तरंगवइकहा : प्राकृत कथासाहित्यातील सर्वप्राचीन धर्मकथा. तरंगवती कथा हे तिच्या नावाचे संस्कृत रूप. प्राकृतात स्वतंत्र कथासाहित्याची परंपरा तिने निर्माण केली. ⇨पादलिप्तसूरि  हा जैन साधू तिचा कर्ता. उपलब्ध पुराव्यावरून पादलिप्तसूरि इसवी सनाच्या पाचव्या शतकापूर्वी होऊन गेला हे निश्चित आहे. तथापि एर्न्स्ट लॉइमानसारख्या विद्वानाने तो इसवी सनाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकात होऊन गेला असावा, असे मत व्यक्त केले आहे. तरंगवइकहा  ही मूळ कृती आज उपलब्ध नाही. तथापि अणुओगदार, दसवेयालियचुण्णी, जिनभद्रगणी क्षमाश्रमणाचे विशेषावश्यक भाष्य, लक्ष्मणगणीचे (बारावे शतक) सुपासनाहचरिय  इ. ग्रंथांतून ह्या कथेचे उल्लेख आढळतात. त्यावरून ह्या कथेची लोकप्रियताही लक्षात येते.

ही कथा आज तिच्या मूळ स्वरूपात उपलब्ध नसली, तरी तिचा १,६४३ पद्यांत केलेला एक संक्षेप मात्र तरंगलोला  ह्या नावाने मिळतो. वीरभद्र आचार्यांचा शिष्य नेमिचंद्रगणी ह्याने तो यशनामक आपल्या शिष्यासाठी तयार केला. तरंगवइकहा  आणि तरंगलोला  ह्यांच्यामध्ये सुमारे १,००० वर्षांचा काळ गेला असावा, असे विद्वानांचे मत आहे. तरंगलोलावरून मूळ तरंगवती कथेची कल्पना येऊ शकते. ती कथा अशी : धनपाल नामक एका श्रीमंत गृहस्थाच्या घरी साध्वी तरंगवती भिक्षा मागण्यासाठी आली. तिचे अप्रतिम लावण्य पाहून धनपालाची पत्नी मुग्ध झाली. एखादी धर्मकथा सांगण्याची विनंती तिने तरंगवतीला केली. त्यावर तरंगवतीने स्वतःचीच हकीकत तिला सांगितली. कौशाम्बीचे नगरशेट ऋषभसेन ह्यांची तरंगवती ही मुलगी, वयात आल्यानंतर उद्यानात एक चक्रवाकी पाहून आपणही पूर्वजन्मी चक्रवाकी असल्याचे तिला आठवले. त्या जन्मी एका व्याधाच्या बाणाला तिचा प्रियकर बळी पडला होता त्याच्या दुःखाने तिने स्वतःस जाळून घेतले होते. वर्तमान जन्मात आपला प्रियकर आपणास पुन्हा भेटावा, म्हणून पूर्वजन्मीच्या त्या घटनेचे एक चित्र रंगवून ते तिने कौमुदीमहोत्सवाच्या प्रसंगी राजमार्गावर लावले. ते चित्र पाहून पद्मदेव नावाच्या एका तरुणाची पूर्वजन्मस्मृती जागृत झाली बळी पडलेला चक्रवाक आपणच हे त्याच्या लक्षात आले. त्याने तरंगवतीला रीतसर मागणी घातली. तथापि तरंगवतीच्या पित्याकडून हा संबंध मान्य झाला नाही. परिणामतः ती दोघे गांधर्वविधीने विवाहबद्ध झाली. लग्नानंतर ते चोरांच्या हाती सापडले कात्यायनीला हे दांपत्य बळी देण्याचा त्यांचा विचार होता परंतु तरंगवतीचा विलाप ऐकून अखेरीस चोरांनी त्यांना सोडून दिले. नंतर हे दांपत्य कौशाम्बीस आले. पुढे विरक्त होऊन ती दोघे तपश्चर्या करू लागली त्यांनी सिद्धत्व मिळविले. जैनांच्या कथांमागील धर्मप्रेरणा ह्या कथेतही स्पष्टपणे प्रत्ययास येते. तरंगवतीची हकीकत ऐकून धनपालाची पत्नीही श्राविकेच्या बारा व्रतांचा स्वीकार करते.

एर्न्स्ट लॉइमानने तरंगलोलाचा जर्मन अनुवाद केलेला आहे (१९२१).

तगारे, ग. वा.