प्रतिपिंड :(अँटिबॉडी). प्रतिजने [संभाव्य हानिकारक बाह्य पदार्थ ⟶प्रतिजन], प्राणिशरीरात शिरल्यानंतर त्यांची विल्हेवाट लावण्याकरिता शरीरात जो विशिष्ट प्रतिरक्षात्मक (प्रतिकार करून शरीराचे रक्षण करण्याचा) प्रतिसाद मिळतो, त्यामध्ये रक्तद्रवात तयार होणाऱ्या विशिष्ट प्रथिनांना ‘प्रतिपिंड’ म्हणतात. प्रतिरक्षा क्रियेत भाग घेतात म्हणून त्यांना ‘प्रतिरक्षा प्रथिने’ असे संबोधावे, अशी आंतरराष्ट्रीय मान्यता १९६४ मध्ये देण्यात आली आहे. प्रतिपिंडाचा विशेष गुणधर्म म्हणजे ज्या प्रतिजनाविरुद्ध त्याची निर्मिती झाली असेल त्याच्याशीच संयोग पावून त्याची हानिकारकता घालविणे हा होय. प्रयोगशाळेत प्रतिजन शोधण्याकरिता व प्रतिरक्षाक्षमता अजमावण्याकरिता प्रतिपिंडाचा उपयोग होतो. [⟶ रोगप्रतिकारक्षमता].

आ. १. प्रथम व दुय्यम प्रतिसाद : प्रतिजनाच्या प्रथम अंतःक्षेपणाला (इंजेक्शनाला) आणि कित्येक आठवड्यांनंतर दिलेल्या दुय्यम अंतःक्षेपणाला मिळणाऱ्या प्रतिपिंड प्रतिसादाचा कालावधी व प्रतिपिंड सांद्रता यांचा संबंध दर्शविणारा आलेख.

प्रतिजन शरीरात शिरल्यानंतर प्रतिपिंड तयार होण्यास थोडा विलंब लागतो. प्रतिजन जेव्हा प्रथमच शरीरात शिरते तेव्हा उत्पन्न होणाऱ्या प्रतिसादाला ‘प्रथम प्रतिसाद’ म्हणतात. त्याच प्राणिशरीरात तेच प्रतिजन काही कालावधीनंतर पुन्हा जेव्हा प्रवेश करते तेव्हा उत्पन्न होणाऱ्या प्रतिसादाला ‘दुय्यम प्रतिसाद’ म्हणतात. प्रथम प्रतिसाद काही वेळाने उत्पन्न होणारा, कमी प्रभावी व अल्प काळ टिकणारा असतो. याउलट दुय्यम प्रतिसाद ताबडतोब मिळणारा, शक्तिशाली व अधिक काळ टिकणारा असतो. प्रथम प्रतिसादात प्रतिपिंड काही आठवडे, तर दुय्यम प्रतिसादात काही महिने टिकतात (आ. १ पहा). प्रतिकारक्षमता अधिक काळपर्यंत टिकण्याकरिता रोगप्रतिबंधक लस अंतरा-अंतराने याच कारणाकरिता टोचतात.

 शरीरात प्रतिपिंड रक्तगट प्रतिजन [⟶प्रतिजन], सूक्ष्मजंतू व व्हायरस तसेच शरीराशी नेहमी संबंध येणाऱ्या रासायनिक आणि जीवरासायनिक पदार्थांविरुद्ध तयार होतात. गर्भावस्थेत मातेच्या रक्तातील प्रतिपिंड नाळेवाटे गर्भाच्या रक्तात प्रवेश करतात. नवजात अर्भकास त्यानंतर मातेच्या दुधातून काही प्रतिपिंड मिळतात परंतु हे सर्व प्रतिपिंड अपुरे असतात. म्हणजेच प्रतिरक्षात्मक दृष्ट्या नवजात अर्भक अपरिपक्वच असते. जसजसा बाह्य पदार्थांशी त्याचा संपर्क वाढत जातो तसतसे अनेक प्रतिपिंड बालकाच्या शरीरात तयार होतात. नवताज अर्भकात प्रतिपिंडांच्या उत्पादनास वयाच्या चौथ्या-पाचव्या आठवड्यापासून सुरुवात होते आणि वयाच्या बाराव्या महिन्यापर्यंत त्याच्या रक्तद्रवात प्रौढांच्या रक्तद्रवातील प्रतिपिंडाएवढे प्रतिपिंड तयार होतात.

