वळंज : हा मासा सिल्युरिडी मत्स्यकुलातील असून याचे शास्त्रीय नाव कॅलिकस बायमॅक्युलेटस किंवा ओमपोक बायमॅक्युलेटस असे आहे. याला वांझ असेही म्हणतात. याचा प्रसार श्रीलंका, भारत, थायलंड, म्यानमार (ब्रह्मदेश), इंडोनेशिया येथे गोड्या पाण्यात आहे. भारतात तो मोठ्या नद्यांत विशेषेकरून वळंज (कॅलिकस बायमॅक्युलेटस)आढळतो. हा तमिळनाडू, मलबार किनारा व कावेरी नदीच्या कालवे क्षेत्रात जास्त करून आढळतो. याचे शरीर एकदम चपटे असते. पृष्ठपक्ष (पाठीवरील पर) लहान असून खूप लांब तळ असलेला गुदपक्ष (ढुंगणावरील पर) पुच्छपक्षाच्या (शेपटीच्या पराच्या) थोडा पुढे संपतो व तो त्याच्याशी जुळून जात नाही. खोल विभाजित पुच्छपक्षाचा वरचा भाग काहीसा मोठा असतो. मिशांच्या दोन जोड्या असतात. वरच्या जबड्यावरील जोडी लांब असून मागे वळलेली असताना ती अधरपक्षाच्या (खालच्या पराच्या) बुडाच्या सुरुवातीपर्यंत पोहोचते. खालच्या जबड्यावरील जोडी खालच्या ओठाच्या कडेपासून सुरू होते व ती खूपच आखूड असते. पिले काचेसारखी पारदर्शक असतात. प्रौढ मासे गर्द करडे हिरवे ते तपकिरी असून दोन्ही बाजूंना निळसर चमक असते. खालची बाजू फिकट रंगाची असते. पृष्ठपक्ष व अंसपक्ष (छातीवरील पर) यांच्यामध्ये एक मोठा काळा, फिकट कडा असलेला ठिपका असून त्यापासून गर्द ठिपक्यांची ओळ किंवा सलग पट्टी निघून शेपटीच्या बुडापर्यंत जाते. सर्व शरीर व गुदपक्ष यांवर बारीक काळे ठिपके असतात. बहुधा पुच्छपक्षाच्या बुडावरून गर्द पट्टा जातो.

चपळ व दिनचर लहान वळंज मासेच वनस्पती व मुळांचे जाळे असलेल्या मोठ्या, ऐसपैस भांड्यात ठेवतात. पाणी फार खोल नसते व त्याचे तापमान २० –२५ से. ठेवतात. नेहमी यांचे लहान गट ठेवतात. एकाकी मासा मंद हालचाली करतो. मलबार किनाऱ्यावर याची लांबी ५१ सेंमी.पर्यंत होते. उत्तर बंगालमध्ये तो १३-१५ सेंमी. लांब होतो. तो उत्तम खाद्य मत्स्य आहे.

काळी वांझ (कॅ. पॅबो) ही जाती दिसण्यास वळंजसारखीच असते परंतु तिचा पुढचा भाग काहीसा रुंदट असतो. वरच्या जबड्यावरील मिशा आखूड असतात. पिलाचा रंग तपकिरी ते काळसर असून शरीराच्या वरच्या अर्ध्या भागावर गर्द ते काळी नक्षी असते, तर खालच्या अर्ध्या भागावर काळे ठिपके असतात. पर तपकिरी रंगाचे असतात. गुदपक्षाच्या तळाशी गर्द रंगाचे ठिपके असतात.

काळ्या वांझची लांबी १२ सेंमी.पर्यंत असते व प्रसार ईशान्य भारत व गंगा-यमुनेचे खोरे या भागात मर्यादित आहे. पौष्टिक अन्न म्हणून याचे बरेच महत्त्व आहे. उत्तर बंगालमध्ये विशेषतः आजारी माणसासाठी तो चांगला मानतात. याची फक्त पिलेच जलपात्रात ठेवतात.  

जमदाडे, ज. वि.