नाग: हा साप ‘इलॅपिडी’ या सर्पकुलातील आहे. कैरात, ⇨माँबा वगैरे प्राणघातक विषारी साप याच कुलातील आहेत. भारतात आढळणारा नाग नाजा वंशातील असून या वंशात सु. १० जाती आहेत. त्यांपैकी ४ जाती भारतात आणि ६ जाती जगाच्या इतर भागांत आढळतात. आफ्रिका, अरबस्तान, भारत, द. चीन, फिलिपीन्स बेटे आणि मलेशियाचे द्वीपकल्प या सर्व प्रदेशांत नाग आढळतो. भारतात सर्वत्र आढळणाऱ्या नागाच्या जातीचे शास्त्रीय नाव नाजा नाजा आहे. आफ्रिकेतील नागांच्या दोन जाती विशेष प्रसिद्ध आहेत– एक ईजिप्तचा नाग (नाजा हॅजे) आणि दुसरा काळी मान असलेला नाग (नाजा नायग्रिकॉलिस).

 आ. १. भारतीय नाग

नाग देखणा पण अपायकारक विषारी साप आहे. याचे महत्त्वाचे लक्षण म्हणजे याचा फणा होय. याच्या मानेवर लांब बरगड्या असून त्यांना स्नायू जोडलेले असतात. मानेच्या स्नायूंच्या संकोचनाने दोन्ही बाजूंच्या बरगड्या फाकतात आणि त्यांच्यावरील त्वचा ताणली जाऊन फणा तयार होते. नागाला भीती वाटली किंवा तो चवताळला म्हणजे फणा काढतो. नागाच्या फणेवर काही खुणा आढळतात. कित्येकांच्या फणेच्या वरच्या पृष्ठावर १० सारखा आकडा असतो या प्रकारचे नाग महाराष्ट्रात सर्वत्र आढळतात. काहींच्या फणेवर अंडाकार काळी खूण असून ती पांढऱ्या दीर्घवर्तुळाने वेढलेली असते आणि फणेच्या खाली अधर पृष्ठावर काही रुंद काळसर पट्टे असतात. अशा प्रकारचे नाग बंगालमध्ये आढळतात. इतर कित्येकांत फणेवर कोणतीही खूण नसते. या प्रकारचे नाग कच्छ, राजस्थान, काठेवाड आणि मध्य भारतात आढळतात. फणा पूर्ण पसरलेली असली म्हणजे खुणा स्पष्ट दिसतात, पण एरव्ही दिसत नाहीत.

पूर्ण वाढ झालेल्या नागाची लांबी १८० सेंमी.पर्यंत असते. नराची लांबी मादीपेक्षा जास्त असते. शरीर साधारणपणे बसकट असून त्याची रुंदी बहुधा सारखी असते. शेपटीची लांबी एकंदर लांबीच्या / ते / असते. भारतातील नागांचा रंग बहुतकरून काळा असतो, शरीराच्या खालच्या बाजूचा रंग पांढरट किंवा पिवळसर असतो पण गव्हाळी रंगाचे नागदेखील आढळतात. कधीकधी विशेषतः पावसाळ्याच्या सुरुवातीला सोनेरी रंगाचे नाग दिसतात, पण त्यांचा हा रंग टिकाऊ नसून सूर्यप्रकाशाने बदलून लवकरच तपकिरी किंवा गव्हाळी होतो राजस्थानच्या दक्षिण भागात पांढऱ्या रंगाचा नाग क्वचित आढळतो याच्या फणेवरील चिन्ह अगदी पुसट असते. याला तेथील स्थानिक लोक ‘वासुकी नाग’ म्हणतात.