नैसर्गिक रीत्या आजार येऊन गेल्यानंतर ज्या सूक्ष्मजंतूमुळे तो उद्‍भवला असेल त्याविरुद्ध प्रतिपिंड तयार होतात व ते तोच आजार पुन्हा होण्याविरुद्ध कायमची किंवा काही काळपर्यंत टिकणारी प्रतिरक्षा उत्पन्न करतात. प्रतिपिंडाच्या या गुणधर्माचा उपयोग पटकी, आंत्रज्वर (टायफॉइड), देवी, घटसर्प, धनुर्वात यांसारख्या काही संसर्गजन्य रोगांविरुद्ध प्रतिरक्षा निर्माण करण्याकरिता करतात. या रोगांचे हतप्रभ किंवा मृत सूक्ष्मजंतू व्हायरस किंवा रोगकारकांपासून बनविलेले विषसम पदार्थ शरीरात अंतःक्षेपणाने टोचून रोग उत्पन्न न करता प्रतिपिंडे तयार करतात. यालाच ‘लस टोचणे’ म्हणतात [⟶ लस व अंतःक्रामण].

वर्गीकरण :आर्ने टिसेलियस (१९०२-७१) या जीवरसायनशास्त्रज्ञांनी शरीर प्रथिनांचा विद्युत् संचारण तंत्राचा (एखाद्या माध्यमात लोंबकळत्या स्थितीत असलेल्या कणांचे विद्युत् क्षेत्राच्या प्रभावाखाली होणाऱ्या संचारणाच्या तंत्राचा) उपयोग करून अभ्यास केला. त्यावरून त्यांनी प्रथिनांचे अल्ब्युमिने, आल्फा,  बीटा व गॅमा ग्लोब्युलिने अशा चार गटांत वर्गीकरण केले. १९३८ मध्ये टिसेलियस यांनी आपल्या एका सहकाऱ्याच्या मदतीने प्रतिपिंडांचा विशेष अभ्यासकेला. त्यामुळे प्रतिपिंड हा एकजिनसी गट नसून त्यात सारखे गुणधर्म असलेली एकमेकांशी जवळचे नाते असलेली विविध प्रथिने असल्याचे समजले. अतिकेंद्रोत्सारक यंत्राचा [मिश्रणातील घटक पदार्थ वेगळे करणाऱ्या यंत्राचा ⟶ केंद्रोत्सारण] उपयोग केल्यानंतर दोन प्रकारचे प्रतिपिंड रेणू ओळखता आले. काहींचा अवसादन गुणांक ७ एस व काहींचा १९ एस असल्याचे आढळते. अवसादन गुणांक हा मिश्रणातील घटक पदार्थांचे रेणू अतिकेंद्रोत्सारक यंत्रासारख्या प्रवेगकारी साधनाद्वारे अलग होण्याचा दर दर्शवितो व तो टेऑडॉर स्व्हेडबॅरी या शास्त्रज्ञांच्या नावावरून ओळखण्यात येणाऱ्या  स्व्हेडबॅरी (= १०-१३ सेकंद) या एककात मोजतात आणि हे एकक संक्षिप्त रूपात एक (S) या अक्षराने दर्शवितात. रासायनिक दृष्ट्या सर्व प्रतिपिंडे ग्लोब्युलिने म्हणजे पाण्यात अत्यल्प विद्राव्यता (विरघळण्याची क्षमता) असणारी प्रथिने असून सर्वांमध्ये शर्करा अवशेष असतो म्हणजेच ती खरी ग्लायकोप्रथिने आहेत.


प्रतिपिंड गुणधर्म व प्रमुख गट 

गुणधर्म 

आयजी-जी 

आयजी-ए 

प्रमुख आयजी-एम 

आयजी-डी 

आयजी-ई 

भौतिक व्यवस्था 

एकवारिक 

एकवारिक, द्विवारिक, बहुवारिक 

पंचवारिक 

षट्‌वारिक 

एकवारिक 

एकवारिक 

रेणुभार 

१,५०,००० 

१,६०,००० (रक्तद्रवात) ३,७०,००० (स्त्रावात) 

९,००,००० 

१,७०,००० 

१,८५,००० 

अवसादन गुणांक 

(स्व्हेडबॅरी एककात) 

७ 

७ (एकवारिक) ११ (द्विवारिक) 

१९ 

(पंचवारिक) 

७ 

८ 

रक्तरसातील सांद्रता (मिग्रॅ. प्रती मिली. मध्ये) 

१३·२ 

१·६ 

०·९ 

०·१ 

०·०००३३ 

कार्बोहायड्रेट (%) 

२·९ 

९·९ (रक्तरस) ११·७ (स्त्राव) 

११·८ 

१३ 

११·६ 

उपगट संख्या 

४ 

२ 

१ 

१ 

१ 

अर्धायुष्य (दिवस) 

उपगटाप्रमाणे २३, १६ किंवा २४ 

६ 

५ 

३ 

२ 

प्रतिपिंड क्रियाशीलता 

नाळेवाटे गर्भाच्या रक्तात जाणे 

– 

– 

– 

– 

[बहुवारिक म्हणजे साध्या रेणूंचा (एकवारिकांचा) संयोग होऊन तयार झालेला प्रचंड रेणू. उदा., पाच पाच साध्या रेणूंचा संयोग होऊन पंचवारिकाचा रेणू बनतो ⟶बहुवारिकीकरण + हे चिन्ह क्रियाशीलतेचे अस्तित्व दर्शविते व – हे चिन्ह क्रियाशीलता नसल्याचे दर्शविते ]. 

