रिक्शा : (रिक्षा). माणसांची व मालाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे एक वाहन. जिनरिक्शा या मानवी शक्तिचलित वाहन या अर्थाच्या जपानी शब्दांवरून रिक्शा हे संक्षिप्त रूप प्रचारात आले आहे. रिक्शाचे तीन प्रकार आहेत: (१) दुचाकी रिक्शा (हिलाच जिनरिक्शा ही संज्ञा रूढ आहे), (२) तीन-चाकी सायकल रिक्शा व (३) ऑटोरिक्शा. 

दुचाकी रिक्शा : जपान व चीन या देशांत एकेकाळी जिन्‌रिक्शा या हलक्या आणि माणसाने ओढावयाच्या दुचाकी वाहनाचा मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक वाहन म्हणून वापर होत असे. या वाहनाचा शोध अमेरिकन बॅप्टिस्ट धर्मगुरू जोनाथन गोबल यांनी १८६९ मध्ये जपानमधील योकोहामा येथे लावला, असे म्हटले जाते. तथापि हे वाहन जपानमध्ये १८७० च्या सुमारास प्रथम वापरात आले, हे निश्चित आहे. यूरोपात सतराव्या व अठराव्या शतकात प्रचारात असलेल्या आणि माणसाने ओढावयाच्या फ्रेंच ब्रूएत या दुचाकी वाहनाशी या रिक्शाचे पुष्कळच साम्य असून कदाचित त्यापासून ती उत्पन्न झालेली असावी. 

आ. १. माणसाने ओढावयाची दुचाकी जिन्‌रिक्शाही रिक्शा वजनाने हलकी व मजबूत असून तिला दारे नसतात. खुर्चीसारखा साटा असतो आणि त्यात एक किंवा दोन उतारू बसू शकतात. उतारूंचे ऊन-पावसापासून रक्षण करण्यासाठी उघडता व बंद करता येणारे छप्पर असते. या वाहनाची गोलक धारवेयुक्त (बॉल बेअरिंगयुक्त) चाके मोठी व धावा भरीव रबराच्या असतात आणि संधारणासाठी (धक्के शोषण्याकरिता आधार देण्यासाठी) दुहेरी कमानीच्या स्प्रिंगा वपरतात. पुढे असणारे दोन दांडे धरून पळणारा माणूस ही रिक्शा ओढतो व पुष्कळदा तो दिवसांतून ३० ते ५० किमी. अंतर तोडतो. पूर्व व आग्नेय आशियामधील देशांतील शहरांत जिनरिक्शा विशेष लोकप्रिय होत्या परंतु पुढे बहुतेक आशियार्ड देशांतून त्यांच्या जागी तीन-चाकी सायकल रिक्शा प्रचारात आल्या. मनुष्यळाने वाहन ओढणे हे मानवी प्रतिष्ठेला उचित नाही असेअधिकाऱ्यांना जाणवल्यामुळे कित्येक चिनी शहरांत जिन्‌रिक्शा बेकायदेशीर ठरविण्यात आल्या. भारतात अद्यापही काही शहरांत अशा रिक्शा वापरात आहेत.

आ. २. ख्रिस कॉसग्रोव्ह यांनी तयार केलेली सुधारित तीन-चाकी सायकल रिक्शा : (१) उंची कमी केलेले सुकाणू-दांडे, (२) पायाने दाबावयाला गतिरोधक, (३) दोन दंतचक्रे,(४) वितळजोडकामाने (वेल्डिंगने) जोडलेला नलिकायुक्त तळगाडा, (५) मागील चाकांचा आस, (६) रबरी आधार, (७) अलग करता येणारी उतारू बैठक (यामुळे माल वाहण्यासाठीही रिक्शाचा उपयोग करता येतो).तीन-चाकी सायकल रिक्शा : या रिक्शाला पूर्व व आग्नेय आशियात पेडिकॅब म्हणतात. हिची रचना सायकलप्रमाणेच असते पण मागील बाजूस एका चाकाऐवजी दोन चाके असतात. या मागील चाकांच्या आसावरील स्प्रिंगावर दोन उतारूंसाठी बैठक बसवितात. काही रिक्शांमध्ये उतारूंची बैठक पुढील बाजूस व सायकल मागील बाजूस अशीही रचना असते. बैठक वरून बंदिस्त व बाजूने अर्धवट आच्छादित असते. रिक्शाचालक सायकलीच्या बैठकीवर बसून पायटे ढकलतो व त्यायोगे मागील चाके फिरून वाहन पुढे ढकलले जाते. सायकलच्या सुकाणू-दांड्याने (हँडल बारने) चालकाला रिक्शाला मार्गदर्शन करता येते व तिचे नियंत्रणही करता येते. पूर्व आणि आग्नेय आशियातील कित्येक देशांत सायकल रिक्शा मोठ्या प्रमाणावर वापरात आहेत. भारतात कलकत्ता, नागपूर, अमरावती, हैदराबाद इ. शहरांत अशा रिक्शा वापरात आहेत. काही ठिकाणी खास उपयोगांसाठी (उदा., शाळेतील मुलांची ने-आण करण्यासाठी) या रिक्शांचा वापर करण्यात येत आहे.      

