाजूंवर कलश व त्याभोवती झाडे, प्राणी इ. असतात.

अरसीलता : हे आरसे वा कंगवे अशा सुंदर वस्तूंवरील आच्छादन असते.आकार समचतुष्कोनी, काठ रुंद व नक्षीदार, मध्यभागी कमळ, कृष्णलीला अथवा ग्रामीण दृश्ये हिच्यावर भरलेली असतात.

ओआर : हे उशीचे अभ्रेच असतात.तिच्या काठावर साधे भरतकाम वा रेखीव आकृतिबंध,वृक्ष आणि अवतीभवती पानेफुले भरलेली असतात.

दुर्जनी:ही एक लहानशी पिशवी असते.हिचा आकार व भरतकामाची पद्धत रुमालाप्रमाणे असते.भरतकाम पूर्ण झाल्यावर हिच्या तीन कडा आतील बाजूस दुमडून शिवून टाकतात.चौथ्या मोकळ्या बाजूला गोंडेदार बंद असतात.

प्राचीनपरंपरागतपद्धतीच्या कंथेवर मध्यभागी विशाल सहस्रदलपद्माचे प्रमुख प्रतीक असते. या पद्मदलांतून जीवात्मा व विश्वात्मा यांची एकात्मता सूचित होते, अशी कल्पना आहे.पद्माखेरीज नंदी,ऐरावत,व्याघ्र,मार्जार,उलूक,मयूर,मूषक व गरुड इ.वाहने आणि वज्रादी आयुधेही त्या त्या देवतेची प्रतीके म्हणून भरण्याची प्रथा आहे.दुर्गेचे प्रतीक म्हणून पन्हळीयुक्त पर्ण व गणेशाचे प्रतीक म्हणून स्वस्तिक भरण्यात येते.शिवाय रासमंडळ,घट,शंख,कलश,चक्र इ. विविध प्रतीके भरण्याची रीत आहे.प्रत्यक्ष देवदेवतांच्या मूर्ती भरू नयेत, हेच यामागील कारण असावे. तथापि कृष्णलीला,रामायणातील किंवा पुराणकथांतील घटना इत्यादींचे भरतकाम करताना त्या त्या देवदेवतांच्या प्रतिकृती भरण्याची प्रथा वैष्णवांमध्ये आहे.

जोशी, चंद्रहास


पारंपारिक कंथ्याचा एक उत्कृष्ट नमुना.