रेणुभार, अवसादन गुणांक इ. गुणधर्मांवरून  प्रतिपिंडांचे पाच सर्वसाधारण गट पाडले आहेत. प्रत्येक गटाला इम्युनोग्लोब्युलिने या इंग्रजी नावाचे दर्शक म्हणून ‘आयजी’ आणि त्यास जोडून गटदर्शक इंग्रजी आद्याक्षर लावून गट नाव दिले आहे, उदा., ‘आयजी-ए’ प्रतिपिंड गट. याशिवाय पाच प्रमुख गटांची विशिष्ट गुणधर्मांनुसार उपगटांत व उपप्रकारांत विभागणी करता येते. प्रमुख गटांचे भौतिक व जैव गुणधर्म दर्शविणारे कोष्टक बाजूस दिले आहे.

उत्पादन, संरचना आणि क्रियाशीलता : प्रतिजनाशी संपर्क येऊनही एका जातीचे सर्वच प्राणी प्रतिपिंड उत्पादन करतीलच असे नाही. नियततापी पृष्ठवंशी प्राणी (पर्यावरणाच्या तापमानात बदल झाला, तरी ज्यांच्या शरीरांचे तापमान एका ठराविक पातळीवर स्थिर असते असे पाठीचा कणा असलेले प्राणी), उदा., मानव, घोडा वगैरे प्रतिपिंड उत्पादन करू शकतात. काही अनियततापी पृष्ठवंशी प्राणी प्रतिपिंडासारखे पदार्थ उत्पन्न करू शकतात. अशा पदार्थांना समूहके म्हणतात. अपृष्ठवंशी प्राण्यात प्रतिपिंड उत्पादनहोत असल्याचे निश्चितपणे समजलेले नाही. काही प्राण्यांमध्ये प्रतिजन चेतनेला प्रतिसाद मिळत नाही. अशा प्राण्यांमध्ये  रक्तातील प्रथिन भागापासून प्रतिपिंड बनण्याची क्षमता जन्मतःच अस्तित्वात नसते. मानवातही अशी विकृती आढळते व तिला ⇨ ए गॅमा-ग्लोब्युलिनीमिया (गॅमाग्लोब्युलीन न्यूनता) म्हणतात. विकृती असलेल्या रोग्यांना सूक्ष्मजंतू संक्रामणाचा गंभीर धोका सतत असतो आणि ती लिंगसंबंधित जनुकाशी [आनुवंशिक लक्षणे निश्चित करणाऱ्या गुणसूत्रांवरील एककांशी ⟶ जीन ] संबद्ध असून नेहमी पुरुष अपत्यातच उद्‍भवते. 


जन्मानंतर सुरुवातीच्या काळात प्रतिपिंड उत्पादनाचे कार्य प्रामुख्याने ⇨ यौवनलोपी ग्रंथी करते. वाढत्या वयाबरोबर हे कार्य लसीका ऊतक केंद्रामार्फत[⟶लसीका तंत्र] होते व यामध्ये लसीका ग्रंथी, ⇨ प्लीहा, अस्थिमज्जा (हाडांच्या पोकळ भागात असणारा मऊसर पदार्थ), पायर क्षेत्रे (जे. सी. पायर या स्विस शरीरविज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणारी व लहान आतड्यात जागजागी गोळा झालेली लसीका ऊतक क्षेत्रे) इत्यादींचा समावेश असतो. या ठिकाणी असलेल्या ऊतकातील (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या -पेशींच्या-समूहातील) मोठ्या लसीका कोशिकांना प्लाविका कोशिका किंवा रक्तद्रव कोशिका म्हणतात व त्या प्रतिपिंड उत्पादनाचे कार्य करतात. प्रतिजन लसीका ऊतक केंद्रांना चेतावणी देऊन रक्तद्रवकोशिकांचे उत्पादन वाढवतात, असा समज आहे. सुरुवातीस प्रतिपिंड उत्पादन प्रामुख्याने प्लीहेत होते परंतु इतर लसीका ऊतकांच्या वृद्धीबरोबरच ते कमीकमी होत जाते व इतर केंद्रे पुरवठा करू लागतात.

लसीका केंद्रातील विशिष्ट लसीका कोशिका रूपांतरित होऊन पूर्वरक्तद्रव कोशिका (ज्यांपासून रक्तद्रव कोशिका तयार होतात अशा कोशिका) तयार होतात. या कोशिकांच्या विभाजनापासून जवळजवळ ५०० रक्तद्रव कोशिका तयार होतात. अशा पूर्ण वाढलेल्या प्रत्येक रक्तद्रव कोशिकेकडून दर सेकंदास २,००० प्रतिपिंड रेणू एवढी प्रचंड निर्मिती होते. हे प्रतिपिंड लसीकेत मिसळतात व तिच्याद्वारे रक्त प्रवाहात मिसळतात. रक्तद्रव कोशिका नाश पावेपर्यंत कित्येक दिवस हे उत्पादन चालू असते.