      यांत्रिक कार्यक्षमता, उतारूंची सुरक्षितता वा चालकाचे स्वास्थ या दृष्टीने अस्तित्वात असलेल्या सायकल रिक्शा फार असमाधानकारक आहेत. याकरिता जिनीव्हा येथील टेक्नॉलॉजी फॉर द पीपल या संघटनेने स्वित्झर्लंडमधील काँडॉर बायसिकल कंपनी, बांगला देश बायसिकल वर्क्स कंपनी आणि मीरपूर अँग्रिकल्चर वर्कशॉप अँड ट्रेनिंग स्कूल यांच्या सहकार्याने सुधारित सायकल रिक्शा तयार केली आहे. या रिक्शात चालकाला वाहन सुलभतेने ओढता येण्यासाठी दोन वेगांची (रिक्षा चालू करण्यासाठी आणि उतरणीवरून जाण्यासाठी) हाताने नियंत्रित करता येणारी दंतचक्र पेटी बसविलेली आहे. कोणत्याही प्रसंगी वाहनाची गतिरोधनाची क्षमता वाढविण्यासाठी चाकांना तबकडी गतिरोधक [⟶ गतिरोधक] जोडलेले आहेत. उतारू बसण्याची परंपरागत बैठक उतारूंची सुरक्षितता वाढविण्याच्या दृष्टीने कमी उंचीवर बसविलेली असून एकूण वजन कमी करण्यासाठी ती तंतुरूप काचेची बनविलेली आहे. याखेरीज रिक्शाचे छप्पर वजनाने हलक्या व अधिक टिकाऊ कापडाचे तयार केलेले आहे. ऑक्सफर्ड (इंग्लंड) येथील खिस कॉसग्रोव्ह यांनी अशाच स्वरूपाची, वजनाने हलका सांगाडा असलेली, चालकाचे श्रम कमी करणारी व इतर काही सुधारणांचा समावेश केलेली सायकल रिक्शा तयार केलेली आहे आणि तिला ‘ट्रिक्शा’ असे नाव दिले आहे. 


ऑटोरिक्क्षा : ही रिक्शा चालविण्यासाठी मानवी शक्तीऐवजी पेट्रोलचा वापर करणाऱ्या ⇨अंतर्ज्वलन-एंजिनाचा उपयोग केला जातो. या रिक्शाची रचना पुढे एक चाक आणि मागे दोन चाके अशी तीन-चाकी असते आणि तिचा उपयोग उतारू वा माल वाहण्यासाठी करण्यात येतो. हिच्यात ⇨स्कूटर प्रमाणेच एंजिन, शक्ति-प्रेषण, संधारण, गतिरोधक, सुकाणू वगैरे यंत्रणा असतात. मात्र दंतचक्र पेटीमध्ये वाहन मागे नेण्यासाठी वेगळ्या दंतचक्राची सोय असते व एंजिनाची क्षमता १७५ व सेंमी. असते. या रिक्शात मागे दोन व तीन उतारू व पुढे चालक बसण्याची सोय असते. काही ठिकाणी स्कूटर-यंत्रणेऐवजी मोटारसायकलीला जोडलेल्या व चार उतारू बसू शकतील अशा गाडीचा उपयोग करतात. चालक व उतारू यांच्यामध्ये कठडा आणि खाली पोलादी पत्र्याचा पडदा बसविलेला असतो. चालकाचे व उतारूंचे ऊन-पावसापासून रक्षण करण्यासाठी कॅनव्हासाचे किंवा पत्र्याचे छप्पर असते. 