शरीराच्या मानाने डोके लहान असून मानेपासून स्पष्टपणे निराळे नसते. नाकपुड्या उभ्या, दीर्घवर्तुळाकार आणि मोठ्या असतात. डोळे मध्यम आकारमानाचे व त्यांतील बाहुली वाटोळी असते. पापण्या नसतात. दृष्टीचा पल्ला मर्यादित असतो. घ्राणेंद्रिय चांगले कार्यक्षम असते. जीभ बारीक, नाजूक आणि दुभागलेली असून तिची टोके काळी असतात. नाग आपली जीभ वरचेवर बाहेर काढतो तोंड मिटलेले असले, तरी त्याला ती बाहेर काढता येते. जीभ हे नागाचे एक ज्ञानेंद्रिय असून वास घेण्याच्या कामी तिची घ्राणेंद्रियाला मदत होते इतकेच नव्हे तर अन्न शोधण्याकरिता, नराला किंवा मादीला हुडकण्याच्या कामी आणि संकटकाळी शत्रूच्या वासावर किंवा मागावर राहण्याकरिता तिचा उपयोग होतो. नागाच्या वरच्या जबड्यावर दातांच्या चार ओळी असतात प्रत्येक काठावर एक व मुखाच्या छतावर मध्यभागी दोन ओळी असतात. खालच्या जबड्यावर प्रत्येक काठावर एक याप्रमाणे दोन ओळी असतात. दात मागे वळलेले व अणकुचीदार असतात. वरच्या जबड्याच्या काठावरील दोन्ही ओळींतील पुढचे काही दात नसतात पण त्यांऐवजी एकेक मोठा, मागे वळलेला, तीक्ष्ण, विषारी दात किंवा विषदंत असतो. विषदंताच्या वरच्या पृष्ठावर बुडापासून टोकापर्यंत एक पन्हळी असते. विषदंत काही कारणांमुळे मोडले किंवा पडले, तर त्यांच्या जागी तसेच नवे दात येतात. नवीन दात तयार होण्याकरिता ३–६ आठवडे लागतात. नागाचे विषदंत अर्धा सेंमी. लांब असून ते हालविता येत नाहीत.

आ.२. नागाचे डोके व फणा

नागाला बाह्यकर्ण (बाहेरचा कान) नसतो त्याचप्रमाणे कानाचा आतला भागदेखील अल्पवर्धित असतो. यामुळे त्याला ऐकू येत नाही. घन पदार्थांमधून जाणाऱ्या ध्वनींना तो संवेदनक्षम असतो म्हणून जमिनीवर जोराने काठी आपटली किंवा मनुष्य जमिनीवरून चालत गेला, तर ते त्याला कळते. पुंगी वाजविली की, नाग डोलू लागतो असे म्हणतात पण ते चूक आहे. पुंगी वाजविताना गारुडी आपले डोके, हात किंवा पुंगी हालवीत असतो. या वस्तूंच्या हालचालींकडे तो टक लावून पाहत असतो व त्यांच्या हालचालीप्रमाणेच त्याची मानही तो हालवीत असतो या वस्तू जर हालविल्या नाहीत, तर नागही डोलत नाही. नागाचे डोळे बांधून त्याच्या समोर जर पुंगी वाजविली, तर त्याच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही.

नाग सगळीकडे आढळतो घनदाट जंगलात त्याचप्रमाणे मनुष्यवस्तीतही तो असतो झाडेझुडपे नसलेल्या उजाड प्रदेशात, शेते, बागा, कुंपणे वगैरे ठिकाणी तो असतो पडझड झालेली घरे, देवळे, मशिदी वगैरे जागी तो दिसतो झाडांवरही तो क्वचित आढळतो.

नागाच्या डोक्याच्या बाजूवर बदामाच्या आकाराची विष ग्रंथी असते तिच्यापासून निघालेली विषवाहिनी विषदंताच्या पन्हळीच्या बुडाशी उघडते. विष ग्रंथीतून निघालेले विष या वाहिनीमधून दाताच्या पन्हळीत शिरते आणि विषारी दाताच्या टोकावरून बाहेर पडते. चावण्याच्या वेळी आपल्या शरीराचा पुढचा भाग उभारून, डोके थोडे मागे घेऊन तो एकदम प्रहार करून दंश करतो. दंश आणि विषाचे अंतःक्षेपण या क्रिया क्षणार्धात होतात. दंशक्रियेच्या वेळी विष ग्रंथीवर स्नायूंचा दाब पडून विष विषदंताच्या मार्गाने शरीरात शिरते. नागाच्या विषावर अँटिव्हेनिनाचे अंतःक्षेपण (इंजेक्शन) हाच एक खात्रीलायक उपाय आहे.