उत्पादनाबरोबरच प्रतिपिंड रक्तद्रवातून काढून घेऊन त्यांचे अपघटन करण्याचे (घटक द्रव्ये अलग करण्याचे) कार्यही सतत चालू असते. म्हणून कोणत्याही एका वेळी मिळणारे एकूण प्रतिपिंड नेहमी उत्पादन व अपघटन यांचा संतुलित परिणाम असते.

आ. २. विशिष्ट आयजी-जी प्रतिपिंडाची संरचना : (१) हलकी पॉलिपेप्टाइड शृंखला, (२) जड पॉलिपेप्टाइड शृंखला, (३) चल भाग, (४) अचल भाग.

संरचना : सर्व प्रकारचे प्रतिपिंड अथवा प्रतिरक्षा प्रथिने ही हलक्या व जड पॉलिपेप्टाइड श्रृंखलांची[पेप्टाइड बंधांनी जोडलेल्या व ॲमिनो अम्लांनी बनलेल्या शृंखलांची ⟶ ॲमिनो अम्ले] बनलेली असतात. प्रत्येक रेणूत दोन हलक्या व दोन जड शृंखला असतात.

शृंखलेचा काही भाग चल (निरनिराळ्या प्रकारचा) आणि काही भाग अचल किंवा कायम स्वरूपाचा असतो. चल भागावर प्रत्येक प्रतिपिंड रेणूचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्या विशिष्ट प्रतिजनाशी संलग्न व्हावयाचे हे अवलंबून असते. प्रत्येक जड श्रृंखला हलक्या श्रृंखलेशी विघटनक्षम बंधांनी जोडलेली असते व रेणूतील जड शृंखला अशाच बंधांनी जोडलेल्या असतात. या बंधांना एस-एस (S-S) बंध (डायसल्फाइड बंध) म्हणतात. अचल भागावर रेणूचे सर्वसाधारण गुणधर्म उदा., भौतिक अवस्था, रासायनिक संरचना वगैरे अवलंबून असतात.  याशिवाय या भागावर प्रतिपिंडाची ऊतकातील हालचाल, ऊतकातील विशिष्ट पदार्थांशी संलग्न होणे, कलेमधून विसरण (पातळ पटलातून पलीकडे जाणे) इ. जैव गुणधर्मही अवलंबून असतात.

क्रियाशीलता : प्रतिपिंड बाह्य पदार्थाचा तीन निरनिराळ्या प्रकारांनी प्रतिकार करतात : (१) प्रत्यक्ष क्रिया, (२) पूरक-पदार्थ तंत्र क्रियाशील बनवून त्याद्वारे बाह्य पदार्थाचा नाश करणे आणि (३) अत्यधिहृषण तंत्र क्रियाशील बनवून प्रतिजन प्रतिकारार्थ स्थानिक परिस्थितीत बदल घडविणे व अशा प्रकारे त्या प्रतिजनाची तीव्रता कमी करणे.

प्रत्यक्ष क्रिया : ही पुढीलपैकी कोणत्याही प्रकारची असू शकते.

(अ) समूहन: अनेक प्रतिजन एकाच ठिकाणी गोळा होतात.

(आ) अवक्षेपण : प्रतिजन-प्रतिपिंड यांच्यापासून अविद्राव्य संयुग बनते व त्याचे अवक्षेपण होते (न विरघळणारा साका तयार होतो).

(इ) उदासिनीकरण : प्रतिजनातील विषोत्पादक भागांवर प्रतिपिंड आच्छादन तयार करतात.

(ई) विच्छेदन: काही अतिक्रियाशील प्रतिपिंड प्रतिजनांच्या कोशिकाभित्तीवर प्रत्यक्ष परिणाम करून कोशिकांचा भंग करतात.

या सर्व प्रत्यक्ष क्रिया प्रयोगशाळेत प्रभावी वाटतात तेवढ्या नैसर्गिक अवस्थेत आढळत नाहीत म्हणून प्रतिकाराचे उरलेले दोन प्रकार अधिक प्रभावी असतात.