आ. ३ ऑटोरिक्शाचा तळगाडा व नियंत्रक साधने : (१) पारदर्शक वातरोधक, (२) एंजिनाचा वेग बदलण्याची मूठ, (३) पुढील गतिरोधकाची तरफ, (४) पुढचा मुख्य दिवा, (५) पुढील संधारण, (६) पेट्रोलची टाकी व तोटी, (७) पायाने दाबावयाच्या गतिरोधकाचा पायटा, (८) आरंभकाची तरफ (डाव्या बाजूस वसलेली), (९) गाडी मागील दिशेस नेण्याच्या दंतचक्राची तरफ, (१०) ध्वनिशामक, (११) हाताने दाबावयाच्या गतिरोधकाचा समायोजक (जुळणी करणारे साधन), (१२) घर्षण कमी करणारे साधन, (१३) परिपीडन दंड (स्प्रिंग), (१४) भार वाहणारे तळगाड्याचे घटक, (१५) चालकाची बैठक (तिरपी करता येणारी), (१६) हत्यारांसाठी पेटी, (१७) हाताने दाबावयाच्या गतिरोधकाची तरफ, (१८) वेगदर्शक, (१९) वातरोधक पुसणारे साधन, (२०) प्रज्वलन स्विच, (२१) पुढील मुख्य दिव्याचा स्विच, (२२) सुकाणू अडकवण (कुलूप).

मोटार टॅक्सीपेक्षा ऑटोरिक्शाच्या भाड्याचे दर कमी असल्याने भारतातील अनेक लहानमोठ्या शहरांत (उदा., मुंबईची उपनगरे, पुणे, कोल्हापूर, नागपूर इ.) ऑटोरिक्शा लोकप्रिय असून मोठ्या प्रमाणावर वापरात आहेत. मोटार टॅक्सीप्रमाणे ऑटोरिक्शाच्या मधल्या कठड्यावर ⇨गाडीभाडेमापक  बसवितात. 

भारतात पुणे येथील बजाज ऑटो व मुंबई येथील ऑटोमोबाईल प्रॉडक्टस ऑफ इंडिया या ऑटोरिक्षा तयार करणाऱ्या दोन प्रमुख कंपन्या आहेत. या कंपन्या तीन चाकी वाहनाचा साटा तयार करून त्यावर मागणीप्रमाणे उतारू किंवा माल वाहण्याकरिता सांगाडा   बांधतात. भारतातील ऑटोरिक्शांचे काही वर्षांचे उत्पादन कोष्टक क्र. १ मध्ये आणि सुट्या भागांच्य पूर्ण संचाच्या रूपात भारतातून निर्यात झालेल्या ऑटोरिक्शांची आकडेवारी कोष्टक क्र. २ मध्ये दिली आहे. बजाज ऑटो या कंपनीने बांगला देश, क्यूबा, डोमिनिकन प्रजासत्ताक, कुवेत, लायबीरिया, श्रीलंका, सूदान, टांझानिया, अमेरिका, प. जर्मनी वगैरे देशांना आँटोरिक्शा निर्यात केलेल्या असून निर्यात केलेल्या वाहनांची संख्या १९८४-८५ मध्ये ८१८ १९८५-८६ मध्ये ३,००५ व १९८६-८७ मध्ये २,५२९ होती. 

कोष्टक क्र. १. भारतातील ऑटोरिक्शांचे उत्पादन.           कोष्टक क्र. २. सुठ्या भागांच्या पूर्ण संचांच्या रूपातीलऑटोरिक्शांची भारतातून                                                                                                                                                                                            झालेली निर्यात.

वर्ष

उत्पादन

वर्ष

निर्यात

१९५५

१९७५

१,४००

१९६०

४९६

१९७६

२,५००

१९७०

४,२२९

१९७७

२,३००

१९८०

२६,५१९*

१९७८

२,८००

१९८१

२४,८३३*

१९७९

१,०१०

१९८२

३०,५८५*

१९८०

४,६२५

१९८३

३७,६५६*

१९८१

२,०५०

१९८४

४१,८३६

१९८२

३००

१९८५

४९,२६७

१९८३

६०

१९८६

५३,०९४

 

[* यात सुट्या भागांच्या पूर्ण संचांच्या रूपातील उत्पादनाचा समावेश आहे].

हाटे, ज. ना. भदे, व. ग.