बरुआ, बिरिंचीकुमार : (१९१०-१९६४). प्रसिद्ध असमिया कथा-कादंबरीकार, साहित्यसमीक्षक व विद्वान. जन्म नौगाँग येथे. त्यांचे आरंभीचे शिक्षणही नौगाँग येथेच झाले. नंतर कलकत्ता विद्यापीठातून पाली साहित्य हा विषय घेऊन ते एम.ए. व लंडन विद्यापीठातून पीएच्.डी झाले.

‘बीन बरुआ’ ह्या टोपणनावाने त्यांनी आपले सुरूवातीचे लेखन केले. विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या कथांनी वाचकांचे लक्ष वेधून घेतले. पट-परिवर्तन (१९४८) आणि अधोनिबाई हे त्यांचे कथासंग्रह होत. पहिल्या संग्रहात महाविद्यालयीन जीवनाशी निगडीत असलेल्या भावुक प्रेमकधा असून, दुसऱ्यात आसामच्या ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण आहे. दुसऱ्या महायुद्धातनंतर ते कथेकडून कादंबरीकडे वळले. त्यांच्या जीवनर बाटत (१९४५) व सउजी पातर काहिनी (१९५९) ह्या दोन कादंबऱ्या महत्वाच्या मानल्या जातात. पहिलीत त्यांनी आसामचे ग्रामीण जनजीवन समर्थपणे चित्रित केले असून, दुसरीत चहामळ्यातील मजुरांचे जीवन मोठ्या सहानुभूतीने शब्दांकित केले आहे.

असमिया कथासाहित्य (१९५०), असमिया भाषा आरु साहित्य (१९५८), असमर लोकसंस्कृति (१९६१), काव्य आरु अभिव्यंजना हे त्यांचे उल्लेखनीय समीक्षाग्रंथ होत. असमिया कथासाहित्यमध्ये त्यांनी असमिया गद्याचा आरंभ व विकास यांची चिकित्सा केली असून असमिया भाषा आरु संस्कृतीमध्ये त्यांनी त्यावेळेपर्यंत उपेक्षित ठरलेल्या आसामी जीवनाच्या विविध अंगांवर व संस्कृतीवर लिहिलेले स्वतंत्र लेख आहेत. असमर लोकसंस्कृतीमध्ये त्यांनी असमिया लोकसंस्कृतीचे सखोल विवेचन केले असून ह्या ग्रंथास १९६४ चा साहित्य अकादेमीपुरस्कारही लाभला. काव्य आरु अभिव्यंजनामध्ये क्रोचे तसेच इतर इंग्रजी, हिंदी व बंगाली समीक्षकांच्या विचारांची त्यांनी मीमांसा केली आहे. असमीज लिटरेचर (१९६४) हा त्यांचा साहित्येतिहासपर इंग्रजी ग्रंथ साहित्य अकादेमीने प्रसिद्ध केला. यांशिवाय अ कल्चरल हिस्टरी ऑफ आसाम (१९५१), स्टडीज इन अर्ली असमीज लिटरेचर (१९५३) हे त्यांचे इतर दर्जेदार इंग्रजी ग्रंथ होत.

त्यांनी काही प्राचीन दुर्मिळ ग्रंथांचेही उत्कृष्ट संपादन केले आणि त्यांना अभ्यासपूर्ण चिकित्सक प्रस्तावनाही लिहिल्या. या दृष्टीने त्यांचे अंकिया नाट (१९४०), महामोह काव्य, श्रीराम अत आरु रमानंदर गीत हे संपादित ग्रंथ विशेष महत्वाचे मानले जातात. सर्जनशील लेखक, चिकित्सक साहित्यसमीक्षक आणि कुशल संशोधक-संपादक म्हणून त्यांना असमियात महत्वपूर्ण स्थान आहे.

सर्मा, सत्येंद्रनाथ (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)