पूरक-पदार्थ तंत्र क्रियाशीलता : रक्तद्रव व इतर शरीरद्रव्यातून काही विशिष्ट पूर्वएंझाइमे (ज्यांपासून एंझाइमे – जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणारे प्रथिन पदार्थ – तयार होतात असे पदार्थ) प्राकृतिक अवस्थेत नेहमी असतात. अशी एकूण नऊ निरनिराळी पूर्वएंझाइमे असून त्यांना अनुक्रमे सी-१ ते सी-९ अशी नावे दिली आहेत. या सर्वांना मिळून पूरक-पदार्थ तंत्र म्हणतात.  प्राकृतिक अवस्थेत ही पूर्वएंझाइमे निष्क्रिय असतात. प्रतिजन-प्रतिपिंड संयुग तयार होताच ते या पूरक-पदार्थ तंत्राला सक्रिय बनविते. अशी संयुगे अत्यल्प प्रमाणात उपस्थित असली, तरीही पूर्वएंझाइमांपासून क्रियाशील एंझाइमे मोठ्या प्रमाणावर बनविण्यास समर्थ असतात. ही क्रियाशील एंझाइमे प्रतिजनाविरुद्ध निरनिराळ्या प्रतिक्रिया सुरू करतात, संभाव्य हानीपासून संरक्षण देतात आणि स्थानिक ऊतकातील प्रतिक्रियांना चेतावणी देतात. आ. ३ मध्ये एका सूक्ष्मजंतूविरुद्ध (प्रतिजनाविरुद्ध) प्रतिपिंडांची व पूरक संयुगांची क्रिया दर्शविली आहे.


आ. ३. सूक्ष्मजंतूविरूद्ध प्रतिपिंड क्रिया : (१) सूक्ष्मजंतू, (२) प्रतिपिंड, (३) पूरक-पदार्थ.

अत्यधिहृषण तंत्र क्रियाशीलता : काही प्रतिपिंड, विशेषेकरून आयजी-इ प्रतिपिंड, ऊतकातील व रक्तातील विशिष्ट कोशिकाभित्तीशी संलग्न होतात. या प्रतिपिंडाचा जेव्हा प्रतिजनाशी संयोग होतो तेव्हा त्या कोशिका फुगतात व भंग पावतात. या कोशिका विच्छेदनामुळे काही नवे पदार्थ मुक्त होतात व ते स्थानिक परिस्थितीवर परिणाम करतात. या पदार्थांमध्ये हिस्टामीन, मंद प्रतिक्रियाशील अत्यधिहृषक पदार्थ [अपायिता उत्पन्न करणारे पदार्थ ⟶ अपायिता], रसायनानुचलनी पदार्थ (विशिष्ट कोशिकांना विशिष्ट जागी रासायनिक प्रभावाद्वारे आकर्षित करणारे पदार्थ) व लायसोसोमल एंझाइमे (स्थानिक शोथोत्पादक – दाहयुक्त सूज उत्पन्न करणारी – एंझाइमे) यांचा समावेश असतो. या पदार्थाच्या क्रियाशीलतेमुळे बाह्य पदार्थांना हानी करण्यापासून रोखण्यात येत असावे. कधीकधी या पदार्थांचा मूळ शरीरावर अधिहृषतेच्या [ॲलर्जीच्या ⟶ ॲलर्जी] स्वरुपात गंभीर परिणाम प्रकट होण्याची शक्यता असते. या बाबतीत असेही आढळले आहे की, आनुवंशिकता ज्या व्यक्तीमध्ये अधिहृषता प्रतिक्रिया उत्पन्नच होत नाही, त्यांच्यामध्ये सूक्ष्मजंतू संक्रामण अतिशय जलद फैलावते. म्हणून या क्रिया संरक्षणात्मक कार्य करीत असाव्यात.

नैसर्गिक प्रतिपिंड : फक्त प्रतिजन शरीरात शिरल्यावरच प्रतिपिंड तयार होतात, असा गैरसमज होण्याचा संभव आहे. मानवासहित अनेक जातींतील प्रत्येक प्राण्यात प्रवाही प्रतिपिंड नैसर्गिक रीत्या तयार होतात. हे प्रतिपिंड एकाच जातीच्या दुसऱ्या प्राण्यातील प्रतिजनाविरुद्ध कार्यशील असतात. अशा प्रतिजनांना समप्रतिजन व प्रतिपिंडाना समप्रतिपिंड म्हणतात. ⇨ रक्तगट ठरविण्याकरिता उपयुक्त असणारी ए, बी व ओ प्रतिजन या प्रकारात मोडतात व ते रक्तातील तांबड्या कोशिकांशी निगडित असतात. समप्रतिपिंड रक्तद्रवातील गॅमाग्लोब्युलीन भागात असतात. आंत्रमार्गात (‌आतड्यात) नेहमी वास्तव्य करणाऱ्या सूक्ष्मजंतूंविरुद्ध तयार होणारे प्रतिपिंड नैसर्गिक असतात. [ ⟶ रक्ताधान].

प्रतिपिंडांची वैशिष्ठ्ये : प्रतिपिंड गटांचे विशेष गुणधर्म पृष्ठ क्र. ३०४ वर दिलेल्या कोष्टकात दिले आहेत. याशिवाय प्रत्येक गटाविषयी महत्त्वाची माहिती खाली दिली आहे.