नाग स्वभावतःच भित्रा असल्यामुळे आपण होऊन माणसावर हल्ला करून चावत नाही. तो भ्याला किंवा संतापला म्हणजे जोराने फुसकारे टाकतो.

उंदीर, घुशी, बेडूक हे नागाचे भक्ष्य आहे पण कधीकधी तो पक्षी, पक्ष्यांची अंडी, खारी, कोंबडीची पिल्ले, पाली, सरडे आणि इतर जातींचे सापही खातो. क्वचित एक नाग दुसऱ्या नागाला खातो. नाग दिवसा हिंडतो, पण भर वस्तीमध्ये बहुधा रात्रीच तो आपले भक्ष्य शोधण्याकरिता बाहेर पडतो.

घारी वगैरे शिकारी पक्षी सोडले, तर ⇨ मुंगूस हा नागाचा कट्टर शत्रू आहे. नाग आणि मुंगूस यांच्या लढाईत मुंगूस नागाला ठार करते. मुंगसाच्या अंगावरील लांब, दाट व राठ केसांमुळे नागाचे विष मुंगसाच्या अंगात जाऊ शकत नाही. ⇨ नागराज नागाला खातो.

नागाची नर आणि मादी ही भिन्न असून दोन्हीही विषारी असतात. नागाच्या मैथुनाचा काळ पावसाळा आहे. नर आणि मादी जमिनीवर आडवी पडलेली असतानाच त्यांचे मैथुन होते. मैथुनानंतर सु. ८–१० महिन्यांनी (साधारणतः एप्रिल महिन्यात) मादी १२–५६ पांढरी, लंबवर्तुळाकृती व सु. ५०–५२ मिमी. लांबीची अंडी घालते. अंडी मातीत मिसळलेली असतात व मादी ती उबविते. ती क्षणभरही अंडी आपल्या दृष्टिआड होऊ देत नाही. दोन महिन्यांनी अंडी फुटून २००–२५५ मिमी. लांबीची पिल्ले बाहेर पडतात. ती चलाख आणि विषारी असतात. जन्मल्यानंतर एका महिन्यात ती तीनदा कात टाकतात. सु. तीन वर्षांनी पिल्लाला प्रौढावस्था येते. नाग इतर सापांप्रमाणेच वरचेवर कात टाकतो. कात टाकण्याच्या सुमारास तो अगदी सुस्त होतो. डोळ्यावर कात आल्यामुळे त्याला दिसत नाही.

नागाच्या डोक्यात एक मणी असतो आणि त्याचा प्रकाश पडतो अशी समजूत आहे रात्री नाग हा मणी बाहेर काढून ठेवून त्याच्या प्रकाशात भक्ष्य शोधीत असतो असे म्हणतात. या मण्याच्या अंगी विषहारक गुण असतो अशीही पुष्कळांची समजूत आहे. या दोन्हीही समजुती चुकीच्या आहेत.

भारतीय संस्कृतीत नागाला एक असाधारण महत्त्वाचे स्थान मिळालेले आहे. लोककथा, कला आणि धर्म या सगळ्यांत नागाचे अस्तित्व जाणवते. सबंध भारतात विशेषतः दक्षिणेत ⇨ नागपूजा होते. नागपूजेचे प्रकार निरनिराळ्या प्रांतांत वेगवेगळे आहेत. श्रावण शुद्ध पंचमीला लोक नागाची पूजा करतात स्त्रिया नागपंचमीची कहाणी मोठ्या भक्तिभावाने सांगतात व ऐकतात [→ नागपंचमी]. नागांबद्दल अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. कालियामर्दन, समुद्रमंथन, जनमेजयाचा सर्पसत्र यांच्या कथा सुपरिचित आहेत. कालिया, शेष, वासुकी, तक्षक, पुंडरीक, कर्कोटक इ. सुप्रसिद्ध नागांची नावे सगळ्यांच्या परिचयाची आहेत.

कर्वे, ज. नी.