 आयजी-जी : रक्तद्रवात सर्वाधिक प्रमाणात असणारा हा प्रतिपिंड गट असून त्याच्या प्रत्येक रेणूवर प्रतिजन – प्रतिपिंड संयोगाकरिता दोन क्षेत्र असतात आणि म्हणून त्याला ‘द्विसंयुजी’ असेही म्हणतात. एकूण प्रतिपिंडापैकी ७५% प्रतिपिंड या गटात मोडतात. प्रतिजन बद्ध करण्याच्या कार्याशिवाय पूरक-पदार्थ तंत्र कार्यान्वित करण्याचे कार्यही हा गट करतो व तो बहुपयोगी आहे. त्याचे चार उपगट स्पष्टपणे मिळतात परंतु त्यांची जैव कार्ये अनिश्चित आहेत. या प्रतिपिंडांचे उत्पादन प्लिहा, लसीका ग्रंथी व अस्थिमज्जा यांत होते. रक्त व लसीका यांमध्ये ते सुलभतेने ये-जा करू शकतात. सूक्ष्मजंतूच्या विषांचे उदासिनीकरण हे प्रतिपिंड करू शकतात व या गुणधर्मामुळे ते सूक्ष्मजंतू विरुद्ध शरीराचेसंरक्षण करण्यात महत्त्वाचे कार्य करतात.

आयजी-ए : या गटाच्या प्रतिपिंडात कार्बोहायड्रेटाचे प्रमाण वरील गटापेक्षा अधिक असते. त्यांचे सर्वाधिक प्रमाण लाळ, अश्रू, श्लेष्मा (नाक व श्वासनलिका यांतील स्त्राव), प्रथम स्तन्य (प्रसूतीनंतरचा सुरुवातीचा दुग्धस्त्राव) आणि लघ्वांत्रातील (लहान आतड्यातील) स्त्राव यांमध्ये असते. यावरून हे प्रतिपिंड शरीराच्या श्लेष्मास्तर (बुळबुळीत अस्तर) असलेल्या भागांत नैसर्गिक संरक्षण देण्याचे कार्य करीत असावेत. या गटाचे एकूण प्रमाण आयजी-जी गटाखालोखाल असते. द्विसंयुजी प्रकार जास्त प्रमाणात आढळत असला, तरी काही प्रकारांत चार किंवा अधिक संयोगक्षेत्रेही आढळतात. हा गट पूरक-पदार्थ तंत्र क्रियाशील बनवीत नाही परंतु तो सूक्ष्मजंतू व व्हायरस यांच्या विषांचे उदासिनीकरण करतो.

लाळ किंवा अश्रु यांतून स्त्रवण्यापूर्वी दोन आयजी-ए प्रतिपिंड रेणू एका प्रथिन बंधाने बांधले जातात. यामुळे त्यांना बहुवारिक प्रतिपिंड म्हणतात व ते व्हायरसांना निष्क्रिय बनविण्यास तसेच सूक्ष्मजंतूंचा नाश करण्यास समर्थ असतात. मात्र या क्रियेकरिता लायसोझाइम या एंझाइमाची गरज असते. हे प्रतिपिंड श्वसनमार्ग व आंत्रमार्ग यांमध्ये नेहमी वास्तव्य करणाऱ्या सूक्ष्मजीवांविरुद्ध स्थानिक प्रतिकार उत्पन्न करण्याचे कार्य करतात.

 आयजी-एम : हा गट, विशेषेकरून आद्य प्राण्यांत प्रतिरक्षा प्रतिसादामध्ये सर्वप्रथम तयार होतो. प्लिहा व लसीका ग्रंथीतील मोठ्या लसीका कोशिका त्याचे उत्पादन करतात. बहुतेक सर्व नैसर्गिक प्रतिपिंड या गटात मोडतात. बहुतकरून पंचवारिक असणारे रेणू इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली तपासल्यास त्यांपैकी काही षट्‌वारिक असल्याचे दिसते. प्रत्येक रेणू १० जड आणि १० हलक्या शृखलांचा बनलेला असतो. प्रत्येक रेणूवर ५ ते १० संयोजी क्षेत्रे असल्यामुळे मोठ्या आकारमानाच्या प्रतिजनांना, उदा., सूक्ष्मजंतूंना बद्ध करण्याची त्यात क्षमता असते म्हणून त्यांना बहुसंयोजी म्हणतात. पूरक-पदार्थ तंत्रास चेतावणी देऊन हा गट सूक्ष्मजंतूंचा नाश प्रभावीपणाने करू शकतो. अनेक आयजी-जी रेणू करू शकतील तेवढा सूक्ष्मजंतूंचा नाश एकच आयजी-एम रेणू करु शकतो. आयजी-जी पेक्षा त्यामधील कार्बोहायड्रेटांचे प्रमाणही बरेच जास्त असते. विषांचे उदासिनीकरण व व्हायसरांविरुद्ध संरक्षणाची कार्यक्षमता आयजी-जी पेक्षा आयजी-एम्‌ची बरीच कमी असते.

 प्रतिरक्षा प्रतिसादाच्या सुरुवातीस या गटाचे उत्पादन अधिक असले, तरी ते हळूहळू कमी होत जाते. याशिवाय त्याचा चयापचयात्मक (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक-रासायनिक घडामोडींमध्ये होणारा) नाशही जलद होतो. प्रतिरक्षा प्रतिसादाच्या शेवटी शेवटी रक्तद्रवात फक्त आयजी-जी च मिळते व ते सतत वाढत असल्याचे आढळते. यावरून ज्या कोशिका प्रथम आयजी-एम चे उत्पादन करीत होत्या, त्याच शेवटी शेवटी आयजी-जी चे उत्पादन करू लागत असाव्यात.

 आयजी-डी : रक्तद्रवात अत्यल्प प्रमाणात मिळणारा हा गट सर्वप्रथम मज्जार्बुद (नवीन कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणारी अस्थिमज्जेतील मारक गाठ) या विकृतीत तयार होणाऱ्या प्रथिनात मिळाला. प्रतिजन बद्ध करण्याची क्षमता असलेल्या या गटाचा आतापर्यंत अभ्यास पूर्ण झालेला नाही. अलीकडील संशोधनानुसार आयजी-एम बरोबरच हा गट अस्थिमज्जा निर्मित लसीका कोशिकांच्या पृष्ठभागावर असल्याचे आढळले आहे. या गटाच्या जैव गुणधर्मांविषयी अजून फारशी माहिती समजलेली नाही. नाळेतील लसीका कोशिकांवर हा गट आयजी-एम नसतानाही मिळाला आहे.


आयजी-इ : के. इशिझाका नावाच्या जपानी शास्त्रज्ञांनी रॅगवीड या वनस्पतीच्या परागांची अत्यधिहृषता असलेल्या रोग्यांच्या रक्तद्रवातील या प्रतिपिंडाचा शोध लावला. इतर काही शास्त्रज्ञांनी त्यानंतर हा गट बहुमज्जार्बुद विकृतीच्या रोग्यांतही शोधून काढला. प्राकृतिक अवस्थेत त्याचे प्रमाण अत्यल्प असते. इतर प्रतिपिंडापेक्षा कमी तापमानात हा गट जलद नाश पावतो. उदा., ५६° से. तापमानाचा इतर गटांवर परिणाम होत नाही परंतु हा गट नाश पावतो.

या गटाचा आणखी एक विशेष गुणधर्म म्हणजे तो कोशिकाकर्षी (कोशिकांकडे खेचला जाणारा) आहे. संयोजी ऊतकातील स्नेह कोशिकांचे (मोठ्या आकारमानाच्या व हिस्टामीन मुक्त करणाऱ्या कोशिकांचे) या गटातील प्रतिपिंडांना विशेष आकर्षण असून त्यांच्या पृष्ठभागावर ते घट्टपणे बद्ध होतात. हा गट समजातीय स्नेह कोशिकांशी बद्ध होऊ शकतो, तसे इतर गट होऊ शकत नाहीत. म्हणून या गटाला ‘समकोशिकाकर्षी’ आणि इतरांना ‘विषम कोशिकाकर्षी’ म्हणतात. विशिष्ट प्रतिजनाशी संपर्क येताच हिस्टामिनासारखे प्रभावी पदार्थ एकदम मुक्त होतात. नाक व श्वसनमार्गाच्या स्त्रावातही हा गट सापडतो. त्याची क्रियाशीलता सूक्ष्मजंतुजन्य व इतर प्रोटिओज पदार्थांमुळे जलद नाश पावते.अधिहृषता असलेल्या व्यक्ती व सूत्रकृमी (जंत वगैरे) असलेल्या रोग्यांच्या रक्तद्रवात या प्रतिपिंडांचे प्रमाण नेहमीपेक्षा अधिक असते. हे प्रतिपिंड पूरक-पदार्थ तंत्र कार्यांन्वित करण्यास असमर्थ असतात.

 प्रतिपिंडांची क्रियाशीलता निरनिराळ्या प्रकारची असू शकते, उदा., विद्राव्य प्रतिजनाचे अवक्षेपण, विविक्त प्रतिजनांचे समुहन, सूक्ष्मजंतू विषांचे उदासिनीकरण वगैरे. या क्रियांवरून त्यांचा उल्लेख करताना अवक्षेपक, समूहक, प्रतिविष इ. संज्ञा वापरतात. एकाच प्रकारचा प्रतिपिंड वरीलप्रमाणे अनेक क्रिया करण्यास समर्थ असू शकतो म्हणून प्रतिपिंडांचे वर्गीकरण क्रियानुरूप केल्यास ते नेमके स्पष्ट असू शकत नाही.

प्रतिपिंडांसारख्या परस्परव्यापी गुणधर्म असलेल्या प्रथिनांचा अभ्यास इतर प्रथिनांच्या अभ्यासाप्रमाणे सोपा नाही. या प्रथिनांच्या अभ्यासाकरिता संशोधन प्रयोगशाळांतून मानव व उंदीर यांमध्ये उद्‍भवणाऱ्या बहुमज्जार्बुद या विकृतीत होणाऱ्या प्रतिरक्षा प्रथिनांच्या अपसामान्य उत्पादनाचा उपयोग करतात. या विकृतीत रक्तद्रव कोशिकांची भरमसाट वाढ असलेली अर्बुदे कंकालात (निरनिराळ्या हाडांत) विशेषेकरून कवटीच्या हाडात तयार होतात. या विकृतीला ‘रक्तद्रव-कोशिकार्बुद’ असेही म्हणतात. या कोशिका प्रतिरक्षा प्रथिनांची भरमसाट वाढ करण्यास कारणीभूत असतात. ही जादा प्रथिने मूत्रातून उत्सर्जित होतात व त्यांना हेन्‍री बेन्स-जोन्झ या शास्त्रज्ञांच्या नावावरून बेन्स-जोन्झ प्रथिने म्हणतात. या रोगात मिळणारे प्रतिरक्षा प्रथिन एकजिनसी व एकाच प्रकारचे असते. यामुळे त्याचा संरचनात्मक व गुणधर्मविषयक अभ्यास करता येतो आणि त्याकरिता त्याची प्रतिपिंड क्रियाशीलता शाबूत असावी लागते.

सर्वच मज्जार्बुद विकृतीच्या रोग्यांतील प्रथिने एकाच प्रकारची नसतात परंतु ती निरनिराळी असली, तरी निरोगी व्यक्तीत नेहमी आढळणाऱ्या प्रतिरक्षा प्रथिनांच्या कोणत्या ना कोणत्या तरी गटातीलच असतात. ज्या प्रतिरक्षा प्रथिनांचे भरमसाट उत्पादन होत असेल त्यावरून विकृतीला आयजी-जी मज्जार्बुद, आयजी-ए मज्जार्बुद वगैरे नावे देतात. सर्वाधिक प्रमाण आयजी-जी मज्जार्बुदांचे व अत्यल्प प्रमाण आयजी-इ मज्जार्बुदांचे आढळते.

शरीरात शिरणाऱ्या एकाच प्रतिजनाविरुद्ध विशिष्ट क्रिया करू शकणारे विविध प्रतिपिंड निर्माण होतात व ते निरनिराळ्या गटांतील असतात. प्रतिपिंड निर्माण करणाऱ्या कोशिकेचे वैशिष्ट्य म्हणजे एकच कोशिका एकाच प्रकारचे प्रतिपिंड उत्पन्न करीत राहते. शरीरात जे विविध प्रतिपिंड निर्माण होतात त्या प्रत्येक प्रकारच्या प्रतिपिंडाच्या निर्मितीसाठी वेगवेगळ्या रक्तद्रव कोशिका असतात. प्रत्येक प्रतिपिंड रेणूतील विशिष्ट जड व हलक्या शृखलांच्या संरचनेकरिता या कोशिकेकडे विशिष्ट जनुके असतात. जनुकांच्या प्रभावामुळे प्रतिरक्षा प्रथिनातील ॲमिनो अम्लांच्या विशिष्ट अनुक्रमाची आखणी होऊन त्याप्रमाणे निर्मिती होते. सृष्टीतील प्रतिजनांची विषमांगता लक्षात घेता या सर्वांविरुद्ध प्रतिपिंड निर्माण करण्याची शरीराची क्षमता तेवढीच विविधपूर्ण आणि आश्चर्यकारकही आहे. असंख्य व विविध प्रतिपिंडांच्या निर्मितीकरिता तेवढीच विविध जनुके शरीरात असणार. ही जनुके आनुवंशिकतेने मूळ निषेचित फलन अंडात झालेल्या स्त्री-जनन कोशिका असतात की जीवनक्रमात कायिक उत्परिवर्तनामुळे (आनुवंशिकतेने संततीत उतरू शकणाऱ्या शारीरिक वैशिष्ट्यात बदल घडून येण्यामुळे) निर्माण होतात, हे अद्याप न सुटलेले कोडेच आहे.

पहा: प्रतिजन रोगप्रतिकारक्षमता

संदर्भ : 1. Gray, D. F. Immunology, London, 1964.

            2. Guyton, A. C. Textbook of Medical Physiology, Tokyo, 1976.

            3. Stewart, F. S. Beswick, T. S. L. Bacteriology, Virology and Immunology for Students of Medicine, London, 1977.

 परांडेकर, आ. शं. कुलकर्णी, श्यामकांत भालेराव, य, त्र्यं.